खारा पोंगल (वेन पोंगल)

तर, परवा अगदी हलके काहीतरी खायचा मूड होता. नेहेमीची मुगाच्या डाळीची खिचडी नको होती. मग आईशी बोलताना या खारा पोंगलची आठवण निघाली. मग केलाच. छान झाला, इथे रेसिपी दिसली नाही आणि स्वतःच्या रेफरन्सकरता पण लिहून ठेवावी म्हणले. माझा एक कझिन बंगळूरूला असतो. आई काही दिवस तिकडे गेली होती, त्यांच्याकडच्या मदतनीस ताईनी केला होता, बहुतेक ऑथेंटिक असेल. नसेल तर जाणकारांनी सूचना कराव्यात. तर नमनाचे तेल झाल्याने साहित्य आणि कृती.

साहित्य (२ व्यक्तींकरता)

१/२ वाटी तांदूळ (लाँग ग्रेन बासमती सोडून. मी आंबेमोहोर वापरला)
१/२ वाटी पिवळी मुगाची डाळ
३ चमचे साजूक तूप
८-१० किंवा आवडीप्रमाणे काजूच्या पाकळ्या
५-६ काळीमिरी थोडीशी ठेचून किंवा ओबड धोबड कुटून
१/२ चमचा आले. मला तुकडे दाताखाली आलेले आवडतात. आवडत नसतील तर किसून
फोडणीसाठी
जीरे
हिंग
१-२ हिरवी मिरची
भरपूर छान ताजा हिरवागार कढीलिंब
मीठ

कृती
१) डाळ आणि तांदूळ एकत्र करून २-३ वेळा नीट धुवून घ्यायचे आणि निदान १० मिनिटे निथळत ठेवायचे.
२) एका कढई/पॅन मधे १ चमचा तूपावर हे निथळलेले डाळ आणि तांदूळ हलके परतून घ्यायचे. रंग बदलला नाही पाहिजे पण थोडे नटी झाले पाहिजेत.
३) मग कुकरच्या भांड्यात हे डाळ आणि तांदूळ आणि दुप्पट किंवा थोडे जास्त पाणी आणि थोडा हिंग घालून ३-४ शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे .
४) प्रेशर गेले की तयार खिचडी सदृश मिश्रण नीट डावाने घोटून/हाटून घ्यायचे. हवे तर १ वाटी आधणाचे पाणी घालायचे. सरबरीत झाले पाहिजे. कोरडे नको.
५) मग परत कढई/पॅन मधे राहिलेल्या २ चमचा तूपाची फोडणी करायची. जीरे घालाय्चे, ते फुलले की काजू हलके गोल्डन होईपर्यंत परतायचे, मग कुटलेली मिरी, हिरवी मिरची, किसलेले किंवा तुकडे केलेले आले, कढिलिंब, परत थोडा हिंग घालायचा.
६) तयार फोडणीत ती सरबरीत मिश्रण घालून नीट एकत्र करायचे. चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार गरम पाणी घालून कन्सिस्टन्सी अ‍ॅडजस्ट करायची.

अधिक टीपा
१) फोडणीत हळद नको. मोहरी पण नको.
२) खाताना वरून अजून साजूक तूप घेऊ शकतो. पण कोथिंबीर वगैरे पण नको.
३) शक्यतो कुठलेच साहित्य स्किप करू नका. सगळ्याची एकत्र चव खूप छान लागते.
४) एकदम सात्विक फील असतो या खाण्याचा. कधी कधी कुठलेच मसाले नकोत असे होते तेव्हा ही हलका मिरी, जीरे,आल्याची चव मस्त वाटते.
५) बरोबर एखादे लोणचे, एखादा पापड आणि हवीच असेल तर कढी/सार वगैरे छान लागेल.
६) ही ऑथेंटिक रेसिपी नव्हे. ती वेगळी असू शकते.
७) फोटो अगदी वाईट आहे. पण अंदाज यावा म्हणून दिला आहे.

माहितीचा स्त्रोत
माता (माता त्या कर्नाटकी मदतनीस ताईंकडून शिकली. आई म्हणाली की तिकडे देवळात प्रसाद म्हणून पण मिळतो आणि त्याल थोडा कापराचा वास असतो. मी खाल्लेला नाही.)

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.