रूपेरी वाळूत - ६

समोर फोटोग्राफरकडे बघत स्माईल देतादेता मिनूला ती दिसली. डोळे मोठे करून तिने हाताने इकडे ये म्हणून इशारा केला. नोराने ओठांनी सॉरी म्हणत कानाची पाळी पकडली आणि पटकन मिनूशेजारी जाऊन बसली.

"तू मार खाणारेस माझ्या हातून! लग्न संपू दे फक्त. कुठे होतीस?" मीनू चेहऱ्यावर राग न दाखवता समोर बघून हसत म्हणाली.

"सॉरी यार, काल खूप काम होतं त्यामुळे उठायला उशीर झाला. नवरीबाई गोड दिसताय एकदम, मेहंदी मस्त रंगली!" नोरा हसून तिच्या कानाशी कुजबुजत म्हणाली.

"थँक्स! बट समवन्स लूकींग हॉट टुडे! आजूबाजूला बघ सगळे डूड्स तुझ्यावर डोळा ठेऊन आहेत". मिनू तिला डोळा मारत म्हणाली.

"ओह रिअली? थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट! पण या डूड्सनी मला काम करताना माखलेली बघितला तर पळून जातील." ती हसत म्हणाली.

"आता विधी संपलेले आहेत, मुहूर्त समीप आहे. वधू वरांना कपडे बदलायचे असतील तर आता जाऊ शकता. अर्ध्या तासात या, मुहूर्त पाळा." भटजींनी मोठ्याने सांगितले.

"हुश्श! अजून एक साडी की संपलं!" मिनू हातातल्या फोल्डिंग पंख्याने वारा घेत म्हणाली.

नोराने भा पो म्हणून तिच्याकडे पाहिलं. नवरी कपडे बदलायला गेल्यावर नोरा पायलशेजारी जाऊन बसली. एकदोन बायका पायलच्या मेहंदीचे कौतुक करत होत्या. आजच आलेल्या एक बाई पर्समधला कोन काढून मांडवातच अरेबिक मेहंदी काढून घेत होत्या. ती बोर होऊन रुखवताच्या टेबलकडे निघाली. टेबलावर मांडलेल्या कागदी फुलांच्या फुलदाण्या, आइस्क्रीम स्टिक्सने केलेली वॉल हँगिंग्स, फूड कलरने मीनल आणि वरुण लिहिलेल्या करंज्या, लाडू, ड्राय फ्रुटस आणि लोणची मुरंबे भरलेल्या बरण्या, पुठठ्यावर चिकटवलेल्या बांगड्यात वधूवराला संदेश, मोती चिकटवलेले सोनेरी नारळ, विणकाम भरतकाम केलेले पडदे, बेडशीट्स, ब्लॅंकेट, कपबश्या, ग्लासेस, नॉन स्टिक कढया, डिनर सेट वगैरे टिपिकल माल खचून भरला होता. अचानक पदर ओढल्याचा भास झाला म्हणून ती वळली. डोक्यावर केसांचं कारंजं बांधलेली, हिरव्या खणाचं परकर पोलकं घातलेली एक तीन चार वर्षाची गुटगुटीत छबकडी तिचा पदर ओढत होती.

"ए काकू, ए काकू हे तुला!" ती समोर गुलाब धरून म्हणाली.

काकू? नोराने डोळे फिरवले. "माझ्यासाठी?" खोटं हसत तिने विचारलं. "कोणी दिलं?" अचानक ट्यूब पेटून ती पुढे म्हणाली.

त्या मुलीने डोळे मिचकवत हाताने तिला जवळ बोलावलं. नोरा गुढग्यावर बसून तिच्या जवळ गेली.
"ते ना शीक्लेट ए!" तिने नोराच्या कानात सांगितले.

"ए सांग ना मला सिक्रेट!" नोरा मस्का मारत म्हणाली.

"अम्म, माला किंद्ल जॉय दिलं तल सांगेन." मुलगी हाताची घडी घालून म्हणाली.

"अरे पण माझ्याकडे नाही ना किंद्ल जॉय!" नोरा हसत म्हणाली. "तुला पेढा चालेल का?" हातातला चॉकलेटसारखा रॅप केलेला गुलाबी कागदातला पेढा दाखवत म्हणाली.

"म्म.. चालेल!" बऱ्याच विचारांती हात पुढे करत ती म्हणाली. पेढा हातात पडताच तिने लांब खुर्चीमागे बोट दाखवले. "त्या काकाने!"

तिथे बुफे काउंटरपाशी पलाश एका वेटरला काहीतरी सांगत होता.

तिचा हसरा चेहरा बदलून एकदम रागीट झाला. गुलाब हातात घेऊन ती ताडताड पलाशपाशी पोचली. "ए फाईव्ह स्टार!" तिने त्याच्या खांद्यावर टॅप केलं. त्याने वेटरला पुढे पाठवले आणि तिच्याकडे वळला. "येस?" त्याने काहीच न झाल्यासारखं तिच्याकडे पाहिलं.

"हा कित्यांक? माझ्याशी असला चीप फ्लर्ट नाही करायचा हां, डोन्ट यू डेअर!" ती हातातला गुलाब त्याच्या तोंडासमोर नाचवत रागाने रोखून पहात म्हणाली.

"फ्लर्ट? चीप फ्लर्ट?" तो नवीनच काही ऐकल्यासारखं म्हणाला. "आत येताना तुझ्या केसांतला गुलाब इथे पडला होता, मला दिसला म्हणून पाठवून दिला."

तिने नकळत केसांना हात लावला तर खरंच एकच गुलाब शिल्लक होता.

त्याने कडेला झुकून गुलाब तिच्या मेसी बनवर खोचला. "घे बाय थोडा कोक पी, थंड हो" काउंटरवरून कोकचा ग्लास तिच्यासमोर धरत तो म्हणाला.

शरम आणि रागाने तिची बोलतीच बंद झाली. अबाउट टर्न करून ती पटकन गर्दीत जाऊन मिसळली. "ऍनिमल प्लॅनेट!" म्हणून हसत त्याने  थंडगार कोकचा ग्लास ओठाला लावला.

रुमालाने कपाळावरचा घाम टिपून घेत नोरा पुढे गेली. तेवढ्यात नवरी आली, नवरी आली म्हणून गलका झाला आणि पोपटी काठांची पिवळी साडी नेसलेली मिनू अंतरपाटामागे जाऊन उभी राहिली. मिनूने आधीच सांगितल्याप्रमाणे नोरा हातात करा धरून तिच्या मागे दिवा धरलेल्या करवली शेजारी उभी राहिली. शेवटचं 'सावधाssन' झाल्यावर अंतरपाट बाजूला झाला तेव्हा तिला वरूण शेजारीच उभा असलेला पलाश दिसला. त्याच्या नजरेला नजर न देता तिने पटकन इकडेतिकडे बघितले. तिचे जेव्हाही त्याच्याकडे लक्ष जायचे तेव्हा त्याचे डोळे तिच्याकडेच लागलेले असायचे. 'ठीक आहे, मी जरा त्रास दिला पण हा इतका इश्यू करून मला सारखं का टार्गेट करतोय' म्हणून ती मनातच चरफडली आणि तिच्या रागाचा पारा अजून काही डिग्री वर चढला. मंगळसूत्र घालून मग नवरानवरी फोटोसेशन सुरू झालं आणि सगळे बुफेकडे वळले. नोराला पुढची कामं दिसत होती म्हणून तिने पायलला पकडले आणि पटकन रांगेत उभी राहिली. भरपूर रायता आणि रशियन सॅलड वाढून घेऊन तिने फक्त दोन रोट्या घेतल्या. पापड, शाही व्हेज कुर्मा आणि तवा पुलाव थोडा थोडा वाढून मधले पालक पनीर, पोळी, दाल तडका, जीरा राईस, खास कोकण स्पेशल म्हणून ठेवलेले उकडीचे मोदक वगैरे आयटम्स स्कीप करत ती शेवटी दुसऱ्या डेझर्टपाशी आली. सर्व्ह करणारा तिच्या वाटीत रसमलाई वाढणार तोच त्याच्यामागून फेरी मारणारा पलाश तिथे डोकावला.

"डॉक्टरीण बाईंना दोन वाट्या रसमलाई वाढ रे संतू, त्यांच्या जिभेला मिर्ची लागलीय!" संतूसकट आजूबाजूचे दोनचार जण हसले. मागून पायलने तिच्या दंडाला टॅप केलं आणि हसायला लागली. नोराने त्याच्याकडे खाऊ की गिळू नजरेने बघितले.

पायलबरोबर कोपऱ्यातल्या खुर्चीत बसून तिचे गॉसिप ऐकत ती पटापट जेवायला लागली.  वरुणचा सगळा एमबीए ग्रुप समोर मोठ्या गोल टेबलाभोवती कोंडाळे करून बसला होता. हे सगळे लोक सेम कॉलेजमुळे पलाशच्याही ओळखीचा होता. त्यामुळे जेवताना त्यांचे जोरजोरात जुने किस्से आठवत एकमेकांची खिचाई करणे सुरू होते. ग्रूपमधल्या दोन मुली तर पलाशच्या अगदीच गळ्यात पडत होत्या. नोरा तिकडे बघत असतानाच त्याने तिच्याकडे बघितले आणि तिची रागीट अन त्याची थंड नजर एकमेकांत गुंतून पडली. त्याने मान वळवून शेजारच्या मुलीच्या कानात काहीतरी सांगत कसल्याश्या जोकवर टाळी दिली. "माज!" म्हणत तिने रोटीचा एक मोठा तुकडा तोंडात कोंबला. नुसत्या कोरड्या रोटीमुळे लगेच तिला ठसका लागला. पाणी पिता पिता ग्लासच्या काठावरून तिचे समोर लक्ष गेले तेव्हा तो शांत होऊन तिच्याकडे बघत होता. तिने नजर वळवली.

सगळ्यांना आग्रह करत मिनू तिच्यापाशी येऊन पोचली आणि प्लेटवर फार काही न दिसल्यामुळे स्वतः आग्रह करून केशर पिस्ता आईस्क्रीमचा एक मोठा तुकडा आईस्क्रीम प्लेटमध्ये वाढला. जेवण झाल्यावर मीनल - वरूण जोडीला शुभेच्छा देऊन ती कपडे बदलायला पळाली. दुपारचे दोन वाजले होते. तिला डोळ्यासमोर पुढची कामे दिसत होती, तसंही कॉकटेल पार्टी संध्याकाळी सातला सुरू होणार होती.

अर्ध्या तासात ती घरी पोहोचली. बुलेट पार्क केली आणि वर जाऊन तिने तासभर निवांत रसमलाईची झोप काढली. सुदैवाने तिचा पार्टी ड्रेस रेडी होता. शेजारच्या नॅन्सीच्या लग्नात तिने घातलेला ब्राईड्स मेड ड्रेस! स्लेट ब्लू रंग, बारीक चंदेरी भरतकाम केलेला व्ही नेक स्लीव्हलेस घट्ट टॉप आणि कंबरेपासून खाली घेराची पायघोळ टूल असलेला मॅक्सी ड्रेस. आताही तिने पायलने घालून दिलेला मेसी बन रिपीट केला आणि खड्यांचे लोंबते  कानातले घातले. वेडिंग केक घेऊन जाण्यासाठी ब्लू लगूनची गाडी येणार होती म्हणून तिने ड्रेसवर डेनिम जॅकेट चढवले आणि शार्प पाच वाजता बेकरीत जाऊन बसली. ममाने नेहमीप्रमाणे डिटेल्सच्या वरताण केक बनवला होता. नोराने आपली नसलेली कॉलर ताठ केली. ममाने केक उंच खोक्यात सरकवला आणि बाहेर सणसणीत ब्रेक लावत थार येऊन थांबली.

क्रमशः

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle