लडाख भटकन्ती - मे २०२२ :::: दिवस १- २३ मे २०२२ ::: आराम आणि acclimatization

दिवस १- २३ मे २०२२ ::: आराम आणि acclimatization

राहण्याची जागा - हॉटेल पद्मा, लडाख - http://padmaladakh.com/

एकोणीस मे ला सुरभिची बोर्डाची परीक्षा संपली आणि ती उंडारायला मोकळी झाली.. मला आणि अमितला मात्र 21 22 मे ला पूर्ण दिवस काम होतं- त्यामुळे काम करता करता त्यातल्या त्यात बॅगा भरल्या आणि 22 तारखेला रात्री निघायला तयार झालो...
23 तारखेला सकाळी चारची फ्लाईट असल्यामुळे खरं म्हणजे थोडा वैतागच आला होता पण दुसऱ्या दिवशी लिहायला फक्त आरामच करू अशी मनाची समजूत घातली आणि रात्री साडेअकरा बारा वाजता घरातून निघालो...
फ्लाईट वेळेवर होती... किंबहुना वेळेच्या थोडी आधीच निघाली - दिवसभर झालेलं काम आणि रात्री अजिबात न झालेली झोप यामुळे फ्लाईट मध्ये आम्हाला गाढ झोप लागली ... तसंही मला डोळे मिटले की झोप लागते त्यामुळे झोपेचा प्रश्न कधी नसतो.
साधारण सहा वाजता जाग आली तर विमानातून असा सुंदर नजारा दिसत होता... थोडेसे फोटो विमानाच्या खिडकीतून काढण्याचा मोह आवरला नाहीच

23 May -ViewFromPlane-1.jpg

विमानातून दिसणारे काळे करडे डोंगर पाहून आपण हिमालयाची ओळख जीवाला पटली

23 May -ViewFromPlane-0.jpg

23 May-ViewFromPlane-2.jpg

विमान जसं उतरायला लागलं तसं करड्या रुक्ष डोंगरात मध्येच हिरवळ पाहून डोळे शांत झाले

23 May -ViewFromPlane-3.jpg

विमान लेहला उतरलं तेव्हा पूर्ण उजाडलं होतं - या छोट्याशा विमानतळावर सध्या बरच बांधकाम चालू आहे हळूहळू इंटरनॅशनल फ्लाईटही सुरू होतील असं लोक म्हणत होती
फ्लाईट वेळेत आली तरी सामान यायला मात्र बराच वेळ लागला - आमचं सगळं सामान आलं. मुंबईपासून आमच्याबरोबर आलेल्या जोडप्याने त्यांची मेमरी बँक चेकइन केलेल्या बागेत टाकली होती. मेमरी बँक चेकिंग बॅगेत टाकायला परवानगी नसल्यामुळे एअरलाइन ने त्यांच्या बॅगा मुंबईतच ठेवल्या होत्या. नशिबाने त्यांच्या ग्रुपमध्ये कोणीतरी दुसऱ्या दिवशी येणार होतं आणि त्यांच्याबरोबर त्या बॅगा येतील अशी सोय शेवटी झाली
या लोकांनी एवढी मोठी चूक कशी केली असा प्रश्न मला आज सुद्धा पडतो कारण दरवेळेला बॅग चेक इन करताना "मेमरी बँक नाहीये ना या बॅगेत?" असा प्रश्न चेकिंग एजंट आवर्जून विचारतात.एवढं सगळं होईपर्यंत आम्ही आमच्या बॅगा कलेक्ट केल्या आणि बाहेर पडलो.

बाहेर जरासा गारवा होता पण अजिबात थंडी नव्हती त्यामुळे हुश्श करत आम्ही गेट कडे निघालो तेवढ्यात आमचं नाव असलेली पाटी घेतलेला एक माणूस आम्हाला दिसला.आम्ही नको नको म्हणत असताना सुद्धा आमच्या मोठ्या बॅगा त्याने घेतल्या आणि झपाझप पुढे निघाला... आम्ही आपले आमच्या छोट्या छोट्या बॅगा घेऊन निघालो... पार्क केलेल्या गाडीपर्यंत जाताना एक चिमुकला चढ लागला... आणि आपण मुंबईत नाही इथे हवा विरळ आहे याची पटकन आठवण झाली ..अगदी धाप लागली नाही पण आम्हाला चढताना त्रास जाणवत होता...

ड्रायव्हर बरोबर गप्पा मारत मारत हॉटेलपर्यंत पोहोचलो उतरून आम्ही बॅगा काढायला घेणार तेवढा ड्रायव्हरने सांगितलं की सध्या तुम्ही बॅगा उचलू नका दम लागेल.एवढ्या वेळात हॉटेल मधली मुलं बॅग घ्यायला आली होतीच.

अतिशय संथ गतीने चेक इंन ची प्रक्रिया आटपली तोपर्यंत आम्हाला भुका लागल्या होत्या त्यामुळे रूममध्ये वर जाण्याच्या आधी नाश्ता करून मगच जाऊ असे ठरवलं.ठीकठाक नाश्ता होता भरपूर खाल्ल्यानंतर डोळ्यावर अगदी पेंग यायला लागली होती तेव्हा पटकन रूम मध्ये गेलो
रूम आणि बाहेरचा व्ह्यू आवडला आणि हॉटेलची निवड आवडली म्हणून स्वतःच कौतुक करत तिघेही झोपी गेलो

23 May -HotelPadmaRoom.jpg

23 May -View From HotelPadma-2.jpg

23 May -ViewFromPlane-0.jpg

उठल्यानंतर आमच्या एजंटला फोन केला तर त्याने आपण बाजारपेठेतच भेटू जरा थोडा दहा मिनिटं चालत या त्यामुळे तुम्हाला इथल्या हवेचा त्रास होतोय का तेही कळेल असं सांगितलं.
त्याने दिलेल्या दिशे बरहुकूम चालत चालत आम्ही निघालो खरे पण चढावर आपल्यालाच त्रास होतोय हे मात्र जाणवत होतं. धाप बीप काही कोणाला लागत नव्हती ही त्यातली जमेची बाजू.लेहच्या बाजारपेठेत पोहोचल्यानंतर गरम गरम फ्राईज आणि त्याबरोबर चॉकलेट मिल्कशेक असा नाश्ता केल्यावर जीव सुखावला आणि मग एक फेरफटका मारायला बाहेर पडलो - अगदी टिपिकल हिल स्टेशनला असणारा मॉल रोड पाहून जरा गंमतच वाटली

23 May -Leh Market.jpg

23 May -Leh Market.jpg

ज्यांना शॉपिंग करायला आवडतं त्यांच्यासाठी इथे बरीच संधी आहे - मात्र शॉपिंग या विषयात रस नसल्याने आम्ही फक्त फेर फटका मारला. एव्हना पुन्हा दमयला झालं होतं त्यामुळे आमचा मोर्चा रूम कडे परत वळवला…
परतताना कापूर / थोडी गोळ्या चॉकलेटं बिस्किटं असा खाऊ / पिण्या पाण्याच्या बाटल्यांचा क्रेट अशी पुढच्या आठ दहा दिवसांसाठी बेगमी केली आणि पुढच्या ट्रीपची स्वप्न बघत गुडूप झोपलो

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle