व्हेजी कोरियन पॅनकेक

आज नारळी पौर्णिमे निमित्त नारळी भात आणि जोडीला हे पॅनकेक केले. इन्स्टावर बघुन हे पॅनकेक करुन बघण्याचा मोह होतच होता आणि माझी अगदी जिवाभावाची एक मै कोरियन आहे त्यामुळे तिला नीट कृती विचारली आणि थोडे फेरफार करुन हे करुन पाहीले. चवीला छान आणि अगदी पोटभरीचे होतात.
कृती साधारण आपल्या धिरड्याच्या जवळपास जाणारी आहे.भरपूर भाज्या असल्याने पोटभर आणि हेल्दी पण आहेत.

साहित्य : फ्रिज मध्ये असतील त्या भाज्या उभ्या चिरुन. मी गाजर, कोबी, झुकीनी, ढब्बु, कांदा, कांद्याची पात, मश्रूम आणि कोथिंबीर वापरले आहेत.
बटाटा, रताळ ,पालक वैगरे छान लागतात अस मैत्रीण म्हणाली.
मिठ, मिरपुड, मिरची, डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ,चमचाभर कॉर्नफ्लावर / कॉर्नस्टार्च आणि तेल.

कृती : मोठ्या भांड्यात चिरलेल्या भाज्या घेऊन ( मी साधारण ५ कप भाज्या घेतल्या होत्या, जवळ जवळ १/२ कढई भाज्याच होत्या ) चवीनुसार त्यात मिठ, बारीक चिरलेली मिरची, मिरपुड घालून त्यात साधारण १ ते सव्वा कप मिक्स पिठ थोड थोड करत घातलं. ह्या पॅनकेक मध्ये भाज्या जास्त आणि पीठं नावाला घालायच आहे अगदी थोडंस पाणी छान ओलसर होण्यासाठी आणि लगेच करायला घ्यायचे.

मी लेक नवरा खायला आले की गरम करायचे म्हणून जवळ जवळ तासभर मिश्रण तसंच ठेवल्याने भाज्यांना थोडं पाणी सुटलं जे गरजेच नाहिये.

आता तव्यावर तेल लावून चमच्याने ते मिश्रण साधारण गोल पसरवायचं. भाज्याच जास्त असल्याने चमच्यानेच कराव लागतं. आपापलं पसरत नाही. एक बाजू छान कुरकुरीत झाली की पलटून दुसर्‍या बाजूने पण तेल लावून भाजायचे.

कोरियन रेसिपी नुसार ह्यात फक्त मैदा आणि कॉर्नफ्लावर वापरतात, आणि आवडत असेल तर अंड, सीफुड मिक्स ( हे काय असतं मला माहिती नाहीये) घालतात.

ह्या बरोबर खायला मी चिली गार्लिक चटणी केली आहे. पण पारंपारीक पद्धती मध्ये सोया सॉस + व्हिनेगर+ कांद्याची पात+तिळ घालुन मिक्स करतात आणि त्या बरोबर हे पॅनकेक खातात.
मी केलेल्या बदलाने ग्लूटेन फ्री खाणार्‍यांच्या साठी पण हे पॅनकेक चालतील.
img_6860.jpeg

img_1539.jpeg

img_1540.jpeg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle