मी आणि माझं काव्य

कवितेचा आणि माझा परिचय तसा लहानपणापासूनचा (माझ्या). पुढे 'आमच्या घराच्या उजवीकडे एक घर सोडून ती राहत असे' हे वाक्य आपोआप लिहिलं गेलं होतं ते खोडलं. (तिचा आणि माझाही परिचय लहानपणापासूनचा. पण बाहुलीच्या लग्नावरून भांडणं झाल्याने आम्ही नंतर एकमेकींशी बोलत नसू.) तर ही कविता म्हणजे काव्य वगैरे बरं का! त्या प्रकाराचा आणि माझा परिचय लहानपणापासूनचा. पण लिखाणाची सुरुवात मी कवितेने नाही केली बरं! कविता ही गद्यापेक्षा आकाराने छोटेखानी असूनही माझ्या लेखनप्रवासाची सुरुवात झाली गद्यापासून. मी जादूगार, राजकुमार आणि परी वगैरे असलेली परिकथा लिहिली होती पहिल्यांदा. पण त्यात जादूगाराचा जीव टीव्हीत (आमच्याकडे तेव्हा नुकताच रंगीत टीव्ही आला होता.) ठेवल्याने कथा परिकथेऐवजी फारच वास्तववादी आणि फ्लॉप झाली. असो.

तर कविता करण्याची सुरुवात झाली कुठून? हं तर.. लहानपणी माझ्या भावाने एक तीन ओळींची कविता केली होती. आकाराने लहान असलेली ही कविता गूढ आणि आशय खच्चून भरलेली होती. ती अजूनही कवी वा एकमेव वाचक (पक्षी: मी) दोघांनाही कळलेली नाही. त्यातला आशय महास्फोटक असावा की काय, असाही एक अंदाज आहे. त्यामुळे कवीसुद्धा अजून ती कविता प्रकाशित करण्याच्या भानगडीत पडलेला नाही. तर ती कविता वाचून मला एक दिशा मिळाली. मग मी पण कविता करण्यासाठी अभ्यास सुरू केला. भाऊ वापरत असे तीच पेन्सिल आणि तशीच वही आणून पहिली कविता लिहिली. ती अगदीच-

'आला आला पाऊस.
पावसात भिजायची, मला भारी हाउस.'छाप सुबोध झाली होती. (पहिल्याच प्रयत्नात 'यकदम शिंपल' ओळी लिहिल्या गेल्या तरी मी डगमगले नाही. 'हायकू' हा परदेशी काव्यप्रकार जेव्हा मी हाताळला तेव्हा या ओळींचा मोठ्या चतुराईने वापर करून घेतला. लेखात पुढे ते हायकू येतीलच.) बॉलपेन, शाईपेन, जेलइंकपेन आणि वही, चित्रकलेच्या वहीच्या मागचा कागद, हँडमेड पेपर अशी साधनं बदलून प्रयोग करून पाहिले. तरी उपरोल्लेखित गूढ कवितेसारख्या कविता जमेनात. मग सुबोध कविताच लिहाव्यात, असं मनाशी पक्कं केलं. मग अभ्यास-ए-गझल करून गझल(सुबोध! काही खवचट नातेवाईक श्रोत्यांनी तिला 'बाळबोध' म्हटलं. चालायचंच.) लिहिली. गझल हे एक खानदानी प्रकरण आहे. अभ्यास-ए-गझल सुरू करण्याआधी मी खास मेणबत्ती स्टँड (त्यांना 'रोशनदान' असं भारदस्त नाव आहे बरं का! पण आमच्याइथल्या रोशनदान विकणार्‍या माणसाला 'मेणबत्ती स्टँड' हेच नाव ठाऊक आहे आणि त्याला न कळणारे शब्द संभाषणात आले की, तो भलतीच गोष्ट पुढ्यात आणून ठेवतो. पण माणूस चांगला दुकानदार आहे. मेणबत्ती स्टँड गझलेसाठी हवे आहेत म्हटल्यावर 'ताई, मग पाणाचा णक्षीदार पितळी डबा पन घेऊण जावा.. फ्रेश ष्टाक आला आहे' असं म्हटला. खरेदीत तो डबा वाढल्याने एकूण प्रकरण जरा महागातच पडलं, पण एखाद्या गोष्टीला निश्चयाने सुरुवात केल्यावर मग छोट्या छोट्या संकटांना भिऊन मागे हटणारी मी नोहे!) आणि सुगंधी मेणबत्त्या आणल्या. हातात आलेलं कुठलंही पान उजवीकडून डावीकडे वाचायला सुरुवात केली. हे मला सहज जमलं कारण लहानपणी हॉटेलांतली मेनूकार्डं मी तशीच वाचायचे, असं माझे बाबा म्हणतात. पदार्थाच्या नावाआधी उजवीकडची किंमत पाहून जास्तीत जास्त किंमत असलेला पदार्थ ऑर्डर करण्याकडे माझा कल होता, असं त्यांचं निरीक्षण आहे. (त्यांचं निरीक्षण अफाट आहे. पोलिसांत गेले असते तर ते महासुपरनिरीक्षक वगैरे झाले असते. असो.) अर्थात, पुढे उजवीकडून डावीकडे वाचायची तशी आवश्यकता नव्हती, हे माझ्या लक्षात आलं म्हणा! कारण 'घरच्याघरी घडवा घजल.. आपलं.. गझल' हे पुस्तक माझ्यासारख्या उत्साही विद्यार्थ्यांना सोयीचं व्हावं म्हणून मराठीतच लिहिलं गेलं आहे, असं कळलं. तर आता गझलेसंदर्भात काही गोष्टी आपण बघू. मी अगदी जरुरीपुरता अभ्यास करून गझल घडवली. (इंजिनीयरिंगला असताना कठीण विषयांचा चाळीस मार्कांपुरता अभ्यास करायची सवय मला अजूनही अशी उपयोगी पडते.) तर मला कळलेला पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गझलेत शेर असतात. कलेकलेने चंद्र वाढावा तशी शेराशेराने गझल वाढते. हे सगळे शेर वेगवेगळे विषय घेऊन आलेले असू शकतात. हे किती रम्य आहे ना! म्हणजे पहिल्या शेरात प्रेम, दुसर्‍यात रेशनच्या रांगा, तिसर्‍यात विरह, चौथ्यात पोराची केजीची अ‍ॅडमिशन... सुचेल तसे शेर करा. मॅचिंग शेर एकत्र करून हव्या तितक्या लांबीची गझल बेतून घ्या. गझलेची टोकं शिवणाच्या कात्रीने नीट कातरून गझलेला सुबक आकार द्या. आहे की नाही सोपं? मी तर शिकलेच, पण तिची शिवणाची कात्री वापरू देण्याच्या बदल्यात माझ्या आईलासुद्धा मी गझल शिकवली. तिने आमच्या दूधवाल्याला-

'दीड लिटर दुधात तुझ्या असते अर्धा लिटर पाणी,
तुझ्या कर्माचा हिशोब वर बसला देव ठेवतो आहे.'

असा शेर ऐकवून गार केलं होतं. (डिसेंबरच्या महिन्यातली सकाळ.. बिचारा आधीच गारठला होता. दुसर्‍या दिवशी फक्त पाव लिटर पाणी घातलेलं दूध टाकलं त्याने आमच्याकडे! असा आहे शेराचा प्रभाव..) अशा छोट्या छोट्या प्रयोगांमुळे आत्मविश्वास वाढल्यानंतर आम्ही सर्व कुटुंबीय मिळून गझलेत वेगवेगळे प्रयोग करू लागलो. माझी लखनऊची आंटी (एरवी आम्ही तिला सरिताआंटी किंवा सरिताआत्या म्हणतो, पण गझलेने भारावलेल्या काळात आम्ही तिला सरिताखाला म्हणायचो!) आलेली तेव्हा बिर्याणीची (सरिताखाला लग्न होऊन लखनौत गेली तीस वर्षं स्थायिक झाली आहे. एकदम ऑथेंटिक मटण बिर्याणी करते.) तयारी करताना आम्ही जात्यावर ओव्या म्हणतो, त्यापद्धतीने एकेक एकेक शेर म्हणत गझल रचली होती. नंतर प्रत्येकाच्या पानात बिर्याणी वाढल्यावर त्या-त्या व्यक्तीने एकेका शेराने गझल वाढवायची, असंसुद्धा केलं होतं. अब्बूजानचा शेर इतका कातिल होता की अम्मीजानने त्यांच्या पानात दोन डाव बिर्याणी अजून वाढली बक्षीसादाखल! जेव्हापासून मी गझलप्रांतात पाऊल ठेवलं तेव्हापासून आईबाबांना प्रेमाने अब्बूजान व अम्मीजान अशी नावं ठेवली. आज्जीला दादीजान म्हणायला गेले तर तिने पाठीत धपाटा घालायची मेथड अंगिकारून इतक्या प्रेमळ संबोधनाचा पार कचरा केला. ती पंचाहत्तरशेरी गझल सरिताखालाने कॅलिग्राफीत त्यांच्या स्वैंपाकघराच्या भिंतीवर कोरून घेतली आहे. दर गझलेमागे सुगंधी मेणबत्त्यांचा खर्च परवडेनासा झाल्यावर घरच्यांच्या आग्रहामुळे मी कमी साधनसामुग्री लागणार्‍या कवितांकडे वळले. गझलेसाठीची सुरुवातीची गुंतवणूक म्हणजे रोशनदानं, वगैरे काही वाया गेली नाहीत म्हणा! दिवे गेले की आई अजूनही त्यांतच मेणबत्त्या लावते. मध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी मावसबहीण भूत बनून गेली होती तेव्हा एक काचेचं रोशनदान नेऊन, त्यात मेणबत्ती लावून चालत होती. तिला पहिलं बक्षीस मिळालं. पानाच्या पितळी डब्यात आजी सध्या हिंगाष्टक वटी आणि सुपारीविना सुपारी ठेवते. दुपारी जेवणं झाल्यावर लोडाला आरामशीर टेकून ती पानाचा डबा पुढ्यात ओढून स्टायलीत हिंगाष्टक वटी चघळत असते. पुढे मी चारोळ्यांचा अभ्यास केला. ग्रामीण बंधू-भगिनींसाठी 'शिरपा-कमळीच्या कविता' हे छोटेखानी पुस्तक लिहिलं. शेतीच्या कामांमधून आपल्या ग्रामीण बंधुभगिनींना वाचन करण्यास वेळ कमी मिळतो, त्यामुळे 'वेळ कमी, तरीही उच्चकाव्यानुभूतीची हमी' या योजनेअंतर्गत प्रकाशित झालेल्या 'शिरपा-कमळीच्या कविता' काव्यसंग्रहात दोन-दोन ओळींच्या आकलनास सोप्या आणि आशयसंपन्न कविता आहेत. (चारोळीपेक्षाही दोनोळी भारी आहे की नाही?) वानगीदाखल ही एक कविता-

'अरे ए कमळी, मेरी जानेमन, तुझसे नजरिया लडी.
हे बेब गेट अप अँड गिव्ह मी सम आंबावडी.'

खेडोपाडी पोचलेलं केबल नेटवर्क, त्यामुळे वाढलेलं हिंदी सिनेम्यांचं वेड आणि त्यामुळे बदलत चाललेली ग्रामीण भाषा व संस्कृती या दोन ओळींमधून आपल्यापर्यंत प्रभावीपणे पोचत नाही काय? दोनोळींचा क्रांतिकारी प्रयोग आपण तपशीलात नंतर कधीतरी पाहू.

आता वळूया माझ्या सुबोध गझलेकडे. खरंतर गझलेत दोनदोन ओळींचे शेर असतात हे कळल्यानंतर 'शिरपा-कमळीच्या कविता: पान ५८ ते ६७ ही दहाशेरी गझलच आहे, नाही का हो?' असं मी माझ्या गझलगुरूंना (हो.. चांगलं मार्गदर्शन मिळावं म्हणून पुढे मी एका गझलगुरूंचं शिष्यत्व पत्करलं. त्यांचं नाव अकबर गुलाबाबादी. गुलाबाबाद लखनौपासून दोन मैलांवर आहे. गुरूंचं खरं नाव रामशरणभैया. ते सरिताखालाकडे दूध टाकायला येतात. गेली वीस वर्षं रोज ब्राह्म्यमुहुर्ताला उठून गझलेची साधना करतात ते!) विचारलं तेव्हा त्यांनी मंद हास्य करून माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. नंतर ते संन्यास घेऊन हिमालयात गेले. पुढे गझलेची साधना मी पुस्तकांच्या मदतीनेच पूर्ण केली. असो.

गझल पेश-ए-खिदमत करते. सुबोध व्हावी म्हणून प्रत्येक शेराखाली विषय दिलेला आहे.

गलीगलीमें आजकाल हाच शोर आहे
आजचा अलिबाबा हा एक्केचाळिसावा चोर आहे
* 'अरेबियन नाईट्स'च्या रुपकातून सामाजिक परिस्थितीवर भाष्य

मालवून टाकलास दीप, हात हाती घ्यावया
आपल्यावर लक्ष ठेवून (इश्श्श!), आकाशी चंद्राची कोर आहे
* रोम्यांटिक

हंसाने ऑफर केले १००% प्युअर दूध,
गेस्ट म्हणून आलेला सरस्वतीचा मोर आहे
* नीरक्षीरविवेक, 'अतिथी देवो भव' आणि पुराणांतली माहिती

झुडपेबाबांचं नाव घ्यून पक्यादादाकडे लावला आकडा
समदा पैसा ग्येला, पक्या भXX XXXखोर आहे
* अंधश्रद्धा, सामाजिक समस्या आणि मनातल्या भावनांचे उत्स्फूर्त प्रकटीकरण

रोहित शेट्टीच्या सिन्म्यांचे हाय हे काय झाले?
अजिचबात पाहवेना, बोलबच्चन बोर आहे
* जिव्हाळ्याचा विषय - बॉलीवूड

पहाट झाली, बैल घेऊन शेतात निघाला शेतकरी,
गावचा पैलवान शंभूदादा मारतो बैठका, जोर आहे
* ग्रामीण जीवनाचे रम्य चित्रण

पाऊस पडतो तसाच, परि तूस मिळावी कांदाभजी कोठूनी?
पुणे नव्हे हे 'श्रद्धा', हे तर सिंगापोर आहे.
* वस्तुस्थितीची दु:खद जाणीव व खिन्नपणा, खेरीज येथे शेवटच्या शेरात नाव गुंफण्याची प्रक्रिया केली आहे. आमच्या घरात आम्ही सगळेच ही प्रक्रिया करतो, त्यामुळे गझलांचं सॉर्टिंग सोपं पडतं.

ही माझी गझलसाधना पूर्ण झाल्यानंतरची पहिली, अख्ख्या उत्तर सिंगापुरात गाजलेली गझल. आता 'ही गझल अख्ख्या उत्तर सिंगापुरात गाजली आहे याला पुरावा काय?' असे काही संशयात्मे विचारतीलच. गझल प्रकाशित केल्यावर मी रात्रीच्या वेळी रस्त्यावरून पळणार्‍या चिनी लोकांना('पळणार्‍या' म्हणजे रात्री जॉगिंग करतात ते! नाहीतर माझी गझल ऐकायला नको म्हणून पळत असतील, असे इथे काहीजण म्हणतील.) थांबवून थांबवून सर्व्हे केला. गझल रोमन लिपीत लिहून तीनेकशे कागद छापून नेले होते. 'गझल कशी वाटली?'ला समोरून '९ वाजून १० मिन्टं', 'एमारटी स्टेशन समोरच आहे', 'तीनशेचोपन्न नंबरचा ब्लॉक इथून डावीकडे गेल्यावर आहे', 'रस्ता ओलांडण्याआधी सिग्नलचे बटन दाबा' अशी उत्तरं आली. कधीकधी संवादात अडचण येऊ शकते. पण दिलेला गझलेचा कागद प्रत्येकाने जपून घरी नेला, हे मात्र मी पाहिलं आहे. गझलेची लोकप्रियता कळायला एवढा पुरावा पुरेसा आहे. (पाठकोरा कागद वाया जाऊ नये म्हणून छापणार्‍याने त्या कागदाच्या मागे 'उद्यापासून सुरू होणार्‍या नव्या जीएचमार्ट सुपरस्टोअरमध्ये हे कूपन दाखवल्यास ७० टक्के सूट!' असं लिहिलं होतं. पण असं कुठलंही सुपरस्टोअर सुरू झालेलं नाही, त्यामुळे लोकांनी कागद निव्वळ गझल संग्रही असावी म्हणूनच नेले यात काय शंका?) बर्‍यापैकी काळ गझला रचल्यानंतर मी इतर काव्यप्रकारांकडे वळायचं ठरवलं. माझ्या निष्ठावान वाचकांशी मी तसा वादासुद्धा केला होता, पण गझल जमायला लागली म्हटल्यावर त्यातच जरा जास्त रमले. तेव्हाच कधीतरी 'तू वाडा ना तोड..' हा जुना वाडा पाडणार्‍या बिल्डरशी लढा देण्याच्या पार्श्वभूमीवर बेतलेली प्रेमकहाणी असलेला भावपूर्ण सिनेमा पाहिला. तेव्हापासून मूळ गाणं सारखं मनात वाजू लागलं. वादा केला तर निभावला पाहिजे, असं आतून जाणवलं. वेळ न दवडता मग मी कामाला लागले. गझल हा मूळचा परदेशी काव्यप्रकार, तीच परंपरा पुढे चालू ठेवत पुढे मी 'हायकू' हा दुसरा परदेशी काव्यप्रकार अभ्यासला.

'हायकू' हा जपानी काव्यप्रकार. तो शिकायचा म्हटल्यावर पुन्हा एकदा माझी सामानाची जमवाजमव सुरू झाली. लिहिण्यासाठी खास शाई आणि खास बोरू विकत आणले. 'पुन्हा नवीन खरेदी?? कार्टे, तुझा पॉकेटमनीच बंद करते आता' या आईच्या धमकीला धूप घातला नाही. 'मला कांजी शिकायचीये' या विधानाला समोरून 'रुचिरामध्ये बघ. पंजाबी पदार्थांत दिलेली आहे कमलाबाई ओगल्यांनी कृती..' असा वाईड बॉल आला तरी डगमगले नाही. अवांतर:- रुचिरातली कांजी 'गाजराची कांजी' निघाली. 'माझी आई रुचिरातून आणि स्वयंपाकघरातून कधी बाहेर येणार? कधी तिची प्रगती होणार?' हे दोन प्रश्न मी मोठ्याने उद्गारले तर आतून 'मी येते बाहेर.. तू कर आजपासून स्वयंपाक' असा जबाब आला. मी निमूटपणे बाहेर प्रयाण केलं. असो. पुढे जाऊन हायकूंबाबतही गझलेसारखाच अनुभव आला. आणलेलं पुस्तक मराठीतच होतं. त्यातून पुन्हा एकदा चाळीस मार्कांपुरतं बेसिक शिक्षण घेऊन मी हायकू घडवायला घेतले. शिवाय पारंपरिक जपानी हायकूकर्ते हाताने हायकू घडवत असत, तर मी कॉम्प्युटरावर हायकू रचण्याची आधुनिक, क्रांतिकारी पद्धत शोधून काढली. आज संगणकक्रांती झालेली असताना ही तंत्रं आपण सगळीकडे आत्मसात करणं अत्यावश्यक आहे. तर ते असो. आता आपण हायकूची कृती पाहू. पदार्थ सोपा, लहानसा दिसत असला तरी कृती गुंतागुंतीची आहे. 'हायकू' प्रकार साधारणपणे तीन ओळी व्यापतो. कॉम्प्युटरावर बेसिक हायकू बनवायला साधारणतः दोन-तीन शब्दांनंतर एकदा एंटर दाबावं. दुसर्‍यांदा एंटर दाबल्यानंतरची ओळ ही शेवटची ओळ असावी, हे अवधान राखावं. चौथी ओळ आल्यास 'हायकू' बिघडेल आणि त्याची चारोळी बनेल. या चारोळ्या हायकूंसारख्या रुचकर आणि ग्लॅमरस नसतात, हे सदैव लक्षात ठेवावे. हायकू हे नजाकतीने रचायचं नाजूक प्रकरण आहे. हायकू या शब्दातदेखील एखादं जरी अक्षर वाढले तरी होणारा परिणाम भीषण असतो. (अधिक माहितीसाठी: 'हायहुकू..'हे सुनील शेट्टीचं गाणं पहा.[वैधानिक इशारा: गाणं आपापल्या जबाबदारीवर पाहणे. गाणं पाहून काही दुष्परिणाम झाल्यास सदर लेखिका जबाबदार नाही.]) गझलेप्रमाणे यातही विविध विषय हाताळता येतात. तर आता आस्वाद घेऊया खालील हायकूंचा. येथे चौथी ओळ दिसते ती मूळ हायकूचा भाग नाही, त्यात नेहमीप्रमाणे वाचकांस सोयीस्कर म्हणून विषय दिलेला आहे.

आला आला पाऊस.
पाउसात भिजायची,
मला भारी हाऊस!
- तरुणाईचा हायकू. काव्याकडे वळल्यानंतर मला स्फुरलेल्या या पहिल्यावहिल्या तीन ओळी. त्यामुळे या हायकूचं माझ्या मनात एक विशेष स्थान आहे.

आला आला पाऊस.
रेनकोट घेतल्याविना,
पाउसात नको जाऊस!
- प्रेमळ आईचा काळजीवाहू हायकू. ("कार्ट्या, भिजून आलास आणि सर्दी झाली तर फटके खाशील" अशी तीव्र विधानं हायकूत भावना व्यक्त केल्यास सौम्य होतात.)

आला आला पाऊस.
कॉम्प्युटरावर आले थेंब,
अन भिजला माझा माऊस!
- यंत्रयुगीन टेक्नो हायकू. या हायकूनंतर माऊस पंख्याखाली वाळवत ठेवायला विसरू नये.

आला आला पाऊस.
तेवढ्यासाठी कळकट ठिकाणी,
कांदाभजी नको खाऊस.
- आरोग्यपूर्ण हायकू

आला आला पाऊस.
बागेला पाणी घालायला,
आज पाईप नको लाऊस.
- निसर्ग, पाणीबचत आणि काम वाचल्याचा आनंद एकत्रित असणारा हायकू

आला आला पाऊस.
आता कर पुरे,
मेघमल्हार नको गाऊस.
- तानसेनाच्या बायकोचा मुघलकालीन हायकू.

गझल आणि हायकूंपासून सुरू झालेला माझा काव्यप्रवास पुढे चालूच आहे. सॉनेट, वगैरे परदेशी प्रकार संपल्यावर आता मी ओव्या, अभंग, मुक्तछंदातल्या मराठी कविता वगैरे हाताळून पाहते आहे. पण त्याबद्दल नंतर पुन्हा केव्हातरी. या लेखाचा शेवट माझ्याच एका प्रभावी दोनोळीने -

'सद्गदित झाले मी, जेव्हा सुचल्या कवितेच्या ओळी.
संक्रांतीला खावा तीळगूळ, होळीला पुरणाची पोळी.'

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle