क्रिकेट प्रेम - आठवणी आणि वारसा

कोणे एके काळी, शाळेत असताना क्रिकेट मॅचेस बघण्याच्या खूप वेड होतं. मी पहिली-दुसरीत जाई पर्यंत बाबा त्यांच्या ऑफिस कडून क्रिकेट खेळायचे. त्यांचे दौरे आणि माझं मग त्यांच्या आठवणीत रडणं हे ठरलेलं होतं. नंतर त्यांचं क्रिकेट मागे पडलं, पण बुलढाण्यात अजूनही जुने कुणी भेटले, की त्यांना क्रिकेट मुळे ओळखतात. त्यामुळे त्या खेळातल्या बारीक सारीक गोष्टी बाबांकडूनच मला समजल्या. मला ती मॅच पण आठवते, ज्या नंतर मी खऱ्या अर्थाने क्रिकेट बघायला लागले. आम्ही कुठेतरी बाहेरगावी गेलो होतो, परत यायला उशीर झाला, पाऊस पण पडत होता. बुलढाण्यात तेव्हा दोनच हॉटेल होते, उशीर झाला म्हणून आम्ही तिथे जेवायला गेलो. ही गोष्टच मुळात तशी दुर्मिळ होती. तेव्हाच भारत पाकिस्तान मॅच सुरू होती, आम्ही तिथेच ती बघत होतो. अजय जडेजा आणि अझरुद्दीन खेळत होते आणि चौकार षटकार करत त्यांनी ती मॅच जिंकून दिली. त्या मॅच मुळे पुढे अजय जडेजा माझा क्रश झाला, क्रश हा शब्द नंतर समजला तेव्हा तो आवडायचा असं होतं फक्त. क्रिकेट वेड इथून सुरू झालं ते पुढे अनेक वर्ष राहिलं. मी आणि बाबा मॅच बघण्यात गुंग होऊन खूप वेळ घालवून मग अभ्यास झालाच नाही म्हणून मीच रडत आहे, आई रागावते आहे असं सुद्धा झालं आहे. सचिन, द्रविड, गांगुली आणि इतर देशातले ही अनेक खेळाडू, आवडते नावडते, त्यावरून मला आवडणाराच कसा चांगला खेळला असं ठासून सांगणे, हरल्याबद्दल वाईट वाटणे, स्वतः खेळता येत नसेल तरी समीक्षा करणे हे सगळं ओघाने अनुभवलेले आहे.

पुढे हॉस्टेल ला गेल्यावर तिथल्या डबड्या टीव्ही वर पण सगळ्या जणींनी मिळून क्रिकेट बघणे हा वेगळा माहौल अनुभवला. पण सगळ्या रोजच्या कॉलेज लाईफ मध्ये मॅच बघता न येणे हेही सवयीचं झालं. फक्त राहुल द्रविड दूरचा नातेवाईक आहे म्हणून भरपूर भाव खाऊन घ्यायचे. मग टी ट्वेणटी आलं, त्याच्याही पहिल्या वर्ल्ड कपची फायनल मॅच मी दादा कडे जाऊन पाहिली होती. तेव्हा रस्त्यावर असलेला शुकशुकाट अनुभवला. पण एकूण क्रिकेट वेड जरा कमी होत गेलं. नवीन खेळाडू पण सगळे माहीत नव्हते. २०११ चा वर्ल्ड कप आपण जिंकलो, त्याचा अत्यानंद झाला, तरी त्या वेळी फायनल वगळता खूप काही लक्ष देऊन मॅच पहिल्या नव्हत्या.

मग आयपी एल सुरू झालं, मी देशाबाहेर आले आणि क्रिकेट प्रेम अजून ओसरत गेलं. भारतीय म्हणून क्रिकेट पासून दूर जाऊ शकत नाहीच. खरंतर सुरुवातीला इथे तो माहौल अनुभवता येतं नाही, याचं खूप वाईट वाटायचं. बाबांशी फोन वर हमखास मॅचेस बद्दल गप्पा व्हायच्या. पण वेळा जुळण्यापासून ते नोकरी, प्रापंचिक जबाबदाऱ्या आणि जोडीला जाणवणारा आयपीएलचा नकोसा गवगवा, या सगळ्यात क्रिकेट तेवढं महत्वाचं राहिलं नाही. इथेही वर्ल्ड कप किंवा किमान पाकिस्तान विरुद्ध असलेली मॅच आवर्जून, ठरवून मित्र मैत्रिणींसोबत बघायची, जिंकल्यावर सेलिब्रेट करायचं हे सुरू होतं. पण ग्रुप गेट टुगेदर वेळी कोणतीही मॅच असेल, तर सगळं विसरून पुरुषांच्या स्कोअर आणि क्रिकेटच्या चर्चा सुरू झाल्या की बास आता ते, असं म्हणणाऱ्या गटात मी मोडायला लागले.

मागच्या दोन वर्षात पुन्हा जरा रस वाढत गेला. थोड्या प्रमाणात बातम्या बघितल्या जायच्या. सुमेध सोबत अधून मधून हायलाइट्स तरी बघितल्या जायच्या. राहुल द्रविड प्रशिक्षक म्हणून येणे ही एक आनंदाची गोष्ट होती. सृजनला पण याच दरम्यान क्रिकेट हा खेळ समजला. फुटबॉल पण समजला. त्याच्या आजूबाजूला क्रिकेट माहिती असणारे आमच्या शिवाय कुणीच नाही, त्यामुळे साहजिक फुटबॉल त्याला जास्त आवडणार हे आलंच. त्यामुळे मधूनच क्रिकेट का बघतो बाबा सारखा असं तो कंटाळून पण म्हणायचा. "आता मी क्रिकेट बघूच देणार नाही बाबाला" असं अगदी ठासून सांगितलं, तरी नंतर मात्र दोन तासांनी कोण जिंकले, काय झालं हेही सगळं तो तेवढ्याच उत्साहाने विचारायचा, गुंगून बघायचा सुद्धा. भारतवारीत त्याला आजोबांनी क्रिकेट शिकवायला सुरुवात केली आणि बॅट बॉल घेऊन दिला. त्याने गच्चीतून भरपूर बॉल टोलवले (ते एक दोन गाडयांना लागता लागता वाचले तेव्हा मीच घाबरले होते). या सगळ्या दरम्यान त्याची क्रिकेट प्रेमाची बीजं रोवली गेली. बुलढाण्यातले काही जण फार पूर्वी इंग्लंड मध्ये कौंटी क्रिकेट साठी निवडले गेले होते, एक जण मध्यंतरी आयपीएल मध्ये होता याही गोष्टींचा बुलढाणेकर म्हणून अभिमान होताच, तेही मग त्याला सांगितलं.

त्याला आवडतं म्हणून बॅट बॉल इकडे घेऊन आलो. त्याच्या सोबत घरा जवळच्या मोकळ्या जागेत आम्ही कधी आवडीने, तर कधी नाईलाजाने, पण लुटुपुटु गल्ली क्रिकेट खेळायला लागलो. आजूबाजूच्या जाणार्यांना आमची नवीन ओळख झाली. बाबा आले तेव्हा त्यांच्या सोबत सृजन खेळायचा, तेव्हा काही जणांनी "तुम्ही भारतातून आलात का?" हेही विचारलं. त्याच दरम्यान इथेही बरेच भारतीय क्रिकेट खेळतात त्याबद्दल माहिती समजली. मग त्या मॅच बघायला एक दोन वेळा गेलो. इथे काही मोठे क्रिकेटचे ग्राउंड नाहीत. भरपूर मोकळी जागा असली तरी मनात येईल तिथे पूर्ण टीम मिळून क्रिकेट खेळू असं होत नाही. काही ठिकाणी सोय आहे, तिथे त्या त्या भागातले अनेक जण विकेंड ला खेळायला जातात. त्या सगळ्यांचं विशेष कौतुक यासाठी, की तिथे त्यांना चिअर करायला काही भरलेलं ग्राउंड नसतं. कोणतंही मानधन मिळत नाही. पण तरीही हे सगळे रेग्युलर सराव करतात, जमेल तिथे मॅच खेळायला जातात, त्यासाठी आपला ठराविक वेळ तिथे देतात. आपल्या देशाशी असलेली ही जवळीक त्यांच्या परीने जपून ठेवतात. तिथेच मग नवीन मुलांना सुद्धा शिकवतात. सृजनला तिथे घेऊन गेलो ते त्याला मनापासून आवडलं. सगळ्यात लहान सृजनच होता. त्यानंतर काही ना काही कारणाने आम्हाला जायला जमलं नाही. त्यामुळे पुन्हा कधी जाणार हे सृजन दर वेळी विचारतो. लंडन मध्ये लॉर्ड्स बघायला गेलो तेही सृजनला आवडलं, त्यातून नवीन माहिती मिळाली. आता मोकळा वेळ असेल तर तो आम्हाला दोघांना घरासमोर क्रिकेट खेळायला ओढून घेऊन जातो. हिवाळा सुरु झाला तसं हे सगळं कमी झालं. पण त्याच वेळी वर्ल्ड कपच्या बातम्यांची सुरुवात झाली.

पाकिस्तान विरोधात आपली मॅच होती त्यावेळी आम्ही नेहमी पेक्षा जास्त लक्ष देऊन बघत होतो. सृजनही त्यात सामील झाला आणि भारत जिंकला म्हणून आनंदाने नाचला. मग या सगळ्यात वर्ल्ड कप म्हणजे काय, क्वार्टर फायनल, सेमी फायनल म्हणजे काय, जर्मनी त्यात नाही, जर्मनीने फुटबॉल वर्ल्ड कप जिंकला होता, फायनल हरलो तर काय, जिंकलो तर त्यांना किती पैसे मिळतात, कोणतं मेडल मिळतं, तो कोण आहे, सचिन म्हणजे कोण , रोहित शर्मा कॅप्टन आहे तर कॅप्टन म्हणजे काय अश्या वेगवेगळ्या विषयांवर आपसूक अनेक प्रश्न आले, चर्चा झाल्या. फोर, सिक्स, आउट याच्या खुणा त्याला समजायला लागल्या. सेमी फायनल सुरु असताना अचानक तो त्याच्या खोलीत गेला आणि भारताचा झेंडा रंगवून आणला, भारतच जिंकायला हवा हे खूप वेळा म्हणून झालं, तो झेंडा तेव्हा पासून आमच्या टीव्ही जवळ ठेवला आहे.

मधल्या काळातली मरगळ निघून गेल्यासारखी मी पण पुन्हा सगळ्या मॅचेस फॉलो करत होते. बघायला नाही मिळाल्या तरी स्कोअर, बातम्या यातून आपल्या टीमची एनर्जी, स्पिरिट्स जाणवत होते. विराटचा रेकॉर्ड झाला तो क्षण नंतर पुन्हापुन्हा बघितला. सगळेच जण पॅशनने, तयारीने मैदानात उतरत आहेत, प्रत्येक मॅच चांगली होते आहे असं करत आपण फायनल पर्यंत आलो. त्यांच्या बातम्या आणि सृजनचे प्रश्न सगळ्यांनाच उत आला होता. काल उत्साहाने सुरुवात झाली पण ऑस्ट्रेलिया समोर नेहमी प्रमाणेच पुढे सगळं वेगळंच झालं. आपण वर्ल्ड कप मिळवू शकलो नाही, याच्या इतकंच दुःख ऑस्ट्रेलिया विरुद्ध हरलो याचं झालं. जर तर ला काही अर्थ नाही, शेवटी आपण हरलो हे समजणं सोपं नव्हतंच. मागे एक जर्मन कलीग, ज्याला क्रिकेट काहीही कळत नाही तरी ऑस्ट्रेलिया जिंकावं असं त्याला वाटतं आणि तेच होईल म्हणाला होता, तेव्हा तेच खरं झालं. आता त्याच्या सोबत काम करत नसले तरी तो आठवून रागच आला. राहुल द्रविड साठी वेगळंच वाईट वाटलं. तरी शेवटी सोमवारी ऑफिस म्हणून आम्ही रविवारची बाकी कामं पुढे नेत, फक्त हळहळत राहिलो.

मॅच सुरु असताना सृजन मित्रांसोबत खेळण्यात गुंग होता, तरी सतत लक्ष मॅच कडे होतं. आपण हरतो आहोत आता हे आम्हीही नाराजीने त्याला सांगितलं आणि तेव्हा पासून मग तोही नाराज झाला. तरी खेळण्याच्या नादात विसरला आणि मग झोपायला गेल्यावर मात्र त्याला आपण हरलो याची पुन्हा आठवण आली. त्या लहानश्या मनाला हे सगळं फार लागलं होतं, ते आता बाहेर यायला लागलं. आपण हरलोच कसे, का अश्या प्रश्नांची मालिका सुरु झाली. त्याला झोपच येत नव्हती आणि त्याचं मूळ क्रिकेट आणि आपण हरलो यात होतं. आम्ही त्याला आमच्या परीने टिपिकल हा खेळ आहे, कुणीतरी हरणारच वगैरे सांगून झालं. आपण खूप छान खेळलो तरीही हे होऊ शकतं, आपण त्या सगळ्यांना खूप शाब्बासकी द्यायला हवी, ते किती प्रॅक्टिस करतात रोज, पुढच्या वेळी पुन्हा प्रयत्न करू वगैरे सांगून समजावत होतो. आमच्याही मनात एकीकडे हरल्याचं प्रचंड दुःख होतं. लहानपणी जे वाईट वाटायचं ते आठवलं, तर आता मधल्या वीस वर्षातला इतिहास माहीत आहे म्हणून कदाचित जास्त त्रास होतो. आपणही वैयक्तिक आयुष्यात घेतलेले अनुभव, पचवलेले पराभव असतात, त्यामुळे आपल्याला दुरून वाटतं तर प्रत्यक्षात खेळाडूंना काय वाटत असेल याची जाणीव असते. अत्यंत गरिबीतून वर आलेले खेळाडू, तिथे पोचे पर्यंत त्यांचा संघर्ष, पाकिस्तान विरुद्ध मॅच असते तेव्हा भारतीयांना का एवढा विशेष रस असतो, ऑस्ट्रेलिया विरुद्ध हरण्यातला अपमान, एकेक खेळाडूंशी झालेलं आपलं कनेक्शन, या बाजू सृजनला माहीत नाहीत. पण आपल्याला वर्ल्ड कप मिळाला नाही म्हणून त्याला झालेलं दुःख तेवढंच खरं आहे.

भारताबाहेर राहत असताना पालकांना अनेक भारतीय गोष्टींशी नाळ जुळवून ठेवण्याची इच्छा असतेच. प्रत्येकाचे मार्ग वेगळे असू शकतात आणि त्यातलं सगळं जमेलच असंही होत नाही, तशी अपेक्षाही नाही. पण आत्ता तरी क्रिकेट आणि भारत, भारतीय टीम या बद्दल असलेली त्याची आस्था, या सगळ्या हरण्याच्या दुःखात सुखावून गेली. हार जीत होत राहील, मोठा होत जाताना आवडी निवडी बदलतील, फुटबॉल मध्ये जर्मनी जिंकेल तेव्हा त्याला आणि आम्हालाही नाचावं वाटेल, पण सध्या क्रिकेटच्या निमित्ताने त्याने काढलेला भारताचा झेंडा, त्याच्या मनात सदैव झळकत राहावा म्हणून आम्ही प्रयत्न करत राहू...

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle