मशरुम्स विथ गार्लिक सॉस/डिप (Champignons mit Knoblauchsoße - Sautéed Mushrooms with Garlic Sauce)

जर्मनीतल्या ख्रिसमस मार्केट्स मध्ये मिळणारा चटपटीत असा हा खाद्यप्रकार. खरंतर गावागावात वर्षभर असे अनेक मार्केट्स लागतातच, वसंत ऋतूची सुरुवात म्हणून, उन्हाळ्यात तर अगदी रेलचेल असते, पुन्हा ऑक्टोबर मध्ये पानगळीच्या दरम्यान आणि मग शेवटी ख्रिसमस मार्केट्स. इतर वेळी बहुतांशी फक्त विकेंडला, सुट्टी दरम्यान ही मार्केट्स असतात. पण ख्रिसमस मार्केट्स नोव्हेंबरच्या शेवटी चालू होतात आणि २२-२३ डिसेंबर पर्यंत असतात. स्थानिक तर असतातच, अनेक पर्यटक सुद्धा खास ख्रिसमस मार्केट्स बघायला येतात. या मार्केट्स मध्ये हमखास एक स्टॉल तरी या मशरुम्सचा असतोच. एका भल्या मोठ्या पॅन मध्ये हे मशरुम्स शिजत असतात. कडाक्याच्या थंडीत हे मशरुम्स, सोबतीला ब्रेड आणि ग्लुवाईन. याचे मूळ जर्मन नाव Champignons mit Knoblauchsoße. Champignons म्हणजे मश्रुम्स आणि Knoblauchsoße म्हणजे लसूण, दही, क्रीम यापासून केलेला एक डिपचा प्रकार. विविध ठिकाणी बघून कसे करतात याचा अंदाज आला होता. आंतरजालावर अजून थोडी शोधाशोध केली. त्यावरून मी केलेली पाककृती येथे देत आहे. यात तुम्ही आवडीनुसार थोडे बदलही करू शकता.


साहित्य -

५०० ग्रॅम मशरुम्स (शक्यतो लहान आकाराचे घेतले तर जास्त चांगले)
१ मध्यम आकाराचा कांदा चिरून
२-३ टेबलस्पून तेल (शक्यतोवर ऑलिव्ह ऑइल)
चवीपुरते मीठ
मिरपूड
धणे जिरे पूड अर्धा चमचा
Chives - आणि ते नसल्यास कोथिंबीर

गार्लिक सॉस/डिप साठी
४-६ मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या (आवडीनुसार कमी जास्त)
१/३ वाटी घट्ट दही/योगर्ट
१/३ Crème fraîche / सावर क्रीम
सुकवलेली शेपू/पुदिना किंवा तत्सम हर्ब्ज
चवीपुरते मीठ
मिरपूड
अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल

कृती -

गार्लिक सॉस विकत मिळाल्यास ते थोड्या दह्यात मिसळून किंवा तसेच वापरू शकता. अन्यथा हे खालीलप्रमाणे घरी करू शकतो.

१/३ वाटी घट्ट दही, १/३ Crème fraîche / सावर क्रीम (Sour Cream) एकत्र करून घ्या. यात चवीपुरते मीठ मिरपूड घाला. लसूण पाकळ्या बारीक क्रश करून घाला. सुकवलेली शेपू/पुदिना किंवा तत्सम हर्ब्ज घाला. अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल पण घाला. सर्व मिसळून घ्या. गार्लिक सॉस तयार आहे.

मशरुम्स धुवून देठ काढून घ्या. मोठे मश्रुम्स असतील तर अर्धे तुकडे करू शकता.

एका पसरट भांड्यात तेल गरम करा. तेल गरम झाले की त्यात कांदा घाला. कांदा ब्राउन होत आला की मग मीठ आणि मिरपूड आणि मग मश्रुम्स घाला. दहा मिनिटे मश्रुम्स ब्राऊन रंगावर परता. मश्रुम्स तसे पटकन शिजतात पण त्या दुकानांमध्ये सतत ते आचेवर असतात आणि त्याची चव आवडली म्हणून जरा जास्त शिजवलेले चालतील, . बारीक चिरलेली Chives किंवा कोथिंबीर घाला. सगळे एकत्र करून २ मिनिटे परता.

गरमागरम मशरुम्स प्लेटमध्ये काढून त्यावर गार्लिक सॉस घाला.

सुरुवातीला केलेल्या पाककृतीपेक्षा आता काही बदल केलेत, नेटवर याच्या पाककृती शोधताना त्यात कुणी लाल तिखट तर कुणी गरम मसाला सुद्धा घातला होता. ते सगळे प्रयोग करून आता जी चव जास्त आवडली ती ही पाककृती.

आवडीच्या ब्रेड सोबत सर्व्ह करू शकता. ब्रेडच हवेत असंही काही नाही. खान्देशी पद्धतीची खिचडी, एखादं सलाड, हे मशरुम्स आणि गार्लिक सॉस असंही कॉम्बिनेशन भारीच लागतं. नुसते स्टार्टर्स म्हणूनही छान लागतात. आवडत असल्यास आणि ख्रिसमस मार्केटचा फील हवा असल्यास सोबत वाफाळती ग्लुवाईन घेऊ शकता. 

Guten Appetit!
 
फोटो काही जुनेच आहेत, एक अगदी काल काढलेला आहे.

1

2

3

पाककृती प्रकार: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle