गूढ, अद्भुत तरीही विलोभनीय ....गिरनार (भाग ४)

आजि म्या ब्रह्म पाहिले

तॄप्तीची अनुभुती ? कसं काय? अजून तर दर्शन व्हायचे होते त्याआधीच तॄप्ती? पण 'देवाघरची अशीच उलटी खूण असते', कुणाची ही वाट पहाण्यात एक अधीरता असते, घालमेल असते, पण या वाट पहाण्यात खरोखर तॄप्ती जाणवत होती, वाट पहाण्यातली तॄप्ती केवळ परमेश्वरच देऊ शकतो.

फक्त पन्नास पायर्‍या बाकी राहिल्यात या जाणीवेनेच आतून भरुन येत होते. जसजशी जवळ येत चालले होते, शरीरात सूक्ष्म कंप जाणवू लागला होता. धडधड वाढली होती. मी इथवर आले होते? नाहीच मुळी "तो" घेऊन आला होता.... माझं इथवर येणं घडून येण्यासाठी माध्यम ठरलेले अनेक जण आता नजरेसमोर येऊ लागले. पुस्तक देणारा भाऊ, या यात्रेविषयी माहिती देणारी त्याची डॉ. सहध्यायी, परीक्षा चालू असतांनाही “आई तू जा बिनधास्त म्हणणारा मुलगा”, वयाच्या ८२ व्या वर्षी घरची, लेकाची जबाबदारी सांभाळेन म्हणणार्‍या आई, आईला आणि लेकाला सोबत म्हणून , मनात असूनही माझ्याबरोबर न येता “तू निर्धास्तपणे जा”, म्हणणारा नवरा, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑफिसातून सुट्टी मिळू शकेल की नाही अशी शंका येत असंताना बाणेदारपणे बॉसना Sir, let her take leave I will take care of her work in her absence असे म्हणून आश्वस्त करणारा ऑफिसातील सहकारी, मला व्यायाम आणि आहारासंबंधी योग्य मार्गदर्शन करणारा माझा भाचा, या यात्रेचे पाचही आयोजक आणि इतर ग्रुप मेंबर्स…. सर्वांची मी ॠणी आहे, तुम्ही सर्व नसता तर हे भाग्य माझ्या वाट्याला आले नसते.

गिरनारची वारी करतांना वाटेत 'दत्तगुरु' कोणत्या ना कोणत्या रुपात दर्शन देतात असे ऐकले होते. पण मला असे कोणीही दिसले/भासले नव्हते. कसलीही अनुभुती, चमत्कारीक अनुभव का ही ही नाही. हा विचार मनात येताच सद्गुरुंचे शब्द आठवले. "बाळांनो, चमत्कार पाहून नमस्कार करु नका.समोर दिसणार्‍या चमत्काराने तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? खरा चमत्कार सद्गुरु घडवून आणतात तो भक्ताच्या मनात आणि मनात बदल घडला की प्रारब्ध बदलायला वेळ लागत नाही”. अचानकच आठवले ज्या वेळी 'दत्त अनुभुती' पुस्तकात दहा हजार पायर्‍यांच्या प्रवासाबद्दल वाचले, त्या वेळीच मुखपॄष्ठावर असलेल्या गुरुशिखरावरील दत्तगुरुंच्या फोटोकडे पाहून म्हटले होते की "माझा नमस्कार इथूनच घे दत्तबाप्पा" असं बोलणारी मी आणि गिरनार दर्शनाची आस मनात घेऊन इथवर पोचलेली मी.... हा माझ्या मनातील बदल होता. हा माझा प्रवास होता नकारात्मक भावनेतून, सकारात्मकतेकडे नेणारा, न्युनगंडाकडून आत्मविश्वासाकडे नेणारा..... सद्गुरुंनी सांगितलं होतं की “जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या ताकदीच्या बाहेरील कार्य आपण संपादन करतो, तेव्हा जाणावे की कुठेतरी, कुठल्यातरी क्षणाला ह्या कार्यामधील कुठलातरी भाग स्वयंभगवानाने माझे रुप घेऊन घडवून आणलेला आहे”. याहून जास्त अनुभुती कसली हवी होती मला? सद्गुरु म्हणतात की “परमेश्वराकडे प्रत्येकाची रांग ही वेगळीच असते, माझ्या रांगेत माझ्या पुढे कोणी नाही आणि मागेही नाही, मी एकटीच चालत असते माझ्या रांगेत, त्यामुळे अमक्याला हे मिळालं/दिसलं तर मला का नाही? हे विचार सोडा. 'ज्याला ज्याची गरज आहे ते त्याला मिळणारच आहे , कारण 'तो' तर भरभरुन द्यायलाच बसला असतो आपल्या लेकरांना, आपलीच झोळी फाटकी असते”..... हे सारं आठवून डोळे पाझरतील की काय अशी अवस्था झाली. कसेबसे स्वतःला सावरत चढू लागले.

श्रावणासारख्या पवित्र महिन्यात, एकादशीच्या दिवशी, सोमवारी हे दुर्लभ दर्शन घ्यायला मिळणार होते. माझ्यासाठी आजच्या दिवसाला आणखी खास महत्व होते. कारण आज २६ ऑगस्ट हा माझ्या आईचा जन्मदिन. ती असती तर आज तिचा ७५ वा वाढदिवस असता.नेमक्या याच दिवशी मला सद्गुरुपादुकांचे दर्शन होणे हा निव्वळ योगायोग खचितच नव्हता. आई-वडीलांची पुण्याई मुलांच्या कामी येते असं म्हणतात, तेच घडत असावं माझ्या बाबतीत.

पावणेसहा ते सहाचा सुमार. शेवटची पायरी चढले. समोर, लोखंडी सरकते दार, त्या दाराजवळ बसलेला गणवेषधारी पहारेकरी. आतमध्ये दॄष्टीक्षेप टाकत मी आत पाऊल टाकले, जिथे साक्षात दत्तगुरु पादुकांच्या रुपात स्थिरावले होते, त्या गुरुशिखरावरील मंदीरात मी आता या क्षणी उभी होते. चालत थोडी पुढे गेले, पादुकांसमोर , सभोवती गोलाकार बॅरीकेडस होते, तरीही पादुका व्यवस्थित दिसत होत्या. राखाडी रंगाच्या पाषाणावर, साधारण सहा ते साडे सहा फूट उंचीच्या व्यक्तीच्या पायांचा आकार जितका असेल त्या आकाराची दोन पावले, त्या पाषाणात रुतलेली, त्यामुळे जरा खोलगट, पायाच्या बोटांपासून मध्यभागापर्यंत पादुका तशाच अनावॄत्त होत्या. मागच्या भागांवर फुले वाहिली होती, जरी अर्धा भागच दिसत असला तरी अंदाज येत होता पावलांच्या लांबीचा. पादुकांच्या मागेच त्रिमुर्ती, ती मात्र पादुकांच्या आकाराच्या तुलनेत, छोटीशी, साजरी. पादुकांकडे एकटक बघत असतांना नकळत हात जोडले गेले आणि इथवर आवरुन ठेवलेले अश्रू घळघळा डोळ्यांतून वाहू लागले. आता ते आवरणं शक्य नव्हतं. त्याच स्थितीत डोकं टेकलं. आपल्या खूप जवळच्या कुणालातरी आपण बर्‍याच काळानंतर भेटतोय असं वाटत होतं. असा काही वेळ गेला. सावरलं स्वतःला. समोरच पुजारी बसले होते, ते पहात होते.पण त्यांना हे सवयीचं असावं बहुदा, कारण प्रत्येकाची अवस्था माझ्यासारखीच होत होती. मंदीरात अर्पण करण्यासाठी आम्हाला देण्यात आलेलं खडीसाखरेचं पाकीट आणि पादुकांसठी हिना अत्तराची छोटी बाटली, बाहेर काढली.गुरुजींना दिली. खडीसाखर लगेच प्रसाद म्हणून परत केली गेली. उभी राहिले, प्रदक्षिणा घालण्यासाठी. हात जोडून प्रदक्षिणा घालत परत समोर येत असतांना गुरुजी माझ्याकडे पहात माझ्या दिशेने येत असलेले दिसले, म्हणून तिथेच थांबले. त्यांनी एक लहानशी पोथी माझ्या हातात दिली आणि म्हणाले की "बेटी इसे रोज पढना, तुम्हारी हर इच्छा महाराज पुरी करेंगे!' त्या क्षणी पुन्हा एकदा कंठ दाटून आला. गुरुजी परत फिरुन पादुकांशेजारी जाऊन बसले. मला पुन्हा एकदा नमस्कार करायची अनिवार इच्छा झाली. पुन्हा एकदा पादुकांसमोर नतमस्तक झाले. मनोभावे नमस्कार केला. हुंदका दाटून आला. आवंढा गिळत उठले. अजून मागे बरीच माणसं खोळंबली आहेत. त्यांना माझ्यामुळे ताटकळत रहावं लागू नये असं वाटलं, कारण थोड्या थोड्या लोकांनाच एकावेळी आत सोडत होते. पादुकांकडे पहात- पहातच परत फिरले.

त्याच पायर्‍यांवर चढणारी माणसे होती. मी उतरु लागले. अगदी थोड्याच पायर्‍या उतरल्यावर माझी मैत्रीण दिसली. तिला म्हटले, “तू दर्शन घेऊन ये, मी थांबते इथे." अजूनही सूर्योदय झाला नव्हता. तांबडं फुटू लागलं होतं. ढगांआडून एखाद-दुसरी सोनेरी रेघ आकाशात पसरत चालली होती. एरव्ही हिल स्टेशन्सना, समुद्रकिनारी जाऊन सुर्यास्त कैक वेळा पाहिला आहे पण सूर्योदय पहाण्याची ही पहिलीच वेळ.तो सुद्धा गुरुशिखरावरुन दिसणारा सूर्योदय. पण तितका वेळ हाताशी नव्हता. आता धुनीचे दर्शन घ्यायचे होते. जी फक्त दर सोमवारीच प्रज्वलित होत असते.सहा वाजून गेले होते. आम्ही दोघी झटपट उतरु लागलो. अंधारात जे जाणवलं नव्हतं ते आता उजेडात दिसून आलं की बर्‍याच पायर्‍यांना कठडाच नाहीये. उतरतांना त्यामुळे जरा भिती वाटत होती. एकमेकींचा हात धरुन आम्ही खाली आलो. आता बर्‍याच पायर्‍या चढायच्या होत्या. त्या चढून झाल्या एकदाच्या. धुनीपाशी आणि त्याबाहेर गर्दी जमली होती. आम्ही पोहोचेपर्यंत आत धुनी प्रज्वलित झाली होती. आमच्यापैकी केवळ दोघे त्या वेळी तिथे होते, ज्यांना तो क्षण पाहण्याचे दुर्मिळ भाग्य लाभले. पुन्हा एकदा मनाला बजावले "ज्याला ज्याची गरज आहे, ते त्याला मिळणारच." शांतपणे रांगेत आत जात धुनीपाशी आलो. शिर्डीतल्या साईनाथांच्या द्वारकामाईतील धुनीची आठवण आली. लहानपणापासून देव म्हणजे साईबाबा हे समीकरण मनात फिट्ट झालेले. त्यांचंच बोट धरीत इथवर पोचले होते. मनोभावे धुनीला नमस्कार केला.

आता अन्नपूर्णेचा प्रसाद ग्रहण करायची वेळ. इतक्या लवकर पोचलो असूनही आत आमच्या आधीच पहिली पंगत बसली होती. त्यामुळे बाहेर थांबलो.पहिल्या पंगतीतील भाविकांचे प्रसादग्रहण झाल्यानंतर आम्हाला आत घेण्यात आले.एका वेळी साधारण तीस - चाळीस माणसे बसू शकतील इतकी जागा होती. सेवेकरीही तत्पर होते.भराभर पाने वाढण्यात आली. सकाळी साडे सहाच्या सुमारास डाळ, भात, शिरा-पुरीचा आस्वाद घेऊन आम्ही तेथून बाहेर आलो.

तिथून गोरक्ष गुफेकडे जायचे होते. पण स्त्रियांना आत जाऊ देत नाहीत. त्यामुळे बाहेरच बाकीच्यांची वाट बघत थांबलो. तोवर सकाळचे साडे सात वाजले होते.गिरनार जागा झाला होता. वर्दळ वाढली होती. आम्ही आता अंबाजी मंदीराकडे चालू लागलो. ते दर्शन अजून बाकी होते. अंबाजी मंदीरापाशी आता पुजेच्या, ओटीच्या सामानाची दुकाने उघडली होती. ते घेऊन आत दर्शनासाठी गेलो. रेणुका मातेसारखं दिसणारं अंबामातेचं रुप मनात भरलं. बाहेर येऊन परत एकदा पहाटे जिथे चहा घेतला होता, त्या हॉटेलात विसावलो. गिरनार वारीतील सर्व स्थळांचे दर्शन घेऊन झाले होते. आता परतीची वाट धरायची होती. कोल्ड्रींक घेऊन थोडा आराम केला. साधारण सव्वा आठ-साडे आठच्या सुमारास खाली उतरण्यास सुरुवात केली.

आता खरी कसोटी होती. उतरतांना अधिक त्रास होतो, पाय लटपटतात, पायांत गोळे येतात असे ऐकून होते. उतरायला सुरुवात केली आणि अगदी ८-१० पायर्‍या उतरताच उजव्या पायांत क्रँप आल्यासारखे वाटले. धस्स झालं. चढतांना अगदी पिसासारखी चढले होते. आता काय ? पायाची बोटे जरा हलवली. काही क्षण थांबले. बरं वाटू लागल्यावर पुन्हा उतरायला सुरुवात केली. पायांत गोळे ,पाय लटपटणे यांपैकी काहीच होत नव्हते. त्यामुळे हायसं वाटलं. आता फक्त एकच चिंता होती , ती उन्हाची. उन्हं प्रखर झाली की त्याची झळ लागणार. मला तर उन्हात गेलयावर त्रास होतोच होतो. त्यामुळे शक्यतो उन्हं चढायच्या आत खाली उतरण्याचा प्रयत्न करायचा असे ठरवले. माझी मैत्रीण अगदी सावकाश उतरत होती. तिच्याशी बोलले. तिच्या सोबत ग्रुपमधल्या काही जणी होत्या. त्यामुळे ती म्हणाली की तू पुढे झालीस तरी चालेल आणि मी पुढे निघाले. मध्ये-मध्ये वाटेत आमच्या ग्रुपमधले कु़णीतरी भेटत होते. उतरतांनाही थांबत, विश्रांती घेतच उतरलो.

एका ठिकाणी एक भली थोरली शिळा तिरप्या अवस्थेत - (४५ डीग्री च्या कोनात कललेली) आढळली. ती शिळा देवीमातेने आपल्या दोन्ही हातांनी धरुन ठेवली आहे असे मानले जाते. त्या स्थानावर देवीला हळदी-कुंकू, बांगड्या वाहिलेल्या दिसत होत्या.

आजूबाजूचे सॄष्टीसौंदर्य आता नजरेत भरत होते. उतरत असतांनाच काही फोटो काढले. सकाळच्या लख्ख प्रकाशात गिरनार डोळ्यांत साठवून घेत उतरत होतो.
Girnar2.jpg
Girnar3.jpg
Girnar4.jpg
Girnar5.jpg
Girnar7.jpg
Girnar8.jpg
Girnar Guha.jpg
या अशा डोंगरातील गुहा अधेमधे दिसत होत्या.

आता विरुद्ध दिशेने चढून येणारी माणसे वाटेत दिसत होती. वर्दळ वाढत होती. ते लोक "दत्तात्रेय" पर्यंत चढून परत येताय का? कधी चढायला सुरुवात केलीत वगैरे चौकशी करत होते.

एका ठिकाणी जे पाहिलं ते बघून थबकलेच. एक कॄश अंगकाठीचा युवक एल पी जी सिलिंडर खांद्यावर घेऊन अनवाणी चढत होता, घामाने निथळत. त्यानंतर लगेच काही बायका सुद्धा मोठाल्या फरशा डोक्यावर घेऊन चढतांना दिसल्या. स्वतःची लाज वाटू लागली.
इथे यायचं म्हणून किती ते जीवाला जपलं होतं मी... ब्रॅण्डेड, अ‍ॅण्टीस्किड, कंफर्टेबल शूज निवडून घेतले होते, अशाच इतरही अनेक गोष्टी कंफर्ट देणार्या. स्वतःच्या कंफर्ट झोनमधून बाहेर यायचीच तयारी नसते नं आपली... इथे हे बिचारे कष्टकरी.... त्यांच्या पायांत साध्या चपलाही नव्हत्या नि शिरावर एव्हढं ओझं. मनात आलं आपल्याला मिळालेलं ‘व्ही आय पी स्टेटस’ हे या यात्रेपुरतं नसून त्या ‘दयाघनाने’ जन्मापासून आपल्याला बहाल केलं आहे. आपल्याला फक्त किंमत नाहीये त्याची. म्हणून तर साध्याशा मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टीचा आपण इतका बाऊ करत असतो. या कष्टकर्‍यांच्या रुपात खरोखर ‘देव दर्शन’ झाले आम्हा सर्वांनाच. इतर तीर्थस्थळांवर गर्दी करणार्‍या भिकार्‍यांपेक्षा हे लोक स्वाभिमानाने जीवतोड मेहनत करुन कष्टाची भाकरी मिळवत होते. मनोमन कडक सॅल्युट ठोकला त्यांना.

गिरनार यात्रेदरम्यान जाणवलेली एक खंत म्हणजे इतकं जागॄत देवस्थान असूनही हे फार दुर्लक्षित आहे. दुसर्‍याच दिवशी पाहिलेल्या सोमनाथ, प्रभास क्षेत्र येथील देवस्थानांचे वैभव बघता इथे तर किमान सुविधाही नाहीत. प्रसाधनगॄहही ९००० पायर्‍या चढून गेल्यावरच. सरकार इथे का लक्ष देत नाही? माहीत नाही. यात्रेकरुंसाठी नाही पण निदान इथल्या मजूरांचे असे अवजड सामान वाहून नेण्याचे कष्ट तरी दूर व्हावेत अशी मनोमन इच्छा आहे.

जैन मंदिरे दिसू लागली. त्या मंदीरांचे बाधकाम खूप सुंदर होते. गिरनारच्या पार्श्वभुमीवर ही जैन मंदीरे सकाळच्या उन्हात खूप लोभसवाणी दिसत होती.
Jain mandir Girnar1.jpg
Jain mandir Girnar2.jpgजैन मंदिरे

हळूहळू उन्हे चढू लागली. नेमक्या किती पायर्‍या उतरुन झाल्या, किती राहिल्या, कळत नव्हते. थोड्याच पायर्‍या आता शिल्लक राहिल्या असाव्यात असं स्वतःला समजावत मी उतरु लागले. अता कधी एकदा खाली पोचतोय असे होऊ लागले होते. साडेदहाच्या सुमारास उन्हाची झळ जाणवू लागली. मी थांबले एके ठिकाणी. सॅकमधून टोपी, गॉगल काढला. इलेक्ट्रलची पावडर पाण्यात घालून प्यायले. जरा बरं वाटू लागलं. पुन्हा उतरायला सुरुवात. आमच्या ग्रुपमधील एकाने गुढगे दुखू लागल्यामुळे उतरतांना डोली केली असे समजले. वाटेत प्रत्येक दुकानदार डोली हवी का? असे विचारत होता. “नाही, नाही” म्हणत मी आपली शक्य तितक्या लवकर उतरण्याचा प्रयत्न करीत होते. दहा- पंधरा पायर्या मग सपाट चौथरा, त्यापुढे वळण पुन्हा पायर्या, चौथरा, वळण ही रचना आता इतकी सवयीची झाली की डोळे मिटूनही तेच दिसू लागले.

वाटेत एका दुकानात मालिशचे तेल विकण्यास ठेवले होते. सांधेदुखीवर रामबाण औषध म्हणून. मागे माऊंट अबूवरील गुरुशिखरावर जातांनाही असेच मालिशचे तेल विकत घेतले होते, त्याचा आईंना बराच फायदा झाला होता. त्यामुळे इथेही २ बाटल्या घेतल्या. गिरनारवर शॉपिंग ही करुन झाले.

आता जमिनीपासूनचे अंतर कमी कमी होत चाललेले दिसले आणि आपण आता अगदी अंतिम टप्प्यात पोचलोय हे जाणवले. माझ्या ग्रुपमधील दोघे वाटेत भेटले. आम्ही तिघेही आता एकत्रच उतरत होतो.साडेअकरा वाजता पहिल्या पायरीवर पोचलो. रात्री साडेअकराला इथूनच सुरुवात केली होती. बारा तास पूर्ण झाले होते. परततांना पहिल्या पायरीवर डोकं टेकून आणि शेजारील हनुमानाला नमस्कार करुन सुखरुप नेऊन आणल्याबद्द्ल आभार मानायचे असतात. तसंच ग्रामदैवत भवनाथांचे दर्शन घेऊन त्यांचेही आभार मानायचे असतात. मगच यात्रा पूर्ण झाली असं समजलं जातं. त्यामुळे बूट काढले. पायरीवर डोके टेकायला म्हणून खाली वाकले, डोके टेकले, कंबर प्रचंड दुखत होती हे तेव्हा जाणवलं. कसंबसं उठून चढवावा हनुमानालाही नमस्कार केला आणि भवनाथ मंदीराकडे निघालो.

रस्त्यावर रहदारी वाढली होती. आमच्या हातातील काठी आणि एकूणच अवतार बघून लोक गिरनार चढके आये क्या? दत्तात्रेय तक गये थे क्या? अशी चौकशी करु लागले. हो हो म्हणत आम्ही कसे तरी स्वत:ला रेटत भवनाथ मंदीरात आलो. दर्शन घेतले. कितीही थकला असलात तरीही न जेवता झोपायचे नाही अशी सक्त ताकीद आयोजकांनी दिली होती. जेवण्याचे हॉटेल आणि कुपनही आदल्या दिवशी निघतांनाच दिले होते. त्यामुळे आम्ही तिघे त्या हॉटेलात गेलो. कसेबसे दोन घास खाल्ले आणि आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो. इथे परत २ मजले चढायचे म्हणजे दिव्य.... ते पार पाडलं. खोलीत आल्यावर फ्रेश झाले, एक क्रोसिन घेतली आणि पायांना रोल ऑन फासून झोपून गेले.

एकेक करत सारे परतू लागले. दुपारी दोन वाजेपर्यंत ग्रुपमधील सर्व खाली आले. आयोजकांनी एक मसाज करणारा माणूस बोलवून घेतला. तो प्रत्येकाच्या खोलीत जाऊन पायांना मसाज करुन देत होता. त्यामुळे खूप बरं वाटू लागलं.

सर्वांची गिरनार यात्रा पूर्ण झाली होती. यात्रा जरी पूर्ण झाली असली तरी या यात्रेआधी आणि त्या दरम्यान 'दत्तगुरुंशी' जुळलेली नाळ तशीच रहावी…..अगदी जन्मजन्मांतरीसाठी हीच इच्छा.

ही लेखमाला म्हणजे गिरनार वारीचे वर्णन आहे. पण ज्याप्रमाणे गिरनार वारी ‘दत्तगुरुंच्या इच्छेनेच’ घडते तसेच हे लेखनही. कारण बुद्धिदाताही 'तोच'. त्यामुळे हे लिहिणारी मी केवळ एक निमित्तमात्र, त्यानेच त्याला हवं तसं लिहून घेतलंय माझ्या हातून. असं असलं तरी या लेखनात अनवधानाने काही त्रुटी आढळल्या तर ते न्यून माझे समजून क्षमा कारावी.

शेवटी एकच सांगणे….
इदं न मम | इदं सद्गुरो:||

लेखनसीमा.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle