(हे पान मी आधी फेसबुक वर टाकले होते. काही जणींनी वाचलेच असेल. आता ते मी काढले आहे तिथून. त्यामुळे दिसत नाही)
कधी वाटले नव्हते युद्धाची डायरी लिहायला घेईन. सध्या आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे सगळ्यांना एव्हाना माहिती झाले असेल. आम्ही बहारीन या सौदी जवळ असणाऱ्या आखाती देशात राहतो. गेली अनेक वर्षे हेच आमचे घर आहे. जगभरात फिरूनही आम्हाला हा छोटासा शहर कम देश प्रचंड आवडतो. आमचा जुफैर एरिया भारतीय लोकानी इतका भरलेला आहे की आपण परदेशात राहतो वाटूच नये! सतत निरनिराळ्या सणांचे जोरदार celebration ,दणक्यात होणारी हळदीकुंकू, मित्र मंडळाच्या उपस्थितीत उत्साहाने साजरे होणारे गणपती असे सगळे आनंदी वातावरण असणारा हा देश. भारता पासून अगदी तीन तासावर असल्यामुळे मनात आले येतो भारतात. इथे कडवे धार्मिक वातावरण नाही. त्यामुळे 'पर' देश कधीही वाटले नाही. माझे या देशावर एखाद्या माणसावर असावे असे प्रेम आहे! इथल्या समुद्राच्या कडेने बांधलेल्या walkway वरुन चालताना समोर दिसणारा देखणा देश मला फार फार आवडत असतो...
Cut to 5/3/2026
इथल्या राजधानीतल्या एका हॉटेलच्या बेसमेंट ला बंकर मध्ये रुपांतर केले आहे. दर दोन तासांनी एक जबरदस्त स्फोट होतो. आम्ही emergency बॅग घेतो. बंकर मध्ये येऊन बसतो. पंच तारांकित हॉटेल चा बंकर पण पंचतारांकित! इथे गाद्या आहेत, एसी आहे. खाण्यापिण्याची रेलचेल आहे. जरा
वेळाने all clear होते. दिवसभर नुसता बसुन काढला म्हणून जिम मध्ये जायचा विचार करते. एक सेट करून स्वतःवर खुश होत असते. मनात #strength in war वगैरे भंकस सुरू होते. तेवढ्यात दुसरीकडे रहायला गेलेल्या शेजारीण मैत्रिणीचा कॉल येतो. आत्ता घरावरून drone गेले. मला आधी पक्षीच वाटला सांगत असते. नुकतीच strength आलेली सबला तिच्याशी गप्पा मारत अजून एक सेट मारते. बोलून मग ती सायकल वर येते. दहा मिनिटे सायकल करून जावे आता. पंचतारांकित हॉटेलची चकाचक जिम ती. समोर प्रचंड मोठी काच. त्यातून तिचे लाडके शहर न्याहाळत ती सुरू करते. तेवढ्यात समोरून तिच्या दिशेने काचेच्या पलीकडून जोरात काहीतरी पक्ष्या सारखे येते. क्षणार्धात सबलेची अबला होते. Drone असे किंचाळून ती जिम च्या दाराकडे धावते. तिला पळताना बघून बाहेरचा attendant धावत येतो. ती drone असे म्हणुन बोट दाखवते. तो समोर बघतो. तिची मान धरून मॅडम see म्हणुन अदबीने वळवतो, एक भले दांडगे कबुतर घाण आवाज करत काचेच्या कडेला विसावते. तोवर फुग्यातून हवा गेलेली अबला तिकडून पळ काढते. ती रूम वर येऊन विसावते. तिच्या मैत्रिणीला घडलेला किस्सा सांगायला फोन घेऊन खिडकी जवळ येते. तिच्या डोळ्यासमोर चार पाच drone उडत जातात. प्रचंड धमाका होत दूरवर दिसणार्या refinery मध्ये आग लागलेली ती पाहतेय. तिचा नवरा बाजूच्याच plant मध्ये आहे. त्याच्या खुशालीचा फोन येतो तो घेत धपापत्या हृदयाने ती बन्कर मध्ये बसते. खरे drone खोटे drone चा खेळ दोन तासपर्यंत शांत होतो. ती रूमवर झोपायला येते. रात्री दोन वाजता अभद्र आवाजात siren वाजतो . तिच्या walkway वरच्या आवडत्या बिल्डिंगला, तिच्या घरासमोरील बिल्डिंग ला drone ने स्फोट होऊन आग लागली आहे. युद्धाचा एक दिवस संपून पुढचा सुरू झाला आहे....
( कालचा प्रचंड काळजीचा दिवस घालवण्यासाठी लिहून काढले आहे. जमेल तसे लिहीत राहीन. फार दिवस लिहायला लागु नये यासाठी जरूर प्रार्थना करा)

