साहित्य- फरसबीच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, कढिपत्ता, चण्याची डाळ, ओलं खोबरं, कोथिंबीर, मीठ, साखर, फोडणीकरता तेल, हिंग, हळद, मोहरी.
कृती- सगळ्यात आधी चणाडाळ भिजत घालावी. ह्या भाजीकरता फरसबी चिरायला जरा वेळ लागतो. पण मला शॉर्टकट मारवत नाही.
तर फरसबीची शेंग आडव्यात चिरुन २,३ तुकडे करावेत आणि मग एक तुकडा उभा धरुन त्याचे ३ किंवा चार तुकडे करावेत. (हो, हो, कटकटीचं वेळखाऊ काम आहे). ही चिरलेली फरसबी धुवून घेऊन कुकरला दोन शिट्ट्या करुन वाफवून घ्यावी. शिट्टी पडली की चाळणीत निथळून घ्यावी.
तेल गरम करुन त्यात हिंग, हळद, मोहरी घालून फोडणी करावी. त्यात चणाडाळ परतून घ्यावी. हिरव्या मिरच्या तुकडे करुन किंवा ठेचा करुन घातल्या तरी चालतील. तर ते परतावं डाळीबरोबर. कढिपत्ताही घालावा आणि मग ही निथळलेली फरसबी घालावी. नीट मिक्स करुन त्यावर झाकण घालावं आणि झाकणावर थोडं पाणी म्हणजे भाजी करपणार नाही. एक वाफ काढून त्यात मीठ, किंचीत साखर आणि खोबरं, कोथिंबीर घालून गरम गरम पोळीबरोबर वगैरे खावी. मला नुसतीच खायलाही खूप आवडते.
आत्ता फोटो नाहीये. पुढच्यावेळी केली की टाकेन इथे.
