आरोग्यसेतू ऍप

भारतात राहणाऱ्या मुलींनो..

तुमच्यापैकी कोणी आरोग्यसेतु ऍप डाउनलोड केले आहे का?

मी नवऱ्याच्या मोबाईलवर बघून गुगल प्ले स्टोर वरून आजच डाउनलोड केले.

ऍप कार्यरत करण्यासाठी:

१. डाउनलोड करण्यासाठी फार जागा आणि इंटरनेट स्पीडची गरज पडली नाही. ऍपची साईझ फार नाही.

२. डाउनलोड केल्यावर नाव व नंबर मागितला गेला व ओटीपी द्वारे कन्फर्म केला गेला.

३. नंतर काही आरोग्य विषयक प्रश्न विचारले गेले ज्याची खरी व प्रामाणिक उत्तरे देणे अपेक्षित होते.

४. त्यांनतर ऍप सुरू झाले. त्यात महाराष्ट्र आणि देशातली रिअल टाईम आकडेवारी अपडेट होत होती.

कार्यपद्धती:

या ऍप मध्ये आपल्या लोकेशन ची माहिती घेऊन त्यानुसार माहिती पुरवली जाते. मला हे फिचर आवडले कारण अशी एरिया स्पेसिफिक माहिती इतरत्र कुठेही उपलब्ध आहे असे मला वाटत नाही. उदा. बिबवेवाडी हा पुण्यातील एरिया अनेक किलोमीटर मध्ये पसरलेला आहे. त्यामुळे बिबवेवाडी अमुक इतके रुग्ण सापडले ही माहिती कितपत सिरियसली घ्यायची हेच लक्षात येत नाही. आत्तापर्यंत फॉर्मली / इंफॉर्मली हातात आलेल्या माहितीप्रमाणे बरेच रुग्ण घरापासून किमान 4 किमी लांब आहेत इतपत माहिती होती.

परंतु ऍप मध्ये कळले की माझ्या 500 मीटरच्या परिघात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे. कदाचित कागदोपत्री हा माझ्या शेजारचा एरिया असू शकतो. पण ऍपमुळे मला जास्त अचूक माहिती मिळू शकली.

या ऍप मध्ये जर तुमचे सॅम्पल कोरोना टेस्टिंगसाठी गेले असेल तर तशी नोंद करण्याची सोय आहे. तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर तेही नोंदवण्याची सोय आहे.

आता या सगळ्याचा फायदा काय?

१. आपण कोणत्याही कारणाने घराच्या बाहेर पडताना याचे ब्ल्यूटूथ ऑन ठेवणे अपेक्षित आहे. समजा अ व ब व्यक्ती एकाच वेळी घराबाहेर पडले आणि एकाच भाजीवल्याकडे भाजी घेतली. काही दिवसांनी ब व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली आणि तिने तसे ऍपला सूचित केले तर त्याची माहिती (ब चे नाव जाहीर न करता) ताबडतोब अ ला दिली जाईल आणि त्याला क्वारांटाईन होण्याचा सल्ला दिला जाईल.

२. जर आपण सर्वांनी हे ऍप वापरायचे ठरवले तर ब च्या संपर्कात जे जे आले त्या सर्वांना नोटिफिकेशन द्वारे कळवण्यात येईल की त्यांनी घरी राहणे आणि कोरोनासदृश कोणतेही लक्षण आढळल्यास तातडीने सरकारला कळवणे गरजेचे आहे.

३. मी मध्यंतरी वुहानमध्ये त्यांनी कोरोना इतक्या लवकर कसा आटोक्यात आणला याबद्दल तिथे राहणाऱ्या एका भारतीय पत्रकाराने दिलेली बातमी बघत होते. तर तिथे अश्याच प्रकारचे एक चायनीज ऍप सरकारने वापरले आहे जे डाउनलोड करणे सर्वांना बंधनकारक आहे. त्या ऍप मध्ये जोपर्यंत तुम्हाला कोरोना लक्षणे नाहीत, तुम्ही कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात येत नाही तोपर्यंत हिरवा रंग दिसतो. हा हिरवा रंग तुम्हाला मॉल किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी आत शिरण्यापूर्वी दाखवणे बंधनकारक आहे. त्यानंतर तुम्ही ज्या ज्या व्यक्तींच्या जवळून गेलात त्या सगळ्यांची माहिती ऍप टिपून ठेवते. तुम्ही ज्याच्या जवळून गेलात तो एका आठवडाभराने जरी कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर त्याचे ऍप लाल रंगाचे होऊन ती माहिती त्याच्या जवळून गेलेल्या सर्वांना कळवते. तुमचेही ऍप रेड (लाल) होते आणि तुम्हाला घरी बसावे लागते. आरोग्यसेतू ऍप साधारण याच धर्तीवर काम करते आहे. परंतु सरकारने ते बंधनकारक केलेले नाही.

तोटे / ड्रॉबॅक:

१. यात असलेल्या सुविधेचा वापर करायचा असेल तर जास्तीत जास्त लोकांनी हे डाउनलोड करणे गरजेचे आहे. आपण एकट्याने डाउनलोड करून काय होतंय असा विचार सगळ्यांनीच केला तर या ऍप चा काहीही उपयोग होणार नाही. म्हणूनच तुम्ही किंवा कुटुंबातील जी कोणी व्यक्ती जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडते आहे / जिला पडावे लागते आहे अश्या व्यक्तीला तरी हे मोबाईलवर घालण्याची विनंती कराच. तसेच परगावी असलेले वृद्ध आईवडील किंवा इतर नातेवाईकांनाही याची माहिती द्या.

२. आणखी एक म्हणजे या ऍप ला निदान घराबाहेर पडताना तरी ब्ल्यूटूथ व जीपीएस ऑन लागतेच (त्याशिवाय ते जवळपास आलेले इतर लोक कसे आयडेंटिफाय करणार). तर काहींना वाटते की यामुळे मोबाईलची बॅटरी फार लवकर संपेल. पण मग स्वतःच्या जीवाच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही मोबाईल ची बॅटरी नाही वापरणार तर काय फक्त कॅंडी क्रश खेळायलाच वापरणार का?

तरी आपण सर्वांनी भारत सरकारने उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून कोरोनाचा प्रसार टाळूयात.

अधिक माहिती : https://www.bbc.com/marathi/india-52306639

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle