चक्राता- परत एकदा (भाग १/२)

ऑक्टोबर २०१९ मध्ये किरण पुरंदर्‍यांच्या निसर्ग निरीक्षण शिबिरासाठी चक्राताला जाऊन आल्यानंतर मी चक्राताचं एवढं वर्णन घरीदारी केलं होतं, की ते ऐकून ऐकून माझ्या घरच्यांनाही चक्राताला जावंसं वाटायला लागलं होतं. त्यामुळे २०२२ मध्ये प्रवास करता येईल अशी खात्री वाटल्यावर एप्रिलमधली चक्राताची सहल ठरवून टाकली. आधी तेव्हा किकांचं शिबिर असणार आहे का, याची चाचपणी केली, पण त्यांचा तेव्हा तरी तसा विचार नसल्याचं कळल्यावर आमचे आम्हीच जायचं ठरवलं.

आठ एप्रिलला सकाळी पुण्याहून विमानाने दिल्लीला पोचून, मग दिवसभर दिल्ली विमानतळावर थांबून संध्याकाळी डेहराडूनला पोचणार होतो. तिथे आधीच ठरवलेला ड्रायव्हर आम्हाला चक्राताला घेऊन जाण्यासाठी येणार होता. हे सुरळीतपणे पार पडेल असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात पहाटे लवकर उठणं, मग दिवसभर विमानतळावर बसून राहणं, वेळी-अवेळी खाणं आणि शिवाय डेहराडूनहून चक्राताला जाणारा वळणदार रस्ता, या सगळ्याचा एकत्रित परिणाम झाला आणि (पुलंच्या शब्दात सांगायचं तर ) गाडीला एका अर्थाने लागणारी वळणं मुलांना निराळ्या अर्थाने लागायला लागली! त्यामुळे थांबत थांबत, सावकाश जात आम्ही रात्री नऊ-साडेनऊला हॉटेलला पोचायच्या ऐवजी अकरानंतर पोचलो! आपण आधी मनाशी ठरवलेला, डेहराडूनला एक रात्र राहून मग सकाळी चक्राताला जाण्याचा मूळ प्लॅनच बरोबर होता, पहिल्याच दिवशी एवढा त्रास झाल्यावर आता यापुढचे रोजचे वळणदार प्रवास कसे काय पार पडणार, या विचारांनी मला चांगलीच काळजी वाटायला लागली होती. रस्त्याच्या कडेला दिसणारे शिल्लक किलोमीटरचे आकडे अगदी सावकाश कमी होत होते. कधी एकदा हॉटेलला पोचतो, असं झालं होतं. अखेरीस पोचलो, खोलीत शिरलो आणि थंडीने कुडकुडायला लागलो. ती थंडी पाहून मुलं तर थेट पांघरुणातच शिरली. एवढा उशीर होऊनही हॉटेलच्या स्टाफने गरम गरम जेवण तयार ठेवलं होतं. खरं म्हणजे जेवायची अजिबात इच्छा नव्हती, पण त्यांनी तयार ठेवलेलं स्वादिष्ट गरम जेवण पाहून जेवावंसं वाटलं आणि आम्ही दोघं थोडं थोडं का होईना, पण जेवलो.

दुसर्‍या दिवशी हॉटेलवरच थांबून विश्रांती घ्यायची असं आधीच ठरवलेलं होतं. तरी सकाळी सहाच्या आधी जाग आलीच. सकाळी सकाळी हॉटेलच्या आवारातून भरपूर पक्षी दिसतात हा गेल्या वेळेचा अनुभव आठवून मी लगेचच बाहेर गेले आणि सुरुवातीलाच चक्क कलिज फेजन्ट हा कोंबड्याच्या कुळातला देखणा पक्षी दिसला. नर आणि मादी, दोघेही दिसले. नर दिसायला जास्त रुबाबदार असतो. हे पक्षी कोंबड्यांसारखेच, जमिनीवरच जास्त दिसतात. झुडपांखालीच जास्त करून वावरतात.

kalij_male1.JPG

कलिज फेजन्ट नर
kalij_male2.JPG

हाही तोच आहे.

kalij_female.JPG

कलिज फेजन्ट मादी

ब्लू व्हिसलिंग थ्रश (शीळकरी कस्तुर) हा पक्षी यावेळी भरपूर संख्येने दिसला. त्यांचा सध्या प्रियाराधनेचा काळ सुरू असावा, कारण जोडीजोडीने दिसत होते पक्षी. संध्याकाळी काळोख पडण्याच्या सुमारास त्याची सुमधुर शीळही खूप वेळा ऐकली.

blue_whistling_thrush.JPG
शीळकरी कस्तुर

मुलं उशीरानेच उठली आणि हॉटेलचा छान परिसर पाहून खूष झाली. तिथे ज्यूनो नावाची एक पाळलेली कुत्री आहे. एकदम शांत आहे. तिच्याशी हळूहळू मुलांची दोस्ती झाली. रोजचा नाश्ता, जेवण अतिशय चवदार होतं. प्रवासामुळे बिघडलेलं पोटाचं कामही लवकरच रुळावर आलं.

आम्ही चक्राताला एकूण चार दिवस आणि पाच रात्री राहिलो. पहिल्या दिवशी आमच्याव्यतिरिक्त अजून फक्त एक जोडपं हॉटेलमध्ये उतरलं होतं. ते दुसर्‍या दिवशी चेकआऊट करून गेल्यावर तर फक्त आम्हीच उरलो. शेवटचे दोन दिवस मात्र मुलाबाळांसहित आलेली दोन कुटुंबं होती.

hotel_back.JPG

हॉटेलचा परिसर

hotel_flowers.JPG

एप्रिल महिना असूनही, भर दिवसासुद्धा हॉटेलच्या खोलीत चक्क थंडी असायची. फरशी गार गार असायची. त्यामुळे खोलीत ठेवलेला टेबलफॅन कोण, कधी आणि कशासाठी वापरत असावेत असा प्रश्न आम्हाला पडला!
’हल्की ठंड है, आप एक पतला सा जॅकेट रख दीजिये बस’ या हॉटेलमालकांच्या बोलण्यावर विसंबून आम्ही थंडीसाठी फारसं काही नेलं नव्हतं. पण त्यांच्यासाठी हलकी असलेली थंडी आम्हाला कुडकुडायला लावत होती. त्यामुळे पहिल्या दिवशी संध्याकाळी तातडीने चक्राता मार्केटला जाऊन मुलांसाठी एकेक जॅकेट घेतलं. तत्पूर्वी आमच्या ड्रायव्हरने आम्हाला चक्राताजवळच्या चिलमिरी नावाच्या ठिकाणी नेलं. उंचावर असलेलं विस्तीर्ण पठार अशा स्वरूपाची ही जागा आहे. भणाणणारा वारा वहात होता. इथून सूर्योदय आणि सूर्यास्त, दोन्ही सुंदर दिसतात असं तो म्हणाला. त्या दिवशी नाही, पण नंतर एक दिवस आम्ही इथे येऊन सूर्यास्त पाहिला.

chilmiree.JPG

चिलमिरीहून दिसणारं दृश्य

chilmiri_sunset.JPG

तिथून दिसणारा सूर्यास्त

दुसर्‍या दिवशी टायगर फॉल्स या धबधब्याला गेलो. चालतही जाता येतं, पण आम्ही गाडीनेच गेलो. आमचा ड्रायव्हर स्कॉर्पियो गाडीसह या पूर्ण सहलीत आमच्याबरोबर होता. हिमालयातल्या रस्त्यांवर गाडी चालवणार्‍या चालकांमध्ये आढळणारे गुण, म्हणजे कौशल्य, प्रसंगावधान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ’सेफ्टी फर्स्ट’ हा दृष्टिकोन त्याच्याकडे असल्यामुळे आमचे सगळे प्रवास उत्तम पार पडले. टायगर फॉल्सला जाणारा रस्ता त्यामानाने सोपा आणि चांगला आहे. गाडी थांबवून पुढे धबधब्यापर्यंत चालत गेलो. खरं तर त्या दिवशी रविवार, पण आम्ही तसे लवकर पोचल्यामुळे आम्ही सोडून तिथे फारसं कुणीच नव्हतं. पाणी बर्फासारखं थंड होतं. मी जेमतेम गुडघ्यापर्यंतच्या पाण्यातच उतरले, पण मुलांनी मात्र भरपूर मज्जा केली. ती नखशिखांत भिजली. मी पाण्यात बुडवलेला पायाचा भाग जवळजवळ बधीर झाल्यासारखा वाटत होता. अर्धापाऊण तास मजा करून आम्ही बाहेर आलो. तिथे तिकिटं वगैरे तपासणारा एक स्थानिक माणूस होता, त्याने उत्साहाने धबधब्याच्या समोरच्या बाजूने वर चढून अजून उंचावरून धबधबा दाखवला. तोपर्यंत धबधब्यावर बरीच गर्दी झाली होती. मग आम्ही परत निघालो आणि जेवायला हॉटेलवर येऊन पोचलो.

tiger_falls.JPG

टायगर फॉल्स

kanchan.JPG

वाटेत दिसलेलं कांचनाचं फुललेलं झाड

संध्याकाळी आम्ही रस्त्यावर फिरायला निघाल्यावर हॉटेलच्या मॅनेजरने सांगितलं की इथे खाली जवळच ’किमोना फॉल्स’ नावाचा धबधबा आहे. एकदम सुंदर जागा आहे, तिथे जा. आम्ही त्याने सांगितलेल्या वाटेने, शिवाय अजून दोघातिघांना विचारून तो धबधबा शोधण्याचा बराच प्रयत्न केला, पण आम्हाला काही तो सुंदर धबधबा सापडला नाही! काळोख पडायला लागला होता त्यामुळे झाडीतून अजून फिरत बसण्यात काही अर्थ नव्हता. शेवटी परत आलो. वाटेत वळणावर एक पहाडी तांबट (हिमालयन/ग्रेट बार्बेट) एका झाडावर बसून साद घालत होता, पण आम्ही जेमतेम तिथे पोचलो आणि तेवढ्यात एका गाडीच्या हॉर्नच्या आवाजामुळे तो उडून गेला! याने नंतर बर्‍याच वेळा हुलकावणी दिली, पण आम्ही परत जाण्याच्या आदल्या दिवशी मात्र नीट दिसला.

आम्ही संध्याकाळी आमच्या ड्रायव्हरला परत बोलावलं होतं कारण आज चिलमिरीला जाऊन सूर्यास्त बघायचा होता. हॉटेलच्या परिसरात काळोख पडायला लागला असला तरी चिलमिरी उंचावर आणि उघड्यावर असल्यामुळे तिथे सूर्यास्ताला अजून तसा वेळ होता. त्याप्रमाणे ड्रायव्हर गाडी घेऊन आला. चिलमिरीला सूर्यास्त बघायला आलेले आमच्यासारखे बरेचजण होते. लांबच लांब पसरलेल्या पर्वतशिखरांच्या मागे दिसणारा सुंदर सूर्यास्त बघितला.

दुसर्‍या दिवशी सकाळी उठून, नाश्ता करून आम्ही बुधेर गुंफांना जाण्यासाठी निघालो. चक्रातापेक्षा हे ठिकाण जास्त उंचावर आहे. रस्ताही तसा चांगला आहे. अर्थात वळणदार आणि चढणीचाच. वाटेत एका ठिकाणी थांबून एका झर्‍याचं पाणी पिऊन आणि बाटल्यांमध्ये भरून घेतलं. आमचा ड्रायव्हर चांगला होता, पण ही गाडी त्याच्या सवयीची नव्हती. त्यामुळे त्याची पाठ दुखत असल्याचं त्याने आदल्या दिवशी सांगितलं होतं. बुधेर गुंफांपर्यंत चारपाच किलोमीटर चढत जावं लागतं. मी जरी आधी एकदा जाऊन आले असले आणि वाट तशी सोपी असली तरी, तरी आपण कुठे चुकणारच नाही, अशी खात्री मला नव्हती. त्यामुळे चक्रधर आणि मार्गदर्शक अशी दुहेरी जबाबदारी त्याच्यावर होती. पाठ दुखत असेल तर तो कसा काय चढणार अशी शंका आम्ही बोलून दाखवल्यावर तो म्हणाला की पाठदुखी आता कमी आहे, त्यामुळे मला चढायला जमेल. फक्त काल रात्री झोप नीट झाली नाही, कारण आमच्या गावात काल बिबट्या आला होता!! आम्ही एकदम ’बापरे!’ केलं, तर म्हणाला की येतो कधीकधी बिबट्या गावात, बकर्‍या वगैरे न्यायला. पण आम्ही हाकलतो. काल रात्रभर ओरडत होता.
त्याचं गाव आमच्या हॉटेलपासून एखाद्या किलोमीटरवरच होतं. आपल्यापासून एवढ्या जवळ काल रात्रभर बिबट्या होता या कल्पनेने आम्हाला भीती वाटलीच आणि काल टायगर फॉल्सला जाताना जंगलातून चालत गेलो नाही ते बरं झालं असाही विचार मनात आला. बिबट्या जरी शक्यतो दिवसा दिसत नसला तरी काय झालं?

रस्त्यात एका ठिकाणी बुरांशच्या फुलांचं झाड जवळ होतं, तेव्हा आम्ही त्याला तीनचार फुलं काढून देण्याची विनंती केली. त्यानेही लगेच कडेच्या दरडीवर चढून फुलं काढून दिली. तजेलदार लालभडक रंगाची ही फुलं छानच दिसतात.

rhododendron.jpg

होता होता बुधेर गुंफांची वाट जिथून सुरू होते, त्या पायथ्याशी पोचलो. हे शेवटचे सहासात किलोमीटर्स जरा कठीणच आहेत. रस्ता अरुंद, वळणावळणांचा आणि खराब. इथेच एका ठिकाणी आम्हाला बर्फ दिसला. ऊन फारसं पडत नाही, अशा जागी साठून राहिलेला होता. खाली उतरून थोडा बर्फ हातात उचलून आणला. मी आणि मुलांनी पहिल्यांदाच असा बर्फ बघितल्यामुळे आम्हाला मजा वाटली. तो ठिसूळ आणि कुरकुरीत होता, पण सहजासहजी वितळत नव्हता.

पायथ्याशी पोचलो तेव्हा अकराचा सुमार होता. आधी वर चढून परत खाली येऊ आणि मग सोबत आणलेलं जेवण जेवू असं ठरवलं. तिथे खाली वन खात्याचं एक विश्रामगृह आहे. बाहेरच्या बाजूला काही काम सुरू होतं. तिथे एक कुत्राही होता. आम्ही चालायला लागलो, तसा तोपण आमच्याबरोबर आला.

dog.JPG

वाटेत अधूनमधून थांबत दीडेक तासात आम्ही वर पोचलो. चढ अगदी सलग असा खूप नाही, पण तसा
बर्‍यापैकी चढ आहे. पण पूर्ण वाट देवदारांच्या जंगलातून जात असल्यामुळे ऊन अजिबात लागत नाही.
वर पोचल्यावर लहानमोठे उंचवटे आहेत, त्यावर सगळीकडे हिरवं गवत आहे. तिथे झाडं अजिबातच नाहीत. त्यातल्याच एका मोठ्या उंचवट्यावर एक देऊळ आहे. त्या देवळाचा एक उत्सव दोन तीन दिवसांनी सुरू होणार होता, त्याची तयारी सुरू होती. ’बिसू’ नावाचा सण आहे असं ड्रायव्हर आणि बाकीच्या माणसांच्या बोलण्यातून कळलं. आसामात ’बिहू’ असतो, केरळमध्ये आणि कर्नाटकात ’विशू’ असतो, तुळू लोकांचाही ’बिसू’च असतो.

budher.JPG

तिथे पोचल्यावर आम्ही बुधेर गुंफा पहायला पुढे गेलो आणि तेवढ्यात आमच्या ड्रायव्हर कम गाईडने एक झोप काढली! गुंफांपर्यंत पोचलो खरे, पण आत जावंसं वाटलं नाही, कारण गुहेच्या तोंडाशी मोठ्या प्रमाणात माश्या उडत होत्या. सकाळी हॉटेलवरही असा सल्ला मिळाला होता की शक्यतो गुहेत जाऊ नका, गेलात तरी सगळ्यांनी एकाच वेळी आत जाऊ नका. या गुहा आतमध्ये बर्‍याच लांबलचक पसरलेल्या आहेत. पण सगळा भाग अजून कुणी फिरून पाहिलेला नाही.

थोडा वेळ सावलीत विश्रांती घेऊन आम्ही खाली उतरायला लागलो. उतरताना अर्थातच भराभर उतरलो आणि लगेचच खाली पोचलो. हात-तोंड धुवून तिथल्या एका शेडमध्ये जेवायला बसलो. डाळ-भात-दही-सॅलड असं छान जेवण होतं. पण भरपूर प्रमाणात माश्या होत्या आजूबाजूला! शेवटी एकदाचं जेवण झालं. वर जाताना जो कुत्रा आमच्या सोबत आला होता, तो वरच थांबला होता. आमचं जेवण होता होता तो एकदम धावत धावत येऊन पोचला. त्यालाही भूक लागली असणारच. उरलेला सगळा डाळभात त्याला एका पानावर वाढला आणि त्याने तो पाच मिनिटांत संपवून टाकलासुद्धा!

आम्हीही मग तिथून निघालो. मागच्या वेळी किकांबरोबर शिबिराला आलो असताना पहिल्या दिवशी ज्या ’कोटी कनासर’ या ठिकाणी गेलो होतो, ते ठिकाण मी यावेळी यादीत घेतलं नव्हतं. पण ती जागा बुधेरपासून जवळ आहे असं सकाळी हॉटेलवर समजलं आणि त्यामुळे तिथेही जायचं ठरवलं. त्याप्रमाणे बुधेरहून कोटी कनासरला पोचलो. तिथे एक खूप जुनं आणि खूप मोठं देवदाराचं झाड आहे. एक शंकराचं लहानसं घुमटीवजा देऊळ आहे. मागच्या वेळी शांत, स्वच्छ असणारी ही जागा, यावेळी मात्र गजबजलेली आणि अस्वच्छ होती! मोकळ्या जागेत क्रिकेटचा खेळ चालू होता. देवळाच्या आणि झाडाच्या आसपास वेफर्स-कुरकुरे आणि तत्सम वस्तूंच्या प्लॅस्टिकच्या पाकिटांचा कचरा पडलेला होता. रस्त्याच्या पलीकडच्या बाजूलाही अगदी डायपर्सपासून विविध प्रकारचा कचरा होता. तीन वर्षांमध्ये एवढा बदल झालेला बघून वाईट वाटलं. तिथे खरं म्हणजे कचरापेट्याही आहेत. तरीही कचरा असा उघड्यावर का टाकून देत असतील लोक? ही नेमकी काय प्रवृत्ती असते माणसाची, जी सुंदर ठिकाणांना कुरूप बनवते? कधी कचरा टाकून, कधी आपापली नावं कोरून.

तिथे मग फार वेळ न थांबता हॉटेलवर परत आलो. चहा वगैरे पिऊन मग नेहमीप्रमाणे खाली रस्त्यावर चालत एक चक्कर मारली. परत आलो तेव्हा व्हर्डिटर फ्लायकॅचर नावाचा अतिशय सुंदर दिसणारा छोटासा निळा पक्षी, खरं तर त्यांची जोडी, बराच वेळ दिसली. दुर्बिणीतून खूप वेळ त्यांना पाहिलं. भरपूर फोटो काढले.

verditer.JPG

काळोख पडता पडता दोन गाड्यांमधून दोन कुटुंबं आली. तेही बंगलोरचेच होते. मूळचे हैदराबादचे. आपण जिथे रहात असतो, तिथल्या माणसांच्या दिसण्याची, वागण्याबोलण्याची आपल्याला सवय झालेली असते. पण त्या त्या ठिकाणच्या माणसांची, स्वतःची अशी वैशिष्ट्यं असतात. सांगायची म्हटली तर कदाचित सांगता येणार नाहीत, पण दिसली की लगेच लक्षात येतात. तसे हे टिपिकल बंगलोरवासी होते. आम्हीही त्यांना तसेच वाटलो, की आमच्यावर अजूनही मराठी छाप जास्त आहे, हे सांगता येणार नाही. ’गाववाले’ भेटल्यामुळे चांगल्या गप्पा झाल्या. दुसर्‍या दिवशी ते बुधेर गुंफा आणि टायगर फॉल्स अशी दोन ठिकाणं करणार होते. आम्ही देवबन आणि खडांबाला जाणार होतो.

हे काही पक्षी

grey_headed_canary_flycatcher.JPG

grey-headed canary flycatcher

Grey_treepie.JPG

टकाचोर

himalayan_bulbul.JPG

हिमालयन बुलबुल

himalayan_vulture.JPG

हिमालयन गिधाड

russet_sparrow.JPG

russet sparrow

streaked_laughingthrush.JPG

streaked laughingthrush

alt="White_throated_fantail.JPG" />

व्हाईट थ्रोटेड फॅनटेल (नाचण)

White_throated_fantail2.JPG

हाही तोच आहे.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle