दिवस 3 -
सकाळी उठलो तर लीडरचा मेसेज - पक्ष्यांचे खूप आवाज येतायत. तडक बाहेर गेले आणि merlin चालू केलं. पहिलाच great barbet identify झाला- जवळजवळ अर्धा तास पक्षी बघण्यात घालवला. एकदाचा barbet दिसला अधू डोळ्यांना :D माझी दुर्बीण खूप जड आहे म्हणून आणली नव्हती, ते एक चुकलं. अर्थात दुर्बीण असती तर मी कदाचित हलले नसते तिथून कारण दिवसभर पक्षी दिसत होते रिसॉर्टवर. गंमत म्हणजे जो verditer flycatcher बघायला सिंहगड valley मधे जावं लागत तो असा समोर दिसत होता. बरोबरच्या 5 जणांना पण ज्ञानी करून टाकलं :D सकाळ संध्याकाळ जेवढा वेळ रिसॉर्टवर होतो तेवढा वेळ merlin ला कामाला लावलं होतं. Merlin app वर रेकॉर्डिंग चालू करून कोणते कोणते पक्षी आसपास आहेत ते कळतं. नवीन ठिकाणी फार उपयोगी आहे. एका वेळी 7-8 पक्षी मिळायचे merlin ला, कुठे बघू असं होत होतं.
हा ग्रेट बार्बेट -

आपल्या इथे coppersmith बार्बेट - मराठीत तांबट दिसतो.
Verditer Flycatcher -

वरील दोन्ही फोटो गूगल वरुन घेतलेले आहेत.
7 ला आवरून ब्रेकफास्टला सगळ्या जमलो. आंघोळ आदल्या दिवशी उरकून घेतली होती. मस्त गरम आलू पराठे, ब्रेड-बटर, पोहे आणि चहा-कॉफी असा मेनू होता. एवढ्या सकाळी खायची सवय नाही पण चालायचं होतं म्हणून थोडं थोडं खाऊन घेतलं.
सारी नावाचं गाव आहे जिथून देवरियाताल ट्रेक चालू होतो. महाभारतातले फेमस यक्ष प्रश्न ह्या ताल - तलावापाशी विचारले गेले होते असं गूगल सांगतोय :) चौखंबा नावाच्या शिखराचं ह्या तलावात प्रतिबिंब फार सुरेख दिसतं - पण सकाळी लवकर आणि पाणी क्लिअर असेल तर. सारी गावापासून 3 किमी चढून जायचं होतं. अंतर फार नव्हतं पण चढ जास्त आहे असं कळलं. आज आम्ही किती वेळात चढतोय त्यावर टूर लीडर आम्हाला जज करेल आणि उद्या किती लवकर बाहेर काढेल अशी आमची चर्चा झडली.
आमच्या रिसॉर्टपासून सारी गाव एक दीड तासावर होतं. कालच्या पेक्षा रस्ते लहान आणि सतत वळणं. वाटेत अनेक हिमशिखरं दिसली. गाडी लागणाऱ्या आम्ही 2 मेम्बर्स पुढे होतो त्यामुळे समोरून येणारी सगळी वाहनं कशी बिनधास्त येतायत हे बघून सारखं धस्स होत होतं. मागच्या तिघी मस्त निसर्ग सौंदर्य बघत - कॅमेऱ्यात टिपत होत्या. दुसरी गाडी लागणारी फक्त कॉफीवर आलेली, उपाशीपोटी तिला खूपच त्रास होत होता - कधी उतरतोय असं झालेलं तिला. ती आमच्यात सगळ्यात मोठी होती वयाने आणि तीच दोन्ही दिवस पहिली पोचली.
प्रवेशद्वारापाशी पोचलो, आमच्यातल्या एकीकडे काठी - डीकेथलॉन मध्ये मिळणारी स्टिक नव्हती आणली तिच्यासाठी बांबू भाड्याने घेतला. जवळ जवळ 8:45 ला चढायला सुरुवात केली असेल. जास्त गर्दी नव्हती त्यामुळे मोकळेपणाने आपल्या आपल्या पेसने सुरुवात केली. बऱ्यापैकी चढ होता आणि दम लागत होता. आमच्यातल्या तिघी जणी राज मार्गाने न जाता बाजूला जी मातीची वाट असते तो शॉर्टकट घेत पुढे गेल्या. मी, अजून एक जण आणि लीडर मागून चालत होतो. प्रत्येक वळणावर सावली दिसली कि थांबायचं, बसायचं नाही असं चालू होतं. वाटेत खूप पक्ष्यांचे आवाज येत होते पण ऊन झाल्याने दिसत नव्हते. Merlin app ला रेंज नसल्याने कुठले आहेत तेही कळत नव्हतं.

वाटेत एक सुंदर शिव मंदिर लागलं. उघडलं नव्हतं म्हणून उतरताना दर्शन घेतलं

तुरळक लोक चढत होती त्यामुळे झिगझॅग चढत जाता आलं. वाटेत stalls होते 4-5 पण वॉशरूमची सोय नव्हती. वर पोचल्यावर एका टपरीवर चहा/खाणं घेतलं तर वॉशरूम उघडून देतात असं कळलं.
शेवटी शेवटी उतार-चढ करत तलावापाशी पोचलो. पाऊस पडत असल्याने नितळ पाणी नव्हतं, माती दिसत होती पाण्यात. चौखंबा शिखरावर थोडे ढग होते, आजूबाजूची हिमशिखरं छान दिसत होती. तलावापाशी जरा बसलो, फोटो काढले आणि तलावाला प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा मार्गावर दोन्ही बाजूंना मस्त झाडी होती. जंगलातून चालल्यासारखं वाटत होतं. प्रदक्षिणा घातल्यावर हिरवळीवर बसलो. सटरफटर आणलेलं तोंडात टाकलं. वॉशरूम ब्रेक घ्यावा लागणार होता.


प्रदक्षिणेची वाट -



उतरायला सुरुवात केली आणि जवळच्या टपरीवर चहा-सरबत + वॉशरूम ब्रेक घेतला. भूक पण लागायला सुरुवात झाली होती :D उतरताना सगळे एकत्र होतो, थोडेसे शॉर्टकट्स घेत होतो मधेच. गप्पा टप्पा करत शिव मंदिरापाशी आलो. शूज काढायचा कंटाळा म्हणून मी बाहेरहूनच दर्शन घेतलं. नेहमीचा प्रश्न - इतक्या उंचीवर दगड आणले कसे, बांधकाम केलं कसं असेल - पडले आणि पृथ्वीवर माणूस उपराच पुस्तकाची आठवण झाली :)
सारी गावात फार काही हॉटेल्स दिसली नाहीत म्हणून on the way थांबायचं ठरवलं. एखादं चांगलं हॉटेल दिसून थांबा म्हणेपर्यंत चालककाका पुढे कुठेतरी थांबायचे - शेवटी लीडर त्यांच्या शेजारी बसून राहिला आणि सर्वानुमते एक दरीचा चांगला view असलेलं ठिकाण फायनल केलं :D
बरोबरीच्या दोघी पट्टीच्या मांसाहारी आणि चारधाम यात्रा चालू असल्याने त्यांना कुठेही अंडंही मिळत नव्हतं. त्या म्हणे काहीही ऑर्डर करा सगळं सारखंच आम्हाला :D पावसाळी हवा झाली होती त्यामुळे गरम गरम दाल खिचडी, पापड असं घेतलं. रिसॉर्टवर पोचलो कि चहा हेही तिथेच ठरलं :) पुन्हा एकदा वळणंवळणं करत रिसॉर्टवर पोचलो. Rooms वर जाताना उतारावर पाय बोलायला लागले, वाटेतच डायनिंग एरिया लागत असल्याने आधी चहासाठी तिकडे शिरलो. पावसामुळे लाईट गेलेत असं कळलं. रूममध्ये 2-3 लाईट्स, एक चार्जिंग पॉईंट असं inverter वर होतं पण हिटर चालणार नव्हता. चहा घेऊन रूमवर गेलो, जरा फ्रेश होऊन पुन्हा पक्षी शोध मोहीम सुरु केली :)
मधेच लाईट आले तेव्हा हिटर लावून आंघोळ करून घेतली. पुन्हा चहाचा राऊंड झाला आणि लाईट गेले. रूम्स होत्या तिथे आजूबाजूला झाडी असल्याने डास होते मग त्यांच्या डायनिंग एरियात जाऊन बसलो - पत्ते गप्पा टप्पा करत 8 वाजता जेवण झाल्यावरचं रूम्सवर परतलो.
दुसऱ्या दिवशी ट्रिपचा महत्वाचा टप्पा तुंगनाथ - चंद्रशिला होता, 6 चा call time होता, अर्ध्या तासात ब्रेकफास्ट करून packed lunch घेऊन 6:30 वाजता निघायचं होतं.
