ये मोह मोह के

ये मोह मोह के पत्ते ❤️❤️❤️

मोह- मधूका लॉंजिफोलिया-मधूक- महुआ
लोकेशन-अंबरनाथ-जिल्हा-ठाणे

साध पिठल- भाकरी/चपाती, लोणच, कांदा डब्ब्यात भरून घेऊन आवडलेल्या एखाद्या ठिकाणी झाडझाडोऱ्यात जाऊन निवांत निसर्गाच गाण ऐकत जेवलो की जो आनंद मिळतो तो अवर्णनीय आहे. म्हणूनच एप्रिलमध्ये उन्हाचा तडाखा सुरू झाला तेव्हा सरळ उठून मोहराईत जाऊन डब्बापार्टी करून आलो आम्ही दोघ. दोघच कारण लेक होस्टेलवर असते न हल्ली.
त्याच नेमकं काय झाल तर मार्च संपता संपता वॉकला जायचो तिकडे रस्त्याच्या आजूबाजूच्या मोकळ्या माळरानावरची काहीकाही झाड आपली कोवळी मनमोहक रंगबिरंगी पालवी दाखवत मला त्यांच्याकडे बोलावू लागली. एकदोन दिवस बघून न बघितल्यासारख केलं मी पण दिवसागणिक झाड अजूनच लाल-कुसुंबी-पोपटी-तपकिरी होतायेत हे बघून वॉकला सोडचिठ्ठी देत रस्ता सोडून त्या माळरानात त्या झाडांकडे खेचले गेले आणि चक्क कित्येक वर्षांची मोह बघायची माझी इच्छा पूर्ण झाली. त्या पालवीने मोहाची ओळख पटवून दिली मला, इतकंच काय तर मोहाची फुल पण चाखायला मिळाली चक्क.गेल्या मे महिन्यापासून इकडे शहारापासून जरा लांब, वस्ती नसलेल्या ठिकाणी वॉकसाठी यायला लागलो होतो आणि जवळजवळ वर्ष होत आलेलं पण इथल्या मोहाच्या झाडांची तेव्हढी ओळख पटली नव्हती ती त्याच्या पालवीने करून दिली फायनली.
वॉकसोडून रस्त्याचा बाजूला आत माळरानात गेले आणि तिथे त्या छोट्या टेकडीवर असलेली 6-7 मोहाची झाड, प्रचंड फुललेली शाल्मली, जवळच मोठं जांभूळ आणि टेकडीखाली समोरच असलेलं गहू, मका, पालेभाज्या आणि वेलीभाज्यांनी वाऱ्यावर लहरणार हिरवंगार शेत, शेताच्या बाजूला असलेली करंज, मोई, भोकर, जांभूळ, पिंपळ, शाल्मली, पळस,मोह ह्या झाडांची दाटी बघून मी हरखून गेले. टेकडीवरच्या त्या मोहाच्या 5-6 झाडांना नवीन पालवी फुटत होती आणि तिथे लाल- कुसुंबी- पोपटी- मातकट तपकिरी रंगाचा मेळावाच भरला होता. फांद्यांच्या टोकाला मातकट रंगाच्या कळ्यांचे घोस लटकत होते. बाजूच्या शाल्मलीवर तर जणूकाही पक्षी संमेलन भरले होते.असंही पळस-पांगारा- शाल्मली फुलले की ती झाड म्हणजे कित्येक पक्षी आणि प्राण्यांच ज्यूस सेंटरच बनत. खालच्या शेताच्या आणि टेकडीच्या मधल्या जागेत वर्षभर पाण्याचा साठा असतो तर शेताच्या बांधावरची झाड हेरॉन्स, पेंटेंड स्टोर्कस, बगळे ह्यांच्या रातथाऱ्याची जागा आहेत हे मी आधीच शेताच्या पल्याड असलेल्या रस्त्याने वॉक करताना मनात नोंदवून ठेवल होतच. दुसऱ्या दिवसापासून आम्ही दोघेही वॉक कसाबसा पटकन उरकून टेकडीवर मोहाखाली बसायला लागलो आणि तो वेळ कसा निघून जायचा ते आम्हाला समजायच पण नाही. सांजावताना पाखर रातथाऱ्याला निवडलेल्या झाडावर उतरताना बघणं, त्यांच सेटल होईपर्यंत गडबड गोंधळ घालत नंतर शांत होत जाण, मावळतीच्या सूर्याने जाताजाता आकाशात रोज नवीन चित्र रंगवून जाण, थंडगार - मोकळ्या वाऱ्यावर झाडाखाली हे सगळं अनुभवताना लेकीला होस्टेलवर सोडून आल्यापासून तिला मिस करताना कातर झालेलं मन, मनाला लागलेली एक अनामिक हुरहूर, रोजच्या हजार चिंतांनी, आपल्याच माणसांच इर्षेने, द्वेषाने वेड होत विचित्र वागणं हे सगळं सहन करत दुखावलेल मन तिथल्या त्या तासाभराने शांतावत जायच आणि दुसऱ्या दिवसाच्या लढाईसाठी नवीन उमेद देत होत.
तिथली मोहाची सगळी झाड आपसांत मी कसा वेगळा हे दाखवण्यकासाठी इरेला पेटली आहेत अस वाटत होतं कारण एक मोह पोपटी पालवी मिरवत होता तर एक लाल तर एक कुसुंबी तर कोणी मातकट- तपकीरी पालवी मिरवत होता. पण निळ्या निरभ्र आकाशाच्या बॅकड्रॉपवर ती झाड इतकी सूंदर दिसत होती की कितीही वेळ बघत बसल तरी मन भरत नव्हतं. कळ्या आता टोपसल्या होत्या आणि एकदा रस्त्यावरच हवेवर एक गोड सुवास दरवळत मोह फुलल्याची बातमी घेऊन वारा आला. जाऊन बघतो तर काय झाडाखाली हलक्या लेमन यल्लो आणि लाईट पिस्ता रंगाच्या छोट्या मोत्यांचा सडा पसरलाय अस वाटत होतं आणि गोड सुगंधाने आसमंत भरून गेला होता. सरतेशेवटी इवलाली मोहाची फुल फुलायला सुरवात झाली होती आणि वाऱ्याने त्या फुलांनी झाडांवरून खाली जमिनीवर झेप घेत जमिनीवर जणू चादर अंथरली होती. पटकन आम्ही 5-6 फुल उचलून गट्टम केली आणि तो गोडवा जिभेवरून मनापर्यंत हळुवारपणे पोचला.मोहाच्या फुलांच यथार्थ वर्णन म्हणजे कितना मधुर, कितना मदिर ही ओळच आहे ही खात्री पटली ती फुल खाऊन बघितल्यावर. पटकन मोहाच्या फुलांचा फोटो मित्र-मैत्रिणींना पाठवला तर मलाच विचारायला लागले सगळे की मग काय आज झिंगझिंगझिंगाट का पण शप्पथ सांगते फक्त 5-6 च फुल खाल्लेली भीतीने. दोन दिवसांनी सकाळीच लक्षात आल की आज 3 पर्यंत दोघांनाही वेळ आहे तर पटकन पिठल-चपाती करून डब्बा भरून, पाण्याच्या बाटल्या,दरी वगैरे घेऊन अकरा वाजता आम्ही टेकडीवर पोचलो. पारा चाळीशी पार करत होता तरी तिकडे मात्र झाडांची दाट सावली आणि खालच्या पाण्यावरून येणाऱ्या वाऱ्याने मस्त थंडगार वाटत होतं. मग नवऱ्यानी सगळी माझ्या आवडीची गाणी गायली ती ऐकत निवांत बसलो. बारा- साडेबाराला गप्पा मारत मस्तपैकी जेवलो आणि नंतर नवऱ्याने चक्क ताणून दिली तिकडे. त्याची झोप होईस्तोवर मी टेकडी खाली उतरुन आसपासच्या झाडांना भेटून आले, भरपूर फोटो काढले. मैत्रिणीच्या सल्ल्याने मोहाची बरीच फुल गोळा केली सुकवून नंतर खाय छान लागतात म्हणून. नंतर मीही दरीवर पाठ टेकली आणि वर बघितल तर नजरेला हिरवी - लाल पानांची महिरप दिसत होती,इतकी दाट- मोठमोठी पान असतात मोहाची की सूर्याची तिरीपपण येत नव्हती खाली डोळ्यावर. जरावेळाने झोप पूर्ण झाल्यावर नवरा उठला तर बाजूच्या गावातल्या बायका सरपण गोळा करत आल्या तिथे. त्यांच्याशी गप्पा मारताना आम्ही असे डब्बा पार्टीसाठी आलेलो बघून पिकनिकला कसे काय आलात तुम्ही इकडं रानात म्हणत तोंडावर पदर ठेवून खुसुखुसू हसून गेल्या. खालच्या पट्ट्यात दोन -तीन गुराखी गायी-म्हशी घेऊन आलेले तर ते पण ह्ये कोण येडे आहेत अश्या नजरेने बघत होते आम्हाला आणि नंतर तर त्या झाडांखाली 2 मूल मोबाईल नेटवर्क मिळत म्हणून रोज दुपारी येऊन बसत असावीत तिथे ती आली आणि आम्हाला बघून निघून जायला लागली तर आम्हीच त्यांना म्हंटल की बसा तुम्ही,आम्हीच निघतोय. असही अडीच पर्यंत घरी पोचण मस्ट होतच कामासाठी. पण हा वनभोजनाचा बेत मात्र फक्कड जमून आलेला. मोहाच्या फुलांमुळे जमिनीवर मुंग्या आणि इतर कीटक दिसत होतेच पण चक्क एक हुदहुद पण त्या कीटकांच्या मेजवानीवर ताव मारायला तिकडे आला होता. काटेसावरीवर मात्र कोतवाल, शिंपी, बुलबुल आणि फुलचुखे सोडून इतर पक्षी मात्र दिसले नाहीत, कदाचित दुपार असल्याने असेल कारण संध्याकाळी जातो तेव्हा खूप वेगवेगळे पक्षी बघायला मिळतात तिकडे. फुलपाखरं मात्र भरपूर बघायला मिळाली त्यावेळात आणि खंडया पण खूप दिसले.
ते मोहाचे, पिंपळाचे चैत्र पालवीचे रंग बघून मनात विचार आला की परदेशात ती लोक फॉल कलर्स सेलिब्रेट करतात तशी उद्यानांत जाणीवपूर्वक मोह, कुसुंब, पिंपळ अशी झाड लावली तर आपण पण चैत्र पालवी महोत्सव करू शकू. एकत्र खूप सारे मोह,कुसुंब लावले असतील तर सिझनला मस्त कुसुंबी रंगाची उधळण बघायला मिळेल. तसच बहावा, सीता अशोक, पळस, पांगारा, शिरीष असे ठरवून एका एका उद्यानात लावले तर फुलल्यावर त्या उद्यानांना भेट देणे म्हणजे एक सोहळाच होईल.
मोहाच्या झाडाबद्दल बोलायचं तर हा एक अस्सल देशी वृक्ष असून उत्तर प्रदेशात मोहाला कल्पवृक्ष म्हणतात कारण ह्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो. फुल कच्ची खातात, वाळवून त्याच पीठ करून चक्क त्याच्या भाकरी पण करतात आदिवासी लोक.फळाची भाजी , लोणचं बनवतात. बियांपासून खाद्य तेल मिळते. वाळवलेल्या बिया डालडा आणि साबण बनवण्याच्या प्रक्रियेत वापरतात, पान जनावरांना चारा म्हणून उपयोगात येतात. लाकूड बाईपगासी, फर्निचर, घरबांधणीसाठी उपयोगात येत. मोहाच्या फुलांची दारू प्रसिद्ध आहेच पण ती फुल औषधी पण आहेत तसेच मोहाची साल, फळ, पान आणि बियाही औषध बनवताना वापरतात. मोहाच संस्कृत नाव आहे मधूक तर शास्त्रीय नाव आहे मधूका लॉंजिफोलिया - मधूका संस्कृत नावावरून घेतले आहे आणि लॉंजिफोलिया म्हणजे लांब पाने असलेला. मोहाला महुआ, मोवा, मोहडा, बटर ट्री, हनी ट्री अशी पण नाव आहेत. ह्याची फॅमिली सॅपोटेसी आहे म्हणजेच बकुळ कुळातील हे झाड आहे. बियांपासून सहज रोप तयार होणारा हा एक अतिभव्य वृक्ष आहे.
इथे जवळपास पन्नासेक मोहाची झाड आहेत पण इथल्या गावकऱयांना मोहाची उपयुक्तता माहीत नसल्याने ही झाडे फक्त वन्य झाडे म्हणून वाढत आहेत. आता हे चांगल की वाईट ते काही मला ठरवता येत नाहीये पण मला मात्र ही मोहराई अगणित आनंद देत आहे. (झाडावरच्या कळ्यांचे आणि फळांचे फोटो ब्लर आलेत कारण तिथे सतत इतका वारा असतो की मोबाईलमधून ऑब्जेक्ट फोकस करणे महाकठीण काम होऊन बसत सो बेअर विथ माय पूअर फोटोग्राफीक स्किल्स)

मोहाची फुल

Screenshot_20220512-182111_Gallery.jpg

Screenshot_20220514-112712_Gallery.jpg

Screenshot_20220514-112703_Gallery.jpg

Screenshot_20220514-112745_Gallery.jpg

Screenshot_20220514-112827_Gallery.jpg

Screenshot_20220514-112837_Gallery.jpg

Screenshot_20220514-112810_Gallery.jpg

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle