Coorg barefoot marathon

कुर्ग बेअरफूट मॅरेथॉन
नुकताच कुर्ग बेअरफूट/ अनवाणी मॅरेथॉन ला जायचा योग आला. खरंतर या मॅरेथॉनची ही सातवी शृंखला पण माझ्यासाठी पहिलीच बेरफूट मॅरेथॉन. भारतातीलच नव्हे तर जगभरातील एकमेव अशी बेअर फूट मॅरेथॉन. काहीतरी नवीन अनुभवता येईल या उद्देशाने मी मंगळूर रनर्स क्लबच्या मेंबर्स बरोबर पोल्लीबेट्टा,कुर्ग ला रवाना झाले. कुर्ग वेलनेस फाउंडेशन तर्फे गेल्या सात वर्षापासून ही स्पर्धा आयोजित केली जाते. फिल्म अॅक्टर आणि फिटनेस फ्रिक मिलिंद सोमण हे या मॅरेथॉनचे प्रतिनिधित्व करतात. निसर्गाच्या सानिध्यात होणारी प्रत्येक रनर्सनी एकदा तरी अनुभवावी अशी ही मॅरेथॉन, पंढरीच्या वारी सारखे इथली वारी करणारी बरेच धावपटू वारकरी इथे भेटतात.
मॅरेथॉनच्या बऱ्याच कॅटेगरी आहेत, अगदी दीड किलोमीटर पासून ते फुल मॅरेथॉन पर्यंत. ही माझी पहिलीच बेअरफुट मॅरेथॉन असल्यामुळे मी फक्त 10km साठी रजिस्टर केले होते. खरंतर या मॅरेथॉनची थीम' Reconnect yourself with the mother earth’ अशी आहे,याचा प्रत्यय खरोखरच आला. या इव्हेंट मध्ये कुठेही सिंगल युज प्लास्टिकचा वापर केला नव्हता. रनिंग साठी वापरण्यात येणारी बीब(BIB) ज्युटपासून तयार केली होती आणि फिनिशर मेडल हे नारळाच्या करवंटी पासून तयार केले होते. कुर्गच्या गुलाबी थंडीमध्ये सकाळी, गुळाची कॉफी चाखता आली तीही नारळाच्या करवंटी पासून तयार केलेल्या कपामध्ये. त्या लाँनमध्ये अनवाणी चालण्याचा अनुभव खूप सुखद होता, थोड्या वेळासाठी का होईना पण कुठेतरी निसर्गाशी जवळीक साधता आली.
मॅरेथॉन ची सुरुवात विशेष पूजा करून करण्यात आली. कोडगू प्रांतामध्ये वाहणारी कावेरी नदी तिची प्रार्थना करून आशीर्वाद घेण्यात आला. विशेषता , धावपटूंचे एका पांढराशुभ्र कपड्यावर, माती आणि हळद यांच्यापासून तयार केलेले मिश्रणापासून फुटप्रिंट घेण्यात आले. बरच काही नवीन असे या मॅरेथॉनमध्ये पाहता आलं. वॉर्म-अप साठी खास कुर्गी पद्धतीचं संगीत सगळ्यांनाच पायाचा ठेका धरायला लावत होत. थोड्याफार फरकाने सगळ्याच रनिंग कॅटेगरीचे फ्लॅग ऑफ झाले. माझ्यासाठी ही जरी पहिलीच वेळ बेअरफूट मॅरेथॉन असली तरीही थंड अशा कॉफी ईस्टेट मधून जाणारया रस्त्यावर धावण्याचा अनुभव अवर्णनीय होता. मंगरूल सारख्या दमट वातावरणमधुन आलेल्या लोकाना अशा थंडीच फारच विशेष.
खरंतर, हा लेख लिहिण्याचा उद्देश म्हणजे अशा इव्हेंट्स आपल्याला, काही व्यक्ति भेटतात किंवा दिसतात जी आपल्या आयुष्यावर थोडाफार प्रभाव टाकून जातात. वय, एखादा हाय प्रोफाईल जॉब किंवा पैशाचा अभाव त्यांच्या पॅशनच्या आड येत नाही .
याचा पहिल उदाहरण म्हणजे उषा सोमण aunty, वय 80 च्या वर पण आजही त्या त्यांच्या मुलाबरोबर push-up करू शकतात त्याची झलक थोडी फार बघितली. एक दोन वर्षांपूर्वी युट्युबवर संदक-फु, ट्रेक बद्दल बघत असताना त्यांचा संदक-फु समिट व्हिडिओ बघितला होता, तेव्हापासून त्यांना भेटायची खूप इच्छा होती. या मॅरेथॉनच्या निमित्ताने ती पूर्ण झाली. वयाचं कारण न देता अशी मनस्वी आयुष्य जगणारी माणसे भेटली मग आपल्यालाही आपले फिटनेस गोल अवगत करायला अजून बळ येतं.
भारतातले बेअरफूट धावपटू म्हणून ख्याति असलेले बॉबी सर यांना पहिल्यांदाच पाहता आलं आणि त्यांच्याशी बोलताही आल. जवळपास एक दशकापूर्वी ज्यांना 400 मीटर धावायला ही अवघड जात होतं , पुढे काही वर्षांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे त्यांनी Boston मध्ये बेअरफूट रनिंग करून काहीतरी विशेष केलं होतं आणि कुर्ग मध्ये ते प्रत्येक वर्षी बेअरफूट फुल/42.2KM मॅरेथॉन करतात. खरंतर एखादा हाय प्रोफाईल जॉब असताना आपल्या पॅशनसाठी, इतका वेळ देणारे खूप कमी लोक असतात.
या मॅरेथॉनमध्ये भेटलेली तिसरी व्यक्ती की जी मनात कुठेतरी घर करून गेली ती म्हणजे माधव सर. वय जवळ जवळ सत्तरी कडे झुकलेलं किरकोळ शरीर यष्टि. व्यवसाय रिक्षा चालक म्हणजे आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची पण तरीही यांना वेगवेगळ्या रनिंग इव्हेंट्स मध्ये भाग घ्यायची आवड. एक दिवस सुट्टी घ्यायची म्हणजे बरेच आर्थिक गणित चुकतं, त्याचबरोबर शाळेच्या मुलांची मुलांचे ने आण करण्याचे काम असल्यामुळे त्यालाही पर्याय जुगाड करावा लागतो. माधवसरांकडे स्पोर्ट्स वॉच नाही पण त्यांची रनिंग ट्रॅक करण्याची पद्धत खूप अजब आहे, रिक्षा चालवत असल्यामुळे रिक्षाच्या मीटरवर पडलेला रीडिंग लक्षात ठेवत ते रनिंग ट्रॅक करतात. खरतर त्यांच्यासाठी त्यांच स्मार्ट वॉच म्हणजे त्यांच्या रिक्षाचा मीटर. कधी कधी त्यांची ही आवड बघून कोणीतरी त्यांच्या इव्हेंटची फी भरते. या तिन्ही व्यक्ती अगदी वेगवेगळ्या सामाजिक स्तरावरून आलेल्या पण त्यांची फिटनेस किंवा रनिंग बद्दलची आसक्ती ती मात्र तितकीच तीव्र.
या सगळ्या अनुभवाच्या शिदोरीबरोबर आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे मिलिंद सोमण सरांबरोबर सेल्फी. तुम्हालाही सरांबरोबर सेल्फी घ्यायची असेल तर मग push-up करायच्या तयारीला लागा. .............. रेवती

Attachmentमाप
Image icon fb_img_1702835810381.jpg183.85 KB

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle