इको फ्रेंडली गणपतीची मुर्ती

हा लेख मागच्या वर्षीच लिहायचा होता, घरचा गणपती धाग्यावर मी लिहिलं होतं की कॉर्न स्टार्च आणि मीठ वापरून आम्ही घरीच मूर्ती घडवली. त्याबद्दल अजून सांग असं धारा म्हणाली होती, तर आता यावर्षी गौरी गणपती बसतील त्या आधी लिहुयात म्हणून आज मुहूर्त लागला.

मागच्या वर्षी पासून, आणि पहिल्यांदाच आम्ही इकडे, म्हणजे जर्मनीत गणपती आणि गौरी बसवणार असं ठरलं. करोना मुळे सगळी अनिश्चितता होती. साबा गौरींचे फक्त मुखवटे घेऊन येणार होत्या, गणपती आम्ही इकडेच शोधू असं ठरवलं. काही ग्रुप्स वर इथलेच काही मराठी लोक, जे आर्टिस्ट आहेत तेही करून देतात मूर्ती असं कळलं, पण आम्ही चौकशी करे पर्यंत उशीर झाला होता. एक मैत्रीण नेहमीच घरी करते मूर्ती, तिने काही अ‍ॅमेझॉन वरच्या क्ले साठी लिंक्स पाठवल्या आणि शिवाय एक लिंक पाठवली, ज्यात घरीच क्ले करता येईल. मग त्याप्रमाणे घरीच क्ले बनवून आम्ही (मुख्य नवरा) इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती घरीच केली. पहिलाच प्रयत्न होता पण चांगला जमला.

क्ले बनवण्याची माहिती या लिंक वर आहे - https://www.coffeecupsandcrayons.com/cornstarch-salt-clay/

कॉर्न स्टार्च आणि मीठ यांचं प्रमाण जसंच्या तसं घेतलं लिंक प्रमाणे. हे कसं जमेल असा प्रश्न सुरुवातीला पडला, कारण एवढं मीठ म्हणजे हे टेक्स्चर कसं असेल, मूर्ती कशी घडेल त्यातून असं वाटत होतं, पण नीट वळवता येत होती हवी तशी. आम्ही ओल्या फडक्याने झाकून ठेवत होतो सतत खूप कोरडी पडू नये म्हणून. पूर्ण मूर्ती झाल्यावरही, जसा वेळ जाईल आणि पूर्ण वाळेल, मग कुठे क्रॅक जातील का अशी भीती होती. पण तसंही झालं नाही. आम्ही अगदी दोन दिवस आधी मूर्ती घडवली, गौरींसोबत विसर्जन केलं त्यादिवशी पर्यांत जशीच्या तशीच होती.

आणि मूर्ती साठी तसे बरेच व्हिडिओ पाहिले, यूट्यूब सर्च वर जे आले ते बरेच बघून मग ही एक मूर्ती घडली.

ही आमची मूर्ती -

Ganesh1.jpg

रंग कोणते द्यायचे असा विचार केला, तेव्हा आधी मूर्ती जमायला हवी मग बघू म्हणून. पण ही मूर्तीच इतकी छान वाटली, की वेगळे रंग दिले नाही. यावर्षी नॅचरल रंग थोडे वापरू असं आत्ता डोक्यात आहे.
मोहरीचे दाणे डोळे म्हणून वापरले.

आसन बनवले ते खोक्यांचे आणि टिश्यू पेपर च्या रोलचे. एक खोका आणि त्या मागे एक जाड पुठ्ठा असं सगळं लाल रंगाचा कागद घेऊन त्यावर चिकटवलं. आणि शेजारी लोड म्हणून टिश्यू पेपर चे उरलेले रोल घेऊन, योग्य साईज मध्ये कापून त्यावर पुन्हा लाल रंगाचा कागद लावला. सोनेरी चिकटपट्टी घेऊन थोडं डेकोरेशन करायचं होतं पण ते घाईत जमलं नाही, म्हणून फक्त एक बॉर्डर केली. यात अजून बरंच काही करता येईल, हे कमी वेळेत जमणारं आणि सोपं होतं.

Ganesh2.jpg

घरीच बादलीत विसर्जन केलं आणि ते पाणी झाडांना दिलं, मुख्य मीठ असल्यामुळे लगेच सगळं विरघळलं पाण्यात.
पूर्ण पर्यावरण पूरक मुर्ती आणि तीही घरीच घडवल्याचा आनंद जास्त होता.

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle