पडू आजारी

बालपणी माझं एक सिक्रेट दुःख होतं. ते म्हणजे, मी फारच कमी आजारी पडायचे. तेव्हा माझ्या काही मैत्रीणी होत्या. त्या सतत आजारी पडायच्या. त्यांना हमखास वार्षिक परिक्षेच्या वेळी टायफाॅईड, काविळ नाहीतर कांजिण्या होत आणि मग त्या परिक्षा न देताच पुढच्या वर्गात जात. मला तेव्हा त्यांचा फार हेवा वाटायचा. आपल्याला पण कधीतरी वार्षिक परिक्षेआधी असलं दणदणीत आजारपण यावं आणि आपलीही परिक्षा बुडावी असं मला कायम वाटे. पण संपूर्ण शैक्षणिक कालखंडात एकदासुद्धा, अगदी घटक चाचणी परिक्षेलासुद्धा टांग मारता येईलसं आजारपण मला कधीच आलं नाही.

थंडीत इतर मुलं कानाला वारं लागेल म्हणून कान बांधून येत. मला कानाला वारं लागतं म्हणजे काय नक्की होतं असा प्रश्न पडायचा. मुलं उन्हात डोक्यावर टोपी घालत, पावसात पण शक्यतो भिजायचं टाळत. पण हे असं कान, डोकं वगैरे न बांधताही थंडी, उन्हाळा आणि पावसाळ्यानं माझं कधीच काही वाकडं केलं नाही. खेळताना कधी खरचटलं किंवा रक्त आलं तर तिथंच टणटणीच्या पाल्याचा रस लावायचो जखमेवर. कधी बरं झालं ते समजायचंही नाही.

खाण्यापिण्यानंही आम्हाला कधी सतावलं नाही. उष्ण, थंड, गरम, गार, पित्त, कफ, वात वगैरे सगळं पब्लीक गुण्यागोविंदानं रहायचं. आम्ही कशावरही काहीही खायचो. झाडावरच्या चिंचा,बोरं, कै-या, वगैरे दगडानं मातीत पाडून मग त्यावरची धूळ बाजूला करून बिनधास्त खायचो. त्यावर कुठेही, जे मिळेल ते पाणी ढसाढसा पिऊनही कधी घसा बसलाय वगैरे आठवत नाही. हाॅटेलचं खाणंच माहीत नव्हतं त्यामुळे इम्युनिटी कशाशी खातात हेही माहीत नव्हतं.

थोडक्यात काय तर भगवंतानी चांगलं टणटणीत माॅडेल बनवून खाली पाठवलं होतं आणि त्यावेळी त्याचंच वाईट वाटायचं. कधी आईवडील खूप रागावले, ओरडले, तर मग त्यांना धडा शिकवण्यासाठी तरी आपल्याला खूप मोठ्ठं आजारपण यावं असं वाटायचं. पण तेव्हा तसं काही व्हायचं नाही. बरं तर बरं, कधी हाड मोडलं नाही की टाॅन्सिल्स पण वाढले नाहीत. इतर मित्रमैत्रीणींचं टाॅन्सिल्सचं ऑपरेशन झालं की ते चैनीत, समोर बसून, कायद्यात, मस्त दोनदोन दिवस आईसक्रीम चापायचे आम्ही फक्त बघायचो.

आणि मग अशी खूप वाट पाहिल्यावर, कधीतरी, साधारणपणे पावसाळा सुरू झाला की थोड्या दिवसांनी एके दिवशी शाळेतून घरी येता येताच अंगात कणकण, नाकात सूं सूं... घशात खवखव आणि मग एकापाठोपाठ दणदणाटी "ह्हाक्क्क्छ्छी"....नं थंडीतापाची चाहूल लागे. आम्हाला एरवी चहाकाॅफी प्यायची मुभा नव्हती, पण अशा वेळी आलं आणि गवती चहा घातलेला चहा औषध म्हणून, बरोबर त्रिभुवन किर्तीची एक गोळी आणि रुमालावर निलगिरी तेलाचे दोन थेंब असा जामानिमा करून रात्री जरा लवकरच झोपायची सोय केली जाई.

दुस-या दिवशी सकाळी उशीरा जाग यायची आणि जाणवायचं की, अरे, आज आपण एकटेच झोपलोय अजून. बाकी जग चालूच दिसतंय. भावंडं शाळेची तयारी करतायत्, बाबा ऑफीसला चाललेत. चला, म्हणजे आज आपण एकटेच घरी. आज सुट्टी म्हणून खूप आनंद होई.

मग जाणीव होई ती आंबट आंबट डोळे, गरमगरम तळपाय, दुखणारं अंग आणि घसा... क्षीण झालेला आवाज, धो-धो सर्दी आणि सटासट शिंका...येस्स्स!!! आपण आजारी पडलोय :)

आणि मग अचानक बाबांच्या थंड हाताचा गार चटका कपाळावर आणि गळ्यावर जाणवे. त्यांचा हात इतका कसा कसा गार? ओह्,,, आपल्याला ताप आलाय. आणि मग मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागत. ताप मोजला जाई. ताप एकशेएकच्या वर असला की मला फार आनंद होई आणि तो अजिबात उतरू नये अशी मी देवाची करुणा भाकत असे.

आमच्याकडे पेशंटचा ताप शंभर असेल तर त्याला व्हीआयपी आणि एकशे एकच्या पुढे असेल तर एकदम व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट असे. डाॅक्टरांचं औषध आणलं जाई. आंघोळीची सक्ती नसे. नुसतं स्पंजिंग करून कपडे बदलले तरी चाले. तोंडाला चव यावी म्हणून फळं, मनुका, खडीसाखर, श्रीखंडाच्या गोळ्या (फक्त आजा-यासाठी) आणल्या जात. सुंठवडा, आलेपाक, पाचक वगैरे गोष्टी पण तयार केल्या जात. चमचा, वाटी, पाणी किंवा लागणारी इतर कुठलीही वस्तू मागितली की लगेच हाताशी मिळे. न आवडणारा पदार्थ "नको" असं आईला सांगायची परमिशन असे. त्यावर "बरं, मग शिरा करू का थोडा" वगैरे विचारलं जाई. दुपारी मऊ गुरगुट्या भात, मेतकूट तूप किंवा उकड वगैरे मऊमऊ आणि गुलगुलीत काहीतरी खायला मिळे. काहीच खावंसं मात्र तेव्हा वाटत नसे.

बाहेर पावसाचा आणि चिखलाचा रपरपाट चालू असताना आणि इतर सगळे जण शाळेत आणि कामाला गेले असताना आपण मात्र मऊमऊ पांघरूणात गुरफटून दिवसभर झोप घेतोय ह्याचा आनंद दिवसभर होत राही. ते तापाचं फिलींग पांघरुणात गुंडाळून, आजूबाजूचे आवाज ऐकत शांत पडून रहाणं छान वाटे.

संध्याकाळी बाबा घरी आले की परत एकदा ताप बघत. आवडीचं पुस्तक वाचून दाखवत किंवा आवडीची गोष्ट सांगत. आग्रहानं रव्याची किंवा साबुदाण्याची लापशी करून खायला लावत. कंटाळवाण्या तिन्ही सांजेला त्यांनी करून दिलेल्या त्या लापशीची चव आजही माझ्या जिभेवर आहे. आमच्या घरी ही खीर तेच बनवत. त्यांच्या मर्यादीत पाककौशल्याचा संपूर्ण कस लावून केलेली ती लापशी असे. त्यात वेलदोडा किंवा सुकामेवाही नसे. फक्त दूधसाखर आणि रवा किंवा साबुदाणा घालून केलेली ती लापशी खाल्ली की खूप तरतरी वाटे आणि मग त्यांच्याशी गप्पा मारता मारता दिवसभराचा आजारानं आलेला शीण आणि मलूलपणा हळूहळू कमी होत जाई....जेमतेम एकदोन दिवस टिकणारं हे आजारपण फार हवंहवंसं वाटे तेव्हा.

बघता बघता बालपण सरलं. संसार सुरू झाला, आता तर पिल्लं मोठी होऊन आपापल्या घरट्यांत गेली सुद्धा. ताप येणं हे दुरापास्त नाही आता. जीवनशैलीचे आजार जडले. वडील हयात नाहीत आता. आईचंही वय झालं. वडीलधारे नसले की लहानपण सरतंच. ..आता....आपणच आपल्याला सांभाळावं लागतं.

अशातच, गोधडीमधे गुंडाळलेल्या एका गरमागरम संध्याकाळी, अचानकच...कपाळाला, गळ्याला परत एक गार चटका बसतो. तो मुलीच्या मऊ हाताचा स्पर्श. थर्मामिटर लावला/काढला जातोय. स्वैपाकघरातून गरमगरम वरणभाताचा सुगंध येतोय. डोळे किलकिले करून मी पहातेय. माझ्या शेजारी औषधांबरोबरच आवळासुपारी, आलेपाक, फळं ठेवलेली दिसतायत......मुलीची लगबग चालू आहे. घरातली आवराआवर चाललीये. आईची काळजी घ्यायला आता, मुलगी घरी आली आहे.

मी परत एकदा तशीच लहान होते आणि ताप उतरूच नये अशी देवाकडे प्रार्थना करायला लागते. :)

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle