इसां(प)नीती

इसां(प)नीती

इडलीसांबार!!! लुसलुशीत आणि वाफाळतं. मराठी घरांनी उपमापोह्यांबरोबर प्रेमानं आपल्यात सामावून घेतलेला पदार्थ. मेजाॅरिटी लोकांचं कंफर्ट फूड. हेल्थभीऑरटेस्टभी आयटम.

चांगल्या इडलीबद्दलही खूप वेगळीवेगळी मतं दिसतात. घरची (जमलेली) इडली कशी पांढरी शुभ्र, आंबटसर चवीची, मऊ तरी रवाळ आणि बेताच्या आकाराची तर उडप्याकडची ऑफ व्हाईट,भलीमोठ्ठी, भुसभुशीत आणि कमी आंबूस. उडप्याकडे एका प्लेटमधे पोट भरतं तेच घरी भस्म्या झाल्यागत अवस्था होते. हाॅटेलसारखी इडली घरी बनत नाही हे खरंच पण घरच्यासारखीही हाॅटेलात मिळत नाही. काही ठिकाणी अतीमऊ, गुबगुबीत, लवचिक पण नाॅन पोअरस, भातासारखी लागणारी इडली खाल्ली. पण ती तर सांबाराशीच फटकून वागत होती. (ह्याला काय अर्थ आहे?) काही जण तिला चांगली इडली म्हणतात म्हणल्यावर जरा आश्चर्यच वाटलं. इडलीनं साॅफ्ट असावं पण चमच्याशीही अदबीनं आणि सांबाराशी मिळूनमिसळून वागायला हवं ना. करायला सोप्पा वाटणारा हा पदार्थ जमायला मात्र अनुभवी हातच लागतो. डाळ-तांदळाची जात, तापमान, वाटण्याची-आंबवण्याची- शिजवण्याची प्रक्रीया ह्या सगळ्यांतून उत्तम पोत आणि चवीची इडली बनते. चांगली इडली बनवणं हे काही खायचं काम नाही.

सांबाराच्याही किती त-हा. उडप्यांकडचं ऑथेंटीक सांबार, मराठी हाॅटेल मालकाचं फोडणीच्या वरणाच्या जवळच्या चवीचं सांबार, नवसुगरणीचं सर्व प्रोसेस फाॅलो केल्यानंतरही काहीतरी कमीच आहे असं वाटणारं सांबार, आईच्या/आजीच्या हातचं गूळ घातलेलं सात्विक सांबार, हातगाडीवरचं पाणथळ तरी चविष्ट सांबार....पण इडलीबरोबर ह्याची जोडी जमली की मजा येतेच.

एखाद्या रविवारी घरी इसांचा बेत ठरतो. हेsss एवढं सांबार आणि डबाभर इडलीचं पिठ तयार केलं की "खा मेल्यांनो" म्हणत दिवसभर आया मोकळ्या. बच्चा, बच्चे का बाप आणि आज्ज्याआजोबेही खूष. इसां वाल्या रविवारी घरातली एरवीची लाडावलेली मेंबरं आपापली आसनं सोडून चक्कपैकी सांबार गरम करण्यापासून ते वाढून घेण्यापर्यंतची(च फक्त) कामं लुटूलुटू स्वतःच करताना दिसू शकतात.

गरमागरम इडलीसांबार खाताना प्रत्येक वेळेस कितीही काळजी आणि वेळ घेतला तरी पहिला घास चटका लावणाराच ठरतो. सांबाराचा एक दणदणीत चटका खाल्ला आणी मग जाॅनी लिव्हर किंवा वाॅकरसारख्या मुद्रा करून झाल्या की मग फ्फू .....फू..करत भाजलेल्या जिभेवरून इडलीसांबाराचा सुखमय प्रवास सुरू होतो. मग मात्र मधे मधे कुणी तडमडायचं नाही, बेल आणि फोननंही वाजायचं नसतं. फक्त मै और मेरा इसां.......सारं जग कसं शांत शांत वाटतं. अट एकच.... रसद अखंड हवी. मधेच इडल्या संपल्या किंवा सांबार संपलं वगैरे फालतूपणा नको. चटणी असली तर असूदे बिचारी पण आज फोकस मात्र सांबारावर.

सकाळची अन्हीकं उरकली की ब्रेकफास्टला पहिल्या वाफेच्या इसां ची अनेक आवर्तनं होतात. ("श्शूक, इथं इडल्या नाही मोजायच्या...... पाप लागतं") मग पूर्णविराम म्हणून आल्याचा एक फक्कड चहा.....आता बरीच मेंबरं (कुणीही विचारलं नसताना) मनाच्या लाजेखातर, "बापरे फार खाणं झालं... आता दुपारचं जेवण नकोच" वगैरे अनाउन्समेंट करतात. मग अनुभवी आया त्यांना फक्त एक लुक देतात. आवराआवर होते. दुपारी कोणीच जेवणार नाही म्हणून पिठातले, सांबारातले डाव बाहेर निघतात. झाकपाक होऊन स्वैपाकघर शांत होतं.

दुपारी...जरा उशीरानंच..पण एक एक जण हळूचकन् स्वैपाकघराशी घुटमळायला लागतो. परत गॅसवर कुकर चढतो, सांबाराला परत उकळी आणली जाते. परत एकदा नव्या उत्साहानं दुस-या वाफेचं दणकून इसां. परत एकदा चवीचवीनं खाल्लं जातं. आता जरा धीम्या गतीनं असतो हा कार्यक्रम. गप्पाटप्पा चहा होतोच. आता मात्र रात्री नक्कीच काही नको वर सर्वानुमते शिक्कामोर्तब होतं.

संध्याकाळी हिंडूनफिरून चारदोन कामं करून घरी आल्यावर टिव्हीवरचे रंगारंग कार्यक्रम बघून झाले की झोपायला जायचं ठरलेलं असतं. मेजाॅरिटीमधे कुणाला भूकही नसते. पण एकजण फुटतो. त्या एकासाठीच फक्त एकाच साच्यात चार इडल्या शिजायला लावल्या जातात. सांबाराला उकळी आणायला पातेलं गॅसवर चढतं.....मात्र.... परत एकदा त्या सुगंधानं सगळेजण परत एकदा टेबलाजवळ घुटमळायला लागतात. इसांची तिसरी राऊंडही पार पडते. ह्या वेळेस सांबार जरा कोमट असलं तरी चालतं. संपवायची म्हणून एखादी इडली नुसतीच आणि चक्क गारही चालून जाते. आता परत नको बाबा...फार होतं हे असं ठरवून इसांरविवार सफल होतो.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle