पणजीआज्जीच्या रेसिपीज - तिखटामिठाचा सांजा, पिवळा सांजा, जनसेवा स्टाईल

पुणेकरांमधे अतिप्रिय. जनसेवात मिळायचा हा सांजा, तेव्हा चवीढवीचे जे. ना येऊन मजेत खाताना दिसायचे. दुर्दैवाने जनसेवा आता बंद झाले.

पण आमच्या आज्जींची व त्यांची चव अगदी सेम.

साधारणत: खूप मोठ्या पावसाच्या आळशी संध्याकाळी,आजारी व तोंडाला चव नसलेल्या नातवंडांना खाउ घालायचा पदार्थ. अतिशय कमी सामानात चविष्ट व पटकन होणारा पदार्थ.

साहित्य -
बाआआआ री इ इ इ क रवा १ वाटी, हो, त्याशिवाय हवा तस्स्सा रेशमी पोत येत नाही सांज्याला.
कढिपत्ता - ताजा १ टाळं- हिरवी पाने असलेला. काळी पाने नकोतच.
कोथिंबीर - मूठभर- हिरवी गाआआर हवी शक्यतो.
गोडं तेल
मोहोरी, घरचा हिंग, हळद,
सुके खोबरे किसणीवर किसलेले - जरास्से वरून शिवरायला
लिंबू १-२
किसलेले आले १ चमचा
जिरं, १ हिरवी तिखट मिरची
उगीच आपला नावाला - घातला न घातला असं - तीळ व ओवा ( चिमूट-चिमूट)
उकळलेले पाणी - ३ वाट्या.
साजूक तूप - १ मोठा चमचा.

हा पण लोखंडी कढईतच करायचा.
ला आआआ ल भाजलेला रवा घ्यायचा. तो असतोच घरी कायम. भाजलेला असला तरीही कढईत जरा गरम होउ द्यायचा.

तोवर बारीइइइक चिरलेली तिखट हि. मिरची व मिठ पोळपाटावर तर कढिपत्ता हातानेच चुरून घ्यायचा. तीळ व ओवाही लाटण्यानं जरास्से दुखवून घ्यायचे. पदार्थ जरा जुना असला ना, तरी असं केल्यानं त्याची अंगची चव जरा सुधारते.

एकीकडे दुसर्‍या गॅसवर ३ वाट्या पाणी उकळायला ठेवायचं

मग तेलाची फोडणी करायची. मोहोरी व थोडे जिरे, अर्धा चमचा हिंग, तीळ व ओवा असे घालून फोडणी करायची. हळद फार नाही घालायची. जर्द पिवळ्या रंगाचा सांजा चांगला दिसत नाही. हळद जरा बेतानंच घालायची, कढीपत्ता, आलं, मिरची तेही फोडणीत जरा चरचरीत होईतो परतायचे व वरून फोडणीत २ वाट्या गरम पाणी घालायचं. चांगलं खळखळून उकळलं की मग साखर व मिठ जरा चढंच घालायचं. पाण्याची चव बघायची. आणि मग एका कड असलेल्या पातेल्यात रवा भरून एका धारेत एका हातानं रवा फोडणीतल्या उकळत्या पाण्यात ओतायचा व दुसर्या हाताने ढवळायचं. आयत्या वेळेस सांजा कोरडा वाटला तर अजून थोडं गरम पाणी घालायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. ३-४ मिनिटांनी एक दणदणीत वाफ आली की झाकण काढून त्यात एक चमचाभर तूप घालायचे ( वरून तूप घातले की पदार्थ चमकतो), १ आख्खे लिंबू पिळायचे व लगेचच गॅस बंद करून सांजा दूसर्‍या वाढायच्या पातेल्यात काढून ठेवायचा. लिंबाने लोखंडातला पदार्थ कळकतो त्यामुळे ही काळजी घ्यायची. मग सांज्यावर कोथिंबीर व किसलेले खोबरे शिवरायचे. बरोबर खायला मिरगुंडं तळून द्यायची.

आंबट, गोड, तिखट व मिठ ह्या सर्व चवी बरोब्बर साधल्या की हे अद्भुत रसायन तयार होते.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle