सक्युलंट/ कॅक्टसची काळजी आणि निगा

सक्युलंट/ कॅक्टसची काळजी आणि निगा

सक्युलंट्स माझ्या घरात पहिल्यांदा आली ती या वर्षीच. तोपर्यंत या झाडांना मी सरसकट कॅक्टस म्हणायचे.
पण या गोड झाडांनी चांगलाच तग धरला माझ्या बागेत. छान रुजली, मोठी झाली. पहिल्यांदा ही झाड जागवताना, मोठी करताना चुकत माकत शिकत गेले. काल सक्युलंट प्लांटर्सच्या माझ्या धाग्यावर शूम्पीने सक्युलंट्सच्या काळजीबद्दल विचारलं. त्या अनुषंगाने माझा अनुभव लिहिते.

सक्युलंट जगावीत आणि चांगली वाढवीत असं वाटत असेल तर पहिली गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे त्यांचा ओरिजिनल हॅबिटॅट.
खूप कमी पाणी आणि प्रचंड कोरडं हवामान हे त्यांचं आदर्श वातावरण आहे. त्यामुळे त्याला सिम्युलेट करणारं वातावरण जर आपण तयार करू शकत असलो तर सक्युलंट्स जगवण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही.
या दिवसात सक्युलंटस वाढवताना मला ज्या गोष्टी कळाल्या त्या या

१. पाणी:
सक्युलंट्सची पाने पाणी धरून ठेवतात आणि त्यामुळे ते बराच काळ कमी पाण्यात तग धरू शकतात. त्यामुळे सक्युलंट्सना पाणी देताना विचारपूर्वक द्यावं. आपल्या बाकी झाडांना जसं पाणी ओततो तसं अजिबात द्यायचं नाही. पाणी जास्त झालं तर सक्युलंट्स मरून जातात. पाणी देताना माती पूर्ण वाळलेली हवी. पाणी फवारायचं किंवा शिंपडायचं. तेही आठवड्यातून एकदा. हा कालावधी थंड प्रदेशात रहात असाल तर अजून वाढवू शकता. कुंडीतली माती गच्च ओली होऊ द्यायची नाही.

ऊन :
सक्युलंटसना ऊन हवं असतं पण डायरेक्ट सूर्यप्रकाशात ठेवणं टाळावं. भरपूर सूर्यप्रकाश येणाऱ्या खिडकीत काचेच्या आत सक्युलंट्स ठेऊ शकता. किंवा त्या खिडकीपासून काही अंतरावर ठेवावीत, मी अशी ठेवली आहेत.

पानांची निगा :
सक्युलंट्सची खालची पाने काही काळाने वाळतात. ती अलगद हाताने काढून टाकावीत. जर नाही काढली तरी चालतील, काही दिवसांनी ती आपोआप गळून पडतात.

खत/रुटिंग हार्मोन्स:
काही लोक व्यावसायिक तत्वावर सक्युलंट्स लावतात ते त्यांच्या पटकन वाढीसाठी रुटिंग हार्मोन्स वापरतात. पण माझं वैयक्तिक मत असं कि असं करणं टाळावं. तुमच्या घराचं वातावरण आणि इतर गोष्टींना सक्युलंट्स खूप छान ॲडजस्ट होतात, त्यांना तसं होऊन द्यावं.

प्लांटर्स/ कुंड्या:
सक्युलंट्सना जास्त मोठ्या कुंड्यांची गरज नसते. पण या झाडांचे प्लांटर्सहि यांच्यासारखेच वेड लावणारे असतात. मिनी प्लांटर्स मध्ये लावलेली सक्युलंट पिल्ले खूप मस्त दिसतात.

हा मी बनवलेला एक मिनी सिरॅमिक कप आणि त्यात लावलेलं मिनी सक्युलंट

Keywords: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle