मी तशी बर्यापैकी जुन्या आठवणींमधे रमणारी बाई आहे :) खास करुन लहानपणीच्या आठवणी. यामधे 'तो काळ विरुद्ध आजचा काळ' किंवा 'हा देश विरुद्ध तो देश' अशी कोणतीही तुलना नसते. माझ्यासाठी तो फक्त एक गोड nostalgia असतो. त्यामधे मला हमखास आठवण येते ती भारतात रहाण्याचा अविभाज्य भाग असलेली गोष्ट - रस्त्यावरुन येणार्या हाका, आरोळ्या, आवाज आणि त्यानिमित्तानी विविध लोकांशी होणार्या संवादाची.
माझ्या पिढीतल्या जवळजवळ सगळ्यांच्याच लहानपणीच्या आठवणीत त्यांच्या त्यांच्या भागात रस्त्यावरुन येणार्या हाका किंवा आरोळ्या नक्कीच असतील. आणि प्रत्येकाच्या काही ठराविक फेरीवाल्यांविषयी/विक्रेत्यांविषयी खास आठवणीही असतीलच.
मी लहान असताना पिशवीतल्या दुधाची पद्धत फारशी नव्हती. त्यामुळे रोजची सकाळची - म्हणजे आम्ही अगदी साखर झोपेत असताना - यायची ती पहिली हाक म्हणजे, "ताईऽऽ दूऽऽध". त्यापाठोपाठ आई किंवा काकूचा मुलांची झोपमोड होणार नाही इतपत हळूच आवाज यायचा "आलेऽ". आम्हाला अर्धवट झोपेत कळायचं, नुसतं "आलेऽ" म्हटलं की आईचा आवाज आणि "हो.. आलेऽ" म्हटलं की काकूचा आवाज. या दूधवाल्यांना आम्ही मुलांनी पाहिलेलं नव्हतं. रोज साखरझोपेत त्यांचा आवाज कानावर पडून काहीसा ओळखीचा झाला होता इतकंच! आमच्याकडे दुधाचा रतीब काही वर्षं चिमण्या गणपती जवळच्या गणेश डेअरी मधला होता. महिना अखेरीस कधीतरी मी आई किंवा बाबांबरोबर बिलाचे पैसे द्यायला जायचे. त्या काउंटरवरचे काका - पक्षी त्या डेअरीचे मालकच - घरोघरी जाऊन दूध घालतात, असं मला कितीतरी दिवस वाटायचं. पण सकाळी ऐकलेली "ताईऽ दूऽऽध" ही हाक आणि या काकांचा आमच्याशी बोलण्याचा आवाज काही जुळायचा नाही. मी एकदा न रहावून बाबांना विचारलंच ते! मी त्यावेळी असे अनेक 'डोक्यात हात मारणेबल' प्रश्न विचारत असल्यामुळे बाबांना विशेष काही वाटलं नाही. पण माझं शंकानिरसन झालं आणि दुधाचा रतीब घालणारे काका आणि डेअरीचे मालक ही दोन वेगळी व्यक्तिमत्व आहेत हे कळलं.
अशीच पहाटेची आरोळीची आठवण आहे श्रावण महिन्यातली. श्रावण महिना सुरु झाला की पहाटे पहाटे एक बाई खणखणीत आवाजात आरोळी देत जायची "आघाडा दुर्वा फुलंऽऽऽ". सोमवार ते शुक्रवार आम्हाला ही बाई फक्त आवाजातूनच ओळखू यायची. कारण इतक्या पहाटे आम्ही कशाला उठतोय! पण शनिवारी सकाळच्या शाळेमुळे लवकर उठलेलो असायचो, त्यामुळे बरीच वर्षं शनिवारी हिचा आवाज आला की खिडकीत जाऊन तिला बघून यायचे. आमच्या आजीच्या भाषेत काहीतरी मंत्रचळेपणा! श्रावण संपला की नंतर २-३ दिवस तिची हाक ऐकू आली नाही म्हणून चुकल्यासारखं व्हायचं.
रोज सकाळी साधारण १० वाजता यायचा आमचा भाजीवाला नारायण. पहिली काही वर्षं तो आणि त्याची आई डोक्यावर टोपली घेऊन भाजी विकायला यायचे. आणि नंतर अनेक वर्ष भाजीची गाडी ढकलत ते दोघं यायचे. तो रस्त्यावरुन ओरडायचा "ताई भाऽऽजीऽऽ". आमच्या गल्लीतल्या दर ३-४ वाड्यांनतर त्याचा हाक मारुन स्टॉप असायचा. त्याची हाक ऐकली की इकडच्या तिकडच्या वाड्यातली लोकं यायची त्याच्याकडे भाजी घ्यायला. त्याला का कोण जाणे, आमच्या सगळ्या मुलांमधे, माझ्या भावाचं - शैलेशचं - नाव आवडलं असावं कारण आमच्या वाड्याबाहेर आला की ताई भाऽऽजीऽऽ या हाकेनंतर त्याची खास हाक यायची “ए शैलेऽऽश!!!” ही "ए शैलेऽऽश!!!" हाक आमच्या १२६३, १२६४ सदाशिव पेठ या दोन्ही वाड्यांबरोबरच समोरच्या गद्रेवाड्यासाठी सुद्धा होती. त्याची ठरलेली सगळी गिर्हाइकं येऊन गेली की मग तो पुढे जायचा. त्यामुळे ताई भाजीऽऽ आणि ए शैलेऽश नंतर आमच्या या २-३ वाड्यांमधून "थांब रेऽऽ" किंवा "नारायऽऽण आज नको रे भाजी" असे आवाज इकडून तिकडून यायचे. आमची खिडकी त्यातल्यात्यात रस्त्याच्या जवळ असल्यामुळे मागच्या भागातल्या बाकीच्या बिर्हाडकरुंकडून "मनी... नारायणला थांबायला सांग" अशी हाकही माझ्यासाठी यायची. मजा म्हणजे मधला काही काळ आम्ही त्या वाड्यात रहात नव्हतो. हे नारायणलाही माहिती होतं. तरीसुद्धा नारायण आमच्या वाड्यापाशी आला की "ए शैलेऽऽश!!!" हीच हाक मारायचा.भाजी घ्यायला आलेल्या बायका आणि क्वचित एखाद दुसरा पुरुष - "भाज्या महाग झाल्या रे नारायण!" "मटारचा सिझन यंदा लवकरच संपवलास" वगैरे अशा अनेक गोष्टीत नारायणलाच जबाबदार धरायचे :) नारायण पण हे शांतपणे ऐकून घ्यायचा. बरेच दिवसात ती अमुक भाजी घेतली नाही ताई तुम्ही.. अशी आठवणही करायचा. कालांतरानी, मी कॉलेजमधे असताना वाडा पाडून इमारत झाली. आम्ही त्या इमारतीत जरा मागच्या बाजूला आणि चौथ्या मजल्यावर रहायला गेलो. नारायणला ओरडून थांबायला सांगायची आता सोय नव्हती. सुरुवातीला नारायण यायच्या वेळेला दर १-२ दिवसांनी आमच्यापैकी कोणीतरी खाली रस्त्यावर जाऊन उभं रहायचो. नंतर आता चार मजले उतरलोच आहोत तर भाजी घेऊनच जाऊ, असं म्हणून वेगळ्या भाजीवाल्यांकडे किंवा मंडईत भाजी खरेदी व्हायला लागली. नंतर वाढलेल्या ट्रॅफिकच्या आवाजात नारायणची हाक ऐकू येईनाशी झाली. त्यामुळे नारायणकडे जाणं बरंच कमी झालं, आणि मग ते बंदच झालं. वर्षभरापूर्वी शैलेश त्याच्या भारतवारीत घराखाली रस्त्यावर कोणाशी तरी बोलत उभा होता. शेजारी भाजीची गाडी आली आणि अचानक त्याला प्रश्न आला "शैलेऽश ओळखलंस का रे?" जवळजवळ ३० वर्षांनंतर शैलेशला बघूनही एका क्षणात नारायणनी त्याला ओळखलं होतं. शैलेशलाही इतका आनंद झाला! अतिशय उत्साहानी त्यानी नारायण बरोबर सेल्फी काढून आम्हाला सगळ्यांना पाठवला :)

नारायण सारखाच आमच्या घराजवळच्या चौकात एक मारणे नावाचा भाजीवाला असायचा. नारायणकडे पालेभाज्यांचे पर्याय फारसे नसायचे त्यामुळे आठवड्यातून एखादी चक्कर मारणे कडे पण व्हायची (मी अजूनही पुण्यात गेले की आवर्जून जाते मारणे कडे) एकदा अचानक मारणे काका नेहमीच्या त्याच्या ”ताऽऽजी भाजी घ्याऽऽ, पालेभाजी घ्याऽऽ, चवळीऽऽ, माऽऽठ, मेथीऽऽ...” असं ओरडायचं सोडून "मेथी मटर मलईऽऽ.... पालक पनीऽऽर" असं ओरडायला लागला. मी म्हटलं, काय हो, आज अचानक असं का म्हणताय? तर म्हणाला, हल्ली वाटतंय कुठे कोणाला साध्या पालेभाजीचं आकर्षण! असा काहीतरी मुलामा द्यावा लागतो ताई, तेंव्हा कुठे येतात लोकं पालेभाजी घ्यायला! एक काकू त्याला एकदा म्हणाल्या नको रे बाबा इतक्या पालेभाजीच्या गड्ड्या गळ्यात मारु... निवडून होत नाहीत हल्ली, वेळ किती लागतो. यावर त्याचं उत्तर तयार होतं - ताई एखांदी सिरियल कमी बघा.. पण पालेभाज्या खाणं कमी करु नका! आणि सिरियल बघता बघता तर अजिबात निवडू नका! एखादा किडा, आळी गेली तर कळायची नाही तुम्हाला त्या सिरियलच्या नादात!
आता अचानक हा संवाद कोणत्या नव्या भाजीवाल्या बरोबर झाला तर कदाचित मला विचित्र वाटेल, पण हा माणूस वर्षानुवर्ष माहित्ये, त्यामुळे मलाच काय, बाकी कोणत्या तायांनाही त्याच्याशी असा संवाद करण्यात काही गैर नाही वाटत.
नारायण आणि इतर भाजीवाल्यांच्या फेर्या झाल्या की मग डोक्यावर पेटी घेऊन एक खारीवाला ओरडत यायचा - खाऽऽरी... खारीवालाऽऽ. प्रत्येक वाड्याच्या आत जाऊन तो ओरडून यायचा. पण तेंव्हाही मला फारसं कधी आठवत नाही त्याच्याकडून आम्ही कोणी खारी घेतल्याचं. कारण आमच्या आजीच्या भाषेत या 'वाह्यात गोष्टीत' पैसे खर्च करायला फारसा वाव नव्हता. पण बिचारा रोज नेमानी येऊन ओरडून जायचा. (मला वाटतं तो अजूनही येतो सकाळी ११ च्या सुमाराला).
त्यानंतर दिवसभरात २-३ वेगवेगळ्या वेळांना वेगवेगळे भंगारवाले यायचे भंगाऽऽरवालेऽऽ भंगाऽऽरवालेऽऽ अशी हाक मारत.
पाटा-वरवंटा मधल्या पाट्याला टाकी लावून देणार्या पाथरवटांची आरोळीही यायची "पाट्याला टाकी लावाऽऽ बाऽऽई"... पाटा वरवंटा आईकडे अगदी आत्ताआत्तापर्यंत वापरात होता. पण पाट्याला टाकी लावून कधी घेत होतो का, ते स्मरणात नाही माझ्या.
हा खारीवाला काय किंवा भंगारवाला, पाथरवट काय, यांच्याशी कधी संवाद मात्र झाला नाही पण तरी त्यांचं नेहमी येणं, हाक मारणं हे आठवणींचा एक अविभाज्य भाग आहेच.
आमच्या लहानपणीपर्यंत तांबे-पितळ्यांची भांडी वापरात असायची. आमच्याही घरात होतीच पातेली. महिना-दोन महिन्यातून एकदा कल्हईवाला त्याच्या सायकल वरुन यायचा. कल्हईवाल्याची हाक जोरात यायची कल्हाऽऽऽऽई......एय कल्हईऽऽ वालेयऽऽ….
मग कोणी गिर्हाईक मिळालं की वाड्यात एका ठिकाणी तो बसायचा त्याचा संसार मांडून. मग बराच वेळ ते कल्हईचं हँडल फिरवल्याचे, पातेली गोल गोल सरकवायचे आवाज येत रहायचे.
दोन महिन्यातून एकदा दुपारी एक बोहारीण यायची. तिचं नावं होतं मालू. जुने कपडे देऊन मग त्या बदल्यात तिच्याकडून भांडी घेतली जायची. ती हाक मारायची - भांऽऽडऽईऽऽ..... येऊक्का वहिनी??" मग कोणाला तिला बोलवायचं असेल तर हाक जायची "ये ग मालू!" ही हाक आपल्याला कोणत्या घरातून कोणत्या वहिनीनी मारली हे तिला बरोब्बर कळायचं. मग ती ज्या घरात तिचा बारदाना मांडून बसली असेल, तिथून आवाज यायचे - हे भांडं नको, दुसरं मोठं दे - वहिनी मग अजून एखादी साडी काढा - इतक्या कपड्यात इतकंच येतं वहिनी - वगैरे वगैरे! नेहमीच्या अपेक्षित घरातून बरेच दिवसात हाक आली नाही की तिच्या personal हाका यायला लागायच्या. "मनीची आई, येऊ काऽऽ?", "मुक्ताची आई, येऊ का?" आम्ही चवथ्या मजल्यावर रहायला गेल्यावर आईला तिला वर यायला सांगायचं अगदी जिवावर यायचं. पण ती म्हणायची, येते हो मी वहिनी... तुम्ही नका कापडं घेऊन खाली उतरु. आता तिची मुलगी अजूनही क्वचित कधीतरी येते. आता कपडे देऊन भांडी घ्यायची अशी काही देवाणघेवाण अर्थातच नसते पण आईला आवर्जून हाक मारुन ती सांगते, "वहिनी...मनीताईला सांगा... तिची आणि मुलीची कापडं आणून ठेवा. कशी छान नव्या सारखी असतात!" यावर आमची आई तिला ऐकवते, "नसायला काय झालं नव्यासारखी? ४-६ वेळा घालून देऊन टाकते!" यावर मी आईला म्हणते की अगं मी कपडे चांगले नीट वापरते असा पण अर्थ होतो ना ह्याचा?? फक्त ४-६ च वेळा कशी घालीन? पण आईचा काही माझ्यावर विश्वास नाही बसत :)
वाड्यात होतो तोवर घरोघरी केर गोळा करायला रोज सकाळी लक्ष्मीबाई नावाची बाई यायची. अतिशय शांत आवाजात "बाईऽ.. केऽर" इतकीच हाक मारायची. तिला हो, ये आत असं म्हटलं की मोरीच्या पत्र्यावर ठेवलेली केराची बादली उचलून केर पोत्यात भरायची आणि बादली पुन्हा जागेवर ठेवायची. वाडा संस्कृती होती, दारं उघडीच असायची, पण तिला आत ये म्हटल्याशिवाय ती चुकूनही कधी आत आली नाही.
एक स्वच्छ धोतर नेसलेले, स्वच्छ झब्बा, टोपी घातलेले आजोबा यायचे ते आठवतंय. त्यांच्याकडे वातीच्या स्टोव्हसाठी लागणार्या वाती, पंपाच्या स्टोव्हच्या पिना वगैरे असायच्या (आमच्या पिढीनंतर कोणी हे २ स्टोव्ह पाहिले नसतील कदाचित). त्या आजोबांची मंजूळ आवाजात हाक यायची "स्टोच्या वाती स्टोच्या पिनाऽऽ... कंदीलवाती कंदील काचाऽऽ". आमच्याकडे माझ्या लहानपणीच्या आठवणीत हे दोन्ही प्रकारचे स्टोव्ह होतेच. वीजही नेमानी जात असल्यामुळे कंदिलाच्या वातीही सगळ्यांना लागायच्या. या छोट्या गोष्टींच्या विक्रीसाठी किती पायपीट करत असतील तेंव्हा ते आजोबा! काळाच्या ओघात पंपाचे आणि वातीचे स्टोव्ह आणि कंदीलही लुप्त झाले, तसे ते आजोबाही कधी दिसले नाहीत परत. चरितार्थासाठी नंतर काय करत असतील ते! मला आणि माझ्या दोन्ही भावांना कायम आठवण येते त्या आजोबांची.
मी ९ वर्षांची असताना आम्ही थोड्या काळासाठी पुणे आणि नगरच्या मधे असलेल्या शिरुर या गावी रहायला गेलो. तिथे आजूबाजुला बरीच मुस्लिम वस्ती होती. माझं आयुष्य तोवर सदाशिवपेठेच्या बाहेर न गेल्यामुळे इतर पद्धतींबद्दल काहीही माहिती नव्हती. तिथे गेल्यानंतर काही दिवसात एकदा भल्या पहाटेच्याही आधी अचानक जोरात आरोळी ऐकली "जागोऽऽ... जन्नत के दरवाजेऽऽ खुलेऽऽऽ".... आम्ही दचकून उठलो होतो. दुसर्या दिवशी कळलं की रमजानचा महिना सुरु झाला होता. हा महिना म्हणजे मुस्लिम लोकांच्या उपासांचा महिना ज्यात पहाटे सूर्योदयापूर्वी जेवण संपलेलं असायला हवं. या महिन्यात पहाटे ३.३०/४.०० च्या दरम्यान लोकांना उठवायला २ माणसं पूर्ण गावभर आरोळ्या देत फिरायची "जन्नत के दरवाजे खुलेऽऽऽ". आता यामागचं कारण लक्षात येतं. त्याकाळची त्या गावातली लाइफस्टाइल बघता प्रत्येकाकडे साधं गजराचं घड्याळ असणं हे देखील कदाचित अवघड असेल. तसंच अर्थात आत्तासारखी अॅप्स नसल्यामुळे सूर्योदयाची वेळही सगळ्यांना माहिती नसणार. त्यामुळे त्याकाळी ही हाक कितीतरी जणांना सोयीची जात असेल.
शिरुरच्या अजून दोन खास आठवणी आहेत. एक आठवण म्हणजे तिथे येणारा कुल्फीवाला. गाडीवरची घंटा टणटण वाजवत येणार्या कुल्फीवाल्याच्या आवडत्या हाका म्हणजे - "कुल्फी मलई ए... दूधवाऽऽली कुल्फीऽऽ". हे "दूधवाऽऽली कुल्फीऽऽ" तर मला बरेच दिवस धबाऽऽडी कुल्फी असंच ऐकू यायचं. ही धबाडी कुल्फी कशी बरं दिसत असेल, आणि कशी लागत असेल याचं फार कुतुहल होतं मला. त्यामुळे त्याच्या गाडीवरची घंटा टणटण वाजून त्याच्या आरोळ्या सुरु झाल्या की मी हमखास बाहेर डोकावून यायचेच. पुन्हा याचं कौतुक यासाठी की पुण्यात माझा परिचय अशी रस्त्यावर आरोळी ठोकणार्या कुल्फिवाल्यांशी झालेला नव्हता.आणि दुसरी आठवण म्हणजे सायकल वरुन एक बॉक्स घेऊन माणूस फिरायचा आणि जोरात ओरडायचा "आओ आओ... दिल्लीका कुतुबमिनार देखो" असं काहीतरी. मला वाटतं २५ पैशात बायोस्कोपमधे भारतातल्या प्रसिद्ध ठिकाणांचे फोटो दाखवायचा. हे मला नीट आठवत नाहीये कारण हा कुतुबमिनार बघायला आम्हाला आई-बाबांकडून पैसे मिळणं शक्यच नव्हतं. तुमच्यापैकी कोणी पाहिला असेल अशा माणसाकडे दिल्लीका कुतुबमिनार तर नक्की सांगा.
लहान असताना या घराच्या अवती-भोवती येणारे फेरीवाले-विक्रेते वर्षानुवर्ष आयुष्याचा भागच झाले होते. त्यामुळे आजही त्यांच्यापैकी कोणाच्यातरी आठवणी आईशी किंवा माझ्या भावंडांशी बोलताना येतातच!
