एक 'हकनाक' विवाह- विवाह चित्रपटाची पिसं

अनेक महिन्यांपूर्वी लिहून अर्धवट सोडून दिला होता. आज थोडी डागडुजी करून प्रकाशित केला. फक्त करमणूकीसाठी लिहिला आहे, चूभूदेघे. :)

----------------

विवाह नेटफ्लिक्स वर आलेला आहे, बघायचा असल्यास ....का पण?! तरीही मी बघतेय. कारण घरी कोणी नाही. रामायणातल्यासारखे संगीत सुरू झाले आहे, इंग्रजी वर्णनात Set up for an arranged marriage, a young couple enjoys an old-fashioned courtship, until an accident days before their wedding tests their nascent love. ह्या nascent चा अर्थ मी गुगलणार नाही , सरळ 'नाशवंत' असा घेणार आहे. रेटिंग १४ व जॉन्रा 'फिअर' आहे. यावरुन तुम्हाला खात्री पटेल की मी निर्भय असून कधीतरी पौगंडावस्थेत असते.

बाबूजी (आलोकनाथ) जे 'बाऊजी' म्हणून संबोधल्या जातात, हे नावाला जागून स्वगतात नेहेमी बाऊ झाल्यासारखे बोलत असतात. तरूणपणी यांना खऱ्याखऱ्या केसांचा टोप होता, (पाच मिनिटांत येणाऱ्या वर्तमानात) वय झाल्याने तो काढून ठेवला. हे सतत आपलं मुलगी म्हणजे पराया धन ,त्यांचं विश्वच वेगळं, पराया घराच्या मालकीणी , इथे छोट्या कळ्या- सासरी जगत्जननी असं 'रावणचहाकर' बाईंचं भाषणटाईप दुकानातली हिशेबाची लाल चोपडी वाटावी अशा वहीत लिहीत बसलेयतं. ( ह्यात चंडी, काली,दूर्गा, महिषासुरमर्दिनी या अवस्थांचा सोयीस्कर अनुल्लेख केला आहे.) हे स्वगत इतके मोहक आहे की शकिरा याविषयी आधीच ''Oh बाबू, When you talk like that, you make a woman go mad' आकाशवाणी करून गेली आहे. त्यामुळे हे पुढचं लेखन "mad woman" ने केलं आहे मी नाही.

ह्याच स्वगतात तो 'णम्रपणे' सांगतोय की तो एक मधुपूरचा छोटामोठा फळविक्रेता आहे. आमच्या घराजवळचा बागवान फार बदमाश होता, द्राक्षं घेताना नेहमी काटा मारायचा म्हणून माझा काही याच्यावर विश्वास बसत नाहीये. शिवाय एवढ्या बेताच्या परिस्थितीतही तो रोज शुद्ध नाही पण वनस्पती तुपात तरी नक्कीच स्नान करतो हेही दिसतेय. काही जणं चांगल्या तुपातली म्हणून डालडातली मिठाई विकतात , सुरज बरजात्यानी तेच केलेयं !! (मग आपण म्हणतो 'तेलातली घेतली असती तर निदान घसा तरी बसला नसता'.)

याचं आपल्या पुतणी व लेकीसाठी लग्न लावून 'विदा' करणे हे एकच स्वप्न आहे. शिक्षण-नोकरी वगैरे गोष्टी तेलभांडारवाल्यांच्या नायिकांसाठी क्षुल्लक आहेत. पिळणे आणि तळणे आले म्हणजे झाले. त्यात (पूनम-अमृता राव) पूमृता फार लाडकी आहे. तिला आईवडील नाहीत त्यामुळे ती तूपीकाकांकडे रहाते, आणि ती गोरी असल्याने व पोटची लेक 'छोटी/रजनी' सावळी असल्याने काकू (सीमा बिस्वास) पंधरा वर्षांपासून रूसलेली आहे व सारखं तिला फेसपॅक लावायला सांगत असते. खरंतर ती गोरी म्हणून तिचे नाव 'पूनम' व ही सावळी म्हणून हिचे नाव 'रजनी' ठेवून हे स्वतःच क्रिंज झाले आहेत. पूमृता एवढी गुणी व लाघवी आणि नियमितपणे पाय चेपत असूनही काकूंना काही माया येत नाही. काकूंचा मत्सर आणि असूया इतकी 'इंटर्नल' आहे की या 'रामायणा'त तीच फक्त खरी वाटते! छोटीचा मूळ रंग गोराच आहे बहुतेक, त्यावर एकजिनसी नसलेला काळा रंग फासला आहे. छोटीचा वावर गोड व एनर्जेटीक आहे. लहानपणापासून तूपीकाका पूमृताशी भावला-भावलीची शादी-शादी , डोली-डोली, लाल जोडा-लाल जोडा, बारात-बारात ई ई खेळत ब्रेन वॉश करत असतात. पूमृता काकांसोबत 'फळं विकू-फळं विकू' खेळत असते.

आता भगत (मनोज जोशी#कचरासेठ) या अरूंद गल्लीतून फटाक्यांपासून स्वतःला वाचवत येतो. इथेच तुम्हाला पहिला 'रेड फ्लॅग' दाखवल्या जातो. कचरासेठ दागिन्यांचा व्यापारी आहे म्हणून तो कन्यादानात दागिने लागतातंच वगैरे म्हणत 'हीहीही' करत बिझनेस बिल्ड अप करत डाकूकाकूंना बांगड्या दाखवतो. मग पूमृता सगळ्यांना 'जल लिजिये' म्हणत एकदम ग्लास तोंडासमोर धरत पाणी विचारते , साध्या पाण्याचे 'जल' म्हणून प्रमोशन केल्याने आपल्याला पूमृता फक्त गुणीच नाही तर सरळसरळ पवित्र आहे हे लक्षात येते. काकू बांगड्या घेऊन किंचित आनंदी झाल्याने कचरासेठला फुकटची रबडी गिळायला मिळते, तो मधुपूरची रबडी जगातली बेस्ट म्हणतो. तुम्हाला 'वर्ल्डस् बेस्ट दामाद मिळू देत' अशा शुभेच्छा देतो व पूमृता एवढी गुणी व रूपवान आहे की तुम्हाला आपल्या समाजातून स्थळं येतच असतील असेही बोलून दाखवतो , तर तूपीकाका म्हणतात," येतात होss, पण आजकाल वो वाले संस्कार कहां"! नेमके किती व कोणते हे दाखवण्यासाठी ते दोघे जेमतेम उंबरठ्यावरच असताना पूमृता ताबडतोब भजन गात संस्कारांचे थेटप्रक्षेपण सुरू करते. ते बघून तिला श्रीमंत घरचा व्हिजा मिळतो. हरीश्चंद्र ( अनुपमखेर #डॅडीकूल ) नावाचे 'उंचा खानदान'चे सद्गृहस्थ आहेत व पूमृतेसाठी त्यांचा मुलगा 'प्रेम (शाहीद कपूर# शाहीपनीर-सारखे-शाहीप्रेम)' तोडीसतोड तुपकट आहे हे कचरासेठ आपल्याला ऐकवतात. चालायचंच ... कुणीतरी म्हटलंय तसं , ''उंचे लोग उंची पसंद"! पण बाऊजी विव्हळतात," ते एSवढे तुपकट त्यांच्यासमोर तर आम्ही जणू तेलकटंच, हा रिश्ता कसा तळायचा म्हणजे जमायचा." तरी बाऊजी पूमृताचा फोटो कचरासेठला देतात.

पूमृता जे लाजायला सुरू करते की ज्याचं नावं ते, तिचा तर जन्मंच लग्न करण्यासाठी झालाय म्हणां. मगं ती लाजतेच आहे तर छोटीलाही तिला 'सुन, सुन, सुन दीदी तेरे लिये एक रिश्ता आया है' टाईप गाणं म्हणत चिडवावंच लागतं. या दोघी बहिणी चिडवाचिडवी करत गच्चीवर पकडापकडी खेळताहेत. पूमृता नाचाच्या नावाखाली 'गाय म्हणाssली,
गाय म्हणाली अश्शा अश्शा शेपटीने मी वारीन माश्या
गाय म्हणाली अश्शा अश्शा
शेपटीने मी वारीन माश्या
घोडा म्हणाsला
घोडा म्हणाला ध्यानात धरीन ध्यानात धरीन
मीही माझ्या शेपटीने असेच करीन असेच करीन' जास्तच झालं हे, असो.. असू देते. तर पूमृता या स्टाईलने ओढणी हलवत पळतेय. या दोघींचं होईपर्यंत मी 'मेरे सैयांजीसे आज मैने ब्रेकप कर दिया' ऐकतये.

हा रिश्ता अर्जंट नाही हे न कळल्याने कचरासेठ दिल्लीला पोचल्याबरोबर स्वतःच्या घरी न जाता फोटो घेऊन तडक डॅडीकूलना भेटायला आला आहे. ते एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतात पण आपण नवीन आहोत म्हणून ते आपल्यासाठी तेचतेच बोलतात. इथे अतीश्रीमंत डॅडीकूल आपल्या नातवासोबत सुटाबुटातच शाळेचा रंगवण्याचा गृहपाठ करत बसलेयतं, बागेतल्या फर्नीचरनी घर सजवलेय. पडदे निळे-सोफा लाल, एका बाजूला जमिनीवर पितळी सुरई, मागे अजिंठाच्या लेणीचा फोटो ठेवलेला आहे. हे बघून मला ते श्रीमंतही वाटत नाहीत आणि चोखंदळही ! डॅडीकूल यांना दोन मुलं, त्यापैकी एक मोठा व दुसरा छोटा आहे ही माहिती याठिकाणी आपल्याला मिळते. आता तुम्हाला वाटेल यात काय माहितीये, 'हे जुळे तर नाहीत नं' ही माहिती!

मोठयाचे (समीर सोनी#मलईकोफ्ता, आपण कसं शाहीपनीर ऑर्डर केलं की ,'मलई कोफ्ता नको सारखंच होईल दोन्ही' म्हणतो तसंच आहे हे बंधुद्वय! ) लग्न त्याच्याच बायकोशी कधीच झालेले आहे व त्यांना एक गृहपाठ वेळेवर न करणारा मुलगा आहे. आपल्याला तेवढाच एक 'विवाह' कमी बघितल्याचं समाधान!

मलईकोफ्त्याची बायको 'भाभी' आहे , जी फक्त भाभीच आहे. ती फेसलेस, सुंदर, आनंदी व गृहकृत्यदक्ष आहे. ही दहा वर्षानंतरची पूमृताच आहे. इथेच पिक्चर संपवला तरी चालेल किंवा सुरूच केला नाही तरी उत्तम. पण एवढं कुठलं आपलं नशीब! आता वेगवेगळ्या सीन्स मधे कचरासेठला गुंतवून ते किती श्रीमंत आहेत हे आपल्याला हाताखालच्या कर्मचाऱ्यांची संख्या, बिझनेस टाईम्स, नाश्त्याचे सिरिअल व स्क्वाशबद्दल बोलून सांगितलेले आहे, घर नीट सजवलं असतं तर ह्याची गरजच पडली नसती. डायनिंग टेबलच्या मागेही एक सुरई दिसतेय , ती बाहेरचीच उचलून आणलीये की वेगळी आहे हे मी बघणार नाही. प्रत्येक रूममधे एक सुरई का लागते यांना ?! सगळेच अतिशय आनंदात आहेत व एकमेकांवर प्रेम करत आहेत, मला अर्थातच 'प्यार आणि अपनापन' तालिबान्यांप्रमाणे बोअर व्हायला लागल्याने मी पळवत आहे.

सूट घातलेले बाबुजींचे व्हर्जन शाहीदला 'लग्न कर, लग्न कर' म्हणून मागे लागले आहेत. तो म्हणतो 'एवढी जल्दी कशाला' ते म्हणाले 'तुझ्या भैय्याची व माजीबी जल्दीच झाल्ती'. त्यामुळे तुला किती छान आई मिळाली, एवढी छान आई दुसरी मिळाली असती का ? हे काय लॉजिक आहे, त्याला कसं कळणार होतं वेगळी आई कशी असती ते..! हे एकदम आधुनिक पध्दतीने समजावले आहे त्यामुळे सारांश 'तेरे जैसे बड़े चौधरी देखे हैं मरजाणे,सॉन्ग सुना के इंग्लिश के जो डाले देसी दाणे' हा आहे. 

कट टू साखरपुडा -- 'काय बोलू काही कळत नाही' असे काही तरी गाणं मागे चालू आहे. गच्चीवर एकांतात प्रेम आणि पुनमला बोलायला सोडून भाभी खाली जातात. पुनम कायम 'खाली मुंडी पाताळ धुंडी' अवस्थेत खुसपुस करत असते.... पवित्र आहे ती. मग ती तिची आवडती पुस्तकं सांगते आणि तो विचारतो तुम्ही तर आध्यात्मिक पण वाचत असाल , इथं मला स्वतःवरच फिसकन हसू आलं. 

पूमृता बाऊजीला छोटी करवून म्हणते की 'वो स्थळ बिलकुल आप जैसा है. अरे देवा..! हिरवगार सरबत पाजवून काकू किरकिर करायला बाऊजीला कोपच्यात घेते. डॅडीकूल मधेच कडमडून म्हणतात 'आम्हाला सव्वा रू आणि नारळ चालेल'. साखरपुडा पार पडतो. सोमसरोवरला आमंत्रित करून सगळे आपापल्या घराकडे जातात.

कट टू सोमसरोवर- गावातील कोठी मग पुन्हा 'सुन सुन दीदी तुझा रिश्ता कडमडलाय' भाग २. तुकड्या तुकड्यात बघूनही असह्य होत आहे. वळणावळणाच्या रस्त्यावरून रिश्ता येतोच आहे -येतोच आहे. पूनम लाजतेच आहे- लाजतेच आहे. पुन्हा 'जल लिजिये' कार्यक्रम आहे. जळजळ होते आहे. पूमृता म्हणते सर्दी झाल्यावर थंड पाणी पिऊ नये हे ऐकून प्रेम पाणी ओतून देतो. किती गं बाई माझा आज्ञाधारक..!

काकू लाडू वळताना मदत म्हणून एक लाडू बाऊजींनी वळला आहे. सगळे जेवायला बसतात. ते बारकं पोरगं जरा क्रीपी आहे. थाळीकडे विचित्र नजरेने बघू लागले. फक्त गृहपाठापुरतं नाही हे ! 

आता सगळे खाली गाद्या घालून झोपणार आहेत. तेवढ्यात लोटा घेऊन पू येते आणि काकांना सकाळी सकाळी तांब्याचाच लोटा लागतो म्हणते, अर्थात. थाळीला जागणारा, लोट्याला कसा मुकेल..!

स्वास्थ्य 'बनवायला' सकाळी सगळे फिरायला जातात व येताना जिलब्या खातात. शाब्बास! काकू कधी हसरी, कधी उदास, कधी दुसऱ्या ग्रहावरची दिसते. मग तरुण मंडळी एकटीच पिकनिकला जाते. भैय्या-भाभी यांचा सौम्य हनिमून सुरू होतो व प्रेम व पूमृता यांचे 'सत्संग' सुरू होते. प्रेम झेंडूच्या फुलांची माळ तिला घाल म्हणतो. अरे, आज काही दसरा नाही, पूनम काही गाडी नाही. 

पाऊस सुरु होतो पण संस्कारांच्या अदृष्य 'चॅस्टिटी बेल्टमुळे''मिलन अभी आधा अधुरा है' वाजवावं लागतंय. आता दोघेही लाजत मुरकत बघत बसले आहेत. आता रात्र झाली आहे 'प्यार आणि अपनापन' नंतर रोमॅन्स सुरु होऊन मला असह्य झाले आहे. 'मुझे हक है , तुम्हे हक है' .... परमेश्वरा... व्हाट द हक? हा 'हकहकाट' रात्रभर चालला. 

 सकाळी रिश्तापीप्स परत निघाले. पूमृता 'थंड पाणी पित जाऊ नकोस रे माझ्या राज्जा' म्हणत एक 'जल फॉर द गो' देते आणि स्वतः च पिऊन टाकते. हे उच्च प्रतीचे प्रेम बघून प्रेमला 'टडोज' होते.

-समाप्त का क्रमशः कुणाला माहीत.

©अस्मिता.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle