तुंगनाथ-देवरियाताल भाग-५

दिवस - 4

आदल्या दिवशी आंघोळ केल्यामुळे सकाळी कपडे बदलणे, पाणी आणि ORS च्या बाटल्या घेणे एवढंच काम होतं. 5 ला उठून अर्धा तासात आवरलं आणि अर्धा तास merlin ला कामाला लावलं. आपल्या इथे नेहमी दिसणारा magpie robin तिकडे क्वचित दिसणारा ह्या कॅटेगरीमध्ये होता. Warbler आणि Canary Flycatcher चा आवाज येत होता पण ते इतके बारके पक्षी आहेत आणि पिवळा रंग, झाडात कुठे लपले होते कोण जाणे.

शार्प 6 ला सगळ्या जणी ब्रेकफास्टला जमलो. Packed lunch ताब्यात घेतले. पुरी भाजी, ब्रेड-बटर असा बेत होता. थोडंसं खाऊन घेतलं आणि 6:30 ला प्रस्थान केलं.

चोपटा गावातून तुंगनाथ ट्रेक चालू होतो. तुंगनाथ हे पंचकेदार पैकी एक आणि सर्वात जास्त उंचावरील शिव मंदिर आहे. पायथ्यापासून तुंगनाथ मंदिर 3.5 किमी तर चंद्रशिला समिट अजून पुढे 1 किमीवर आहे.

आमच्या रिसॉर्टपासून चोपटा कालपेक्षा जास्त अंतरावर होतं. चोपटापासून काही अंतरावर गाडी थांबवावी लागली आणि पुढे स्थानिकांच्या गाडीने जावं लागणार असं कळलं. आम्ही 6 जण असल्याने एका गाडीत बसून गेलो. पायथ्यापाशी ही गर्दी जमलेली होती. त्यातून घोड्यांच्या लिदीचा भयाण वास. प्रवेशद्वारापाशी गर्दी आणि त्या वासामुळे फोटोबिटोच्या भानगडीत न पडता तडक चालायला सुरुवात केली.

आज शांतपणे चालता येणार नाही हे दिसत होतं. सतत आजूबाजूला माणसं आणि मधेच घोडे, पालख्या. घोडा आला कि डोंगराच्या बाजूला जायचं, घोडा दरीच्या बाजूने जातो अशी माहिती मिळाली. पालखी म्हणजे वाहणाऱ्या लोकांवर अत्याचार आहे. ती पालखी मुळात जड त्यात तो माणूस बसलेला आणि 4 जणांनी पालखी वाहायची, लहानपणी चारधाम केलेलं तेव्हाचं बाकी काही नाही पण पालखी आठवत होती. तेव्हा तर बिचारे बोलून लोकांना बाजूला करायचे वाटेतल्या. आता मोबाईलवर गाणी लावलेली होती, जोरात गाणी ऐकू आली कि पटकन बाजूला होयचं, घोडे एकापाठोपाठ एक होतेच सारखे. झिगझॅग चालणं शक्यंच नव्हतं.

आज आमच्या सि. चांदेकरने एक मंत्र दिला की दम लागत असेल तर अगदी हळूहळू चाला, जरासा दम लागला तरी लगेच थांबू नका, शरीराला सवय होईल त्या पेसची आणि दम लागणं कमी होईल. त्याप्रमाणे करायचं ठरवलं. आमच्यातली सिनियर मोस्ट होती ती कधीच पुढे गेली होती. आम्ही चौघी आणि सि. पुढे मागे होतो. एखादी थांबली पाणी प्यायला कि सगळ्या लगेच chance मारून थांबून घ्यायच्या :D पण कालसारखं थांबायचं ठिकाण ठरवत नव्हतो सारखं सारखं त्यामुळे सलग चाललं जात होतं. गंमत म्हणजे एक तरुण मुलांचा ग्रुप होता ते तर धापा टाकत जागा मिळेल तिकडे बसत होते. त्यांना कधीच overtake केलं. कालसारखा पायवाटेचा एखादा शॉर्टकट घेत होतो. नेमकं तेव्हाच एकीला cramp आला आणि सि. तिच्याबरोबर थांबला, आम्ही थोडे पुढे होतो. आम्हाला काहीच कल्पना नाही तिला काही झालंय - आम्ही शॉर्टकट घेत पुढे जात होतो. एक दोनदा मागे वळून पाहिलं तर दोघे दिसत होते मधेमधे. शॉर्टकट जरा वळून असल्याने आम्हाला खालचं दिसत होतं, थोड्या वेळाने त्याचा फोन - आहात कुठे, त्याला वाटलं आम्ही मागे आहोत त्यामुळे तो थोडं अंतर उतरून गेला होता. आम्ही पुढे पोचलेलं बघून त्याला आश्चर्यमिश्रित आनंद झाला असणार :P

जिला क्रॅम्प आलेला ती त्रास होत असून चढत होती. वाटेत काही तरुणांचे ग्रुप्स वाट्टेल ती गाणी स्पीकरवर लावून ध्वनीप्रदूषण करत होते. मुळात हातात काठीशिवाय काही धरू नये असं झालेलं असताना हातात स्पीकर बघूनच मला कमाल वाटली. घरीही मोठ्ठ्या आवाजात टीव्ही नको होतो, इथेही गाणी नको वाटत होती म्हणजे वय झालं असं वाटायला लागलं :D

चालून चालून थंडी कमी झाली आणि जॅकेट उतरवलं गेलं. पाठीवरचं ओझं कधी कमी होतंय असं झालेलं असताना हे ऍडिशनल ओझं आलं. तरी सारखं पाणी पीत होतो कारण बाटल्यांचं वजन मॅक्स होतं.

वाटेत हे मंदिर दिसलं

1feb09a9-522b-423b-9eb6-769ff94b4368.jpeg

पण त्या 5 पायऱ्या extra चढायलाही नको झाल्या म्हणून बाहेरूनच नमस्कार केला :D आता पाय बोलायला लागले होते. मधेच मोठे दगड लागले तर टेकत तरी होतो. एकदाचा मंदिराचा परिसर दिसायला लागला आणि इतकं बरं वाटलं. पण actual मंदिर बरंच फिरून होतं. आम्ही 2 तास 50 मिनिटात मंदिरापाशी पोचलो. आदल्या दिवशीचं बघता विक्रमी वेळात पोचलो होतो :D

59d8b730-539f-4152-9a40-be4a74486721.jpeg

44d8d612-4a7f-4e29-9458-fee8e8b14f71.jpeg

दर्शनाला हि मोठी लाईन आणि पावसाळी हवा. दर्शन किंवा चंद्रशिला ह्यातलं एक काहीतरी होईल असं सि. चां. म्हणाला कारण पावसाच्या आत जास्तीत जास्त खाली पोचायचं होतं. दोघी जणी पुढे जायला नको म्हणाल्या म्हणून त्या लायनीत थांबल्या आम्ही तिघी आणि सि. चां. निघालो खरे पण थोडं अंतर गेलो तर चंद्रशिला पूर्ण ढगांमध्ये गेलेलं होतं. तिकडे पोचूनही आजूबाजूचं काही दिसलं नसतं, सि. चां. जायला तयार होता पण मग आम्हीच ड्रॉप केलं. आदले 2 दिवस पडणारा पाऊस बघता safely उतरणं आम्ही prefer केलं. मग दर्शन तरी घेऊ असा विचार करून सगळं सामान सि. कडे देऊन हात हलवत लायनीत त्या दोघी होत्या तिकडे घुसलो. छान दर्शन झालं. फोटो काढायला परवानगी नव्हती, बाहेरून फोटो काढला. फक्त देवापुढे पैसे ठेवू नका, सनई चौघडे सदृश वाद्य वाजवणार्यांना पण द्या अशी शिस्तीत अनाउन्समेंट होत होती, आम्ही नेमक्या फक्त फोन घेऊन आलेलो.

दर्शन झाल्यावर तिकडेच दरीपाशी हिरवळ होती त्यावर बसून आणलेलं जेवण उघडलं. एकजात सगळ्यांचं सँडविच पार गोळा होऊन गेलेलं. पण इतकं टेस्टी लागलं :) रोटी-बटाट्याची भाजी, फ्रुटी सदृश पेय आणि kitkat असा खाऊ होता. भाजी संपली पण सगळ्यांच्या रोट्या उरल्या. आमच्यातली एक कुत्रा प्रेमी होती, दिसेल त्या कुत्र्याशी जाऊन बोलायची, त्यांच्या अंगावरून हात फिरवायची. ती म्हणे बघते कोणी खातंय का. आणि खरंच ती थोड्या अंतरावरच्या कुत्र्याशी बोलून आली, सगळ्यांच्या रोट्या तिने त्याला भरवल्या :) तो पण खाऊन झाल्यावर गेला निघून. सटरफटर लाडू, चिक्की पण तोंडात टाकलं.

उंचावर असल्याने हवा गार झालेली, पुन्हा जॅकेट चढवलं. आता सॅक जरा हलकी लागत होती. नव्या जोमाने उतरायला तयार झालो. मंदिराजवळ असलेल्या दुकानात फ्रिज मॅग्नेट, कडं वगैरे खरेदी केली. एक Paid washroom मिळालं तिथे जाऊन आलो. मधेच ऊन मधेच ढग असं चालू होतं. आम्ही उतरायला लागलो दुपारी 1 नंतर तेव्हा चढणारे आणि उतरणारेही घोडे होते त्यामुळे राजमार्ग सोडून पायवाटेवरून उतरायला लागलो.

img_2235.jpeg

5b9296c3-4db9-4d59-875b-ae0f8e04cbee.jpeg

594ae1d0-de93-4bfc-910a-a5972b524fe1.jpeg

0ef8f748-c6a2-49b8-8dd9-867bf02b52b7.jpeg

bcee83c2-34a7-493c-b56e-542a30325a51.jpeg

c576d65b-a08d-404b-a19d-b8bc7eea881e.jpeg

राजमार्ग म्हणजे दगडांची बांधलेली वाट आणि बाजूला माती+मधेच खडक असलेला शॉर्टकट. आरामात आजूबाजूला बघत फोटो काढत उतरत होतो. एका patch वर एक जण शॉर्टकट सोडून राजमार्गावर गेली. तिला खाली भेटतो असं सांगून उरलेले सगळे शॉर्टकटवरून उतरत होतो. खडक कोणाला कसे बरे पडतील त्याप्रमाणे अंदाज घेऊन वेगवेगळ्या ठिकाणाहून उतरत होतो. आमच्या मागे एका फॅमिलीचं बोलणं आम्ही सगळ्यांनी ऐकलं - पापा यहाँ से नाही जाते | मागे वळून कोण आहे वगैरे मी बघितलं नव्हतं. थोडा खडकांचा भाग झाल्यावर सपाटी होती तिथे आम्ही पोचलो नसू तोच एका बाईच्या लिटरली किंकाळ्या ऐकू आल्या - वळून बघतो तर मगाचचा पापा पडत होतो - अक्षरशः आम्ही त्या माणसाला लाईव्ह पडताना पाहिलं - 2 वेळा फ्लिप होऊन तो एका दगडावर आपटला आणि कोसळला. त्या बाईला बरोबरीच्यांनी शांत केलं. ती इतकी हिस्टेरिक झालेली ! त्याच्या कपाळावर जखम आणि रक्त दिसत होतं. तिचं ओरडणं, ते रक्त बघून मलाच कसतरी व्हायला लागलं, मी रक्तदान करते पण कोणाला रक्त आलेलं बघवत नाही. त्यांच्याबरोबर काही मोठे आणि त्यांची 2 लहान मुलं होती. तो माणूस कॉन्शस दिसत होता पण लागलेलं होतं. आमच्या लीडरकडे फर्स्ट एड किट होतं पण आम्हाला सोडून त्याला जाता आलं नसावं, आम्ही थांबतो हवं तर एका जागी असं म्हणालोही त्याला.पण बऱ्यापैकी स्थानिक लोक मदतीला गेले होते त्या माणसाच्या मग लीडर गेला नाही. त्या माणसाला लवकरात लवकर खाली नेणं आवश्यक होतं. आमच्यातली एक म्हणाली त्याची मुलगी जाऊया नको म्हणत होती ह्या रस्त्याने तरी त्याने सगळ्यांना इथूनच आणलं. तो आमच्या मागेच होता पण मग आम्ही हळू उतरत होतो म्हणून तो थोडासा लांबून उतरायला गेला का काय कोण जाणे.

तो सगळा एपिसोड झाल्यामुळे आता नो शॉर्टकट असं सर्वानुमते ठरलं. लीडरही म्हणे सगळ्या एकत्रच राहा आता. राजमार्गाने आलेली मैत्रीण भेटली - तिनेही चर्चा ऐकली होती एक माणूस पडल्याची Sad थोडावेळ त्या बाईचा आवाज कानात घुमत होता. थोडं अंतर गेलो आणि मागून एका घोड्यावर तो माणूस दिसला बसलेला - जखम सोडता स्टेबल वाटत होता. बघून जरा बरं वाटलं. त्याच्या मागे बायको मुलं चालत उतरत होते. बायको इतकी शॉकमध्ये होती कि मुलांकडे लक्षचं नव्हतं. मोठी मुलगी धाकट्याचा हात धरून रडत रडत जात होती. निदान तो माणूस घोड्यावर बसण्याइतपत ठीक होता हे बघून बरं वाटलं.

जवळजवळ 2-2:30 वाजले होते आणि ह्यावेळी चढणारे लोक बघून हे वर मुक्काम करणार असतील वगैरे आम्ही अंदाज लावत होतो. आम्ही मराठीत बोलत होतो ते एकून एका 60s मधल्या मराठी ग्रुपने वर जाऊन परत खाली यायला किती वेळ लागेल असं विचारल्यावर आम्हालाच काळजी वाटायला लागली. निदान 5 तास तर लागलेच असते, वाटेत लाईटची सोय काही दिसली नाही.

अर्ध्या तासात प्रवेशद्वारापाशी पोचलो. आधीचे 2 दिवस पडलेला पाऊस आजच्या दिवशी फिरकलाही नाही.

आधी राहिलेला फोटो इथे काढून घेतला.

fc89d916-ed67-492f-95e5-471bac25cce3.jpeg

स्थानिकांच्या गाडीतून आमच्या गाडीपर्यंत गेलो आणि अगदी बारीक पाऊस सुरु झाला. पुन्हा दीड एक तासाचा प्रवास करून रिसोर्टवर पोचलो. रूमवर चहा मागवला आणि आंघोळी करून घेतल्या. घरी फोन, फोटोंची देवाणघेवाण, पक्षी निरीक्षण करत जेवायची वेळ झाली. जेवायला जायला १०-१२ पायर्‍या चढताना सगळ्या आ-ऊ करत होतो पण ट्रेक पुर्ण केल्याचा आनंद होता. बहुतेक सगळ्यांनीच चन्द्रशिला ऑप्शनला टाकल्याने ते झालं नाही ह्याचं फार वाईट वाटलं नाही :ड
देवरियातालच्या तुलनेत कमी वेळात जास्त न थांबता चढलात आणि उतरलात अशी सि. कडूनही पावती मिळाली.

आता दुसर्या दिवशी ऋषिकेशला परत जाताना राफ्टिंग करायचं होतं.

Keywords: 

वर
0 users have voted.