A page from a diary of Ginger Kulkarni - 4th October 2023

4th October 2023
आजचा दिवस फार गडबडीचा... खरं तर खुडबुडीचा गेला. सकाळीच मला शंका आली की किचनमध्ये उंदीर घुसला आहे. मी सगळ्या ट्रॉलीज् पायाने ओढून उघडून पाहिल्या. पण मला कपाटं उघडता येत नाहीत. प्राची उघडून देईल म्हटलं तर ती वैतागली होती. तिला तिच्या कामासाठी लॉगिन करायचं होतं आणि माझ्या बरोबर खेळत बसायला वेळ नाही असं काहीतरी ती म्हणाली. तिनं मला किचन बाहेर हाकललं. आणि दरवाजा बंद करून ती वर रुममध्ये गेली. तिची चूक नाही. तिला माहिती नव्हते की उंदीर शिरला आहे. ती वर जाईपर्यंत मी माझ्या गादीवर शहाण्यासारखा बसून राहिलो. मग हळूच किचनजवळ गेलो. दरवाज्याच्या लॅच हॅण्डलवर जोरजोरात पाय मारला की दरवाजा उघडतो हे मला माहीत आहे. मी ५-६ वेळा पाय मारल्यावर दरवाजा उघडला. मी परत शोधाशोध सुरू केली. भांड्यांचा आवाज ऐकून प्राची परत खाली आली. खरं तर मी काही तिला मदत करायला सांगत नव्हतो. फक्त कपाटं उघडून दिली की मी आत घुसून उंदीर शोधला असता. पण तिनं ऐकलंच नाही. परत मला बाहेर हाकललं आणि दरवाजा लावला. आता तर तिने एक खुर्ची पण दरवाज्यासमोर लावून ठेवली. मग मात्र मला काही करता येईना.
शेवटी संध्याकाळी साडेपाच वाजता प्राची खाली आली. तिने मला घराबाहेर पोर्चमध्येच सोडले आणि मग किचनचा दरवाजा उघडून चहा केला. मी तोवर फिरून आलो. मग पाणी प्यायच्या निमित्ताने घरात शिरलो आणि हळूच किचनमध्ये घुसलो. प्राचीने डोक्याला हात लावला. थोड्या वेळाने शंतनु ऑफिसमधून घरी आला. त्यानं मात्र मात्र माझं ऐकलं. चहा वगैरे न घेताच लगेच वायपर घेऊन किचनमध्ये घुसला. 'परत नवा वायपर आणावा लागणार' असं काही तरी प्राची बडबडली. मग मी आणि शंतनुने अर्धा तास उंदीर शोधला. आता उंदीर ट्रॉली मधून बाहेर येऊन फ्रीजमागे पळाला. शंतनु ने फ्रिज जरासा हलवल्यावर मला फ्रिजमागे लपलेला उंदीर दिसला. मी लगेच 'हर हर महादेव' म्हणत हल्ला चढवला. शंतनु नो नो म्हणत होता. पण मी न ऐकताच दोन फटक्यात उंदराला गारद केले. मग प्राचीनं ट्रिट स्टिकचं आमिष दाखवून मला बाहेर बोलावले. खरं तर मला उंदीर सोडून जायचं नव्हतं पण ट्रिट कशी सोडणार? ट्रिट खाऊन झाल्यावर मी परत किचनमध्ये गेलो तर उंदीर गायब. मला ट्रिटमध्ये गुंतवून हळूच उंदीर बाहेर टाकला असावा शंतनुने.
शंतनु खूप खुश झाला माझ्यावर. त्याने फोनवर मिहिकाकडे खूप कौतुक केले माझे की मी एकदम चपळाईने उंदीर पकडला. 'उंदीर मारायला नको होता' असं मिहिका म्हणाली. प्राची मात्र माझ्यावर ओरडली,"गाढवा, तूच दहा वेळा आतबाहेर करतोस, दरवाजा उडता टाकतोस. मग साप, उंदीर शिरतील नाही तर काय?" असं म्हणाली. पण नंतर तिने हळूच एक चमचा जास्त डॉगफूड माझ्या प्लेटमध्ये टाकले.... किसी को कुछ पता नहीं चला.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle