तरुण तुर्कांच्या देशात १

साधारण सहा-साडेसहा वर्षांपुर्वी आई माझ्याकडे टर्किश एअरलाईन्सने आली होती. तेव्हाच येता जाता तिने वरुन इस्तंबुल पाहिलं आणि ती इस्तंबुलच्या प्रेमातच पडली. अर्थातच तेव्हा ती फक्त ट्रान्झिटमधे असल्याने तिने इस्तंबुलचं दर्शन फक्त वरुनच घेतलं होतं. आपण कधीतरी टर्कीला जायला पाहिजे असं तिने ठरवलं होतं. नंतर एक दोन वर्षाने 'झी जिंदगी'वर कोणतीतरी टर्किश सिरिअल सुरु झाली. आई अगदी न चुकता ती सिरिअल बघायची. आधी घेतलेलं इस्तंबुलच दर्शन आणि ही सिरिअल यामुळे आईच्या बकेटलिस्टमधे टर्की फारच वरच्या नंबरला जाउन बसलं होतं.
असं असलं तरी टर्कीला जाण्याचा योग काही येत नव्हता. दोन वर्षापुर्वी सगळ्यांनी म्हणजेच आई, बाबा, आम्ही दोघं, भैरवी आणि अक्षय (बहिण आणि तिचा नवरा)यांनी एकत्र ट्रीप करायची ठरवल्यावर स्विसला पहिला प्रेफरन्स दिला गेला आणि टर्की राहिलचं.

या ऑक्टोबर एंडला बाबा रिटायर होणार होते, म्हणुन परत सगळ्यांनी एक एकत्र ट्रीप करावी असं ठरलं. आई-बाबांच्या मनात टर्की होतचं, तोपर्यंत भैरवीची कोणीतरी मैत्रीण हनिमुनला टर्कीला जाउन आल्याने आणि तिचे फोटो भैरवीने पाहिल्याने तिलाही टर्कीला जायची उत्सुकता होतीच. परत भारत आणि जर्मनीच्या बर्यापैकी मधे असणं हा टर्कीला जाण्यासाठी मोठाच प्लस पॉईंट ठरणार होता. त्यामुळे यावेळी अगदी बिनविरोध टर्कीला जायचा प्लॅन ठरला.

बाबा ऑक्टोबर एंडला रिटायर होणार म्हणुन नोव्हेंबरमधे जायचं ठरलं. मेव्हण्याला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुट्टी मिळणार नव्हती आणि आईचे मार्गशिर्षातले गुरवार नोव्हेंबरच्या शेवटी सुरु होणार होते. यासगळ्यातुन १६ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर (शनिवार ते पुढचा शनिवार)या तारखा ठरल्या.

बहिणाबाईंनी काही झालं तरी कप्पाडोकिआ आणि पामुकल्ले करायचचं हे सांगितलं. मी हळुहळु टर्कीबद्दल वाचायला लागले होते. इथे अंजलीचे लेख वाचले. तिने फक्त इस्तंबुल चार दिवस बघितलं होतं मग साडे सहा दिवसात इस्तंबुल, कप्पाडोकिआ आणि पामुकले कसं होणार? बरं आता माझ्या नवर्यानेही टर्कीला जायचं आणि बीचवर जायचं नाही याला काय अर्थय? असं म्हणुन अजुनच विकेट काढली.

हे सगळं एका ट्रीपमधे करायचं म्हणजे इस्तंबुलला फक्त हात लाउन परत यावं लागणारे हे स्पष्ट झालं. मग मात्र माझी फारच चिडचिड व्हायला लागली. शेवटी १६ च्या ऐवजी १५ जाऊ आणि लवकरच्या फ्लाइटसने जाउ म्हणजे निदान अर्धा शुक्रवार तरी मिळेल असं ठरलं.

आई, बाबांनी पुण्याहुन दिल्लीला यायचं, भैरवी अक्षय बंगलोरहुन दिल्लीला येतील आणि मग चौघं एकत्र भल्या पहाटे निघुन दिल्लीहुन इस्तंबुलला साधारण साडे दहापर्यंत पोचतील असं ठरलं. त्याप्रमाणे त्या चौघांनी तिकिटंही काढली.

आम्ही तिकिटं बघितली तर सकाळी साडेसातची फ्लाइट होती.म्हणजे साडे पाचला तरी आम्हाला एअरपोर्टला पोचायला लागणार होतं. हे बघुन नवर्याने लगेच चेहरा वाकडा केला पण मीच आधी चिडचिड करुन सगळ्यांना लवकर इस्तंबुलला पोचा सांगितलं होतं त्यामुळे आम्हाला साडे सातची फ्लाईट घेण्यावाचुन गत्यंतर नव्हतं. आमची साडे सातची फ्लाईट असली आणि अडीच-तीन तासाचीच असली तरी टर्की जर्मनीपेक्षा दोन तास पुढे असल्याने आम्ही साडे बाराला पोचणार होतो.

सगळी तिकिटं काढल्यावर व्हिजाची पाळी होती. ज्यांच्यकडे युएस, कॅनडा, युके आणि शेंगेन व्हॅलिड व्हिजा आहे त्यांना ई-व्हिजा काढायचा होता. बाबा, भैरवी आणि अक्षय यांच्याकडे युएस व्हिजा अस्लयाने आणि आमच्याकडे शेंगेन असल्याने आम्हा पाच जणांचा व्हिजा पाच मिनिटात मिळणार होता. फक्त आईचा व्हिजा काढावा लागणार होता.

बाबांनी त्यांच्या घाई करण्याच्या स्वभावाला अनुसुरुन स्वताचा व्हिजा लगेच काढला, भैरवी-अक्षयच्या मागे लागुन त्यांचाही काढला. आमच्या मागे लागुन लागुन ते थकले, शेवटी मग आम्ही एकदाचा व्हिजा काढला. आईचाही व्हिजा फार काही घटना न घडता, प्रॉब्लेम न होता जायच्या आठवडाभर आधी आला.

इकडे मी आणि बाबांनी आमची प्रवासाची रुपरेषा बनवली. आता सहा जणं जात असल्याने आणि प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगवेगळ्या असल्याने सगळं कसंतरी साडे सात दिवसात कोंबलं.
बाबांनी सुरवातीला घाईने वेगवेगळ्या ट्रॅव्हल एजंटसकडुन कोटस मागवली होती. आम्हाला काय बघायच आहे, कुठे जायचं आहे, काय काय करायचं आहे यानुसार एकांनी छान माहिती सांगितली होती. आता माहिती मिळाल्यावर त्यांना काम न देता डिच करणं बाबांना बरं वाटतं नव्हतं. म्हणुन मग इस्तंबुलची बोस्फोरस बोट टुअर, कप्पाडोकिआची हॉटएअर बलुन टुर, पामुकल्लेची टुअर आणि सगळी हॉटेलस, हॉटेल्स टु विमानतळ टॅक्स्या हे सगळं त्यांच्याकडुन बुक करुन घेतलं.

अतंर्गत विमान तिकिटं, पहिल्या दिवशी इस्तंबुलदर्शन हे आपापलं करायचं ठरवलं. जरी हे आधी ठरवलं तरी इस्तंबुलमधे गाईडशिवाय वास्तु बघणं जमेल का, किंवा त्याच काही कळेल का ही भिती होतीच. पण पुर्ण दिवस गाईडबरोबर घालवायचाही नव्हता. मग मध्यममार्ग म्हणुन आया सोफिआ, टोपकापी पॅलेस आणि सिस्टर्न बॅसेलिका (संकन पॅलेस) हे गाईड बरोबर करायचं ठरलं. पण हे गाईड आधी फक्त अर्धा-पाउण तास आपल्याला माहिती देणार आणि मग आपल्याला आपलं आपलं बघायला सोडणार अशी व्यवस्था होती. ते आम्हाला फारच सोयीचं होतं कारण परत प्रत्येकाला इंटरेस्ट असणार्या गोष्टी वेगवेगळ्या होत्या. मग अर्धा तास गाईडने दिलेली बेसिक माहिती ऐकली की आम्ही प्रत्येक जण आपल्याआपल्या आवडीप्रमाणे बघु शकणार होतो.

माझी आणि बाबांची ही तयारी सुरु असताना आईचं बरोबर खायला काय घ्यायचं ह्याचे विचार चालु होते.
त्याचवेळी इकडे मैत्रीणवर मॅगीचे लेख यायला सुरवात झाली होती. तिचे लेख वाचुन कधी एकदा इस्तंबुलला जातोय असं झालं होतं. मॅगीने इतकं छान लिहिल्यावर मला आईने आणलेले पदार्थ खाण्यात आजिबात म्हण्जे आजिबातच इंटरेस्ट नव्हता. त्यावरुन रोज आईचे आणि माझे खटके उडतं होते. शेवटी आईने मी माझ्या जावयांसाठी आणणार आहे, तुला खायच नसेल तर नको खाउस असं फायनल व्हर्डिक्ट दिल्याने माझा अगदीच निरुपाय झाला.

अशी सगळी जय्यत तयारी करुन मी गुरुवारी म्युनिकला गेले. भैरवी अक्षय बंगलोरहुन दिल्लीला आले आणि इकडे आई बाबांची पुणे-दिल्ली फ्लाईट टेक्निकल प्रॉब्लेममुळे कॅन्सल झाली. ही फ्लाईट कॅन्सल झाली म्हण्जे अर्थातच पुढची इस्तंबुलला जाणारी फ्लाईट चुकणार होती, शुक्रवारचा सगला प्रॉग्रॅम बोंबलणार होता पण त्याला पर्याय नव्हता.

क्रमशः

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle