डाऊनटन अ‍ॅबी

da.png

mathew.jpg
(फोटो: नेटवरून साभार)

************ या लिखाणात spoilers असतील **********************************

गेला महिनाभर बघत असलेली "डाऊनटन अ‍ॅबी" ही मालिका काल बघून संपवली. खरं तर ही मालिका बघण्यात आमचं वरातीमागून घोडंच झालं पण ते जौंदे.

Downton Abbey हे ब्रिटीश अर्ल , लॉर्ड ग्रँथम यांचं रहातं घर (महाल!). अर्ल हा ब्रिटनमधील खानदानी व्यक्तींचा एक दर्जा आहे. Duke, marquess, earl, viscount (व्ह्यायकाऊंट) , baron - बिटीश उमरावांचे हे उतरत्या क्रमाने दर्जे (ranks!)

या उमराव घराण्याची आणि नुसतीच त्यांची नाही, तर त्यांच्या नोकरवर्गाची ही कथा - १९१२ ते १९२६ चा कालखंड यात रंगवलाय. कथानकाला असलेली ऐतिहासिक घटनांची पाश्वभूमी, त्यांचे घराण्यावर पडणारे प्रतिसाद, या काळात घडणारे अनेक ऐतिहासिक, सामाजिक- तांत्रिक बदल - त्यांचा जनमानसावर पडत असणारा प्रभाव - हे सगळं या period drama मध्ये गोष्टीरूपात बांधलंय. कथेतील पात्रांच्या वैयक्तिक गोष्टी, गॉसिप या सर्वाला मागे अशी पार्श्वभूमी दिल्याने कथानकाला एक वेगळी परिमिती लाभून ते अतिशय गुंतवणारं, खिळवून ठेवणारं झालं आहे.

ज्याप्रमाणे उमरावांचे रँक्स आहेत, तसेच रँक्स या घरांच्या नोकरवर्गांत असतात. बटलर, फर्स्ट फूटमन, सेकंड फूटमन, वॅले (valet), housekeeper, कूक, किचन मेडस, house maids, lady's maids हा भला मोठ्ठा ताफा. शिवाय माळी, नॅनीज, ड्रायव्हर्स - हे तर झालेच. बरं यांचेही पदानुसार मान. कोण काय काम करणार ते ठरलेलं. मेडस, किचन मेडन ना फॅमिलीच्या डायनिंग रूममध्ये प्रवेश नाही. फक्त फूटमेन आणि बटलर ला तिथे प्रवेश. ह्या सर्व नोकरवर्गाचं जग "डाऊनस्टेअर्स". किचन, बटलर, housekeeper यांची ऑफिसेस, servants' hall, dining room, त्यांच्या रहाण्याच्या खोल्या - हे सगळं "डाऊनस्टेअर्स" चं जग. तर "अपस्टेअर्स" अर्थातच उमराव कुटुंबियांचं जग. या मालक्/मालकिणीच्या खोल्यांमध्ये आणि त्यांच्या खाजगी जगात प्रवेश - valets आणि lady's maids ना. आणि मालक्/मालकिण नसतील तेव्हा साफसफाईकरीता मेडस ना! असं सगळं आखीव-रेखीव.
मला वाटलेली एक मजा म्हणजे - या उमरावांचं म्हणणं - त्यांचं मुख्य काम हे भरपूर नोकरवर्ग ठेऊन गावातल्या लोकांना रोजगाराची संधी देणे हेच.

इंग्लंडमधल्या अमीर- उमरावांचं एक वेगळंच जग - वेगळाच थाट, जीवनपट कथेतून आपल्यासमोर उलगडत जातं. म्हटलं तर उच्चभ्रू, ऐषोआरामी जीवन पण काळाप्रमाणे न बदलणे, काळाला अनुसरून इस्टेटीची योग्य गुंतवणूक वगैरे न करणे यामुळे उतरणींना लागलेली ही घराणी - असा हा काळ. डाऊनटनही याला अपवाद नाही. पण लॉर्ड गँथम यांच्या बायकोकडून आलेला पैसा आणि नंतर तरूण पिढीने घेतलेले काही चतुर निर्णय याने इस्टेट टिकून आहे.

तर डाऊनटन मधील उमराव आहेत - लॉर्ड गँथम आणि त्यांची अमेरिकन पत्नी लेडी ग्रँथम. ग्रँथम ही त्यांची पदवी. त्यांचे आडनाव - Crawley. त्यांच्या तीन मुली - लेडी मेरी, लेडी एडिथ आणि लेडी सिबिल. लॉर्ड ग्रँथम यांची माता - काऊंटेस डाऊजर ग्रँथम. मुली, त्यांच्या आयुष्यात येणारे पुरूष, नवरे - या सर्वांची आयुष्यं याभोवती कथा फिरते. आणि अर्थातच लॉर्ड कुटंबाबरोबर त्यांच्या नोकरवर्गाच्या आयुष्याचं, त्यांच्या आयुष्यात
घडणार्‍या छोट्या-मोठ्या घटना, बाहेरच्या वातावरणाचा, घटनांचा त्यांच्या आयुष्यावर होणारा परिणाम - हे देखील कथेचं मुख्य अंगच आहे.

पारंपारिक इंग्लिश आणि उमराव विचारांनी भरलेले लॉर्ड ग्रँथम आणि काऊंटेस डाऊजर ग्रँथम - पण हळू-हळू मुलींनी घेतलेले विविध बोल्ड निर्णय , उचललेली पावलं - विरोध करत पण तरी काळानुसार स्वीकारत जातात. त्यांच्या विचारातलं परिवर्तन. कधी वैयक्तिक, परंपरावादी मतं बाजूला ठेऊन केवळ पोटच्या लेकरांकरीता स्वीकारलेले हे निर्णय कसे पचवत जातात आणि त्यांच्यामागे उभे रहातात हे पहाण्यासारखं.
मोठी कन्या - लेडी मेरी म्हटलं तर परंपरावादी आहे पण तरीही काही निर्णय काळानुसार घेते, तर काही काळाच्या पुढे जाऊन. तिचे आणि तिची मेड, अ‍ॅना यांच्या आपापसातला जिव्हाळ्याचंही खूप सुंदर चित्रण आहे. लेडी मेरीची अनेक गुपितं अ‍ॅनाला माहिती आहेत आणि अनेक भानगडींत तिने लेडी मेरीला मदत केली आहे.
एकंदरीतच Crawley कुटुंबाचे या सर्व नोकरवर्गाशी अगदी सलगीचे/ जिव्हाळ्याचे संबंध. आणि मुख्य बटलर मि. कार्सन हा देखील कुटुंबाशी अतिशय प्रामाणिक, devoted. जवळपास ५० वर्ष या कुटुंबाच्या चाकरीत आणि लॉर्ड ग्रँथम सारखाच किंवा जास्तच परंपरावादी.
नोकरवर्गातही याकाळात परिस्थितीनुसार, काळानुसार बदल होत जातात. कित्येकांना त्यांच्या हक्कांची, निमूटपणे नोकराचं जीवन जगत न रहाता काहीतरी वेगळी स्वप्नं बघण्याची धमक येते आणि काहीजणं ते अमलात आणतात तर काहीजणं आपल्या हक्कांना वाचा फोडतात. यातला फूटमन - मि. बॅरो - हा गे पुरूष आहे. १०० वर्षांपूर्वी होणार्‍या गे लोकांच्या कुतरओढीचं चित्रण फार जिव्हारी लावणारं केलंय.

प्रत्येक पात्र इतक्या vivid तपशीलांनी नटवलंय की आपण कळत नकळत या सर्व पात्रांमध्ये गुंतत जातो. आणि एक वैशिठ्य म्हणजे कुठलंही कॅरॅक्टर पूर्ण काळं किंवा पांढरं न दाखवता - दोन्ही बाजू दाखवल्यात - त्यामुळे सर्वच पात्रं आपलीशी वाटतात. खरं तर सर्वच व्यक्तीरेखा मस्तच आहेत आणि प्रत्येकावरच खरं तर लिहीता येईल. पण तरी सध्या तिघांबद्दलच लिहीते.

मि. ब्रॅन्सनः क्राऊली कुटंबातलं शेंडेफळ - सर्वात धाकटी कन्या सिबील हिचा हा नवरा. वास्तविक कुटुंबाचा ड्रायव्हर म्हणून हा कामाला लागतो. आयरिश रिपब्लिकन! फ्री आय्र्लंडची स्वप्ने बघणारा आणि त्यामुळे ब्रिटीशांचा, ब्रिटीश राजघराण्याचा द्वेष करणारा हा तरूण. सिबील स्वतः देखील अत्यंत तल्लख, तडफदार तरूणी आहे, उमराव व्यवस्थेला वैतागलेली, स्वतःचे काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असणारी आणि करून दाखवणारी सुद्धा. ब्रॅन्सनः च्या विचारांवर भाळून त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेते. आणि वडिलांचा सुरूवातीला असणारा विरोध पत्करूनही प्रेमाला साद देणारी! लॉर्ड ग्रँथम लग्नाला नाराजीने का होईना परवानगी देतात तिथपासून पुढे ब्रॅन्सनचे क्राऊली कुटुंबात सामावून जाणे, इतकेच नाही तर आपल्या स्वभावाने आणि मॅच्युरिटीने सर्वांना आपलेसे करणारा ब्रॅन्सन हा अ‍ॅलेन लीच या नटाने फार सुंदर साकारलाय. सिबीलच्या दोघी बहिणींशी त्याचं नातं इतकं सुंदर दाखवलंय! भावासारखं दोघींवर प्रेम करणारा आणि वेळ पडल्यावर कानउघडणी करणारा ब्रॅन्सन!

मिसेस क्राऊली: लॉर्ड ग्रँथम यांना मुलगा नसल्याने आणि त्यांच्या वडिलांनी करून ठेवलेल्या entail या तरतूदीमुळे मुलीला इस्टेट न मिळता, नात्यातल्या सर्वांत जवळच्या तरूणाला डाऊनटन अ‍ॅबी आणि सर्व इस्टेट मिळणार असते. (मला खरं तर या तरतूदीची कमाल वाटलेली, कारण ज्या इंग्लंडच्या राजघराण्यात पहिली मुलगी असली तर ती राणी होते, त्याच देशात या उमराव घराण्यात अश्या तरतूदी का असाव्यात?) त्यानुसार मॅथ्यु क्राऊली हा लॉर्ड ग्रँथम यांच्या नात्यातला तरूण आणि त्याची आई डाऊनटनला येतात. ही आई म्हणजे मिसेस क्राऊली. अतिशय स्पष्ट विचारी आणि खंबीर बाई - nurse by profession and taking her profession very seriously, कर्तव्यदक्ष , No nonsense woman म्हणून मला ही व्यक्तीरेखा अतिशय आवडली. पेनेलोप विल्टन हिने ही भूमिका उत्कृष्ट साकारली आहे. मिसेस क्राऊली ची कर्तबगारी तिने बरोबर साकारली आहे.
And last but certainly not the least in fact - top of the line - Violet Crawley, Dowager Countess of Grantham !!
व्ह्यायोलेट क्राऊली - हिच्याबद्दल काय आणि किती बोलणार?? हिच्या तोंडून बाहेर आलेला प्रत्येक डायलॉग परखून लिहीलेला आहे. म्हातारीच्या वाक्या- वाक्यातून ब्रिटीश खवचटपणा, उमराव घराण्या बद्दलचा अहंकार भरलेला आहे. पण म्हणून ती काही गर्विष्ठ, चढेल बाई नाही.. पण तरीही प्रचंड आत्मविश्वास, "मी कधीही चूक करतच नाही" हे वारंवार ठासून सांगणे - ही हिची खासियत. परंपरांचा अभिमान असला तरी वेळ पडताच आपल्या तिन्ही नातींच्या विविध भानगडींत हिने त्यांना चांगलाच पाठिंबा दिला आहे. जुने विचार कवटाळून रहात असली - तरी नाखुशीने का होईना नवे बदल स्वीकारते आहे. तिचे, तिच्या अमेरिकन सूने बरोबर आणि सूनेच्या अमेरिकन आईबरोबरचे ब्रिटीश- अमेरिकन तू तू मै मै एकदम खुशखुशीत आणि हहपुवा. म्हातारी बोलायला लागली की you just can't afford to loosen yourself. You have to attentively listen to every sentence that comes out of her mouth!! मिसेस क्राऊलीचं आणि तिचं नातं सुद्धा तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना प्रकारचं आहे. या दोघींची एकमेकींशी टोलवाटोलवी देखील हहपुवा!
नेटवर हिच्या सर्व डायलॉग्जची अक्षरशः लिस्ट आहे. सध्या एक क्लासिक इथे टाकते.

लेडी ग्रँथम (त्यांची सून) हिच्या अमेरिकन आईशी होणार्‍या भेटीबद्दल बोलताना व्हायोलेटबाई एका एपिसोड मध्ये म्हणतातः
Violet: "I'm so looking forward to seeing your mother again. When I'm with her, I'm reminded of the virtues of the English."
Matthew: "But isn't she American?"
Violet: "Exactly."
-------------------------------------------------------
१९१२ ते १९२६ कालखंडात घटनांची पार्श्वभूमी कथानकाला आहे.
Sinking of the Titanic, First World War, Marconi Scandal, Easter Rising - an armed rebellion in Ireland, launched to end British rule and create an independent Irish Republic, Spanish Flu pandemic, Teapot Dome Scandal, हिटलर च्या हूडलमचा उल्लेख या ऐतिहासिक घटनांचे उल्लेख कथानकात आहेत आणि त्याचे प्रतिसाद कथेपड, पात्रांवर पडतात. याखेरीज १०० वर्षां पूर्वीच्या समाजाचं, समाजात होणार्‍या बदलांचं चित्रण आहे - स्त्रियांना होत असलेल्या स्वतःच्या हक्कांची जाणीव, मताधिकार, स्वतःचे स्वतंत्र स्थान - घराबाहेर पडून किंवा घरातही - तोपर्यंत फक्त पुरुषांची मक्तेदारी असलेली कामं करण्याच्या नेणिवा - याचा आलेख आहे. यातल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती नसल्याने त्यांची माहिती मिळवणे/वाचणे - हे ओघाने आलेच.

याखेरीज या काळात लागत असलेले अनेक शोध - जे घराघरात नुकते रूजू लागले होते - इलेक्ट्रिसिटी, त्यावर चालणारी साधनं - जसे दिवे, फ्रीज, टेलिफोन, ग्रामोफोन, रेडिओ हे एकेक डाऊनटन मध्ये येताना दाखवलंय. सर्व नविन बदलांना, नविन साधनांना अर्थातच कोणा ना कोणाचा विरोध - त्यातले मजेशीर प्रसंग. उदा. रेडिओ नविन असतो तेव्हा तो घेण्यास लॉर्ड ग्रँथमचा विरोध असतो. नसती थेरं - असं त्यांच रेडिओबद्दलचं मत - Its a fad, won't last long - असं ते म्हणतात! असे अनेक परिस्थितीजन्य नर्म-विनोदांच्या फोडणीने मालिकेची चव अजून खुमासदार झाली आहे.

तर गेला जवळपास महिनाभर रोज रात्री ही मालिका बघणे, रात्री उशिरा पर्यंत जागणे (मग अर्थातच सकाळी उठण्याचा गोंधळ, सकाळच्या ७.३०-८ च्या मिटींग्जना धडपड्त उठून जाऊन, भंजाळलेल्या अवस्थेत बसणे!) मालिकेतल्या ऐतिहासिक किंवा इतर काही घटनांचे संदर्भ बघणे यात पार झपाटलेपण आलेलं. आता आलेलं रितेपण टाळण्याकरीता एकच उपाय - दुसरी एखादी period drama सिरीज बघायला घेणे!

4423, 4424
106

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle