कोलकाता एग रोल

रात्रीच्या जेवणात दोन तीन पोळ्या शिल्लक राहिल्या तर दुसऱ्या दिवशी आमचा हमखास हा नाश्ता असतो! मी काही साटप सुगरण वगैरे नाही त्यामुळे रेसिपी हेतेढकल आहेच Wink

चार पोळ्या तयार असताना साहित्य:

४ अंडी
२ मध्यम आकाराचे कांदे
२ लहान काकड्या
१ मोठा टोमॅटो
४ चहाचे चमचे तयार हिरवी चटणी/ठेचा (मी हिरवी मिरची, आलं लसूण, कोथींबीर असं वाटून एका हवाबंद डब्यात फ्रिझरमध्ये ठेवते.)
४ चमचे टोमॅटो सॉस
आवडत असेल तर चाट मसाला
एक लिंबू

(हवे असल्यास यात बारीक पातळ उभा चिरलेला कोबी/गाजर/बीट आवडेल त्या प्रमाणात घालू शकता.)

कृती:

कृती अगदी सोपी आहे. पोळ्या तयार असल्यामुळे फक्त दहा मिनिटं लागतात.

१. कांदे आणि टोमॅटो अर्धगोलाकार पातळ स्लाइस करा, काकडी सोलून लांबट पातळ काप करा.  त्यावर मीठ तिखट भुरभुरून ठेवा.

२. पॅन गरम करून थोडं तेल घालून पसरवा. बोलमध्ये एक अंडे मीठ घालून फेटा आणि पॅनमध्ये ओता. ते गोलाकार पसरून लगेच त्याच्यावर पोळी दाबून बसवा. ते पोळीला चिकटून शिजेल.

३. पोळी हाताने गोल शेकून मग उलटा आणि अंड्याची बाजू वर राहील असे बाहेर एका ताटात काढून घ्या.

४. पूर्ण अंड्यावर तिखट चटणी आणि टोमॅटो सॉस स्प्रेड करा. (हिरवी चटणी नसेल तर शेजवान सॉसही लावू शकता. बेसिकली घरात असेल ते वापरा!)

५. पोळीच्या मध्यभागी चिरलेल्या भाज्या एकावर एक लेयर देऊन उभ्या रेषेत ठेवा. आवडत असेल तर चाट मसाला, किसलेले चीज किंवा मेयो घालू शकता. (फार प्रोसेस्ड फूड नको, म्हणून मी घालत नाही.) वरून किंचित लिंबू पिळा.

६. आता अर्धी पोळी भाज्यांवर लपेटून पोळीचा घट्ट रोल करा. असे चारही पोळ्यांचे रोल करून घ्या.

मस्स्त गरम गरम रोल एन्जॉय करा! थंडी/पावसात जास्तच छान लागतो.

फोटो घाईत काढलाय. तुम्ही केल्यावर छान सजवलेले फोटो येऊ द्या Wink

0e2f5f2d-6af1-4e78-8be3-a515b5d5169e.jpg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle