युध्दाचीडायरी दिवस कुठलातरी
त्या संध्याकाळी आपण वर्ल्ड कप जिंकलो होतो. Men in Blue आमच्यासाठी बंकर मध्ये आनंद घेऊन आले. खुशीतच झोपायला गेलो. शांत होते जरा म्हणुन रूमवर गेलो झोपायला. याला सकाळी पाचला मॉर्निंग शिफ्ट ला जायचे होते. रात्री दोन च्या आसपास जाग आली प्रचंड मोठ्या स्फोटांच्या आवाजाने. भोंगा वाजू लागला. इन्स्टावर अधिकृत चॅनेल वर कुठे काय झाले कोणीतरी टाकतेच. त्यात समजले आमच्या कंपनी जवळ ड्रोन लोकवस्तीच्या मध्ये पडले आहे. लोक दगावले आहेत. मोठी आग लागली होती. एक तर छोटेसे दोन महिन्याचे बाळ....
ते वाचून इतक्या दिवसात पहिल्यांदा धाबे दणाणले. याला अजून दोन तासांनी तिकडेच जायचे आहे. पाचला हा उठून हॉटेलने पॅक करून दिलेला ब्रेकफास्ट घेऊन निघाला. तो कंपनीमध्ये पोहोचेपर्यंत विडिओ कॉल वर त्याच्या बरोबर होते. तो पोहोचून तास होत नाही तोवर प्रचंड मोठा स्फोट होत हॉटेल पण दणाणले. धावत बंकर मध्ये पोहोचले. तिथे समजले याच्या बाजूच्या रिफायनरीमध्ये आग लागली आहे. याच्या कंपनी मध्ये पण कुठेतरी लागली आहे. याचा फोन आला सुखरूप असल्याचा. त्याने अक्षरशः live आग लागताना पाहिले सांगू लागला. ते ऐकताना इतक्या दिवसात पहिल्यांदा मला panic attack आला. खरेतर मी खूप शौर्याने हॅण्डल केले लिहायची इच्छा होते आहे पण इतके फेकायला मी काही भारतीय न्यूज चॅनेल नाही!
छातीत जे धडधडायला लागले ते दुपारपर्यंत सुरूच होते. हात पाय कापायला लागले. कसेतरी हा येईपर्यंत दिवस काढला. इतका थरकाप की आज जिम ला पण नाही गेले कारण काचेतून समोर दूरवर आग दिसत होती. तिथे बघण्याचे धाडस नव्हते.
हा जसा समोर दिसला attack गायब झाला ! संध्याकाळी चक्क पाणीपुरी खाल्ली बाजूच्या इंडियन हॉटेल मध्ये जाऊन!
रोज होणार्या स्फोटांचा एक टाइम पॅटर्न आहे. रात्री दीड दोन, पहाटे पाच सहा, संध्याकाळी पाच सात असे साधारण. त्या वेळांमध्ये शांतता असली की पुढच्या वादळाची भीती वाटत राहते. रूम मध्ये समोर काचेची भिंत आहे. तिथे एक खुर्ची टेबल आहे. तिथे बसुन मी दिवसरात्र शब्दकोडी सोडवते. पुण्याहून येताना जंबो शब्दकोडी पुस्तकं आणली होती. कसे कोण जाणे इथे येताना एक बॅगेत टाकले. ते इतके कामाला आले आहे.
त्या खुर्चीत काचेकडे पाठ करून बसले तर मागून काहीतरी होईल या भीतीने मुंग्या येतात पाठीला! मग खाली लॉबी मध्ये जाऊन बसते नाहीतर गादीवर! मी जाईन तिथे माझ्या हातात ते पुस्तक आणि पेन असते. असा माझा अवतार आता सर्वाना परिचित झाला आहे!
असो..
आजपासून याच्या तीन नाइट शिफ्ट आहेत. त्या सुखरूप पार पडू देत.

( ता.क. याच्या night शिफ्ट सुखरूप पार पडल्या आहेत. त्याला या दिवसात पण दिवसरात्र shifts का कराव्या लागतात पुढच्या भागात लिहिते)
