ग्लेनबर्न टी-इस्टेट, दार्जिलिंग : एक आगळावेगळा अनुभव

जरा कल्पना करा...

एका दीडशे वर्ष जुन्या पण अजूनही ती शान तशीच राखलेल्या ब्रिटिशकालीन बंगल्याच्या व्हरांड्यात बसून तुम्ही साग्रसंगीत चहा पित आहात. खानसाम्यानं तुमच्यासमोर आणून ठेवलीय टीकोजीनं झाकलेली किटली, नाजूक नक्षीदार कपबशा, पेस्ट्रीज आणि गरम स्नॅक्स...

किंवा

व्हरांड्यासमोरच्या काळजीपूर्वक राखलेल्या बागेत सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून तुम्ही गरमागरम आलूपराठे खात आहात...

किंवा

मस्त गार वार्‍यावर डुलणार्‍या पपनसांच्या झाडाखाली तुमचं दुपारचं जेवण सुरू आहे. फाईव्ह कोर्स लंच! ते ही तुम्हाला आदबीनं आणून सर्व्ह केलं जातंय. त्यातल्या सॅलडमध्ये आजूबाजूच्या बागेतली हर्ब्ज आणि नॅस्टरशियमची पिवळी, केशरी नाजूक फुलं त्यात सजली आहेत.

किंवा

खळखळ वाहणार्‍या नदीच्या शेजारी झाडाखाली टेबल-खुर्च्या मांडून तुमच्या फर्माईशीनुसार बनवलेल्या जेवणाचा तुम्ही स्वाद घेत आहात.

किंवा

समोर पसरलेली दरी आणि त्यातील उतरंडीवरील चहाचे मळे बघताना भर दुपारी तुमचं मन
बर्फ़ीली सर्दियों में किसी भी पहाड़ पर
वादी में गूँजती हुई खामोशियाँ सुनें
आँखों में भीगे-भीगे लम्हें लिये हुए
च्या जादुई शब्दांवर आणि अगदी तश्श्याच प्रत्यक्षात समोर दिसणार्‍या जादुई वादीमध्ये तरंगत राहिलंय.

किंवा

संध्याकाळी सूर्य मावळताना, त्या दरीतल्या वस्त्यांमधले आवाज, खमंग वास, दाटून येत असलेलं धुकं आणि संध्याकाळची हुरहुर मनात आत आत साठवत तुम्ही एका वेगळ्या मनस्वी जगात खोल, अगदी आतवर जात राहिला आहात....

आणि हे सगळं होत आहे समोरच दिसणार्‍या कांचनजंगाच्या साक्षीनं!!!

************************************************************************************************************

नाही, नाही, मी काही कादंबरी लिहीत नाहीये. याची देही याची डोळा घेतलेले अनुभव आहेत हे - दार्जिलिंगच्या ग्लेनबर्न टी-इस्टेटवर. एक आगळा वेगळा luxurious colonial experience!

दार्जिलिंग मध्ये अनेक प्रसिध्द टी-इस्टेट्स आहेत. त्यातल्या काही टी-इस्टेट्स वर आपल्याला जाऊन राहता येते . यापैकी ग्लेनबर्न टी-इस्टेटचे नाव आम्ही आमच्या काही मित्रमैत्रिणींकडून ऐकले होते. त्यातून आमचे भटकंती बायबल - www.tripadvisor.com - वरही या टी-इस्टेटचे छान रिव्हूज वाचून आम्ही हीच निवडली. २०१३च्या दिवाळीत दार्जिलिंग-सिक्कीम भेटीत दोन रात्री इथे राहून आलो. त्या तीन दिवसांत नितांत सुंदर, अविस्मरणीय आठवणी गाठोड्यात बांधून घेऊन आलो. गाठोडं अगदी जपून ठेवलंय मी मनाच्या एका नक्षीदार कप्प्यात!

...इतर कोणत्याही टी-इ प्रमाणेच ग्लेनबर्न ही देखिल एक जगड्व्याळ परिसंस्था आहे. १८५९ मध्ये चहाच्या एका स्कॉटिश कंपनीने ग्लेनबर्न टी-इस्टेट सुरू केली. नंतर अनेक वर्षांनी चहाच्या मळ्यांच्या धंद्यात असणार्‍या कलकत्त्याच्या एका भारतीय कुटुंबाने ही इस्टेट विकत घेतली. आज याच कुटुंबातील तिसरी आणि चौथी पिढी या चहामळ्याचा कारभार बघते.

२००२ मध्ये या घराण्यातील नविन सुनेने ही इस्टेट पहिल्यांदा पाहिली आणि तिच्या कल्पने नुसार जुन्या ब्रिटिशकालीन बंगल्याचे - बडा बंगला ( The Burra Bungalow) - पुनरुज्जीवन करण्यात आले आणि टी-इस्टेटवरील एक बुटीक हॉटेल जन्माला आले. टेकडीच्या शिखरावर वसलेल्या या देखण्या बंगल्याचे वर्णन कितीही केले तरी त्याची पूर्ण कल्पना येणं शक्य नाही. हे फोटोच थोडीफार ओळख करून देतील...

दर्शनी भाग

व्हरांडा

व्हरांड्यातील बैठक

पुढे २००८ मध्ये जरा खालच्या बाजूला अजून एक बंगला बांधण्यात आला - वॉटर लिली. हा नविन बंगला इतक्या चतुराईनं बांधला आहे की तोही जुन्या काळातला वाटावा.

बरा बंगलो मधून वॉटर लिली आणि दरी

मूळ बंगल्यातील ५ आणि नविन बंगल्यातील ४ अशा नऊ खोल्या आता उपलब्ध आहेत. प्रत्येक खोली अत्यंत सुंदर आणि वेगळी थीम, रंगसंगती घेऊन सजवली आहे. 'गुड अर्थ' नावाचा एक महागड्या पण अत्यंत देखण्या गृहसजावटीच्या वस्तू आणि अपहोल्स्ट्री आणि इतर तत्सम वस्तूंचा एक ब्रँड आहे. त्याचं फर्निचर, पडदे, गादीवरील चादरी, उश्यांची कव्हर्स, फ्रेम्स वगैरे निवडून अत्यंत रसिकतेने नटवलेल्या खोल्या बघून प्रेमात पडायला नाही झालं तर नवल.

किचनमध्ये किती किती त्या कितील्या!

आमची रुम ही बरा बंगलो मधील फायरप्लेस असलेल्या दोन रुम्सपैकी एक होती. लेकीच्या आग्रहाखातर आम्ही दोन्ही रात्री खोली गरम करण्यासाठी शेकोटी पेटवून घेतलीच. एका बाजूला कॉमन व्हरांडा आणि दुसर्‍या बाजूला एक छोटीशी पण सुबक, गोलाकार मॉर्निंगरुम. तिच्यातून बाहेर पडून बागेत जाता येईल अशी सोय. खोल्यांना कपाटांना कुलुपं वगैरे नाहीत. सगळं तुमचंच मग कुलुपांची काय गरज!

फायरप्लेस आणि अँटिक कपाट

रुममध्ये साग्रसंगित चहा

मॉर्निंग रुम

पलिकडे, सकाळच्या उन्हानं भरून वाहिलेली
<

व्हरांड्यातील आमच्या खोलीसमोरची बैठक

दारातून मांजरं येताहेत आणि जाताहेत. हक्कानं त्यांना हवं तिथे डुलकी घेताहेत. त्यांचंही आहेच ना हे सगळं!

आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचे वर्णन तरी काय करावे. टिव्हीला मज्जाव असल्याने एक वेगळीच नीरव शांतता आणि दूरवरून येणारे पक्ष्यांचे, माणसांचे आवाज, हिरवेगार चहामळे, भटकण्यासाठी छोट्या छोट्या पायवाटा. इस्टेटीतून वाहणार्‍या दोन नद्या - रंगीत नदी आणि रंग्डंग नदी. स्वर्गसुखच केवळ.

पायी भटकंती करताना घेतलेले फोटो

झेंडूची फुले आणि संत्र्याची झाडे

आणि या सगळ्यापेक्षाही आपला अनुभव दशांगुळे वर नेऊन ठेवणारं दृश्य म्हणजे या इस्टेटीला लाभलेली कांचनजंगाची पार्श्वभूमी. जाता येता सतत समोर दिसणारा, ढ्गांमागे लपून आपल्याशी लपाछपी खेळणारा, दिवसाभरात विविध विभ्रम दाखवणारा कांचनजंगा पर्वत किती बघू आणि किती नको असं झालं.

सुर्योदयामध्ये कांचनजंगा पाहण्यासाठी पहाटेपासून फिल्डिंग लावून बसलो

पहिल्या किरणांचा स्पर्श

सकाळच्या उन्हात न्हाऊन निघालेला कांचनजंगा आणि दरीतलं धुकं

भर दुपारी

संध्याकाळी

जश्या मालकांच्या अनेक पिढ्या इथे आहेत तश्याच मळ्यात काम करणार्‍या कुटुंबांच्याही अनेक पिढ्या इथे नांदल्या आहेत. इस्टेटीच्या हजारएक एकर्सच्या जागेत अनेक छोट्या छोट्या वस्त्या आहेत, शाळा आहेत, हॉस्पिटल आहे, मैदानं आहेत आणि मैदानात अत्यंत आवडीनं फुटबॉल खेळणारी उत्साही मुलं आहेत. या आडजागी त्यांना वाहतुकीचे साधन म्हणजे इस्टेटीच्या गाड्या, अथवा स्वतःच्या मोटरसायकली अथवा दिवसातून एकदा येणारी प्रायव्हेट बस.

ग्लेनबर्नची परंपरा ब्रिटीश आहे आणि ती इथे कसोशीनं जपली आहे. भारतात आलेले ब्रिटीश कशा पद्धतीनं रहात असत याची एक झलकच आपल्याला इथे दिसते. फर्निचर, खानसाम्यांची आदब, आत्यंतिक स्वच्छता, एकत्र जेवण, जेवणा आधीची ड्रिंक्स सगळंच जपलंय इथं. त्यातून इथे येणार्‍या पर्यटकांतही इंग्लंड आणि युरोपमधून येणारे जास्तच. आम्ही होतो तेव्हा तर आम्हीच फक्त भारतीय. केअरटेकरही ब्रिटिश. तिची हेल्पर - लाराही ब्रिटीश. एक अमेरीकन भारतातल्या टी-इस्टेटवर रिसर्च करत होता. एक ब्रिटिश डॉक्टर दरवर्षी ग्लेनबर्नला येऊन महिना-दोन महिने राहून मळ्यातल्या कामगारांकरता असलेल्या हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा देते. ती ही होती. एक जगभर हिंडणारं ब्रिटिश जोडपं होतं. ते भारताच्या इतक्या प्रेमात की अनेकदा भारताला भेट देत राहतात. ग्लेनबर्नलाही त्यांची ती तिसरी का काय भेट होती. एक जर्मन कुटुंब होतं. रात्रीच्या जेवणाआधी कॉकटेल लाउंजमध्ये आणि मग जेवताना टेबलाभोवती बसून प्रचंड बडबड करायचे सगळे जण. जगाच्या कोणकोणत्या कोपर्‍यातून, वेगवेगळे संदर्भ धरून काळाच्या एका तुकड्यापुरते एका सुंदर जागी आम्ही सगळे एकत्र आलो होतो. मात्र त्या जेमतेम १५-१६ जणांच्या घोळक्यात दोन लारा आणि दोन जेन्या होत्या. गंमतच!

डायनिंग रुम

कॉकटेल लाउंज

कॉकटेल लाउंज संध्याकाळी

एकदा या टीइस्टेटचे बुकिंग केले की ते सर्वतोपरी आपली काळजी घेतात. विमानतळावरून नेण्या-पोहोचवण्याकरता त्यांची गाडी येते. आपल्या दिमतीला एक टीमच हजर असते. आपल्याला टी-इस्टेटची सैर करवून आणण्यासाठी एक स्थानिक बरोबर असतो. पायी अथवा त्यांच्या गाडीतून ही सैर आपल्याला करता येते. टी-इस्टेटवरच त्यांची चहाची फॅक्टरीही आहे. ती पाहून त्याबरोबर टी टेस्टिंगचा अनुभव घेता येतो. तिथल्या छोट्या छोट्या वस्ती मध्ये पायी भटकून येता येतं.

चहाची फुलं

झूम आउट - चहाचं झाड

अजून झूम आउट - चहाचा मळा

पण हायलाईट म्हणजे नदीकाठची पिकनिक. इस्टेटीच्या एका सीमेवर रंग्डंग नदी वाहते. त्या नदीच्या ज्या काठापर्यंत या इस्टेटीची हद्द आहे, तिथे एक छोटेखानी कॅम्प हाऊस बांधले आहे. चालत अथवा गाडीने तेथपर्यंत जाऊन, तिथे नदीकाठी लंच घेऊन, हवे असतील काही खेळ खेळून संध्याकाळी परत येता येते.

रंग्डंग नदी आणि नदीकाठची पिकनिक

कॅम्प-हाऊस

नदीवर जाण्याचा रस्ता मात्र मुद्दाम खडबडीत ठेवला आहे. त्यामुळे रोड- राफ्टिंग लेवल ५ चा आनंद मात्र आपसुक मिळतो. smile

ग्लेनबर्नवरून बागडोगराला परत जाताना कांचनजंगाच्या पार्श्वभूमीवर दिसणारे दार्जिलिंग

उजवीकडल्या पलिकडल्या डोंगरावर दिसते ती मकाईबारी टी-इस्टेट असं आमच्या गाडीवानानं सांगितलं.

भारी बडबड्या होता तो. गाडी चालवता चालवता आमची चांगलीच करमणूक केली त्यानं. आपल्या खास दार्जिलिंग हिंदी उच्चारांत त्यानं दार्जिलिंगला येणार्‍या पर्यट्कांची निरीक्षणं नोंदवली ..

"शाब, बोंगाली बाबू आते हे तो सब्बेरे सब्बेरे उठके सनराईज देखनेके लिये जाते है तो पूरा ढकके जाते है. जो जो मिलेगा वो शब पेहन लेगा. स्वेटर, कोट, मोजे, हातमे ग्लोव, कानटोपी शब शब पेहनेगा. उपरसे रूम का चादर भी लपेट के ले जायेगा. और फिर भी उदर जाके ' ठंडी हे, ठंडी हे ' बोलता रहेगा...

दुसरा वो मद्रासी लोग आता है. वो सीधा लुंगी पेहनके सनराईज देखने को जायेगा. मगर उदर जाके फिर गाडी से बाहर नही जायेगा. गाडी मे बैठके बार बार कॉफी पियेगा .... "

लै हसवलं गड्यानं.

*************************************************************************************************************

दार्जिलिंग ते सिक्कीमच्या रस्त्यावर एक व्ह्यु-पॉइंट आहे. तेथून तीस्ता आणि रंगित नदीचा अत्यंत विलोभनीय आणि नेत्रदिपक संगम दिसतो.

समोरून येणारी फिक्या हिरव्या रंगाची ती तीस्ता नदी. आणि डावीकडून येऊन तिला मिळणारी गडद हिरव्या रंगाची ती रंगित नदी.

/* */ //