नाती तुटताना

नात्यांची एक्स्पायरी आता मला हळूहळू मान्य व्हायला लागलीये..

पूर्वी तुटतंय असं वाटलं की ते टिकवण्यासाठी अतोनात धडपड सुरू व्हायची.. हल्ली जे जसं होतय तसं होऊन द्यावं असं वाटतं.. गैरसमज नकोत यासाठी थोडा प्रयत्न असतोच..
पण तेवढंच..

लोणच्यासारखं मुरलेलं नसेल तर तुटणारच.. त्याला तर गैरसमजाची पण गरज नाही आणि मुरलेलं असेल तर कित्येक काळ एकमेकांशी बोललं नाही तरी सगळं परत पहिल्यासारखं पहिल्याइतकं सुरळीत.. मधला काळ जणू नव्हताच..

पण तरी तुटताना त्रास होतोच..
मला तरी..

नो वन कॅन हर्ट यु विदाऊट युअर कन्सेन्ट हे जरी खरं असलं तरी.. कदाचित आपणच त्या त्रासाला कन्सेन्ट देत असू.. सगळी प्रेमाची आत्मियतेची नसतातच.. त्यांचा नाही त्रास होत.. पण कधीतरी त्या नात्यावर, व्यक्तीवर जिव्हाळा असलेली तुटतात तेंव्हा फार त्रास होतो..

सोडून दे.. कसं..?
जाऊ दे.. कसं..?
तसाच होता तो.. खरंच.. ?
जास्त विचार नाही करायचा.. का..?
हल्ली बदलली ती.. मान्य. पण म्हणून तुटु द्यायचं....?

एकत्र घालवलेले क्षण.. प्रेमाचे, आनंदाचे, त्रासाचे, दु:खाचे, भांडणाचे, काळजीचे.. क्षणार्धात संपतात.. किंवा काही काळानंतरही असतील पण खरंच संपतात..
मग ते खोटं की हे..?
दोन्ही..? की दोन्ही नाही..?
काय माहिती..!

कधी कधी वाटतं थोडी गॅप घेऊन बघावी.. आजिबात एकमेकांना भेटू नये, बोलू नये, व्हॉटसप नको.. एकमेकांचा विचारही नको.. असा बराच काळ गेल्यावर आठवण आली तर ठीकच आणि नाही आली तरीही ठीकच.. कारण ते तसंच व्हायचं असणार..

तुटणारच असेल तर ते होऊ द्यावं..

त्रास होतो.
होणारच. झालाच पाहिजे.

नाहीतर सगळंच खोटं वाटायला लागेल.. आणि सगळं खोटं नाहीये.. एकेकाळचं आपलं नातं फार खरं असतं.. आपल्या सगळ्या डिफ़रंसेस सकट.. पण खरं असतं..
निदान माझ्या बाजूनी तरी..
मारलेल्या घट्ट मिठीपासून तिस-याच व्यक्तीकडे व्यक्त केलेल्या ह्याच व्यक्तीबद्द्लच्या काळजीपर्यंत सगळं सगळं..

पण आता उरलेल्या आणि एकमेकांना फक्त दाखवत असलेल्या वरवरच्या, फ़ेक, ढोंगी आणि दिखाऊ नात्यात राहण्यापेक्षा ते संपवलेलं बरं.. निदान त्या गत नात्याच्या स्मृती तरी आनंदी, गोड आणि प्युअर असतील..

सायली.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle