अंडा फ्राय मसाला

आज खूप दिवसांनी आठवण होऊन अंडा मसाला केला. हॉस्टेलला असताना भटकून झाल्यावर रात्री उशीरा डेक्कनच्या रेश्मा नावाच्या स्टॉलवर भुर्जी, अंडा मसाला, अंडा राईस वगैरे खूप प्रकार खात असू. हल्ली ते दुकान गरवारे कॉलेजजवळ आलंय.

तर हे साहित्य:
१. उकडलेली अंडी - ६
२. मोठे कांदे - २
३. लहान टोमॅटो - ३
४. आलं लसूण ठेचा - एक मोठा चमचा
५. कढीपत्ता - भरपूर
६. नारळाचे खाद्यतेल/गोडेतेल
७. मिरची पूड
८. धने जिरे पूड
९. हळद
१०. गरम मसाला
११. मीठ
१२. कोथिंबीर
१३. पुदिना

कृती:
१. एका स्किलेट मध्ये दोन चमचे तेल घालून गरम झाल्यावर त्यात तिखट, हळद, मीठ घालून त्यावर अंड्यांची अर्धुके करून एकदा उलट, एकदा सुलट अशी थोडा वेळ ठेऊन तळून (शॅलो फ्राय) घेतली आणि काढून ठेवली.

२. दोरीच्या चॉपरने कांदे अतिशय बारीक चिरून घेतले आणि बाजूला ठेवले. चॉपरने टोमॅटोसुद्धा अगदी रस निघेपर्यंत बारीक चिरून बाजूला ठेवले. (कांदा इतका बारीक हवा, म्हणून फोटो.)
img-20251012-wa0011.jpg

३. आधी वापरलेल्या स्किलेटमध्येच अजून दोन चमचे तेल घातले. तापल्यावर त्यात चिरलेला कांदा घालून परतला. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट आणि कढीपत्ता पाने घालून परतली. मग चिरलेले टोमॅटो. ते मऊ झाले की वरून हळद, तिखट, धने जिरे पूड आणि मीठ घालून नीट ढवळले. त्यात थोडे खलबत्ता आणि चॉपर विसळलेले पाणी घालून झाकण ठेवले.
img-20251012-wa0012.jpg

३. पाचेक मिनिटे शिजल्यावर झाकण काढून चमचाभर गरम मसाला, चिरलेली कोथिंबीर आणि अगदी दोन तीन पाने पुदिना घालून ढवळले. मग त्यात ती तळलेली अंडी अलगद ठेवली. पुन्हा थोडे गरम पाणी घालून झाकण ठेऊन पाच मिनिटे शिजवले. पाणी बऱ्यापैकी आटल्यावर गॅस बंद केला. (मसाला घट्ट हवा, पाणी जास्त झाल्यास त्याची अंडा करी होईल!)
img-20251012-wa0014.jpg

४. भाताबरोबर वाढून घेतलं. पण पोळी, पराठा, नान , रोटी कश्याहीबरोबर हा अंडा मसाला भन्नाट लागतो. चला जेवायला :)
img-20251012-wa0015.jpg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.