मृत्यू

असं धाडकन कुणी मृत्यू बद्दल लिहीत नसतं. पण तो तसाच येतो, अंगावर, न सांगता. कोणी कितीही सांगितलं की अंतिम सत्य आहे, असंच होणार, त्याचं येणं धक्काच असत. अचानक आला तरी, वाट पाहून आला तरी. जवळच कोणी असो किंवा अनोळखी. धक्का आणि हळहळ असतेच.
गेले दोन वर्ष तो जागतिक रित्या ओव्हर टाइम केल्या सारखा येतोय जगावर. आकडेवारी वगैरे सोडली तरी आधी लांबून दिसणारा एका दिवस अचानक घरात आला. आतून बाहेरून हलवून गेला. काही दिवस काय होतंय ते कळण्यात गेले. आणि कळल्यावर हाताळण्यात गेले. मन पोळत राहिलं. कारण असं काही हाताळण्यासाठी तयार नव्हतं. मग काय काय वाचन, ऐकणं, स्वतःला समजावणं. सगळं झालं मग नक्की काय ठरवायचं ते हळू हळू कळू लागलं. मृत्यू हा The End ना होता the beginning or the route change झालं.
अजून एक नक्की झालं, बिग बँग थेअरी आणि हिंदू तत्वज्ञानानुसार एकाच स्रोतातून आलेलो, त्यात जाणारे. मग दुःख गेलं कारण हे एकदा निश्चित झालं की आपण एका मोठ्या जगाचे भाग होतो. पृथ्वीचं म्हणाल तर ती एक ट्रेन आपण आपला प्रवास झाला की उतरतो आणि घरी पोहोचतो. बाकीचे प्रवास करत राहतात. असं असेल तर का रडणं, वाईट वाटून घेणं. घरवापसी झाली कि भेट आहेच.
दुसरा विचार तर अजूनच छान. ऊर्ध्व मूलम. तसं असेल तर आणि पटलं तर आपण मुळं आणि वर पसरलेला वृक्ष. जे जातात त्यांची फुलं, पानं, प्रकाश आणि मुळ स्रोताशी भेट आणि त्यात मिसळून जाणं. बाकी मुळांनी आपलं काम करणं.
हे सगळं खरं असेल तर मृत्यू त्रास दुःख नाही. तो खरा आणि आपण त्याचा भाग. तो पूर्णत्वाची जाणीव आणि आपण प्रयत्न. तो असण्याचं कारण आणि आपण असणं. आपण प्रवास आणि तो त्या प्रवासातील शेवटचं स्थानक. प्रवास पूर्णत्वाचा, प्रवास असण्याचा, प्रवास स्वतःचा स्वतःकडे.
आणि अगदीच नास्तिक मार्ग किंवा शास्त्रीय विचार करायचा म्हटलं तर तो म्हणजे संपणं. एखादी खुर्ची तुटते तसं तुटणं. भरलेला डबा रिता होतो तसं रितं होणं. झाड संपत तसं संपणं. काहीच न उरणं. अगदी तसं जरी असलं तर मग वाईट वाटणं भीती कसली? जे गेले त्यांना जाणिवा नाहीत आणि आपण गेल्यावर आपल्याला नसणार.

कुठलाही मार्ग हा समाधानाकडे आणि पूर्णत्वाकडे जाणारा. आता भीती नाही दुःख नसावं.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle