गोजिरवाणी खार पहा ही, गोजिरवाणी खार!

रात्री मुलांना झोपवताना मी एक गाणं बरेचदा म्हणते - 'गोजिरवाणी खार पहा ही, गोजिरवाणी खार!' पूर्वी मुलांना आवडायचं गाणी ऐकणं...आता ती माझीच गरज म्हणून मी घसा साफ करून घेते. हिचं गाणं ऐकण्यापेक्षा पटकन झोपलेलं बरं...असा विचार करून ते लवकर झोपतात हा एक मोठा फायदा! असो!

'गोजिरवाणी खार' ही कविता मी आईकडून ऐकली. आमच्या आजोबांची (आईचे वडिल) ती आवडती कविता म्हणे! सगळ्या नातवंडांना ते ती कविता म्हणून दाखवायचे अशी ऐकिव बातमी! आजी आणि आजोबा माझ्या आठवणीत फारसे नाहीत. मी तीन-एक वर्षांची असताना ते दोघं निवर्तले. त्यामुळे त्यांचा सहवास मला फारसा लाभला नाही आणि आठवणी पण काहीच नाहीयेत :( आईकडून आणि मोठ्या बहिणींकडून ऐकून जेवढं माहिती आहे तेवढंच! पण 'गोजिरवाणी खार' म्हणजे आजी-आजोबा असं अतूट नातं जुळलय माझ्या मनात! हे गाणं गुणगुणताना मला आठवतही नसलेले आमचे आजी-आजोबा आठवतात. दर वेळी हे गाणं म्हणताना माझं मन मात्र ९०-१०० वर्षांपूर्वीचं त्यांचं जग कसं असेल या विचारात पोहोचतं...

१९०४ साली जन्मलेले आमचे आजोबा १९१५ - म्हणजे १०० वर्षांपूर्वी १०-११ वर्षांचे असतील. माझा मोठा आज ८.५ वर्षांचा आहे - म्हणजे साधारण तितकाच की! केवढी वेगळी आयुष्य आहेत पण ही चार पिढ्यांमधली - १०० वर्षातली....!! असं काहीतरी मनात येत रहातं...मुरबाडमध्ये वाढलेले आजोबा आणि दापोली मध्ये वाढलेली आजी! आजोबांचं घर मी बघितलेलं नाही पण आजीच्या दापोलीच्या घरात मात्र लहानपणी जाऊन राहिलो आहोत आणि १७-१८ व्या वर्षी पण एकदा भेट दिलेली. त्यामुळे आजी-आजोबांची आठवण म्हणजे दापोलीचं घर डोळ्यासमोर येतं. कशी असेल आजी तेव्हा? दापोलीच्या गॅडने स्कूल मध्ये ती शिकली...कसं असेल ते आयुष्य???

कधी-मधी मुलांना सांगते - हे गाणं त्यांच्या आजीचे डॅड म्हणायचे. मुलांच्या पणजी-पणजोबांबद्दलच्या प्रश्नांना मग मी कधी आईला विचारून तर कधी स्वतःच काही-बाही रतिब घालून उत्तरं देते. वास्तविक मुलांना ते मराठीतलं गाणं नीट समजत पण नाही...मग मी त्याचं english translation करून त्याच चालीत कोंबून त्यांना म्हणून दाखवते. 'Look at that cute little squirrel, everyone, look at that cute little squirrel!' ;-) मग मुलं प्रत्येकच ओळ translate करून मागतात...आवडीने ते ऐकतात...(एकीकडे अर्थातच जागृत पालकत्वाचा - Turn every moment into education opportunity - नियम राखत - खारी अ‍ॅकॉर्न्स का गोळा करतात, मग त्या अनुषंगाने थंडीकरीता बेगमी करणारे प्राणी, hibernation - असं बाजू-बाजूनी ज्ञानामृत पाजून होतं - बेंबट्या, सांग बरं hibernation म्हणजे काय - या चालीवर!)

मात्र माझ्या मनात एव्हाना ते गाणं कसं चार पिढ्यांमधला दुवा बनून राहिलंय हेच येत रहातं...बाकी आयुष्य असेनात का कितीही वेगळी - नसतील आजी- आजोबांनी पंतवंंडं बघितलेली...पण ह्या अश्या गाण्यांमधून भेटतेच आहे की ही पिढी त्यांच्या पूर्वजांना!

------------------------------------------
गोजिरवाणी खार पहा ही, गोजिरवाणी खार!

कधी कौलावर उन्हात बसते, सावलीत ही कधी आढळते
झाडावरतूनी सदा-कदा ही पळता दिसते फार
गोजिरवाणी खार पहा ही, गोजिरवाणी खार!

बसण्याची किती मोहक ऐट, झुलते झुबक्याचे शेपूट
कुठून आणिला कोट हिने हा पट्टे-पट्टेदार!
गोजिरवाणी खार पहा ही, गोजिरवाणी खार!

हाती चिमुकल्या बिया धरोनी, चुटुचुटु खाते फोडफोडुनी
कोणी येता पोर लाजरी , धूम ठोकते पार!
गोजिरवाणी खार पहा ही, गोजिरवाणी खार!
--------------------------------------------
कवि माहिती नाही. कोणाला माहिती असल्यास जरूर सांगा.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle