भाग २ - भीमताल ते चौकोरी

पहिला स्टाॅप होता तो भीमताल!

M2bheemtaal.jpg

वनवासाच्या दरम्यान द्रौपदी तहानेने व्याकुळ झाली होती. भीमाने गदा मारून ज्या ठिकाणी पाणी काढलं तो हा तलाव म्हणजे भीमतालेश्वर! टीक मार्क करत पुढे निघालो.

दुसराही स्पाॅट होता तो ही टीक मार्कवालाच. नौकुचिया ताल म्हणजे नऊ कोन असलेला तलाव. तलावाला प्रदक्षिणा मारत पुढे निघालो.

M2nauchukiyataal.jpg

दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. 'अच्छी जगह खिलाता हूं' म्हणत विनोदने 'दो बाटी'पाशी गाडी थांबवली. वेगळा व स्थानिक पदार्थ 'कापा' मागवला. कापा म्हणजे आपला आळू बरं का! आलु/पनीर पालकसदृष्य भाजी! संपूर्ण ट्रीपच्या दरम्यान इथे घेतलेलं पहिलं व शेवटचं मेन्यु कार्डवालं जेवण! बाकी रोड साईडला स्थानिक हाॅटेलातच थाळी खात होतो, त्यामुळे विविध प्रकारच्या जेवणाचा आस्वाद घेता आला. साधं, घरगुती चवीचं चुलीवरचं जेवण!

M2kapabhaji.jpg
कापा सब्जी

मठपालजींच्या लोकसंस्कृती संग्रहालयाला परत भेट द्यायचा योग वर्षभरातच येईल असं वाटलं नव्हतं, म्हणून आनंद झाला, पण अति पावसाने त्यावर पाणी पडलं. त्यांची पेंटिंग्ज www.museumhimani.com वर पाहू शकता. पुढचा टप्पा होता कैची (कातरी)च्या आकारावरून पडलेलं नाव कैचीधाम.

करो ना वृक्षोंका अपमान वो देते हमें जीवनदान,
जब जब पेड कटता है तब तब जीवन घटता है

कैचीधामला करौलीबाबा आश्रम फारच सुंदर आहे. श्री एम (सिध्द अध्यात्मिक गुरू)ह्यांच्या पुस्तकात करौलीबाबांचा उल्लेख नुकताच वाचण्यात आल्यामुळे त्यांच्याबद्दल थोडी माहिती होती. बरीच लोकं ध्यान करत तिथे बसली होती. आम्हीही तिथल्या शांतीचा अनुभव घेत थोड्या वेळ बसलो. तिथून थोड्या अंतरावरच एक स्पाॅट होता 'मेंढक राॅक'!

M2mendhakRock1.jpg M2mendhakRock2.jpg

उत्तर गंगा नदीत एक मोठा खडक आहे ज्याचा आकार मेंढकासारखा आहे. स्वच्छ व नितळ पाणी! खाली उतरून मनसोक्त स्वच्छ पाण्यात खेळलो. विनोद वरच बसलेला असताना दिल्लीहून आलेली मुलं दारू पार्टी करणार, ह्याचा सुगावा त्याला लागला. त्याने एक शून्य शून्य फिरवला पण लागला नाही. हे तो आम्हाला गाडीत सांगत असतानाच थोडं पुढे गेल्यावर पोलिस दिसला. पोलिसाला त्याने त्या मुलांच्या प्लानबद्दल सांगितलं. त्या पोलिसाच्या आविर्भावावरून तो काही ॲक्शन घेईल, असं आम्हाला वाटलं नाही. असा अविश्वास व्यक्त करताच तो म्हणाला "म्याडम नही, ऐसा हो नही सकता! वो जरूर करेगा! गलत काम को रोकना उसका ड्यूटी है! हमारे उत्तराखंडमें बहुबेटियाॅं सुरक्षित है और उनको सुरक्षित रखना हर एक नागरिक की जिम्मेवारी है|" पोलिसाने पुढे काही केलं की नाही कळायला मार्ग नव्हता पण विनोदचा पोलिसांवर असलेला विश्वास, देशाभिमान व त्याची सजगता पाहून भरून आलं.

अल्मोड्याला एक रात्र मुक्काम होता. TRH च्या अलिकडेच रामकृष्ण मठ आहे. तिथल्या स्वामी तुर्यियानंदांच्या समाधीचं दर्शन घेतलं, शांत बसलो. खरं तर तिथे बसून स्वामीजींबद्दल ऐकायचं होतं पण संकोचापायी कुणाशी बोललो नाही. प्रसन्न जागा! आश्रमात आधी कळवलं तर राहायची सोय होते. पुढच्या वेळी मठातच राहायचं ठरवून टाकलं अन् TRH मध्ये आलो. TRH मध्येच राहायचं कारण म्हणजे त्यांची निसर्गरम्य लोकेशन्स! विमान मध्यरात्री, भल्या पहाटे दिल्ली विमानतळ, विमानतळ ते रेल्वेस्टेशन ह्या सगळ्या धावपळीत सलग दोन तास झोप मिळाली नव्हती आणि त्यात दिवसभराची भटकंती पण अजिबात थकवा जाणवत नव्हता. तिथल्या स्वच्छ व निर्मळ हवेचा परिणाम! पहिला दिवस घंटारवात, आनंदात व समाधानात पार पडला होता.

M2suryoday.jpg

ताजीतवानी सकाळ ! साडेचार वाजता स्वच्छ उजाडलेलं होतं.
आदल्या दिवशी विनोदने प्रेमळ ताकीदच दिली होती, सकाळी लवकर निघालो नाही तर मला जी जी ठिकाणं दाखवायची आहेत म्हणजे जी तुम्ही पाहिलीच पाहिजेत, ती तुम्हाला दाखवू शकणार नाही.

चहा, ब्रेड बटर खाऊन बरोबर सहा वाजता गाडीत बसलो. पहिलं ठिकाणं डाना गोलू! हिमालयात घंटी बांधून मन्नत मागण्याची प्रथा आहे. छोटंसं ठिकाण पण इथे घंटी न चढवता 'बिडी-माचिस' चढवतात. काल वाटेत विनोदने 'गोलू देवता'ची कहाणी सांगितली होती. गोलू बाबा सिध्दी प्राप्त आदर्श, न्यायप्रिय राजा होता. एक माणूस बिडी पित बसलेला गोलू बाबांना वेष बदलून गस्त घालतांना दिसला. दोघं मिळून बिडी प्यायले. त्या गरीब माणसाला मदत केली. जेव्हा त्याला गोलू बाबाची खरी ओळख कळली तर तो बिचारा घाबरून गेला. तेव्हा गोलू बाबा म्हणाले, 'इथे एक मंदिर बांध.' त्या माणसाने तिथे एक मंदिर बांधलं. त्यांच्या दोघांच्या भेटीची आठवण म्हणून 'बिडी-माचिसची' भेंट चढवतात. पुढे गेल्यावर आहे मुख्य गोलू बाबा मंदिर!

M2Golubaba1.jpg M2Golubaba2.jpg
घंटा च घंटा!

आमच्या मारुती डिझायरमध्ये धक्का बसला की नादमधुर घंटी वाजायची. त्याबद्दल विनोद सांगू लागला, "म्याडमजी, ये गाडी मुसलमान की हो कर भी उसने घंटी लगायी है, बहोत शुभ होती है! म्याडमजी, आप भी गोलू बाबा के मंदिर में घंटी जरूर लेना, उसे अभिमंत्रीत कर के आप भी अपने गाडी में टांग देना और आप की जो भी मनोकामना होगी, वह कागज पे लिखकर टांग दिजीए, अगर जमीन जायदाद झगडा हो, कोई काम रूका हो, तो लिख दिजीए, वो सोल्व हो जाएगा! कई लोग तो अपनी फिर्याद स्टॅम्प पेपर लिख देते है और ऐसी श्रध्दा, मान्यता है कि गोलूबाबा न्याय देते है ...."
मुलाच्या गाडीतली मुंबईच्या रस्त्यावर घंटी किणकिणेल पण अमेरिकेतल्या रस्त्यावर मुलीच्या गाडीतली किणकिणायची शक्यता अगदी न के बराबर तरी विनोदच्या आग्रहाखातर दोन घंट्या घेऊन मंदिरात प्रवेश केला. अबब! किती त्या घंट्या! प्रवेशद्वार ते मुख्य मंदिराच्या आजूबाजूला घंट्याच घंट्या आणि कागदंच कागदं! चिठोऱ्या, कोऱ्या कागदांवर, रेघांच्या कागदांवर अनेक लिपींमध्ये आणि हो! विनोदने म्हटल्याप्रमाणे स्टॅम्प पेपरवर मांडलेल्या असंख्य फिर्यादीच फिर्यादी! गाभाऱ्यात एक कुटुंब आपली फिर्याद प्रत्यक्षच मांडत होतं.... लडकी की शादी नही हो रही है वै... तिथल्या पुजाऱ्याने सांगितलं की इथे अगदी डिस्ट्रीक्ट ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश फैसला सुनवायच्या आधी गोलू बाबाचे आशीर्वाद घ्यायला येतात.

भारतात कुठेही फिरलो तर भक्ती व श्रध्दा ठायी ठायी दिसते इथे जरा जास्त! श्रध्दा व भक्तीच्या बळावरच इथल्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आनंदाने जगत असावीत इथली लोकं! एपिक चॅनेलवर पाहिल्यापासून जागेश्वर पाहायची अगदी तीव्र इच्छा होती. पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असलेली छोटी मोठी जवळपास सव्वाशे मंदिरं आहेत इथे. तिथे एक म्युझीयम आहे पण शुक्रवारी बंद असल्याने बघता आलं नाही. आजकाल सर्रास मंदिरात जे दृश्य दिसते ते इथेही पाहायला मिळालं फरक इतकाच होता पंड्ये मागे मागे फिरून बेजार तर करत नव्हते आणि आज तरी त्यांना गरजही नव्हती. बरेच मोठे मासे गळाला लागलेले दिसत होते कदाचित आमच्या चेहऱ्या व देहबोलीवरून त्यांना अंदाज आला असावा आम्ही कुठल्या प्रकारचे मासे आहोत ते! ऑफिशियल गाईड काही दिसले नाही,आम्ही पण फार शोधायच्या भानगडीत पडलो नाही. गुगलबाबा, विकीदादा जिंदाबाद ! 'जागनाथ'कडे गरमागरम भरपेट नाश्ता केला तो तर स्वादिष्ट होता पण वाखाणण्याजोगी होती तिथली स्वच्छ वाॅशरूम! बिलाबरोबर त्याचीही पोचपावती दिली. आम्ही गाडीत बसल्यापासून सगळी जबाबदारी विनोदवर टाकून मोकळे झालो होतो. आम्ही केलेल्या ह्या सत्कर्माची प्रचिती पहिल्या दिवसापासून येत होती. छोट्या छोट्या गोष्टी असोत, किंवा अद्भूत गोष्टी असो, की फोटो पाॅईंट असो, जिथे जिथे तो गाडी थांबवत होता आम्ही पण मनापासून दाद देत एन्जाॅय करत होतो. दर वेळी त्याचं एक पालुपद असायचं "आराऽऽऽमसे जायेंगे... कोईई जल्दबाजी नहीं, प्रक्रिती का आनंद लेते हुये जायेंगे!" आम्ही पण शहाण्या पर्यटकांप्रमाणे आज्ञापालन करत होतो.

M2Jageshwar.jpg


जागेश्वर

जागेश्वर मंदिराच्या बाजुलाच दंडमहादेवाचं मंदिर होतं. मला वाटलं दंड म्हणजे काठी घेतलेला महादेव की काय पण दंड म्हणजे शिक्षा/सजा झालेला महादेव. त्याची पण काहीतरी कथा सांगितली होती आता आठवत नाहीये.

मला इथली गोष्ट मनापासून आवडली होती ती म्हणजे देवळात शांत बसता येत होतं. कोणी वस्सकन अंगावर येत नव्हतं. कोल्हापूर, जेजूरी, नरसोबावाडीला आलेला हा ओरडण्याचा व गर्दीचा अनुभव अगदी ताजा होता, त्यामुळे की काय, हा सुखद अनुभव अधिक प्रकर्षाने जाणवला व आनंदित करून गेला. देवळाच्या मागे छोटीशी नदी होती त्यात मस्त पाण्यात पाय सोडून बसलो. नैसर्गिकरित्या फिल्टर झालेलं पाणी ओंजळीत घेऊन प्यायलो... थंड, अवीट गोडीचं रसायनमुक्त पाणी! अमृत! अश्या अनेक स्त्रोतातून विनोद आमच्या दिवसभराच्या पाण्याची तजवीज करून ठेवत होता. पूर्ण प्रवासात पाण्यासाठी एकही दमडी खर्च केली नाही.

M2DandMahadev.jpg M2DandMahadev1.jpg


दंडमहादेवाचं मंदिर

पुढचा टप्पा लांबचा होता - पातालभूवनेश्वर! जाण्या आधी मध्ये एक थांबा होता कुमाऊं रेजिमेंटनी बांधलेल्या महाकाली मंदिराचा! एकोणीसशे बासष्ट (जेव्हा मी संख्या लिहीतेय तेव्हा तेव्हा ही आता कशी लिहील्या जाईलचा विचार येतोय :ड ) च्या चीनच्या युध्दात कुमांऊ रेजिमेंटने देवीला साकडं घातलं होतं व चीन मागे हटला होता, म्हणून त्यांनी हे मंदिर बांधलंय. ज्यांनी ज्यांनी हे मंदीर बांधायला सहकार्य केलं त्यांची नांवे भिंतीवर कोरली आहेत. इथे एक छोटीशी गुहा आहे जी थेट पातालभूवनेश्वरला जाते. दोन्हीत भरपूर अंतर आहे. अगदी निघेपर्यंत श्री एम ह्यांच पुस्तक वाचत होते. त्याचा अंमल असल्यामुळे की काय अविश्वास दाखवायला मन तयार नव्हते.

M2Kalimata.jpg


महाकाली मंदिर

प्रत्येक वेळी विनोदने असं काही सांगितलं की "असेल ब्वाॅ! असेल ब्वाॅ!" मन म्हणत होतं.

M2TrimurtiTree.jpg


ब्रम्हा, विष्णू महेश झाड - एकाच झाडाला तीन फांद्या !

M2PandavTree.jpg
पांडव झाड

पातालभूवनेश्वरला पोचेतो तीन वाजले होते. कावळे कोकलायला लागले होते. थाळी मागवली. साधं, रुचकर जेवण आणि विशेष म्हणजे 'भांग' चटणी!
पातालभूवनेश्वर पोचेस्तोवर तीन-चार वेळेला विनोदने विचारून झालं होतं, "म्याडमजी, आप को डर तो नही लगेगा ना?" तो असं का विचारत होता कळत नव्हतं. ह्या गुहेत आदि शंकराचार्य येऊन राहिले होते. नव्वद फुट खोल व एकशे साठ फुट लांब असलेली ही गुहा पुरातत्व खात्याच्या अखत्यारित आहे. पैसे देऊन मोबाईल जमा करावे लागतात, पण त्याची रितसर पावती मिळते. आठ-दहा जणांना एकेक वेळेला आत सोडतात. अरूंद अश्या खळीतून खाली वाकत, बसून, दोन्ही बाजूला आधारासाठी असलेल्या चेनला पकडून उतरावे लागते. तान्हं बाळ ते अवघे पाऊणशे वर्षे वयाचे असे आमच्या मागे-पुढे श्रध्दाळू लोकं पाहून थक्क व्हायला होतं. गाईड अनेक कथा, कहाण्या, दंतकथा श्रध्देने सांगत होता. हे अमरनाथ, हे बद्रीनाथ, हे केदारनाथ! ह्यांचं दर्शन घेतलं, आता चारधाम यात्रा केल्याचं पुण्य तुमच्या पदरी पडलं. इंद्राचा ऐरावत, शंकराच्या जटा, चार युगं, मोक्षद्वार, हंस (अमृतकुंड उष्टावल्यामुळे हंसाला शिक्षा होते व त्याला त्याची मान विरूध्द दिशेला वळवावी लागते), ब्रम्हा विष्णू महेश, चारभुजा मुखविरहीत गणपती व त्यावर अष्टकमळ (हत्तीच तोंड लागेपर्यंत गणपती जिवंत राहावेत म्हणून अष्टकमळातून धडावर सतत अभिषेक होत असतो) पांडवांच अग्नी कुंड... हे सगळं गाईड सांगत असताना उसगावात पाहिलेल्या सोफेस्टीकेटेड Natural Bridge Caverns, Austin(लाईमस्टोन केव्ह्ज)आठवत होत्या आणि तिथे असताना आपल्या! तिथल्या वेगवेगळ्या आकारातल्या दगडात आम्हालाच नाही तर आमच्याबरोबर असणाऱ्या देसी लोकांनाही कुठे गणपती दिसत होता तर कुठे शंकराच्या जटा! तिथल्या गाईडची सपक काॅमेंट्री ऐकून त्याला सुनावलं होतं. अर्थात स्वगत, "बेटा, तू काय पाचशे वर्षांचा इतिहास सांगतोय? ये आमच्या देशात!" आमच्या इथल्या गाईडने पाच हजार वर्षांचा इतिहास सांगितला असता व अश्या एकेका आकृत्यांवर अनेक पुराण कथा तुला ऐकवून रंगत आणली असती! असो!

भंडारीकडे चहा पिऊन चौकोरीकडे निघालो. अंतर कमी होतं पण अरुंद वळणावळणाचा घाट रस्ता होता. आरामात, घंटीच्या पार्श्वसंगीतात प्रकृतीचा आनंद घेत मार्गक्रमण सुरू होते.

तिन्हीसांजा झाल्या...

M2Sunset.jpg

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle