प्रिय मृद्गंधास

प्रिय मृद्गंधास,

यावर्षी तुझ्याशी जरा चुकामूकच झाली. आपली भेट वारंवार होत नाहीच म्हणा. होते दरवर्षी एकदोनदाच. पण जेव्हा तू येतोस, तेव्हा जो आनंद मनात दाटून येतो, तो पुढच्या भेटीपर्यंत पुरतो. अगदी खरं सांगायचं, तर तो काही निर्भेळ आनंद नसतो. एक हुरहूर कायम तुझ्या आगमनासोबत जोडली गेलेली आहे लहानपणापासूनच. तू आलास, म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी संपत आली. तू आलास, म्हणजे सुट्टीला आलेल्या भावंडांबरोबर उन्हातान्हात भटकण्याचे, खेळण्याचे, गप्पा मारण्याचे, हसण्या-खिदळण्याचे, मनसोक्त आंबे-फणस खाण्याचे दिवस संपत आले, ही जाणीव टोचायला लागायची लहानपणी. पण तरी तू तेव्हाही आवडायचास. मुक्त मजेचे दिवस संपून परत चाकोरीबद्ध वर्ष सुरू होताना तुझी जुनी, ओळखीची सोबत कदाचित आश्वासक वाटायची. कारण काहीही असो, तुझं येणं म्हणजे किंचितशा हुरहुरीमुळे अधिकच हवासा वाटणारा आनंद!

तुझ्या येण्याची चाहूल एखाद्या दिवशी सकाळीच लागते, भरून आलेलं आभाळ बघितल्यावर. दिवसभर वातावरणनिर्मिती करून, कधीकधी एकदोन दिवस वाट पहायला लावून मग संध्याकाळी तू अवतरतोस. सोसाट्याचा वारा, काळ्या ढगांचा गडगडाट, लखलखणारी वीज असे तुझे रौद्र जोडीदार. पण तुझ्यात मात्र नावालाही रौद्रता नाही. तू हळुवार, मखमलीच. मातीचा मऊशारपणा आणि पाण्याची शीतलता यांचा संगमच तू. वीज, वारा आणि ढगांच्या वाद्यमेळाने सजलेल्या मैफिलीत तू म्हणजे पहिला सूर. इतका सच्चा, मनाला भिडणारा, की तू सगळ्यांनाच ’आपला’ वाटतोस.

तू कवींचा लाडका आहेस, यात नवल ते काय! बोरकर ’गडद निळे गडद निळे’ कवितेत म्हणतात, ’वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले’. जमिनीतून येणारा तू म्हणजे भूमीचा आशीर्वाद, ही कल्पनाच किती सुंदर आहे! कवयित्री पद्मा गोळ्यांची ’ग्रीष्मातल्या सकाळी’ ही कविता म्हणजे तर तुझ्याशी जोडल्या गेलेल्या आनंदाचं आणि हुरहुरीचं अगदी यथार्थ वर्णन! आकाशात भरून आलेल्या मेघांमुळे कवयित्रीच्या मनावर आलेलं मळभ दूर करताना ’ सद्भाग्य केवढे हे, आले भरून मेघ’ या कल्पनेने रोमांचित झालेला चाफा म्हणतो, ’होईल तृप्त धरणी, मृद्गंध दरवळेल’.

ग्रीष्माच्या चटक्यांनी तापलेल्या, तहानलेल्या धरणीवर पावसाचे पहिले थेंब पडतात, तेव्हा ती जणू आनंदाने निःश्वास सोडते. शास्त्रीय दृष्टीने बघितलं, तरी तुझ्या निर्मितीचं रहस्य असंच काहीसं आहे. उन्हाळ्यात झाडांमुळे, मातीत असणार्‍या जीवाणूंमुळे तयार झालेली द्रव्यं पावसाचे पहिले थेंब पडताच हवेत उधळली जातात आणि तू येतोस!

तुझ्या नावाचं अत्तरही मिळतं. पेट्रिकोर परफ्यूम. ते बनवण्याची प्रक्रिया जितकी निगुतीची आणि अवघड, तितकं ते अत्तरही महागडं. असणारच म्हणा. तुझ्यासारख्या नाजूक, अस्सल नैसर्गिक गंधाची निर्मिती करणं माणसासाठी सोपं नाही. तू कितीही आवडत असलास, तरी मी तुझ्या नावाचं हे अत्तर कधी विकत घेईन असं मात्र मला वाटत नाही. निसर्ग ज्याची उधळण मुक्त हस्ते करतो, ते बंद कुपीतून कशासाठी मिळवायचं? ती कुपी हवी तेव्हा उघडून कदाचित तुझी भेट होईलही, पण तू म्हणजे केवळ मातीचा गंध नव्हेस, तर त्या गंधाची दुर्लभता, अनपेक्षिततासुद्धा तुझ्यातच सामावलेली आहे. ती काढून टाकली, तुला सहजप्राप्य केलं, तर तू, तू उरणार नाहीस!

त्यामुळे, जेव्हा तू उत्स्फूर्तपणे येशील, तेव्हा भेटूया.

-विशाखा

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle