तुंगनाथ - देवरियाताल भाग-२

पुणे - डेहराडून विमान एकदम वेळेत सुटलं आणि वेळेच्या आधीच पोचलं. पुणे विमानतळावर आमची एक सहप्रवासी आणि टूर लीडरबरोबर ओळख झाली. बाकीच्या दोघींचं डायरेक्ट विमान नव्हतं, त्या ऋषिकेशला हॉटेलवर भेटणार होत्या रात्री.

डेहराडून ऋषिकेश कॅबने एका तासाच्या आत पोचलो. हॉटेलमध्ये चेक-इन केलं. गंगा आरती बघायची होती पण बाहेर पडायला 6:30 झालेले मग लक्ष्मण झुला बघायला गेलो. तो सध्या बंद आहे कारण नवीन पुलाचं काम चालू आहे. गंगेचं पहिलं दर्शन इथून झालं. वाटेत दुकानं बघत उगाच टीपी केला आणि हॉटेलवर आलो. प्रचंड उकाडा होता ऋषिकेशमधे.

उजवीकडे आहे तो जुना लक्ष्मण झुला - शेजारीच नवीन झुल्याचं काम चालू आहे -

aee44a70-302b-4d7c-8f5e-83c5b90f2f25.jpeg

उरलेल्या दोघीना ट्रॅफिक लागला होता मग आम्ही डिनर सुरु केलं. आमचं डिनर होईपर्यंत त्या फ्रेश होऊन आल्या, त्यांना वाटेत राम झुला आणि जानकी झुला दिसला होता. जानकी झुलावर छान लायटिंग दिसलं म्हणाल्या. तसे ८:४५-९ च वाजले होते मग आम्ही तिघिंनी राम झुला बघायला जायचं ठरवलं. टूर लीडर त्यांच्यासाठी थांबला होता, शेअर रिक्षा मिळतात असं कळलं होतं येताना सुद्धा. पण आम्ही एक रिक्षा थांबवून ठेवली. खरं अंतर अगदीच कमी होतं पण ट्रॅफिक वेडावाकडा होता, चालायला वैताग आला असता. रिक्षावाला म्हणे तुम्हाला कमीत कमी 1 तास लागेल बघायला - आम्ही आपल्या येतोच 10 मिनिटात म्हणून उतरलो.

राम झुल्यावर इतका भणाणता वारा होता, खाली वाहणारी गंगा नदी, थोड्या अंतरावर जानकी झुल्यावर लायटिंग, पाण्यात कोणी कोणी सोडलेले दिवे, कोणी पास झालं कि हलणारा तो झुला - फार मस्त अनुभव होता. संध्याकाळी इतकं उकडलं होतं आणि आता मस्त गार वारा. तिथून हलूच नये असं वाटत होतं. झुला पार करून पलीकडे गेलो. एक मंदिर बंद होतं पण बाहेरून छान दिसत होतं.

img_7127.jpeg

काठावर लहान लहान मुली दिवे विकत होत्या. दोघींकडून दिवे घेतले. त्यांनीच नदीत सोडले चपळाईने, आमच्या अंगावर नदीचं पाणी शिंपडून आम्हाला पवित्रही केलं :D

img_7128.jpeg

दीड तास आम्ही तिथेच होतो शेवटी रिक्षावाल्याचा फोन आला. आता गर्दीही कमी झालेली, एक पोलीस दिसल्यावर उगाच बरं वाटलं. पुन्हा वाऱ्यात हलणारा झुला पार करून अलीकडे आलो, रिक्षावाला म्हणे - कैसा लगा, म्हंटल खूप छान वाटलं.

शेवटच्या दिवशी जानकी झुल्यावर वेळेत गेलो आणि गंगा आरती बघायला मिळाली. त्या भागात फोटो टाकते.

हॉटेलवर येऊन नवीन दोघींशी थोडंफार बोलून रूम्स वर परत गेलो. दुसऱ्या दिवशी झिप लाईन आणि कुंड गावी - उत्तरकाशीजवळ पोचायचं होतं.

Keywords: 

वर
0 users have voted.