हिंजवडी चावडी: होमवर्क आणि नेटवर्क

वेळ: सकाळी 8.30
तिकडे बाथरूम चं दार उघडल्याचा आवाज आला आणि इथे स्वप्नाने इडल्यांचा पहिला सेट कुकर मध्ये ठेवला.शक्य तितक्या वेळा कुटुंबाला गरम पदार्थ खायला घातल्यास पदार्थ उरण्याचे चान्सेस कमी होतात.शिवाय गोवेकर बाई म्हणतात ताजं गरम खा, वेट लॉस ची हार्मोन जागी होतात.लॅपटॉप ओट्यावर कोरड्या बाजूला ठेवून जपानची मीटिंग चालू होती. मध्ये इडली चं मिश्रण ढवळत असताना तिला बरेच वेळा 'यु वेअर गोईंग टू क्रिएट इश्यू इन मिदोलो मे' ऐकू आलं.तिने घाबऱ्या घाबऱ्या मैत्रिणीला फोन करून विचारलं.
"अगं हे मिदोलो काय आहे?आता नव्या टूल मध्ये टाकायचे का इश्यू?जीरा कुठे गेलं?"
"लोड मत ले स्वप्ना.तो म्हणतोय 'मिड मे, 15 मे पर्यंत इश्यू बनणार होता.मिदोलो टूल नाहीये."
स्वप्नाने हुश्श करून शेजारी कढईत चटणी साठी मिरची टोमॅटो कढीपत्ता परतायला घेतला.
.
वेळ: सकाळी 11.30
एका डोंगराच्या, एका नदीच्या आणि एका हायवेच्या पल्याड पक्या च्या घरात खडाष्टक चालू होते.
"मला अजिबात अमेरिकेचे सॅटेलाईट माझ्या घरावर नकोयत.तू नाव बदललं नाहीस तर घरात मी राहीन किंवा ते दळभद्र राहील."
पक्या ची बायको इतकी चिडायला तितकंच मोठं कारण होतं.पूर्वीच्या काळी बाळं जगत नसत तेव्हा आईबाप मुलांची नावं दृष्ट लागू नये म्हणून दगड्या, धोंड्या, भिक्या ठेवत असत.तसं पक्या वायफाय वर हॅकर्स ने हल्ला चढवू नये म्हणून वायफाय नेटवर्क ला भयंकर नावं देतो.तो ट्रोजन वगैरे नावं द्यायचा.पण मग आजूबाजूला सगळे व्हायरस ची नावं ठेवायला लागले.पक्या ने करोना वगैरे नावं ठेवायला चालू केली.एकदा 'धोका' नाव ठेवलं होतं.त्या महिन्यात बायकोला उजळ माथ्याने 'थांब मी तुला धोका देतो' म्हणणे शक्य झाले.नंतर एकदा 'करोना'नाव ठेवलं होतं. मागच्या महिन्यात वायफाय नेटवर्क चे नाव देवनागरी लिपीत 'जुलाब' ठेवल्यावर पक्या ची बायको चिडायला चालू झाली होती. या महिन्यात त्याने 'तालि-बॅन' नाव वायफाय नेटवर्क ला ठेवल्यावर बायकोचा पारच हल्क झाला चिडून.लग्नापूर्वी 'माझा क्युट शोना किती वेगळा विचार करतो' या कौतुकाचं चं आता लग्नानंतर 'काय हा सतत विअर्डोपणा! जरा चारचौघात माणसासारखं शहाणं वागावं,ते नाही' वालं हतबुद्ध नैराश्य झालं होतं.
.
वेळ: दुपारी 12.45
टीम मीटिंग मध्ये अतिशय गहन चर्चा चालू होती.विषय नेहमीचेच: "आपल्याला गिऱ्हाईक काय मागणार ते ओळखून आधी ते द्यायला पावलं उचलली पाहिजेत." साहेब कीर्तनकाराप्रमाणे बोल बोल बोलत होते.तितक्यात मन्या चा मुलगा धावत धावत आला.मन्याने म्यूट चं बटन दाबून त्याला विचारलं.
"बाबा लवकर या.तुम्हाला कपाट सरकवायचंय".
"मीटिंग करून येतो."
"मला वारकरी नृत्याचा व्हिडीओ बनवायचाय 1 तासात.टीचर ने पांढऱ्या भिंतीपुढे उभं राहून कपाळाला टिळा लावून पांढऱ्या कुर्त्यात कमरेला लाल ओढणी बांधून व्हिडिओ पाठवायला सांगितलाय आता.आपल्या कडे मोकळी पांढरी भिंत नाहीये."
"मग ती टीव्हीसमोरची भिंत वापरा."
"तिथे आईने बुद्धा चं स्टिकर लावलंय मोठं.ती वॉल नाही चालणार."
मन्याने "यांच्या नानाने केला होता व्हिडीओ जोडून वारकरी डान्स" "बुद्धाच्या पुढे वारकरी नृत्य चालणार नसेल तर काय उपयोग 'राष्ट्रीय एकात्मता' थीम चा" वगैरे वाक्यं संतापून मनात म्हटली आणि तो "मी सगळं वेळेत करून देईन, ही मीटिंग होऊदे" म्हणून हेडफोन कानात खुपसून बसला.
.
वेळ: दुपारी 2.30
2 आठवडे विनवण्या करून आज कसाबसा अर्धा तास मीटिंग साठी भेटलेला एक्स्पर्ट 'गाडीच्या इंजिन च्या मोटर च्या वायरिंग चं काम कसं चालतं आणि 3डी मॉडेल करताना काय काळजी घ्यावी' याबद्दल बोलत होता.हे अनोळखी ज्ञानकण कानाचे द्रोण करून नीट ऐकून आणि समजून घ्यायला मिताली वही पेन सरसावून बसली होती.तितक्यात मुलगी घाबऱ्या घुबऱ्या आली.मितालीने पटकन म्युट टाकून 'अगं काय झालं' विचारलं. 'आई, तिथे तो काळा बोका त्या पांढऱ्या मांजरीला खूप मारतोय.तिला रक्त आलंय.तू सोसायटी सेक्रेटरी ला ग्रुपवर सांग ना.'
कम्बशन इंजिन वायरिंग ते मांजर बोका डोमेस्टिक व्हायलन्स केस हा मेंदू साठी फारच मोठा टप्पा होता.मितालीने 'अर्ध्या तासात बघते' सांगून डोक्याला हेडफोन लावला.पण मुलीने परत हेडफोन काढून 'तू जेव्हा उठशील तेव्हा मला मॅगी करून दे' सांगितलं.
'चटणी पोळी खा.तूप साखर पोळी खा.घरात स्वयंपाक तयार असताना मॅगी बनणार नाही.मॅगी खायचं असेल तर माझा सकाळचा स्वयंपाक बनवायचा वेळ वाया घालवायचा नाही.त्या दुपारी नुसतं मॅगी खायचं.' मितालीने रुद्रावतार धारण करून 'मै झांसी नहीं दुंगी' वाला बाणेदार सूर लावला.आता इंजिन आणि वायरीत परत लक्ष घालण्यात अर्थ नव्हता.रेकॉर्डिंग ऐकून रात्री शांतपणे समजावून घ्यावं लागणार परत.
.
वेळ: दुपारी 4.30
विश्या ने अनेक दिवस खपून बनवलेलं प्रेझेंटेशन आज 2 विदेशी डायरेक्टर्स समोर होत होतं. व्हिडीओ नीट लावून, चांगले टापटीप कपडे घालून, मागे स्वच्छ बॅकग्राऊंड ची व्यवस्था करून विश्या बोलत होता.अचानक डायरेक्टर्स ना 'गुड्डू नो!!!!!' अशी किंकाळी ऐकून कॉल बंद झाला.भारतातल्या मित्रांनी काळजीने विश्याला फोन केल्यावर कळलं ते असं: खेळण्यातल्या हेलिकॉप्टर चा चार्जर सापडल्याने खुश झालेल्या गुड्डूने पटकन ते चार्जिंग ला लावलं, ते लावताना जो प्लग काढला तो इंटरनेट कनेक्शन चा होता.आपल्या घरात कडी न लावता येणारी विदेशी हँडल ची दारं आहेत याचा विश्याला नव्याने पश्च:ताप झाला.
.
वेळ: दुपारी 5.45
सुम्या प्रचंड वैतागला होता.'टीम बॉंडिंग' म्हणून टीम मधल्या सर्वानी 5 मिनिटांचे व्हिडीओ बनवून माझी कंपनी, माझं काम किती चांगलं आहे हे सांगायचं होतं.आता सूर्य पिवळा आहे, तेजस्वी आहे हे खरं.पण हे सत्य 10 जणांनी वेगवेगळ्या वेळेला प्रत्येकी 20 वाक्यात सांगितलं तर पिवळ्या तेजस्वी उन्हात चक्कर नाही येणार का?सुम्या ने व्हिडीओ ऑफ करून म्युट दाबून मेथीची जुडी निवडायला घेतली.कालच त्याने सुपर मार्केट बंद होताना 3 रुपयाला 1 मिळतात म्हणून उत्साहाने 10 मेथीच्या जुड्या आणल्या होत्या आणि 'आता या मी एकटी कधी निवडणार?मला पण ऑफिस आहे.कामं आहेत.10 वर्षं भाजी आणायची नाही आणि एकदा 10 वर्षांची भाजी एकदम आणायची याला काय अर्थ आहे?' म्हणून बायकोने कौतुकाची फुलं उधळण्याऐवजी झापलं होतं.
.
वेळ: संध्याकाळी 6.30
पमीने केसांना नुकतीच नीळ लावली होती.काल लावलेली मेंदी जरा जास्तच ताजी असल्याने केस रुमाल उडवत 'यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी' करत नाचणाऱ्या पठाणा सारखे लाल भडक झाले होते.या लाल रंगात निळा रंग मिसळल्यावर सुंदर असा चमकदार तपकिरी रंग केसाला येणार होता(असं ते लोक पाकिटावर तरी म्हणत होते.) आता कंपनी चं ओपन हाऊस, मुख्य साहेबांचं भाषण वगैरे प्रकार चालू होते.
तितक्यात एक अनर्थ झाला.पमी च्या टीम ला 'बेस्ट परफॉर्मन्स इन वर्स्ट केस' असं बक्षीस मिळाल्याने सर्वाना व्हिडीओ कॅमेरा चालू करून स्वतःचे चेहरे दाखवायचे होते.आपल्याला 1 तास उशिरा बक्षीस का मिळू नये या विचाराने पमी हळहळली आणि तिने 'नेटवर्क नीट नसल्याने कॅमेरा चालू करता येणार नाही'सांगितले.आता बाकी सगळ्यांचे फोटो आणि हिच्या फोटो जागी काळा चौकोन येणार होता सर्व मेल्स मध्ये.सौंदर्यासाठी मोजावी लागलेली किंमत.
.
वेळ: रात्री 9.30
निल्या आणि त्याचे कॉलेज मित्र बसून 'टीचर्स' चा आस्वाद घेत होते.गप्पा रंगल्या होत्या.बऱ्याच जणांचं विमान झालं होतं.तितक्यात फोन वाजला.निल्या चा साहेब त्याला कॉल वर बोलावत होता.
"अरे तिथे मायकेल अडकलाय फॅक्टरी मध्ये.कॉम्प्युटर रिस्टार्ट केल्यावर आपली सिस्टम चालू झालीच नाही.मजूर टायर ची लाईन सोडून सिगारेटी प्यायला गेले.नुकसान झालं कंपनी चं."
"पण आपण स्पष्ट लिहिलं होतं ना, सर्व्हिसेस मध्ये जाऊन ते चालू करा म्हणून?"
"त्यांना सापडलं नाही सर्व्हिसेस."
इथे निल्या ला 'सगळे लोक गुगल पंडित नसतात' याचा साक्षात्कार झाला आणि तो निमूटपणे कॉम्प्युटर समोर बसला.सगळ्या तरल वातावरणाची वाट लागली होती.
.
वेळ: रात्री 10.45
स्नेहा सगळं आवरून अंथरुणावर पडणार तितक्यात आत्याबाईंचा फोन आला.
"अगं मी बोलतेय.मी आणि चिमी उद्या येतोय 5-6 दिवस.तुमची सुट्टी चालू आहे ना अजून?"
"सुट्टी नाही हो आत्या.वर्क फ्रॉम होम."
"तेच ते गं.घरी कसली कामं?बरं ठिक, आम्ही येतोय.यावेळी जमलं तर 2 किलो च्या कुरडया पण करून टाकू सगळ्या हसत खेळत."
"ओके, या तुम्ही.मग बघू."
स्नेहा ने "वर्क फ्रॉम होम म्हणजे सुट्टीच" "पापड कुरडया" आणि 1 आठवड्यात असलेली डेडलाईन याची अवघड गणितं जुळवत अंथरुणाला पाठ टेकली.आज स्वप्नात तिला पापड कुरडया घालणारा जर्मन कस्टमर दिसणार होता.

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle