आज्जी आजोबांची डायरी: भाग ११

आता मी पुढे काल घडलेला अतिशय गोड प्रसंग सांगणार आहे.

आज्जी नं. 1 च्या मित्रपरिवाराला भेटल्यानंतर मग मी ज्यांचा उल्लेख पहिल्या भागात केलेला आहे, त्या लायब्रेरियन आज्जींकडे सहज चक्कर मारली. त्यांचे मिस्टर दुसऱ्या मजल्यावर आणि त्या तिसऱ्या, असे का? हे मागे विचारले असता ऍडमिनिस्ट्रेशनच्या कलीगने सांगितले होते की आजोबा बेड रीडन आहेत आणि सतत त्यांना डॉक्टर, नर्स व्हिजिट सुरू असतात, त्यात आज्जींना डिस्टर्ब होऊ शकते, म्हणून ते वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आहेत.

ह्या आज्जी स्वतःसुद्धा बेडवरच दिसल्या मागच्या भेटींमध्ये. मात्र त्या सावकाश आणि वॉकरच्या आधारे चालू शकतात. त्यांचं जेवण मात्र त्यांच्या खोलीत त्यांना मिळत असतं.

काल भेटायला गेल्यावर, "मी तुम्हाला आठवतेय का?" विचारल्यावर आज्जी बेडशेजारच्या कॉर्नर टेबलवर ठेवलेली मासिकं, पेपर आणि पाकिटांचा गठ्ठा चाळायला लागल्या. त्यातून एक A-4 साईझचं पांढरं पाकीट बाहेर काढून त्यावर काहीतरी लिहिलेलं वाचू लागल्या. म्हणाल्या, "स की ना". मी जवळ जाऊन बघितलं, तर मीच मागच्या भेटीत तिथे मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, "SAKINA". आज्जींना माझं नाव नीट कळत नव्हतं, म्हणून त्यांनी मला ते त्या पाकिटावर लिहून त्यांना दाखवायला लावलेलं होतं आणि ते पाकीट त्यांनी अजूनही सांभाळून ठेवलेलं होतं!!!

सगळी ख्याली-खुशाली विचारून झाल्यावर मी आज्जींना विचारलं, "तुम्ही आजोबांना भेटलात का एवढ्यात?" तर त्या रडायलाच लागल्या. "मला भेटायचं आहे त्यांना", म्हणाल्या. पण मला ते कोणत्या मजल्यावर आहेत आणि कुठल्या रूममध्ये आहेत, हे काही आठवत नाहीये, म्हणाल्या. मी त्यांना म्हणाले, थांबा मी त्यांचा रूम नं. लिहून आणून देते तुम्हाला. सर्व्हरवरून आजोबांचा डेटा चेक करून त्यांचा रूम नं. मी आज्जींना आणून दिला. त्या तो नंबर पाठ करायला लागल्या. पण त्यांच्या चेहऱ्यावर मला टेन्शन दिसत होतं. मी एकटी तिथे कशी जाऊ, असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

मी त्यांना म्हणाले, चला आज्जी, मी घेऊन जाते तुम्हाला त्यांच्याकडे. त्यांना वॉकरच्या आधारे खालच्या मजल्यावर नेलं, तर केअर युनिटच्या मुलीने आम्हाला हटकलं. "आज्जी त्या आजोबांना नाही भेटू शकत", म्हणाली. मी विचारलं, "का?" तर तिने सांगितलं, "तिला आज्जींची मेडिकल कंडिशन माहिती नाही, उगाच एकमेकांचा आजार एकमेकांना नको पसरायला.."

मला आणि आज्जींनाही अर्थातच वाईट वाटलं. इतक्या दिवसांनी- किती ते मला माहिती नाही, आजोबांच्या दरवाजाजवळ येऊनही त्यांची भेट होऊ शकली नाही. आज्जींना पुन्हा ३ऱ्या मजल्यावर त्यांच्या रूममध्ये घेऊन गेले, तर त्या रडायलाच लागल्या. माझ्या मिस्टरांना माझे ग्रिटींग्ज कळव, म्हणाल्या. मी "हो" म्हणून "ताबडतोब तुमचा निरोप कळवते", असं सांगून तडक आजोबांना भेटायला गेले. आजोबा झोपलेले होते, म्हणून तिथेच उभी राहिले जरावेळ. त्यांची डोळे मिटलेल्या स्थितीतच हालचाल दिसल्यावर हळूच "हॅलो" म्हणाले, तर आजोबा जागेच होते!

त्यांना त्यांच्या बायकोचा निरोप दिल्यावर ते म्हणाले, "ती मला कधी येईल भेटायला? मला तिची आठवण येतेय. माझी बहीणही आज येणार होती भेटायला, तीही अजून आलेली नाही." (अतिशय आजारी रहिवाश्यांसाठी नियम थोडे शिथिल केलेले असल्याने आजोबांची बहीण रोज तिकडे येते आणि काही तास सोबत राहून घरी जाते, असं नंतर कळलं.)

मला फारच वाईट वाटायला लागलं, ह्या जोडप्याच्या ताटातूटीविषयी कळल्यावर.. आजोबा म्हणाले, "बायकोला माझेही ग्रिटींग्ज कळव." त्याक्षणी माझ्या डोक्यात कल्पना आली, आजोबांना आज्जींसाठी एक पत्र लिहायला लावायचे, तेवढीच आज्जींजवळ त्यांची आठवण. मग मी पेपर पेन घेऊन आले आणि त्यांना आज्जींना पत्र लिहायला लावले. आजोबांनी थरथरत्या हाताने काहीतरी खरडलं, जे अजिबात वाचता येत नव्हतं. मी त्यांना काय लिहीलंय, ते वाचून दाखवायला लावलं. त्यांनी जर्मनमध्ये लिहिलेल्या मजकुराचं भाषांतर असं, " प्रिय.. (आज्जींचं प्रेमाचं नाव) मला तुझी फार आठवण येतेय, लवकर भेटायला ये" मी ते नीट अक्षरात त्यांच्या मजकुराखाली लिहिलं आणि त्याखाली कालची तारीख टाकून आजोबांना सही करायला लावली.

मग आज्जींकडे तो पेपर घेऊन गेले. तर आज्जींना रडू अनावर झालं. आज्जींना म्हणाले, "तुम्हालाही पत्र लिहायचंय का आजोबांना?" आज्जी लगेच तयार झाल्या. थरथरत्या हातानेच पण अतिशय सुवाच्य अक्षरात त्यांनी जर्मनमध्ये उत्तर लिहिलं. त्याचा अनुवाद, "माझ्या लाडक्या.. (आजोबांचं नाव) मलाही तुला भेटायची फार इच्छा आहे. माहिती नाही कधी भेटता येईल. लव्ह यू. तुझीच.. (आणि त्यांचं टोपणनाव)

जाऊन मी ते पत्र लगेच आजोबांना देऊन आले. आजोबा कितीतरी वेळ पत्राकडे बघतच बसले. आजोबांना निरोप देऊन मी निघाले.

मला फार अस्वस्थ वाटत होतं. मी तिकडे एका क्लिनिंगस्टाफपैकी एकीला भेटले. तिला सगळं सांगितल्यावर ती म्हणाली, मास्क घालून तरी भेटू द्यायला हवं यांना.. मग मी स्टेशन हेड कडे गेले, त्याला सगळं सांगून मला दोन मास्कस दे आज्जी-आजोबांसाठी, असं सांगितलं, तर त्याने ते लगेच दिले.
पण त्याच वेळी लंचब्रेक झालेला असल्याने मी जेवून आज्जींकडे जायचे ठरवले.

लंचब्रेकमध्ये बॉससोबत बोलणं झालं. त्या म्हणाल्या, उगाचच अडवलं स्टाफने तुला. आज्जी आजोबांना एकमेकांना भेटायला मास्कचीही गरज नाही. ते इथेच तर राहतात! कुठे बाहेरही जात नाहीत. काही संसर्गजन्य आजारही नाही त्यांना. तू जा घेऊन आज्जींना आजोबांकडे. पुढच्यावेळी तुला काहीही शंका आली, तर लगेच मला कॉल करून क्लियर करून घे. मला हे ऐकून अर्थातच फार आनंद झाला.

मग जेवण झाल्यानंतर लगेचच मी आज्जींच्या खोलीत गेले. तिकडे त्यांची नणंद आलेली होती. मी त्यांना सगळी हकीकत सांगून "आज्जींना आजोबांकडे न्यायला आले आहे, तुम्हीही चला, तुमचा भाऊ तुमची वाट बघतोय", सांगितलं, तर त्या म्हणाल्या, "मला एकावेळी एकाच्याच जवळ थांबायची परवानगी आहे" मला ह्या अशा मजेशीर नियमांचे कारण काही कळले नाही. मी लगेच बॉसना फोन करून विचारले, तर त्यांनी विचार करून सांगितले, ठीक आहे, भेटू दे तिघांना एकत्र..

मग खरंतर माझं काही तिकडे काम नव्हतं, पण तुलाही सोबत यायचंय का, असं आजोबांच्या बहिणीने विचारल्यावर मी, "हो" म्हणाले. "माझं तिकडे काही काम नाही, पण मला तुमचं सर्वांचं रि-युनियन बघायचं आहे", असं म्हणून सोबत गेले. आजोबांच्या खोलीत पोहोचल्यावर आज्जींनी आजोबांना खूप उत्कटतेने खूप खूप कीसेस दिले.

आजोबा म्हणाले, किती छान, तुम्ही दोघी आलात. आज्जींनी मला सांगितलं की ही दोघं जुळी भावंडं आहेत.
मला तिथे इतकं छान वाटत होतं की पूर्णवेळ तिथेच थांबावंसं वाटत होतं, आज्जी आजोबा आणि बहिणीच्या गप्पा ऐकत. त्यांचा मायेचा ओलावा अनुभवत.. पण मी तिकडून थोड्यावेळाने निघाले. बाकीची आज्जी आजोबांना भेटायला हवे होते ना!

मी निरोप घेतल्यावर आज्जी आजोबांनी मला खूप वेळा थँक्यू म्हणून मला निरोप दिला. आज्जींनी पुन्हा एकदा काल मला खूप फ्लाईंग किसेस दिले. अशाप्रकारे मी काल कबुतर झाले! मानसिकरित्या प्रचंड थकवणारा आणि तरीही खूप समाधान देणारा हा जॉब आहे, याची परत एकदा जाणीव झाली.

दोन जवळच्या, एकाच गावात राहणाऱ्या दोन मैत्रिणींची अनेक वर्षांनी सिनियर केअर होममध्ये भेट झाली, त्यांची गोष्ट आणि अजून काही आज्जी आजोबांची गोष्ट उद्याच्या भागात सांगते.

~सखी जयचंदर/सकीना वागदरीकर
१६.०४.२०२०

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle