दिवस 5 -
आदल्या दिवशीच बॅग भरून ठेवली होती आणि आंघोळही उरकलेली होती. आज गंगेत पापं धुवून घ्यायची होतीच नंतर :P
शेवटचं merlin on केलं आणि काय आश्चर्य - स्वर्गीय नर्तक - indian paradise flycatcher चा आवाज capture झाला. ह्यालाही बघायला सिंहगड valley मधे जाणं होतं. पांढरी शेपटी शोधायला सुरु केलं पण झाडीत काही दिसत नव्हतं. निघेपर्यंत मी त्याला शोधत होते. Male नाही female दिसली असती तरी अत्यानंद झाला असता. ग्रेट बार्बेट मात्र एकदम जवळून दिसला.
बॅग्स खोलीबाहेर ठेवून ब्रेकफास्टला गेलो. आजही 7:30 ला आवरलं होतंच. पहाटे लवकर उजाडत असल्याने सकाळी भरपूर वेळ मिळत होता. आपल्यापेक्षा पातळ पण टेस्टी उपमा आणि पनीर पराठा होता. सि. च्या मते राफ्टिंग म्हणजे जणू गंगेत बोट राईड होती, काही घाबरू नका म्हणे, आजूबाजूला छान बघत बघत जाऊ आपण. पोहायला येत नसल्याने जरा धाकधूक होती पण निदान झिपलाईन सारखं हवेत नसणार होतो, आजूबाजूला माणसं असणार होती आणि लाईफ जॅकेट असणार होतं.
आमच्या नॉनव्हेज प्रेमी मैत्रिणींचा कडेलोट झालेला होता 4 दिवस घासफूस खाऊन. सि. ने त्यांना प्रॉमिस केलं होतं कि आज लंच नक्की अशा ठिकाणी करू जिथे मिळेल नॉनव्हेज. रिसॉर्ट आणि पक्ष्यांना बाय करून निघालो. पुढच्या वेळी यायचं तर दुर्बीण घेऊनच असं ठरवलेलं आहे.
पुन्हा एकदा वळणवळण वाटेत संगम बघत ऋषिकेश गाठलं. एक हॉटेल नॉनव्हेज सर्व्ह करतंय असा शोध लावून ते गाठलं. 2 वाजता राफ्टिंगचा स्लॉट मिळाला होता. जेवून राफ्टिंगच्या स्पॉटपाशी गेलो. ऊन मी म्हणत होतं. एकदाचा इंस्ट्रक्टर आला.
सगळ्यांना लाईफ जॅकेट चढवण्यात आलं आणि सुरु झाला सूचनांचा भडीमार. दोन्ही पाय - पावलं राफ्टच्या आतल्या भागात सीट्स असतात त्याखाली रोवून ठेवायची होती. राफ्टला बाहेरून एक दोरी होती, करंटमधून जाताना ती धरा, पडलात तर राफ्टची हि दोरी शोधा आणि वर या, लांब असाल तर एक दोर टाकू तो पकडा , कयाक वाला दिसला पाण्यात असताना तर हे करा ते करा ह्यात कुठेही आम्ही तुम्हाला वाचवू असं काही तो म्हणेना :D
आम्ही सगळ्याच इतक्या महान कि राफ्टच्या edge वर बसतात हे कोणाच्या गावीच नव्हतं, मधे बसू का असा प्रश्न सगळ्यांच्या तोंडी होता पण तो गिळला :P आम्ही 5 + सि. + एक गुज्जू नवदाम्पत्य असे 8 जण एका राफ्टमध्ये बसणार होतो. पोहता न येणाऱ्या आम्ही दोघी सगळ्यात मागे इंस्ट्रक्टरच्या लगेच पुढे बसलो, मग गुज्जू कपल, मग पोहता येणाऱ्या 2 आणि सगळ्यात पुढे सि आणि आमची डॅशिंग मैत्रीण.
Edge वर बसवलं खरं पण आम्ही जास्तीत जास्त आत सरकून बसत होतो. तसं बसलात तर पडण्याचे चान्सेस जास्त आहेत कळल्यावर लगेच बाहेर सरकलो :P एकूण आमचा उत्साह बघता कुठून आणलं ह्यांना असं सि आणि त्या इंस्ट्रक्टरला नक्की वाटलं असणार.
Forward आणि backward वल्ह कसं चालवायचं ह्याचा डेमो आधी दिलेला त्याच प्रात्यक्षिक एकदा घेतलं आणि राफ्ट सुरु झाली. पहिल्याच करंटला कशी बोट उलटी झालेली काही दिवसांपूर्वी अशी खबर देऊन आम्हाला घाबरवण्याचं काम थापा (इंस्ट्रक्टर) साहेबांनी उत्तम पार पाडलं. आणि एकदाचं शिरलो त्या करंटमध्ये , थापा forward forward ओरडत होता, आम्ही कुठले मारतोय वल्ह - जीव वाचवत जास्तीत जास्त आत सरकून बसलो होतो , फक्त वल्ह सोडलं नाही एवढंच. राफ्ट लाटांमुळे जोरदार वरखाली उडत होती. अंगावर गार पाणी उडालं. मजा आणि भीती दोन्ही अनुभवलं. करंटमधून पार झालो आणि थापा साहेबानी analysis सुरु केला. कोणीही वल्ह मारत नव्हतं अशी तक्रार आणि तुमचा लीडरच कसा हवेत उडाला हि माहिती थापा साहेबांनी पुरवली. नंतर सि म्हणे मी हवेत उडालो तेव्हा पहिले मागे बघितलं कि तुम्ही 5 जणी ठीक आहात ना - त्याला काय सांगणार, आमचे बेस मजबूत असल्याने उडणं वगैरे शक्य नव्हतं :P पडलो असतो एक वेळ पण उडतोय कुठल्या :प
त्यानंतर 1-2 करंट अशाच पार पडल्या आणि मग संथ patch आला. पाण्यात कोणकोण उतरणार ह्यावर फक्त गुज्जू 2, सि आणि आमची डॅशिंग मैत्रीण तयार झाले. थापाने एकदा आम्हा चौघीना आग्रह केला पण नंतर नाद सोडून दिला. गुज्जू नवरा इतका महान होता - बायको डॉ आणि हा तिला थापाच सगळं बोलणं गुज्जूमध्ये भाषांतर करून सांगत होता. तेही दोघे पाण्यात राफ्टच्या 2 बाजूना असताना. सि आणि डॅशिंग मैत्रिण तर थोडं अंतर पोहले पण. दोघांनी backflip उडी काय मारली. आम्ही चौघी अजून किती करंट ह्या चिंतेत. पाण्यातल्या चौघांना थापाने ओढून वर घेतलं आणि अजून 5-6 करंट्स पार पडल्या. एकदाही पडू असं नाही वाटलं पण समोरून येणारी ती लाट बघून कुठे धरू असं व्हायचं. राफ्टची दोरी हा पार्ट मी साफ विसरले होते त्यामुळे सगळ्या व्हिडीओज मधे मी राफ्टची मधली slippery seat पकडताना आले आहे :P आजूबाजूच्या राफ्ट मधली मंडळी उड्या काय मारत होती, पाण्यात पाय सोडून काय बसत होती - मजा मजा चालली होती त्यांची.
एकदाचे करंट्स संपले. संथ पाणी आलं तरी आम्ही पाय रोवून बसलेल्या. शेवटी एकीचा पायाचा अंगठा दुखायला लागल्यावर तिने विचारलं काढू का पाय तर थापा म्हणे कधीच काढला असता तर चालणार होतं. आता सांगणार कोण आम्हाला. माझा पाय नाही पण हेल्मेट डोक्याला टोचायला लागलं होतं. एकदाचे लागलो किनाऱ्याला आणि उतरलो. उतरून जी हसाहशी सुरु झाली आमची. थापाच्या गोप्रो वर काढलेले फोटो-व्हिडीओ ताब्यात घेतले आणि हॉटेलवर जायला निघालो. काही करून आज गंगा आरती मिळवायची होती.

