आज्जी आजोबांची डायरी: भाग ३८

"कायदा" या क्षेत्रात डॉक्टरेट असलेले मात्र डिमेन्शिया म्हणजेच विस्मरणाचा आजार झाल्याने सिनियर केअर होममध्ये दाखल झालेले आजोबा करोना काळातील नियमानुसार क्वारंटाईन फ्लोअरवर दोन आठवडे राहून आणि भरपूर गोंधळ घालून संस्थेच्या तळमजल्यावर असलेल्या डिमेन्शिया वॉर्डमध्ये हलवले गेले. 

काही दिवसांनी त्यांच्या आडनावाशी साधर्म्य असलेल्या एक आज्जी संस्थेत दाखल झाल्याचे समजले. या त्यांच्या मिसेस तर नसतील ना? अशी शंका आली आणि तिचे निरसन करून घेतल्यावर समजले की माझी शंका बरोबरच होती आणि त्यामुळे मला अतिशय आनंद झाला होता. कारण ज्या आजोबांशी माझे इतके छान ऋणानुबंध निर्माण झालेले होते, त्यांच्याविषयी खरंतर मला काहीच माहिती नव्हती. एखाद्या पझलचे तुकडे जोडतांना योग्य तुकडा सापडल्यावर आणि जोडल्यावर चित्र पूर्ण झाले की आपल्याला जसा आनंद होतो, तसाच मला कायम एखाद्या व्यक्तीला आधीच ओळखत असतांना त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना पाहिल्यावर होत असतो. मग ते त्यांचे जोडीदार असोत की मुलंबाळं, भावंडं असोत की इन-लॉ ज.. या संस्थेत नोकरी करायला सुरुवात केल्यापासून मला असे अनेक पझलचे तुकडे जोडतांना बघता आले आहेत आणि काही तुकडे मला स्वतःला जोडता आले, ते जोडण्यात मदत करता आली याचा फार आनंद वाटतो.

त्या आजोबांच्या मिसेसना भेटायला जातांना मनात प्रश्नांची मालिकाच सुरू झाली. त्या दिसायला, बोलायला कशा असतील? माझ्या मनातल्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी आज्जी तशा मनमोकळेपणाने बोलणाऱ्या असतील का? त्या मानसिक दृष्ट्या फिट असतील का? 

त्यांच्या रुमचे दार वाजवतांना मनातला उत्साह आणि उत्सुकता यांच्या मिश्रणाने हृदयाचे ठोके वाढले होते. आज्जी डबल रुममध्ये होत्या. त्यांच्यासोबत अजून एका नवीन आज्जींनी संस्थेत प्रवेश घेतलेला होता. रूममध्ये पाऊल टाकले, तर एक आज्जी बेडवर पडलेल्या तर दुसऱ्या आज्जी त्यांना पाठमोऱ्या अशा टेबलवर वर्तमानपत्र वाचत बसलेल्या दिसल्या. दोन्ही आज्जींना "हॅलो" म्हणून मी ज्यांना भेटायला आलेले होते, त्या तुमच्यातल्या कोणत्या, हे विचारल्यावर त्या बेडवर पडलेल्या आज्जी असल्याचे समजले. 

अमिताभ बच्चन सारख्या दिसणाऱ्या आजोबांच्या आज्जी निळसर हिरव्या रंगाची डोळ्यांची शेड आणि धारदार नाक असलेल्या आणि वहिदा रेहमान जाड झाल्यावर कशी दिसू शकेल, तशा दिसणाऱ्या होत्या. चेहऱ्यावरून दुःखी जाणवत होत्या. गेल्या गेल्या मी आज्जींची जनरल चौकशी करून आणि माझी ओळख करून दिल्यावर जराही वेळ न दवडता आजोबांची आणि माझी कशी ओळख झाली, ते त्यांना सांगितलं आणि तुम्हाला भेटून मला फार आनंद झालेला आहे, हे ही.. आजोबांचा उल्लेख ऐकून आज्जींच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं. डोळ्यातल्या पाण्यासोबतच आज्जींनी मनातल्या दुःखाला शब्दांनी वाट दाखवायला सुरुवात केली...

आज्जी बोलायला लागल्या, "दीड वर्षांपूर्वीपर्यंत आमचा संसार अतिशय सुरळीतपणे सुरू होता, मात्र अचानकपणे एक दिवस- मध्यरात्री हे उठले आणि काहीतरी विचित्र बरळायला लागले. मग त्यानंतर त्यांचे विस्मरण अतिशय वेगात व्हायला लागले, ज्याचा मला आणि माझ्या दोन्ही मुलांना खूपच त्रास व्हायला लागला. तरीही मी त्यांना कशीबशी सांभाळत होतेच, पण एक दिवस मीच घरात अडखळून पडले आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. मग हे इथे संस्थेत दाखल झाले आणि मी हॉस्पिटलमध्ये. ट्रीटमेंट झाली, तरीही मला अजूनही चालता फिरता येत नाहीये, त्यामुळे आता मी सुद्धा इथे संस्थेत दाखल झालेय. आयुष्य किती क्षणभंगुर असतं आणि क्षणात कसं होत्याचं नव्हतं होतं, कसं आपलं सगळं जगच उलटं पालटं होतं ना? मला प्रचंड एकटं एकटं वाटतंय..." असं बरंच काही बोलून झाल्यावर आज्जी शांत झाल्या. आज्जींचा मूड बदलण्यासाठी मी आज्जींना आजोबांचा संस्थेत प्रवेश झाल्यानंतर मी त्यांच्यासोबत मारलेल्या गप्पांपासून तर मी कशी त्यांची बॅग लावली आणि त्यानंतर ते कसे सुटकेस शोधत फिरत होते, त्यांनी मला कशी ती छोटी रूम उघडून त्यात सुटकेस चेक करायला लावली, कसे ते अलार्म प्रोटेक्शन असलेले संस्थेचे दार अनेकदा उघडून जिने उतरत, अर्धवट कपडे घालून फिरत आणि  स्वतः चे सोडून इतर रहिवाश्यांपैकी कोणाचेही दार उघडून आत शिरत वगैरे किस्से हसत हसत सांगितले. त्याचा खरोखरच छान परिणाम होऊन वातावरण एकदम हसरे झाले आणि आज्जीही जोरजोरात हसायला लागल्या. 

मी मग आज्जींना विचारलं, तुम्हाला आजोबांना भेटायचं आहे का? तर त्या 'हो' म्हणाल्या. मग उद्या मी आजोबांना तुमच्याकडे भेटायला घेऊन येते असं आश्वासन देऊन मी त्यांच्या मुलांबद्दल विचारायला सुरुवात केली. आज्जी म्हणाल्या, मला दोन मुलं आहेत, पण त्यांच्याशी संस्थेत आल्यापासून काहीच बोलणे झालेले नाही. आज्जी हॉस्पिटलमधून डायरेक्ट संस्थेत दाखल झालेल्या असल्या तरी त्यावेळी आता क्वारंटाईन फ्लोअर रेग्युलर फ्लोअरमध्ये रूपांतरीत झालेला होता आणि ह्या आज्जी तिसऱ्या मजल्यावरील एका रुममध्ये होत्या. मुलांशी संपर्क का नाही झाला, हे विचारले असता, त्यांचाच मला अजून कॉल आलेला नाही, असे त्यांनी सांगितले. तो वर्किंग डे असल्याने दुपारी मुलं भेटायला येऊ शकणार नाहीत, ती नंतर येतील, असे त्या म्हणाल्या. पण मला त्यांची फार आठवण येते आहे आणि मला त्यांच्याशी बोलायचं आहे,  पण त्यांचा नंबर माझ्याकडे नाही, म्हणाल्या. 

मी त्यांना त्यांच्या कॉन्टॅक्ट पर्सन ची माहिती सर्व्हरवर चेक करून कळवते, असं सांगून तिथून त्यांच्या मुलांचे नंबर मिळवून आज्जींना आणून दिले. मग प्रत्येक रहिवाश्याच्या बेडशेजारी असतो, तसा आज्जींच्या बेडशेजारी असलेल्या साईड टेबलवरील संस्थेचा लँडलाईन फोन आज्जींना त्याचे नॉमिनल मंथली चार्जेस सांगून आणि ते मान्य असल्याचे त्यांनी सांगितल्यावर आज्जींच्या परवानगीने ऍडमिन दादांकडून ऍक्टिवेट करून घेऊन त्यांच्या दोन्ही मुलांना एका नंतर एक कॉल करून आज्जींना बोलायला दिले.  मुलांशी थोडावेळ बोलल्यानंतर आज्जी एकदम रिलॅक्स झाल्याचे जाणवले. आज संध्याकाळी दोघंही भेटायला येणार आहेत, अशी माहिती मला दिल्यावर आज्जी,
"आता मला जरा बरं वाटतं आहे, खूप खूप धन्यवाद", असं म्हणाल्या. 

त्यानंतर आज्जींच्या शिक्षणाविषयी आणि नोकरीविषयी विचारले असता त्या जर्मन साहित्याच्या प्राध्यापिका होत्या, असे समजले. त्यांनी नाटकांमध्येही कामं केली असून त्यांनी Oskar Wildeच्या एका नाटकातील Lady Augusta Bracknell नावाचे पात्र साकारले होते आणि त्यात त्यांच्यासोबत त्यांच्या एका मुलानेही भाग घेतला होता, हे सांगतांना त्या जुन्या आठवणींमध्ये रमून गेल्या..

मग त्या आजोबांविषयी भरभरून बोलायला लागल्या. आजोबांचे नाव घेऊन हा अतिशय उमदा माणूस होता, असे सांगायला लागल्या. कितीतरी मुलांना त्यांनी शिक्षणात आणि एकूणच खूप मदत केलेली आहे. स्वतःच्या दोन्ही मुलांसोबतही ते खूप फुटबॉल खेळलेले आहेत, म्हणाल्या.  मग परत नकळत त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

मी आज्जींसोबत बराच वेळ बसलेले असल्याने त्यांना आता निरोप देऊन निघतांना इतकावेळ पाठमोऱ्या बसलेल्या त्या दुसऱ्या आज्जींची चौकशी करून त्यांच्याशी दोन शब्द बोलून मी निघाले.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे दुपारी आजोबा आणि आज्जींची भेट घडवून देण्याच्या उत्साहात त्या फ्लोअरवरच्या नर्सेसना माहिती दिली की आता मी आता आजोबांना घेऊन येणार आहे, त्या म्हणाल्या, की आज्जींनी त्यांना सांगितले होते, की मला त्यांना भेटायचे नाहीये. मला त्यांना पाहिलं, तर त्रास होईल. मी त्यांना सांगितले, की आज्जी मला हे असं काहीच बोलल्या नाहीत. उलट उत्साहात त्यांनी मला त्या गोष्टीसाठी होकार दिलेला आहे. वाटल्यास आता आपण परत त्या गोष्टीची खात्री करून घेऊया. आज्जींचा मूड बदलला असल्यास मी आजोबांना आणणे कॅन्सल करून टाकेन.

मग आज्जींच्या रूममध्ये जाऊन त्यांना नर्सने दिलेली माहिती देऊन विचारले, तर त्या म्हणाल्या, नर्स म्हणते, ते खरं आहे. मी आधी असाच विचार करत होते, पण काल आपण त्यांच्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर मला त्यांना आता भेटावंसं वाटतं आहे. आज्जी आज एकदम फ्रेश दिसत होत्या. त्यांच्याजवळ आज एक बेसिक मॉडेलचा मोबाईलफोनही दिसत होता. आदल्या दिवशी मुलं भेटून गेली, तेंव्हा त्यांनी आणून दिला असावा.

मग मी आजोबांच्या फ्लोअरवर- तळमजल्यावर गेले. आजोबा 'टागेसराऊम' (शब्दशः अर्थ 'डे रूम')मध्ये म्हणजेच डायनिंग हॉलमध्ये खुर्चीवर डोळे मिटून बसलेले होते. आजोबांना हाक मारली, तर ते काही उठले नाहीत. त्यांना अतिशयच गाढ झोप लागलेली होती. आता काय करावं? त्यांना नंतर येऊन घेऊन जावं का? असा विचार करून मी जाणार, तेवढ्यात मला एक ऑक्क्यूपेशनल थेरपिस्ट दिसला. त्याला सांगितल्यावर तो म्हणाला, आजोबांना त्यांच्या मेडीसीन्समुळे झोप लागलेली आहे. लंचनंतर दुपारी रोज ते असेच पेंगलेले असतात. त्यांना आपण व्हीलचेअरवर बसवू आणि तिकडे आज्जींच्या रूममध्ये बसू देऊ. नंतर त्यांची झोप झाली की ते उठतीलच कॉफीब्रेकपर्यंत. मग आजोबांसाठी संस्थेतली व्हीलचेअर आणून त्यांना उठा एक मिनिट आणि इकडे बसा असे तीन चार वेळा सांगून झाल्यावर एकदाचे ते उठले आणि आमच्या मदतीने खुर्चीवर बसले. मग मी त्यांना लिफ्टने आज्जींकडे घेऊन गेले.

आजोबांना बघून आज्जी पुन्हा रडायला लागल्या. औषधांचा परिणाम म्हणून ते झोपले आहेत, हे आज्जींना सांगितलं. त्यांनीही समजून घेतलं. मग जरावेळ आम्हीच पुन्हा गप्पा मारत बसलो. जरावेळाने कॉफीब्रेक झाला. तेंव्हा नर्स ह्या दोन्ही आज्यांसाठी कॉफी आणि केक घेऊन आली, तिला आजोबांसाठीसुद्धा कॉफी आणि केक आणायला सांगून माझ्यासाठीही एक कप कॉफी आणायला सांगितली. मी खरं म्हणजे एम्प्लॉयीजसाठी वेगळ्या ठेवलेल्या थर्मासमधून कॉफी घेत असते, पण मला आजोबांना एकटं सोडणं शक्य नसल्याने मी त्या दिवशी तिथेच कॉफी घेतली. आजोबा मग कॉफी ब्रेकला उठवल्यावर उठले. बहुतेक औषधांचा इफेक्ट कमी झाला असणार. आज्जींना ओळखलंत का, विचारल्यावर "हो" म्हणाले, पण कोण ते त्यांना काही सांगता येईना. आज्जींनीही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हात धरून बसल्या. पण आजोबा काही बोलतच नव्हते. मग त्यांना कॉफी आणि केक खायला दिल्यावर, तो त्यांनी व्यवस्थित खाल्ला. आज्जी म्हणाल्या, मला मुलांना फोन लावून दे. फोन लावल्यावर स्वतः बोलून झाल्यावर आज्जींनी फोनवर बोलत असलेल्या मुलाचे नाव सांगून आजोबांना फोन दिला, तर आजोबाही मुलाचं नाव घेऊन थोडंसं बोलले. मग फोन ठेवून तसेच शांत बसून राहिले. आज्जी काहीतरी गप्पा मारायचा प्रयत्न करत होत्या, पण आजोबा काही रिस्पॉन्स देत नव्हते. आज्जींना पुन्हा रडू यायला लागलं.

मग मी आजोबांना परत घेऊन जाऊ का?, असं विचारलं असता आज्जी लगेच "हो" म्हणाल्या. आजोबांना परत न्यायला लागले, तर ते मात्र विरोध करायला लागले. "मला इथेच थांबायचं आहे घरात", असं म्हणायला लागले. मग नंतर आपण परत घरी येऊ, आता फिरायला जाऊ, असे सांगून मी आज्जींना विचारून आजोबांसोबतचा हातात हात घेतलेला एक फोटो काढून दिला. ज्यात आज्जी सुरुवातीला रडत होत्या, मग हसून पोझ दिली त्यांनी. त्याची प्रिंट आऊट काढून माझ्याकडून नंतर गिफ्ट देण्याचे ठरवले. जी मी त्यांना पुढच्या आठवड्यात देणार आहे. बाकीही काही आज्जी आजोबांसोबत असेच स्पेशल क्षण मी कॅमेऱ्यात बंद केले आहेत. त्यापैकी एका जोडप्याला मी एक फोटो दिलाय. त्यांची गोष्ट नंतर कधीतरी..

आजच्या आज्जींची गोष्ट मोठी आहे. ती अजूनही संपलेली नाही. ती पुढच्या भागात सांगेन. बायदवे, आज माझा जॉब सुरू होऊन बरोबर सहा महिने पूर्ण झाले, हे तारीख लिहितांना आठवले.

~सकीना वागदरीकर जयचंदर
१०.०९.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle