आज्जी आजोबांची डायरी: भाग ३१

डायरीच्या आजच्या भागात मी गैरसमज कसे निर्माण होऊ शकतात आणि सुसंवादाने प्रश्न कसे सुटू शकतात, ह्याचा मला आलेला एक अनुभव सांगणार आहे.

मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे. मी त्या दिवशी ड्युटी संपवून घरी गेले आणि क्वारंटाईन फ्लोअरवर एक नवीन आज्जी दाखल झाल्या. दुसऱ्या दिवशी माझ्या कामाच्या स्वरूपानुसार त्यांना भेटायला गेले, तेंव्हा त्यांनी सांगितले, त्यांना श्वासाचा आजार आहे आणि अजूनही त्यांचा पफ आणि औषधं पोहोचलेली नाहीत. त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आहे.

मी जाऊन नर्सला याचं कारण विचारलं, तर ती म्हणाली, हे काम स्पेशलाईज्ड नर्सेस बघत असतात. ते राऊंडला आले की ती त्यांना विचारेल. मी अस्वस्थ झाले आणि ह्या फ्लोअरची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांना कॉल केला. ते म्हणाले, हॉस्पिटलमधून त्या आज्जी डायरेक्ट संस्थेत दाखल झालेल्या आहेत आणि त्या फ्लोअरवर नवीन असल्याने त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स, प्रिस्क्रिप्शन्स येणे, या सगळ्या प्रोसेसला जरा वेळ लागतो आहे. बाकीच्या लोकांसाठी ही सगळी रुटीन प्रोसेस असल्याने ते कॅज्युअल होते. ते त्यांचं त्यांचं काम रेग्युलर प्रोसेसनुसार करत होते, मात्र माझ्यासाठी हा अनुभव नवा होता आणि आज्जींची कंडिशन नुकतीच पाहून आलेले असल्याने मला मनात जरा टेन्शन होतं. आज्जींची काळजी वाटत होती. लंचब्रेकमध्ये जेवतांनाही आज्जींचा विचार मनात होता. त्याच टेन्शनमध्ये बॉसना न राहवून ही गोष्ट मी सांगितली. बॉसनेही तातडीने जेवण बाजूला ठेवून संबंधित व्यक्तींना कॉल करून अशी काही पटापट सूत्रं फिरवली की मी जेवण संपवून फ्लोअरवर जाईपर्यंत आज्जींची औषधं तिकडे पोहोचलेली होती. मला जबरदस्त सुखद धक्काच बसला ते बघून.

नर्सला सगळी गोष्ट सांगितली, तेंव्हा तीही म्हणाली, फारच छान झालं. मग आमचं बोलणं झालं की गोष्टींचं गांभीर्य ओळखून गरज असल्यास बॉसना कळवलं पाहिजे आणि त्याने गोष्टी स्पीड अप झाल्या, तर ते चांगलंच ना?

दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे राऊंडला गेले, तेंव्हा तीच नर्स ह्या नवीन आज्जींच्या रूममध्ये त्यांच्यासोबत काहीतरी गंभीरपणे बोलत बसलेली दिसली. मला बघून खुणेनेच काही बोलू नकोस आणि आतही येऊ नकोस, असे सांगून तिने आज्जींसोबतचे बोलणे सुरूच ठेवले.

मग मी दुसऱ्या आज्जी आजोबांना भेटायला गेले. थोड्यावेळाने जेंव्हा ती आज्जींच्या रूममधून बाहेर आली, तेंव्हा अपसेट दिसली. काय झालं, विचारलं असता, आदल्यादिवशीच्या नर्सने आज्जींना नीट ट्रीटमेंट न दिल्याची तक्रार आज्जींनी तिच्याजवळ केली असल्याचे तिने सांगितले. नक्की काय झाले, हे तूच आज्जींशी बोल, असे सांगून ती तिच्या इतर कामासाठी निघून गेली.

मग मी आज्जींना भेटले, तेंव्हा त्यांनी सांगितले की संध्याकाळच्या जेवणात त्यांना व्हाइट ब्रेड मिळालेला होता आणि त्यांना ब्राऊन ब्रेड हवा होता, त्यांनी ही गोष्ट नर्सला सांगितली, तेंव्हा त्याने ब्राऊन ब्रेड स्लाईस आज्जींना हातात आणून दिला. वास्तविक त्याने दुसऱ्या प्लेटमध्ये तो देणे अपेक्षित होते आणि तो ब्रेड तुटलेला होता. त्याने तो हाताने कुस्करून त्यांच्या हातात दिला. आज्जींचा फ्लो ब्रेक करून मी त्यांना त्याने हातात ग्लोव्हज घातलेले होते का, विचारले असता त्या 'हो' म्हणाल्या. शिवाय त्यांनी पाण्याची बाटली मागितली, तर त्याने सांगितले की तुमची अर्धी बाटली अजून शिल्लक आहे, ती संपली की नवीन आणून देईन. ही अर्धी बाटली रात्रभर पुरणार नाही, मग ही संपली की पाणीच मिळणार नाही, ह्या भीतीने त्यांनी रात्रभर पाणीच प्यायले नाही, असे सांगितले. हे सगळे त्यांनी सकाळच्या ड्युटीवरील नर्सला सांगितल्यावर तिने तडक बॉसना कॉल करून आज्जींनाच त्यांच्याशी बोलायला लावले, अशी माहिती आज्जींनी मला दिली. ह्या नर्स ताईला मी कालच बॉसना इमर्जन्सी असलेल्या परिस्थितीत कॉल केला पाहिजे, हा दिलेला सल्ला तिने फारच मनावर घेऊन ताबडतोब अंमलात आणलेला दिसला.

आज्जींनी ज्या नर्स मुलाची तक्रार केलेली होती, तो म्हणजे डायरीच्या मागच्याच भागात शेवटी ज्याच्या सेवाभावी वृत्तीबाबत कौतुक केले, तो इरिट्रीयन मुलगा असल्याने मी अतिशय गोंधळात पडले. मनात हजारो विचार घर करू लागले. जसे:

'आपण एखाद्याला काय समजत असतो आणि तो माणूस काय असतो.. '

'माणसाचं खरं रूप तो एकटा असतांनाच दिसतं. लोकांसमोर तो गुडी गुडी मास्क घालून वावरत असू शकतो. आपण त्यावर लगेच डोळे झाकून विश्वास ठेवणे बरोबर नाही.'

'हा छोट्याशा आफ्रिकन देशातला काळा मुलगा.. भारतीयांना देशात तसेच देशाबाहेरही रंगावरून येतात, तसे त्याला वाईट अनुभव आलेले असू शकतात आणि त्यांचं उट्टं तो असहाय्य अवस्थेत असलेल्या गोऱ्या व्यक्तीवर काढत असेल का?'

'आपल्याकडे कसे सासू सुनेवर अन्याय करते, ते किस्से आपण ऐकत, वाचत असतो. त्यातली सासू स्वतः बरेचदा आपल्या सासूच्या छळाचा बळी असते आणि त्यातून शिकून आपल्या सुनेला चांगली वागणूक देण्याऐवजी तिचा छळ करून फिट्टमफाट करत असते.'

'शिवाय जनरलीच बरेच लोक आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला आपल्यापेक्षा दुबळ्या माणसाचा, प्राण्याचा छळ करून घेतांना दिसतात. हे लॉजिक मला कधीच समजलेलं नाही.. ज्याने त्रास दिला, त्याला धडा शिकवायचं सोडून भलत्याच कोणावर तरी राग काढून नेमके काय साधते? एक दुष्टचक्रच त्यातून निर्माण होते.'

'यावर एक गोष्ट वाचलेली आठवली. एक बॉस चिडला, त्याने त्याच्या सबॉर्डीनेटवर राग काढला. त्याने अपमानित झालेल्या त्या माणसाने घरी जाऊन बायकोला क्षुल्लक कारणावरून थोबाडीत ठेऊन दिली. बायकोने आपल्या मुलाला मग काहितरी कारणावरून ठोकून काढले. त्या चिडलेल्या मुलाने रागारागाने रस्त्यावरून चालत असतांना तिकडे बसलेल्या कुत्र्याच्या पेकाटात लाथ हाणली. तो कुत्रा विव्हळत पळायला लागला. तिकडून तो बॉस चाललेला होता, त्यालाच जाऊन तो रागारागाने चावला आणि एक दुष्टचक्र पूर्ण झाले.'

'ही गोष्ट इथे संपवली असली, तरी मग पुढे बॉसने काय केले असेल, हे आपण वाढवत नेऊ शकतो. हे दुष्टचक्र आपण ठरवले, तर चालूच राहू शकते, नाही का?'

आज्जींची गोष्ट ऐकता ऐकता मनात हे सगळे विचार तरळून गेले आणि मी आज्जींनाही ते सांगितले. त्यांना म्हणाले, मला नक्की माहिती नाही, हे असेच घडले असेल की नाही. मात्र आपण त्या मुलाला 'बेनिफिट ऑफ डाऊट' देऊया आणि त्याने असे का केले, हे समजून घेऊया. मी त्याला इतर आज्जी-आजोबांसोबत फार प्रेमाने वागतांना बघितलेले आहे, त्यामुळे मला तुमचा अनुभव ऐकून फार वाईट वाटलेले आहे.

आज तो दुपारच्या शिफ्टवर आला की मी त्याच्याशी बोलेनच, पण तुम्हीही त्याच्यासोबत बोला. त्याला विचारा, की तू माझ्याशी असा का वागतो आहेस? तुला गोऱ्या माणसांकडून काही वाईट अनुभव आलेले आहेत का? की जनरलच म्हाताऱ्या माणसांच्या सोबतच्या कामाने वैतागलेला आहेस आणि तुझा थ्रेशहोल्ड संपला आहे? की तुझ्या व्यक्तीगत आयुष्यात काही घडले आहे, ज्याने तू अपसेट आहेस?

मग आज्जींना सांगितले, की तुम्ही बॉसना कळवले, हे चांगलेच केलेत. आता त्या योग्य ती ऍक्शन घेतीलच. आपण गप्प बसून अन्याय सहन करणे चूकच आहे.

मात्र अजून एक दुसरी गोष्ट त्यांना सांगितली, जी मागे एका आज्जींनाही सांगितलेली होती , ती म्हणजे, तुम्ही आता वयाच्या एका असहाय्य टप्प्यावर आहात, तेंव्हा तुमची काळजी घेण्याची ज्या माणसावर जबाबदारी आहे, तो तुसडा निघाला, तरी त्याच्याशी सुसंवाद साधून त्याच्या वागणुकीमागचे कारण समजून घेऊन त्याच्याशी अधिक गप्पा मारण्याचा, तो कसा आहे, वगैरे चौकशी करण्याचा, त्याच्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केलात, तर तुमचे जीवन सुसह्य आणि आनंददायी होईल. आज्जींना ते पटले आणि त्यांनी हसून मला होकार दिला.

दुपारी हा मुलगा ड्युटीवर आल्यावर नर्स त्याच्यासोबत ह्या विषयावर अवाक्षरही न बोलता काही घडलेच नाही, असे दाखवून त्याच्याकडे काम ट्रान्सफर करतांना काय काय केलेले आहे आणि काय बाकी आहे, वगैरे माहिती देऊन निघून गेली.

हा मुलगा शांत आणि अपसेट दिसत होता. तो स्वतःहून विषय काढेल, ही शक्यता दिसत नसल्याने मीच मग तो विषय काढला आणि त्याला आज्जींनी सांगितलेल्या गोष्टी सांगितल्या आणि विचारले, तू असे का केलेस? तुझे मला किती कौतुक वाटत होते, की तू केवढ्या मायेने सगळं करतोस आणि हे काय आहे?
तो मला म्हणाला, मी असे काही केलेले नाहीये, आज्जींनी असे चुकीचे का पसरवले आहे, मला समजत नाही. आत्ता मी आमच्या डिपार्टमेंटच्या हेडलाच भेटून आलो. तिला बॉसकडून सगळी परिस्थिती कळली आणि तिनेही मला जाब विचारला. गेली अडीच वर्षं मी ह्या संस्थेत काम करतो आहे, एकदाही कोणी माझी अशी तक्रार केलेली नाही.

मग मी विचारले, नक्की काय झाले? आज्जी असे का बोलल्या? त्यावर त्याने मला सांगितले, चल, तुला मी प्रात्यक्षिकच करून दाखवतो. मग तो मला फ्लोअरवरच्या किचनमध्ये घेऊन गेला आणि त्याने दाखवले. हा व्हाईट ब्रेड स्लाईस. हा असा प्लेटमध्ये ठेवलेला होता. सोबत चीज, हॅम, सॅलड वगैरे प्लेटमध्ये होते. आज्जींनी सांगितले की मला हा ब्रेड नको, ब्राऊन हवा. एकच ब्राऊन स्लाईस ब्रेड शिल्लक होता, तो मी किचनमधून आणून त्यांच्या प्लेट झाकलेल्या कव्हरवर ठेवला. तो ब्रेड आधीच तुटलेला होता. मी हाताने नाही कुस्करून दिला. एक्स्ट्रा प्लेट का दिली नाहीस? हे विचारले असता, संध्याकाळी खालचे मेन किचन बंद असते. तिकडून एक्स्ट्रा मागवणे शक्य नसल्याने त्याने हा मार्ग निवडला. आज्जींना त्रास देणे, हा हेतू नव्हता, हे सांगितले.

त्यांना मागितले असतांनाही एक्स्ट्रा बाटली पाणी का दिले नाही, विचारले असता, एक संपल्यावर दुसरे द्यावे, त्यांची रूम एका टोकाला तर किचन दुसऱ्या, असे असल्याने विनाकारण चकरा कशासाठी मारत बसू मी, मला इतर भरपूर कामं असतात, असे सांगितले.

मग मी त्याला सांगितले, चल, आज्जींना सगळं समजावून सांग. त्यांचा गैरसमज दूर होईल. तोही लगेच तयार झाला आणि आज्जींना त्याने सगळी परिस्थिती समजावून सांगितली. आज्जी म्हणाल्या, त्यांना ते कव्हर ट्रान्स्परंट असल्याने दिसलं नसावं.

त्याने खरोखरच कव्हरमध्ये ब्रेड दिला नव्हता की आज्जींना तो दिसला नव्हता, हे मला माहिती नाही. एकतर आज्जींचा गैरसमज झाला असेल, किंवा त्यांनी माघार घेतली असेल, ह्या दोनच शक्यता दिसतात.

त्या मुलानेही आज्जींना ऍश्यूरन्स दिला की, आज्जी, यापुढे एक्स्ट्रा प्लेट्स आणि चमचे, फोर्क्स, नाईफ्स, जास्तीचे व्हरायटी असलेले ब्रेड्स वगैरे खालचे किचन बंद व्हायच्या आतच मागवून घेतले जाईल. शिवाय तुम्हाला मी दोन्ही व्हरायटीज वेगवेगळ्या प्लेट्समध्ये आधीच आणून देईन, म्हणजे तुम्हाला हवे, ते तुम्ही त्या त्या दिवशीच्या मूडनुसार निवडू शकाल. पाणी सुद्धा जास्तीच्या बाटल्या आणून ठेवेन, म्हणजे तुम्हाला झोपतांना असुरक्षित वाटणार नाही. आज्जी हसून म्हणाल्या, "कालच मला खालचे किचन बंद झाल्याने तुम्ही आहे त्यात सगळे मॅनेज करत आहात, हे सांगितले असते, तर मी अशी कटू मनस्थितीत रात्र काढली नसती ना.." नर्स मुलगाही हसून आज्जींना सॉरी म्हणाला.

मग मी आज्जींना त्याने त्याच्या काकांनी त्याला हे काम तू कसे करावेस, ह्याविषयी काय सल्ला दिला होता, ते सांगितले. प्रत्येक आज्जी आजोबांमध्ये तो आपले आई वडील बघत कसे प्रेमाने काम करत असतो, हे आज्जींना त्याच्यासमोर सांगून तो खूप प्रेमळ आहे, जे झाले, ते वाईट भावनेतून घडलेले नाही, मात्र यापुढे असे गैरसमज होणार नाहीत, या दृष्टीने योग्य ती काळजीही घेतली जाईल, अशी खात्री त्यांना त्याच्या आणि संस्थेच्या वतीने देऊन आज्जींना बाय केले.

आपण रोज वर्तमानपत्रात, सोशल मीडियावर वेगवेगळ्या बातम्या वाचत असतो. आपल्या आयुष्यातही रोज काही ना काही प्रसंग घडत असतात. बरेचदा आपण आपल्या जवळच्या मैत्रिणीच्या, मित्राच्या, नातेवाईकांच्याकडून ऐकलेल्या प्रसंगावर, अनुभवावर एखाद्या माणसाबद्दल मत बनवून ते बाळगत असतो. काहीवेळा ते अगदी अचूक असेलही, पण काहीवेळा कानगोष्टींप्रमाणे मूळ गोष्ट असते वेगळी आणि सांगितली जात असतांना ती वेगवेगळे व्हर्जन्स, रूपं घेऊन पसरत जाते. शिवाय कधीकधी बघणाऱ्या माणसाला ती दिसते एक, मात्र तिची पार्श्वभूमी अगदी वेगळी असू शकते. ही गोष्ट ध्यानात घेऊन आपण कोणाविषयी मत बनवण्याची, ते पसरवण्याची घाई करू नये. अगदी विश्वसनीय सूत्रांकडून- जसे वर्तमानपत्र- माहिती आलेली असली, तरीही जे वाचत आहोत, ती एक शक्यता आहे, बातमी मागची बातमी काही वेगळी असू शकते, हेच कायम लक्षात ठेवून डोळसपणे आणि पूर्वग्रहदूषित न राहता गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा जमेल तितका प्रामाणिक प्रयत्न करत गॉसिपिंग पासून दूर रहावे, हेच कायम मनाला समजावत असते. त्याचा मला या आणि अशा अनेक प्रसंगी दुष्टचक्र मोडतांना फायदा होतो आणि खूप आत्मिक समाधान लाभते.

~सकीना (कुमुद-प्रमोद) जयचंदर
२६.०६.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle