भाग ५: कौसानी ते काठगोदाम

सकाळी तरी पंचचूलीचं दर्शन होण्याची शक्यता नसल्याचे TRH कर्मचाऱ्याला बोलून दाखवलं तसं तो म्हणाला, "ऐसे हो नही सकता... पंचचूली कभी किसी को निराश नहीं करता|" त्याची वाणी खरी ठरली होती. बादल हट गये थे! निरभ्र आकाश! फोटोग्राफी करायला हेलिपॅड ग्राऊंडवर गेलो. तिथल्या गार्डने एका अटीवर आत प्रवेश दिला. ITBP कर्मचाऱ्यांनी नंदादेवी ट्रेकला गेलेल्या चार ट्रेकर्सचे मृतदेह शोधून काढले होते व ते त्यांना इथे घेऊन येणार होते. ते येण्याची सूचना मिळाली तर मात्र लगेच बाहेर जावं लागणार होतं. मनसोक्त पंचचूली डोळ्यात व कॅमेऱ्यात साठवून घेतली. ट्रीप सफल झाल्याच्या आनंदात निद्राधीन झालो.

M5 (2).jpg

नाश्ता करून परतीची वाट धरली. बिर्थी फाॅलवरच्या दानु मॅगी पाॅईंटवर चहासाठी थांबलो. आज भाभी खुश होती आणि त्यादिवशी नीट आतिथ्य करू न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत होती व त्याचं परिमार्जन म्हणून स्वादिष्ट कद्दूची भाजी खायलाच लावली. बागेश्वरच्या अलिकडेच जेवलो 'जायका' मध्ये चुलीवरचं अस्सल कुमाऊं थाळी कढी,डुबका, कद्दूची भाजी व भांग चटणी!

M5 (1).jpg

बारा मैलावर भाषा, खाद्यसंस्कृती बदलते म्हणतात. ते अगदी खरंय! दोन्ही ठिकाणी कद्दूच पण वेगवेगळ्या पध्दतीने केलेल्या! दोन्ही चविष्ट ! तृप्तीची ढेकर देत निघालो. कौसानीत पहायला विशेष काही नाही पण गुगलबाबाने गांधीजींचा 'अनासक्ती आश्रम' सुचवला. एका हाॅलमध्ये गांधीजींच चित्रदर्शी जीवन चरित्र आहे. बाकी माहिती सांगायला कोणी दिसलं नाही. इथल्या आश्रमात गांधीजींनी 'अनासक्ती योग' लिहीला. वाचायला हवा.

कौसानी TRH काॅटेज खूपच सुंदर ! अगदी समोर हिमाच्छादित नंदादेवी, त्रिशूल पर्वत रांगा! नयनरम्य दृश्य!तयार होऊन ऑब्झर्वेटीत गेलो पण ढग असल्यामुळे न पाहताच परत यावं लागलं. जेवून झोपी गेलो.

M5 (3).jpg M5 (4).jpg

प्रसन्न सकाळ! पर्वतरांगांच मनोहारी दृश्य डोळ्यात साठवून घेतलं. आज परतीची वाट धरायची होती. . आज का आखरी दिन आराम से... विनोदचं पालुपद आळवणं सुरू झालं... "आज ऐसी जगह दिखाऊंगा ... आप की ट्रीप सफल ही नही, यादगार बन जायेगी... " कुमाऊं व नागा रेजिमेंटचं म्युझीयम ! कुमाऊं रेजिमेंटचा दोनशे सात वर्षांचा इतिहास तीन मजली इमारतीत लिखीत, वस्तु व चित्ररूपात आकर्षक पध्दतीने मांडलाय. कुमांऊ रेजिमेंटला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यापैकी अठरा वेळा पहिल्या पुरस्कराचा मान त्यांना मिळाला आहे. रिटायर्ड आर्मी कर्मचारी अतिशय आत्मियतेने, विस्ताराने, व रंजकतेने माहिती सांगत होता, ऐकताना देशाभिमानाने ऊर भरून येत होता.उत्स्फुर्तेने पब्लिकही टाळ्या वाजवून त्यांना दाद देत होती. विनोद थापा विनोद करत होता पण थापा मात्र मारत नव्हता खरोखरच म्युझीयम मस्ट वाॅच आहेच ह्यात काही शंका नाही पण ते अधिक जास्त भावलं ते त्या ऑफिसरच्या वक्तृत्व शैलीमुळे! वाटेत साततालला व भीमतालला थोड्यावेळ टीपी करून काठगोदामला आलो.

आदि कैलाशची परिक्रमा करून एकेक मंडळी येत होती. पुण्याच्या दोघींशी गप्पा मारल्यावर कळलं की हा ट्रेक अवघड आहे पण अशक्य नाही माझ्यासाठी आणि KVMN ची खाण्यापिण्या व राहण्याची सोय खूप छान आहे आणि हो , actually फोटोत दाखवलाय तसा 'ऊॅं' दिसतो म्हणे! आदि कैलाश, ओम पर्वतची स्वप्न पहाता पहाता सकाळ केव्हा झाली कळलंच नाही. रानीखेत एक्सप्रेसने आदि कैलाशला जाणारी मंडळी यायला लागली होती. त्यांची टीका लावून, हार घालून व टोपी-काठी देऊन समारंभपूर्वक विदाई केली गेली. काश! सॅक पाठीवर टाकून उलटपावली त्यांच्याबरोबर जाता आलं असतं...

एका सहलीत दुसऱ्या सहलीची बीजे अंकुरत असतात... अंकुरे फुटली होती तिला वर्षभर खतपाणी घालून फुलवत ठेवते आणि...
येतेच पुढच्या वर्षी...

M5 (5).jpg

तळटीप :

  1. आल्यावर AVAHAN चे व्हिडीओ पहात होते. त्यात चेतन महाजनांची डाॅ नाडकर्णींनी घेतलेली मुलाखत ऐकली. अल्मोड़ा जवळच्या सातखाल गावात writing retreat घेतात. तिथे भेट देता नाही आली. www.himalayanwritingretreat.com
  2. रामकृष्ण मठाशी संलग्न असलेल्या मामाने सांगितलेली माहिती: स्वामी विवेकानंदांनी अल्मोड़ा होते काही दिवस.तिथे त्यांनी ध्यानधारणा केली त्या ठिकाणी आता माॅं शारदाचा आश्रम आहे. नासाने पाॅझिटीव्ह एनर्जी असणारी तीन ठिकाणं शोधली आहेत त्यात हे तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  3. विनोद थापाचा नं. 9759980311/8958806377 पहिला नं बहुतेक गाडी मालकाचा व दुसरा त्याचा.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle