थेंबे थेंबे तळे साचे - पाणी बचतीचे उपाय

यावर्षी अजिबातच पाऊस झालेला नाही आणि आता तो गणपतीत तरी पडेल, नवरात्रात तरी पडेल या आशेवर जगण्यातही फारसा अर्थ नाही. आतापर्यंत जो काही पाणीसाठी झालेला आहे तोच पुन्हा पाऊस पडेपर्यंत पुरवुन वापरणे याशिवाय दुसरा उपाय नाही. दुर्गम भाग किंवा जिथे पाणी कमी आहे तिथे लोक आधीपासुनच कमी पाण्यात दिवस भागवतात कारण जवळपास दरवर्षी तिथे पाण्याचे दुर्भिक्ष असते. मात्र मुंबईसारख्या शहरात फारसे पाणी बचतीचे उपाय करावे लागत नाहीत. इतर शहरातले फारसे काही माहित नाही मात्र मोठ्या शहरात सहसा दिवसभरातुन एखाद वेळा तरी पाणी उपलब्ध होत असावे .

पण यावर्षीची दुष्काळी अवस्था पहाता ज्या ज्या शहरांत/ गावात रोज काही तास किंवा अगदी २४ तासही पाणी उपलब्ध आहे त्यांनीही स्वतःला पाणी बचतीची सवय लावुन घ्यायला हवी. इथे पाणी वाचलं तर ते दुसर्या ठिकाणी जिथे कमी उपलब्धता आहे तिथे देता येईल असे वाटते.

रोजच्या कामात कुठे पाणी वाचवता येईल , कुठे कमी पाण्यात भागवता येईल त्याबद्दलच्या उपायांची चर्चा या धाग्यात करुयात.

प्रत्यक्ष पाणी बचत

#
बोअरवेलचे पाणी उपलब्ध आहे म्हणुन हवे तितके उपसण्यात अर्थ नाही. त्यामुळे आधीच कमी असलेली पाण्याची पातळी अजुनच कमी होईल.

# गाडी धुण्यासाठी पाईप लावुन फवारा मारुन नमारुन, बादलीत पाणी घेऊन धुतले तर खुप पाणी वाचते.

# घराची फरशी, बाल्कनी, खिडक्या भरपुर पाणी वापरुन न धुता, पुसुन घेता येईल.

#
पाण्याच्या नळासाठी एक जोडणी मिळते, त्यामुळे पाण्यात हवा मिक्स करुन पाण्याचा फ्लो जास्त वाटतो. ते जोडुन घ्यावे त्यामुळे नळ उघडल्यावर कमी पाणी वाया जाते.

#
भाज्या धुतलेले सगळे पाणी बादलीत साठवुन ठेवुन झाडांना घालावे किंवा टॉयलेटमधे ओतण्यासाठी ठेवता येईल.

#
भांडी कमीत कमी पाण्यात घासण्यासाठी वाहत्या नळाखाली न धुता बादली / टब मधे पाणी घेऊन धुता येतील.

#
जेवल्यावर लगेच एखाद्या भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यातच सगळ्या ताटं, वाट्या व इतर भांडी यांचे खरकटे काढुन टाकता येईल. हे वाहत्या पाण्याखाली केल्यास जास्त पाणी लागते.

#
कपडे धुण्यासाठी शक्यतो वॉ. म. टाळता येईल. दुसरा उपाय नसल्यास एकावेळे दोन / तीन दिवसाचे कपडे साठवुन धुतले तर कमी पाणी वाया जाईल.

#
अगदीच पाणी टंचाई येईल तेव्हा मशिन मधे तीन वेळा पाणी टाकुन कपडे विसळले जातात. त्यातले दुसर्या आणि तिसर्या वेळेचे पाणी एखाद्या ड्रम मधे साठवल्यास ( हे वेळखाऊ काम आहे मात्र ) टॉयलेट्मधे टाकायला , कपडे भिजवायला, भांडी पहिल्यांदा विसळुन घ्यायला वगैरे वापरता येईल. साबणाचा अंश असल्याने हे झाडांना वापरता येणार नाही.

#
जेवताना ग्लासमधे घेतलेले, वॉटरबॅग मधुन उरलेले पाणी सुद्धा फेकुन न देता हात धुणे किंवा झाडांना घालणे यासाठी वापरता येईल

# घरी किंवा ऑफिसमधे स्प्लिट एसी असेल तर त्या एसीच्या पाईपमधुन पाणी बाहेर येते ते एका बादली साठवुन वापरता येईल. हे खरेतर अगदी शुद्ध, म्हणजे हवेतुन आलेले पाणी असते. मात्र एसीचे पाईप साफ नसल्याने पाणीही खराब होते.

#
घरातल्या सगळ्यांना वेळोवेळी बोलुन सध्याची पाण्याची परिस्थिती आणी दुष्काळ याबद्दल बोलुन पाणी बचतीसाठी उद्युक्त करायला हवे. तसेच घरकामाला येणार्‍या बायकांनाही याबाबत सांगत राहुन, पाणी कमी वापरायचे सुचवायला हवे.

# ग्रे वॉटर ट्रिटमेंट प्लांट इमारतीत बसवता येईल, हा खर्चिक उपाय आहे शिवाय जागाही लागते.

अप्रत्यक्ष पाणी बचत करताना अन्न वाया न घालवणे हा खुप मोठा उपाय आहे. या वर्षी काही पिकलंच नाही तर आपण सगळेच काय खाणार त्यामुळे अन्नधान्या आयात केले तर त्याच्या एकुण खर्च वाढणार.
तसेच वीजेची बचत करणे मह्त्वाचे आहे. हायड्रोलिक प्लांट पासुन वीजनिर्मिती यावर्षी अगदी कमी होण्याची शक्यता आहे.

अजुन काही उपाय असतील तर इथे लिहा.

अधिकचे सुचवलेले उपाय
# तोंड धुताना वगैरे नळ सोडुन न ठेवता मग मधे पाणी घेउन वापर॑णे

#सोसायटी मधे / गावात इतरत्र काही कारन्जी वगैरे असतील तर बन्द ठेवावी

#घरात अथवा सोसायटी मधे पाणी वाहुन जात नाही ह्याची काळजी घ्यावी

#आपण तांदळाला सर्रास बोरीक पावडर लावतो. मग भात करायचा वेळी ३-४ पाण्याने तांदुळ चोळुन धुतल्याशिवाय स्वच्छ वाटत नाही. हाही पाण्याचा अपव्यय. तर बो.पा.अ ऐवजी कडुनींबाची पाने, तिरफळ , सुकलेली तिखट मिरची वापरावी

#फिरकीचे नळ सुरू करायला आणि बंद करायला त्रासदायक असतात त्यामुळे बरेचदा ते बंद करण्याचा कंटाळा केला जातो. या उलट इतर प्रकारचे नळ पटकन वर खाली किंवा उजवीकडे/डावीकडे फिरवून बंद होतात. अगदी चूळ भरताना तोंडात पाणी घेतल्यावर नळ पटकन बंद करून चूळ भरता येते. फिरकीच्या नळ असेल तर नळ बंद करण्याचा वेळ चूळ भरण्याच्या वेळेपेक्षा जास्त असतो त्यामुळे नळ उघडेच राहतात. त्यामुळे शक्य असेल तर नळ बदलून घ्या.

#चांगला शावर असेल तर पाणी बादलीपेक्षाही कमी लागते , वेळ आणि पाणी दोन्ही वाचते.

#बेसिनवर एक ग्लास ठेवावा. त्यात पाणी घेऊन तोंड धुणे, चूळ भरणे केल्यास कमी पाणी पुरते.

#भाज्या, फळं धुताना मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात धुणे. वाहत्या पाण्याची गरज असल्याशिवाय ते वापरू नये.

#चपला, बूट घालून घरात येणं टाळलं तर लादीसुद्धा रोज पुसायची गरज नसते. सध्या पाणी कमी आहे तर दोन-चार दिवसांतून एकदा पुसून चालेल. किंवा स्विफरसारखे मॉप्स मिळत असतील तर ते अर्धा लिटर पाण्यात लादी पुसून काढतात.

#शक्य असल्यास टॉयलेट्स बदलणे. दोन बटणांचे फ्लश वापरणे.

#टॉयलेट फ्लश मधे दोन लिटर पाण्याच्या बाटल्या भरुन ठेवल्यास प्रत्येक फ्लश वेळेस दोन लिटर पाणी कमी वापरले जाउन पाण्याची बचत होते

#ठेवलेले पाणी शिळे होते हा समज फारसा योग्य नाही. जिथुन पाणि पुरवले जाते त्या मोठ्या टाक्यात, इमारतीमधल्या टाक्यात पाणी साठवुन मगह आपल्याकडे आलेले असते. त्यामुळे कालचे पाणी फेकुन न देता त्याचा वापर करा.

Keywords: 

चर्चाविषय: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle