डाएट मेथी मटर मलई

ह्या पाककृतीला डाएट म्हटलंय कारण ह्यात खवा, साय वापरलेले नाही. नॉनफॅट मिल्क पावडर वापरली आहे ( पुण्यात चितळ्यांची आणते मी ) माझ्या फ्रीझरमध्ये नेहेमीच स्किम्ड मिल्क पावडरचे पाकीट असते. पंजाबी भाज्या उदा. बटर चिकनची ग्रेव्ही, पालक पनीर, शाही पनीर, मेथी मटर मलई आणि सूप्स ह्या सगळ्यात मी ती सढळहस्ते वापरते. क्रीमी चव आणि दाटपणा असे दोन्ही साध्य होते आणि कॅलरीज प्रचंड वाचतात.

साहित्य : १ मेथीची जुडी ( फार मोठी नको )
१ वाटी मटार
२ चमचे तूप, कांदा परतण्यासाठी तेल
१ मोठा कांदा, ७-८ काजू, पाव वाटी दूध ग्रेव्हीसाठी
१ मोठा चमचा लसूण पेस्ट किंवा ड्राय गार्लिक पावडर
१-२ पोपटी मिरच्या ( तिखट मिरची नको. मिरचीचा फक्त स्वाद हवा )
अर्धी वाटी स्किम्ड मिल्क पावडर
१ १/२ टीस्पून कणिक
१ चमचा शहाजिरं. नसेल तर साधं जिरं.
जायफळ
थोडासा गरम मसाला
२ चमचे साखर
चवीनुसार मीठ

कृती : किंचित तेलावर कांदा परतून घ्यावा. लसूण पाकळ्या वापरणार असाल तर कांद्याबरोबरच घालाव्या. त्यातच काजू घालावे आणि गॅस बंद केल्यावर पाव वाटी दूध घालावे.
गार झाल्यावर कांदा-काजू-(लसूणपाकळ्या)-मिल्क पावडर- कणिक असे सगळे थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये गुळगुळीत पेस्ट करुन घ्यावी.
पातेल्यात दोन चमचे तूप घालून ते गरम झाल्यावर शहाजिरं तडतडवून घ्यावं.
बारीक चिरलेली मेथी - फ्रोझन मटारदाणे- ( वाटणात लसूण नसल्यास ) लसूणपेस्ट / पावडर -चिमूटभर गरम मसाला आणि मीठ घालून भाजी शिजेपर्यंत परतून घ्यावे. पाहिजे तर एक वाफ आणावी. पटकन शिजतात मेथी आणि मटार दोन्ही ( ताजे दाणे वापरल्यास वाफवून घ्यावे लागतील )
बारीक चिरलेली मिरची आणि वाटण घालून एक उकळी आणावी.
ह्यात कणिक असल्याने भाजी दाट होत जाते त्यामुळे थोडे पाणी घालून सारखी करुन घ्यावी.
गॅस बंद करता करता दोन चमचे साखर आणि थोडे जायफळ किसून घालावे.
कच्चा कांदा आणि लिंबू पिळून छान लागते ( लिंबू अगदी खायच्यावेळीच पिळावे. ग्रेव्ही फाटत नाही )

ह्याच ग्रेव्हीमध्ये मेथी वगळून भाज्या-फळं घातल्यास उत्तम नवरतन कुर्मा होतो. ह्यात मटरऐवजी बोनलेस चिकन घालून अतिशय उत्तम आणि वेगळ्या चवीचं मेथी चिकन होतं. फक्त त्यात तुपात शहाजिर्‍याबरोबर अर्धवट भरडलेले चार-पाच मिरीदाणे घाला. ( तेव्हा साखर वगळा पण जायफळ वगळू नका )
मेथी-मटर-बारीक चिरलेले पनीर असेही मस्त लागते.

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle