सावरीची सुरेल मैफिल

काही काही झाड नकळत्या वयापासून माझ्या मनात ठाण मांडून बसली आहेत,त्याच मुख्य कारण म्हणजे माझ बालपण त्या झाडांभोवती खेळण्यात गेलं आहे. माझं माहेरच घर म्हणजे त्याकाळच्या शहरवजा गाव असलेल्या अंबरनाथमधल मस्त पुढे मागे अंगण असलेलं कौलारू घर. घराला लागून आमचं शेतसुद्धा होत आणि मी चौथीत जाईपर्यंत आम्ही भात, भुईमूग अशी पीकही घेत होतो शेतात. साहाजिकच घराच्या भवताली भरपूर विविध प्रकारची झाड होती.आमचं घर रस्त्यापासून बरच खालच्या पातळीवर होत तर रस्त्यावरून घरात यायला ज्या पायऱ्या होत्या त्याच्या बाजूला एक देवचाफा होता, जो अजूनही भरभरून फुलत उभा आहे आणि त्याच्या बाजूला चक्क शाल्मलीचा भलामोठा वृक्ष होता. लहानपणी उन्हाचा तडाखा जसा वाढत जाई तसा ह्या झाडाखाली गर्द गुलाबी मोठ्या मोठ्या फुलांचा सकाळ - संध्याकाळी खच पडत असे. काटेसावरीची ओंजळभर आकाराची रसरशीत गडद गुलाबी रंगाची, जाड जाड पाकळ्यांची फुल गोळा करताना आजीकडून सावरीच्या एक ना अनेक लोककथा तेव्हा ऐकल्या आहेत. तिच्या खोडाचे मोठे त्रिकोणी काटे पेरूच्या पानात घालून खाल्लेत आणि तोंड रंगवून कात घातलेलं पान खाल्ल्याचा आनंद मिळवायचा प्रयत्न केला आहे.

Screenshot_20230315-112520__01.jpg

नंतर बालपण हातातून निसटत जाताना कोपऱ्यावर असलेली सावर कुठेतरी हरवली आहे हे त्या फुलपाखरी वयात लक्षातही आल नाही पण मनात मात्र ती रुतून बसलेली होतीच. निसर्गाचं वेड एकदा लागलं की ते सुटत नाहीच त्यामुळेच लवकरच शिशिर संपता संपता जर गावी गेलो तर जाताना रस्ताभर कुठे ना कुठे आपले गर्द गुलाबी फुलांचे पेले मधुरसाने भरून पक्षी आणि प्राण्यांना आपल्याकडे बोलावणारी ही काटेसावर मलाही तिच्याकडे बोलवत असे.

20220313_114704_0.jpg

तर अस शाल्मलीच गारूड नंतर वय वाढेल तस वाढतच गेलं. शिशिरात आपल्या अंगावरच एक अन एक पान गाळून आपल काटेरी खोड आणि फांद्या हात उंचावून पुढे वाढत्या उन्हाच्या झळा सोसायला निळ्याशार आभाळाकडून थोडी शितलता मागत उभ असत. कधी ही निष्पर्ण सावर एखादा संन्यस्त, विरक्त योग्यासारखे भासते, तर कधी हीच सावर निरभ्र, निळ्या आकाशाच्या बॅकड्रॉपवर बघितली तर एखादी शास्त्रीय नृत्यांगना आपला पदन्यास करत, तोल सावरत एकेक मुद्रा करत तोऱ्यात रूपगर्वितेसारखी उभी आहे अस वाटत. फाल्गुन लागता लागता शाल्मलीच्या काटेरी निष्पर्ण काळपट करड्या अंगावर हिरव्या रंगाच्या कळ्यांचे फुटवेच फुटवे दिसू लागतात.पानांचा हिरवेपणा त्यागलेली हि सावर कळ्यांचा हा हिरवेपणा मात्र झोकात मिरवत असते. दिसामाजी उन्हं पिऊन पिऊन ही इवलाली हिरवी बाळ बाळसं धरू लागतात आणि किरमिजी गुलाबी अंडाकृती कळ्यांनी सावर भरून जाते आणि मग सुरू होतो निसर्गाचा एक सुंदर खेळ. कडक उन जिरवत,तप्त वाऱ्याच्या झळा पचवत ह्या कळ्या उमलू लागतात आणि पाच मोठ्या, जाड, मांसल, मेनचट पाकळ्यांची ओंजळी एव्हढी मोठी फुल सावरीच्य निष्पर्ण झाडाचे रुपडे बदलून टाकतात. हिच्या फुलांचा तो गर्द गुलाबी रंग आणि पाकळ्यांचा जाडसर, मांसल पोत बघून अस वाटत की ही फुल नुकतीच न्हाऊन आलीयेत आणि हात लावला तर त्या गर्द गुलाबी, तलम,ओलेत्या पाकळ्या आपले तळहात त्या रंगाने माखवून टाकतील.

IMG_20230227_181458__01-01_0.jpeg

पाच सुट्या पाकळ्या मिळून तळाशी पेल्यासारखा आकार असतो आणि त्यात टोकाशी डार्क चॉकलेटी रंग ल्यायलेल्या पुंकेसरांची वैशिष्ठ्यपूर्ण रचना असते. फुलाच्या त्या पेल्यासारख्या खोलगट भागात सावरीने आपला सगळा जीवनरसच जणू ओतून ठेवलेला असतो. त्या मधुर रसामुळे ऐन उन्हाच्या कडाक्यात सावरी पक्ष्यांचा ज्युसबार बनते.विविध पक्षांबरोबर माकड, खारी, हरण, ससे सुध्दा सावरीची फुल खायला वेडावतात. काही पक्षी निरीक्षकांनी फुललेल्या सावरीवर एका दिवसात ८० वेगवेगळ्या पक्ष्यांची नोंद केली आहे म्हणजे बघा. कडक उन्हामुळे सगळीकडे पाण्याची वाणवा जाणवत असते, छोटेमोठे ओढे पण सुकत चाललेले असतात. अशावेळी साहाजिकच पक्षांना त्यांना इतके दिवस सहज उपलब्ध असणार त्यांचं खाद्य म्हणजे पानोपानी असणारे लहानमोठे कीटक, सिकोडे , इतर फुल ह्यांची कमतरता भासू लागते. अशावेळेस हि खाद्याची उणीव या फुलातील रसामुळे भरून निघते. या झाडावर सूर्योदयापासूनच बुलबुल, हळद्या,वेडे राघू,सुभग, शिंपी,चष्मेवाला, शिंजिर, राखी वटवट्या, शिंपी, चिमण्या, कोतवाल, मैना, पोपट आणि इतरही बऱ्याच पक्षांची मांदियाळी दिसून येते. फुलाच्या कोवळ्या पाकळ्या खायला खारूताई दिवसभर तुरुतुरु ह्या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत रहाते. गावकुसाबाहेरची, जंगलातली सावर असेल तर माकड पण आपला डेरा भल्या सकाळपासून सावरीवरच मांडून बसलेले दिसतात आणि झाडाखाली पडलेल्या फुलांना चरायला हरीण, ससे, अस्वल, साळिंदर गर्दी करतात. दिवसभर पक्षांनी घेतलेल्या ताना सावरी भोवताली एक सुरेल मैफल रंगवत रहातात. हिच्या काटेरी खोडामुळे आपसूकच मिळणार संरक्षण ओळखून काही हुशार पक्षी आपली घरटी काटेसावरीवरच बांधतात. हिच्या गर्द गुलाबी फुलांवर जेव्हा सूर्याची किरण पडतात तेव्हा त्यांचं झळाळून उठण त्या फुलांना एक तलम पोत देतात.
ते बघून अस जाणवत की जरी अंगभर काटेरी कवच ओढून घेतल असल तरी मनातली ओल  हिला बरोबर जपता आलीय.आपल्यालाही असा मनातला ओलावा कायम प्रत्येक अनुकूल - प्रतिकूल परिस्थितीतही टिकवता आला पाहिजे. निरभ्र निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर चमकदार, गर्द गुलाबी रंगाच्या मोठ्या फुलांनी सजलेल्या निष्पर्ण काटेसावरीच वर्णन करणं खरोखरीच शब्दांपलिकडची गोष्ट आहे.

IMG_20230307_173753__01.jpg

ही शाल्मली सदैव आपल्या फांद्यांनी हात उंचावत आकाशाकडे झेपावत असते, फुलही आपल्या माना उंचावून आकाशाशी सलगी करायचा प्रयत्न करत असतात. तळपता सूर्यही शाल्मलीला असणारी आकाशाची ओढ कमी करू शकत नाही. आपल्या गर्द गुलाबी फुलांनी जणू ही प्रेमगीत गात आपल्या प्रियकराला - आकाशाला बोलवत असते. हीच सौंदर्य ना कॅमेऱ्यात बंद करता येत ना कागदावर हुबेहूब चितारता येत. जोपर्यंत हीचा बहर असतो तोवर हा आनंदोत्सव, हीच्या सभोवतालची सुरेल संगीत मैफिल सुरूच राहते.
चैत्र स्थिरावता स्थिरावता इतर जनता चैत्र पालवी मिरवत असते.हीचाही बहर कमी होत जातो पण ही हिरव्या पानांचा झगा अजूनही परिधान करत नाही तर अंगभर हिरवी लहान घोसाळी वाटावीत अशी बोंड मिरवायला सुरवात करते. काही दिवसांत ही बोंड डार्क काळपट चॉकलेटी रंग लेऊन पाच शकलांमध्ये उकलतात. त्या उकललेल्या एका एका बोंडांतून हळूहळू पांढरा रेशमी कापूस बाहेर डोकावताना दिसू लागतो, वाऱ्याबरोबर तो कापूस उधळून रानोमाळ उडत राहतो. या रेशमी कापसामुळेच हीच इंग्रजी नाव आहे रेड सिल्क कॉटन ट्री.

IMG_20230315_112948_207.jpg

झाडाझुडपात अडकलेला कापूस, जमिनीवर पसरलेला कापूस आणि हवेत उडणारा कापूस कोवळ्या उन्हात चकाकताना बघणे म्हणजे एक मेजवानीच असते. त्या कापसात लपेटलेल्या लहान काळसर बिया दूरदूर उडत जाऊन सृजनाची वाट बघत मातीत रुजायची स्वप्न घेऊन मातीवर निजतात.नंतर कधीतरी आलेल्या पावसाच्या ओलाव्याने त्या बियांना सृजनाचे डोहाळे लागून त्या अंकुरतात, रुजतात आणि एक नवीन सावर जन्माला येते.लहानपणी भर दुपारच्या उन्हात सावरीच एखाद बोंड तडकून वाऱ्यावर उधळलेल्या त्या चकाकत्या रेशमी कापसाच्या म्हातारीच्या मागे धावून बेजार, घामाघूम झालेली मी अजूनही आठवते मला. तेव्हा वाटायचं हा सगळा कापूस गोळा करता आला तर त्याच्यापासून बनवलेल्या मऊमऊ  उशी आणि गादी वर मस्त झोप लागेल, गोष्टीतल्या राजकन्येसारखा कोणताही खडा नक्कीच टोचणार नाही.आणि आता ह्या कापूस म्हाताऱ्या दिसल्या की फक्त सलील - संदीपच्या गाण्यातली ती ओळ मनात खूप वेळ रुंजी घालत राहते - सावरीच्या उशिहून मऊ माझी कुशी .......
लहानपणी आजीनी काटेसावरीच्या बऱ्याच लोककथा सांगितल्या होत्या. त्यातल्या दोन - तीन आजही लक्षात आहेत. सावरीला जेव्हा हिरवीगार पाने असतात तेव्हा ही सावर एका उंच दांड्याच्या हिरव्या छत्रीसारखी भासते. ब्रम्हदेव ह्या सृष्टीचे निर्माण करत होता तेव्हा ह्या चराचराची निर्मिती करून झाल्यावर दमलेला भागलेला तो श्रम परिहारासाठी ह्याच सावरीखाली विसावला होता. त्याकाळी म्हणे सावरीची पाने शिशिरातही गळत नसतं, झाडाची साथ सोडत नसत. दणकट, उंच बांधा व वर्षभर हिरवा पर्णसंभार ह्यामुळे सावर गर्विष्ठ झालेली. तिला एकदा कोणीतरी गमतीत विचारलेल की तुझी आणि वाऱ्याची चांगलीच मैत्री आहे वाटत आणि म्हणूनच तो तुझी पान पाडत नाही ना ? ह्यावर सावर अतिशय तोऱ्यात म्हणाली होती की मी इतकी सामर्थ्यवान आहे की मला कोणाच्याही मदतीची, मैत्रीची गरज काय? मी कोणालाही घाबरत नाही, अगदी त्या सोसाट्याच्या वाऱ्यालाही. हे जेव्हा वायुदेवांच्या कानावर जाते तेव्हा चिडून तो वरुण देवासह सावरिवर आक्रमण करायला येतो. पण तोपर्यंत सावरीला सवत: च्या आगाउपणाची, उर्मटपणाची जाणिव होऊन तिने चुकीचं परिमार्जन करावं ह्या हेतूनं आपली सगळी पानं झाडून टाकली होती. ते बघून वायुदेवांनी तिला माफ केलं व सांगितल की परत कधीही गर्वाने उन्मत्त होऊ नकोस. आपल्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून दर शिषिरात अजूनही सावर आपल्या सगळ्या पानांची झुल उतरवून निष्पर्ण होत असते.
दुसऱ्या लोककथेत अस म्हंटल जात की जेव्हा एखादा पापी माणूस मृत होऊन नरकात जातो तेव्हा तिथे नरक यातना भोगण्यासाठी त्याला सावरीचे काटे टोचून टोचून शिक्षा दिली जाते. यावरूनच सावरिला यमद्रम असंही म्हटलं जातं. उष्णता रोधक गुणधर्मामुळे जंगलात वणवा लागला तरी सगळ्यात शेवटी जळणार झाड सावरीचच असत. तिच्या ह्या उष्णता सहन करण्याच्या गुणधर्मामुळे कोणी तिला भक्त प्रल्हादाच रूप मानतात. तर कुठे सावरीला प्रेतात्म्याशी जोडून तिच्या कोणत्याच भागाचा वापर करत नाहीत.कुठे तीच महत्व जाणून तिचा पुरेपूर वापर करून घेतला जातो.काही भागांत सावरीच्या फुलांची, कळ्यांची भाजी करतात, फुल सुकवून त्याच सरबत करतात, त्याच्यापासून रंग बनवतात. फुलांच्या पाकळ्या, काटे, साल सगळ्याचा आयुर्वेदात औषधं म्हणून पूर्वापार वापर केला जातो. ह्याच्या लाकडाचाही वापर काडेपेटी बनवण्यासाठी, बोटी बनवण्यासाठी करतात.हीच्या बिया जनावरांना खाद्य म्हणून देतात आणि हीचा रेशीम कापूस खरोखरच उंची उश्या बनवताना वापरतात.
कोकणात काही ठिकाणी होळीमध्ये मुख्य लाकूड म्हणून सावरीचा बुंधा वापरतात. तर अश्या ह्या नितांत सुंदर वृक्षाची लागवड शहरातही रस्त्याच्या कडेने, बागांमध्ये व्हायलाच हवी.
काटेसावरच संस्कृत नाव आहे शाल्मली आणि हिंदीत हिला म्हणतात सेमल.
कधीही बहरलेली, वयात आलेल्या सावरीची गर्द गुलाबी फुल उन्हात चमचम करताना दिसली की मला हटकून डॉ. शीला मिश्रा ह्यांची ही कविता आठवते -

आज धूप भटक गई
सेमल के गाँव में।
 
अनियारे नयनों की
अनबोली चितवन-सी
साँसों में लाज भरी
खोई-सी पुलकन-सी।
 
आज आँख अटक गई
असुवन की छाँव में।
 
घर आए पाहुन-सा
मौसम नखरीला
नयनों के पानी से
घर आँगन गीला
 
किसकी यह सुधि आई
ठोकर-सी पाँव में।

साँसों की टहनी पर
यादों के फूल-सी
अल्हड़ किशोरी की
छोटी-सी भूल-सी
 
आज साँस भटक गई
पथरीली ठाँव में

L

IMG_20230307_173824_Bokeh__01.jpg

IMG_20230312_113303__01.jpg

IMG_20230307_181805_Bokeh.jpg

20220313_114310.jpg

मराठी नाव : काटेसावर
संस्कृत नाव : शाल्मली
हिंदी नाव : सेमल
शास्त्रीय नाव : Bombax ceiba
इंग्रजी नाव : रेड सिल्क कॉटन ट्री , रेड कपोक
बहर काळ - फेब्रुवारी ते मार्च

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle