जानेवाले कभी नही आते....

माझी आई सौ. स्नेहल चंद्रशेखर जोशी.... हिच्या बरोबर खरंतर माझ्या काही आठवणी नाहीतच. कारण ती हे जग सोडून गेली तेव्हा मी जेमतेम सात वर्षांची होते. मी जे काही इथे लिहितेय ते नातेवाईक आणि जवळच्या कौटुंबिक स्नेह्यांकडून ऐकलेलं आहे.

माझ्या बाबांबरोबर लग्न झालं तेव्हा ती निव्वळ १७ वर्षांची होती आणि शिक्षण होतं इयत्ता दहावी. लग्न होऊन कोल्हापुरात आल्यावर तिने पुढचं शिक्षण पूर्ण केलं. १९७८ च्या आसपास जेव्हा मी तिच्या पोटात होते तेव्हा ती मास्टर ऑफ आर्ट्स विथ इंग्लिश करत होती. त्याच बरोबर तिने शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुद्धा जयपूर अत्रौली घराण्याचे गायक आनंदबुवा लिमये यांच्याकडे लग्नानंतरच घेतलं.

वृषभ राशीची माणसं म्हणे खूप कष्टाळू असतात. माझी आई सुद्धा त्याला अपवाद नसावी आणि नव्हतीच. अपार कष्ट... आमचं घर होतं चौथ्या मजल्यावर त्यातून तिला स्वच्छता आणि टापटिपीची प्रचंड आवड होती. हलकासा ओसीडीच होता म्हणायला हरकत नाही.. (जो माझ्याकडे वहात वहात आलाय) घरची सगळी कामं, म्हणजे कपडे धुणं भांडी... केर फरशी स्वयंपाक इत्यादी (चौथ्या मजल्यावरून ये जा करून) वरून ती पोस्टाची स्मॉल सेव्हिंग एजंट म्हणून काम करत होती.

तिचा आवाज खूपच चांगला होता. त्या काळात तिचे आकाशवाणी वर कार्यक्रम व्हायचे, शिवाय आमच्या कोल्हापुरात एक कॉलेज आहे बी. टी. कॉलेज.. तिथे ही आईच्या आवाजात रेकॉर्ड केलेली प्रार्थना अनेक वर्ष लावली जात असे. या शिवाय एका ग्रुपतर्फे कोल्हापुरला आणि आसपासच्या गावी तिच्या गाण्यांचे कार्यक्रम व्हायचे.

पण मग मी चार वर्षांची असताना साधारण १९८१ साली तिला कावीळ झाली. ती इतकी तीव्र स्वरूपाची होती की त्यातून ती वाचेल का याची शंका होती. सलग पूर्ण एक वर्ष मिरजच्या मिशन हॉस्पिटल मध्ये उपचार घेतल्यावर ती घरी परतली... बरी होऊन.

कडक पथ्य पाळण्यासाठी सांगूनही तिने स्वतःच्या तब्येतीची हेळसांड सुरू ठेवली...
डॉक्टरांनी तिला कधीच कडक उपास करू नका असं सांगितलं होतं... पण १९८६ साली त्या काळच्या प्रथेनुसार तिने सोळा सोमवारांचे व्रत केले... शेवटचा सोमवार होता त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी... तिची तब्येत बिघडली आणि तिला कोल्हापूरच्या आयसोलेशन हॉस्पिटल मध्ये उपचारांसाठी दाखल केलं... त्या दरम्यान आम्ही दवाखान्यात जात नसू.. पण तिने बाबांना "दीप्तीला मला भेटायला घेऊन या" म्हणून सांगितलं.. आमचं घर कोल्हापूरला मध्यवर्ती ठिकाणी असल्याने हॉस्पिटल पर्यंत थेट बस होती.. मग मंगळवारी (२६ ऑगस्ट १९८६) या दिवशी मला एकटीला बाबांनी थर्मास मधून चहा घेऊन पाठवलं.. सुदैवाने बसचा शेवटचा थांबा हॉस्पिटलच असल्याने बस तिथे १० मिनिटं थांबून पुन्हा गावात येत असे... बाबानी सूचना दिल्या.. मी थर्मास घेऊन बस मधून उतरले... आईला भेटले... आईने गालावरून हात फिरवला.. मी ग्लास मध्ये चहा ओतला आणि पळत बस मध्ये येऊन बसले.. तेव्हा तिच्याजवळ बसावं.. तिचा सहवास मनात साठवावा इतकी समज नव्हती याची खंत वाटते..
बुधवार २७ ऑगस्ट ला तिची तब्येत आणखीन खालावल्यावर आयसोलेशन मधून तिला पुन्हा मिरज ला हलवले.. आईने पुन्हा मला आणि माझ्या ताईला भेटण्याची इच्छा व्यक्त केली..

गुरुवारी २८ ऑगस्ट ला सकाळी आम्ही कोल्हापूरहून मिरजला तिला भेटायला गेलो.. चालती बोलती.. होती... तिथे तिच्या त्या कॉटवर बसून तिने आम्हा दोघींचे केस विंचरून वेण्या घातल्या... साधारण दुपारी चार च्या सुमारास आम्ही कोल्हापूरला परत यायला निघालो, तेव्हा माझी काकू आणि तिची एक मैत्रीण हॉस्पिटल मध्ये आत शिरल्या.. रात्री त्या दोघी परतल्या त्या आईला पांढऱ्या चादरीत गुंडाळून घेऊनच... आम्ही भेटून गेल्यावर साधारण संध्याकाळी साडेपाचला तिने जगाचा निरोप घेतला...

तिच्या जाण्याने आमच्या आयुष्यात जी एक पोकळी निर्माण झाली ती कायमची.. आज तिला जाऊन पस्तीस पेक्षा जास्त वर्ष झाली... पण कित्येकदा असे प्रसंग ओढवले जेव्हा मनापासून वाटलं कि आज आपल्याला आई असती तर किती मोठा आधार मिळाला असता. किंवा आज मी जी आहे त्या पेक्षा काहीतरी निराळी असते. जितकं मी आईला जाणते.. त्यातून मला तीन गोष्टी जाणवतात.. कि आज ती असती तर माझे केस लांबसडक असते, मी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं असतं.. आणि मी डॉक्टर असते... पण यातलं एकही घडलं नाही.. नशीब.. दुसरं काय?

आई नसल्याने पदोपदी तिच्या नसण्याची किंमत आम्ही मोजली... ती पण खूप मोठ्या प्रमाणात.. पण आपण नियतीच्या पुढे जाऊ शकत नाही...

aaee.jpg

**********************************************************************************************************
तळटीप : माझ्या आईबद्दलच्या या भावना/आठवणी मी फेसबुकच्या माझ्या वॉल वर लिहिलेल्या आहेत. मला हा लेख इथे शेअर करण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle