स्पॉयलर अलर्ट - पुढील लेखात बिभत्स रस आहे. तो अगतिकते पोटी आलेला आहे. कोवळ्या मनाच्या वाचकांनी खरंच वाचू नये. चुकून माकून कुठेतरी "करुण" रस जाणवला, तर तोच योगायोग समजावा.
आमच्या लहानपणी वाड्यातल्या घरात राहताना, लहानग्या पोरांनं एका खोलीतून दुसऱ्या खोलीत दुडदुडत जाण्याइतकंच नॉर्मल होतं एखाद्या पिटुकल्या उंदराचं तुरुतुरू पळणं. घर म्हणून एखादा उंदीर, पाल, झुरळं वगैरे असणं नॉर्मल होतं. भिंतीवर फ्रेम असावी तशी एखाद्या भिंतीवर पाल दिसायची. एखादं झुरळ दिसलं तर त्याला इग्नोरच मारलं जायचं. फारच झाली तर पॉयशा नावाच्या यंत्रानं त्यांचा खातमा केला जायचा. दुसऱ्या दिवशी घरभर उताणं पडलेल्या लहान मोठ्या झुरळांचा सडा पडलेला असायचा. पण तो आनंद जरा टिकतोय न टिकतोय तोवरच पुन्हा एखादं टर्रेबाज झुरळ मिशा फेंदारून सामोरं यायचं आणि मग परत एकदा पॉयशा जिंदाबाद. उंदीर एखादा असला तर चालून जायचा पण जरा खुडबुड वाढायला लागली की मग त्याला सापळा लावला जायचा. त्यात भजं वगैरे ठेवलं जायचं. मग एकदा का उंदीर गळाला लागला, की बच्चे कंपनी खूष. मग त्याचं क्लोजअप मध्ये निरीक्षण केलं जायचं. त्याचे छोटे छोटे कान, लुकलुकते डोळे वगैरे वगैरे. मग नंतरचा टास्क म्हणजे ईईई, उई, याक वाल्यांना ती शिकार "जवळून" दाखवायची. मग त्यांची पळापळी सुरू व्हायची. त्यांना यथेच्छ घाबरवून झालं की मग तो पिंजरा हातात घेऊन रस्त्यातून मिरवत मिरवत न्यायचो आणि नदीपाशी सोडून द्यायचो.
तेव्हा या असल्या कीटकांच्या अस्तित्वाचा आणि घराच्या स्वच्छतेचा संबंध जोडला जात नसे. आणि (आजकालच्या भाषेत) यावरून कोणी घरच्या गृहिणीला जज् पण करत नसे. गणपती, दिवाळी आणि नवरात्र-दसरा या तीन सणांना संपूर्ण घराची स्वच्छता केली जात असे. अगदी पार फरशाबिरश्या धुण्यापासून ते स्वयंपाक घरातले डबे बाटल्या धुवून काढण्यापर्यंत. माळ्यावरच्या सामानाला मात्र अढळपद होतं. सगळ्या न लागणाऱ्या आणि पुढे कधीही न लागलेल्या वस्तू तिथं सुखानं नांदायच्या. पाळणा, जुने कंदील, नळ, स्टोव्ह, कोळशाची शेगडी, आत्या/ काकाची खेळणी, झोपाळ्याच्या कड्या, पाट असं मागच्या दोन-तीन पिढ्यांचं, थोडीशी डागडुजी केली तर पुढे उपयोगी पडेल म्हणून सांभाळून ठेवलेलं सामान असायचं. तिथल्या वस्तू काढून माळा रिकामा करावा असं "कुणालाच" वाटत नसे. "कधी कुठली वस्तू लागेल सांगता येत नाही", "वेळ काही सांगून येते का" ? आणि "आयत्या वेळेला गरज लागली तर कुणापुढे हात पसरायला नको" या तीन वाक्यांच्या तिकाटण्यावर ठाम विश्वास ठेवून प्रत्येक पिढी आपापल्या परीने माळ्यावरच्या सामानात भर घालायची.
थोडक्यात काय तर सध्याच्या स्वच्छतेच्या आणि नीटनेटकेपणाच्या कल्पना आणि त्या वेळच्या कल्पना याच्यात जमीन आसमानाचा फरक होता.
तर..... हळूहळू वाड्यातली घर गेली आणि ओनरशिपची घरं आली. वन बीएचके, टू बीएचके असे फ्लॅट्स अस्तित्वात आले. दिवस अजून पुढे गेले तसं सगळीकडे पांढऱ्या चकचकीत फरशांची, भरपूर फर्निचर वाली, माळे विरहित घरं, हॉटेलं झक मारतील इतकी सुंदर सजवलेली घरं, घरातल्या माणसांपेक्षा जास्त खोल्या असलेली घरं. घराच्या प्रवेशापासून वॉशरूम पर्यंत सगळीकडे सजावट केलेली घरं.
चकाचक बाथरूम्स, वस्तूंच्या उपयुक्ततेपेक्षाही "रंगसंगतीचं" महत्त्व वाढलं. ( जुन्या वाड्यांच्या सार्वजनिक न्हाणीघरात आणि स्वच्छतागृहांमध्ये पिढ्यांपिढ्या चालत आलेली बादली असायची. तिचा मूळ रंग काय असेल ते वाडा मालकाच्या मूळ पुरुषालाच ठाऊक असावे. पण तिला भोक पडून तिच्यात पाणीच टिकेनासं झालं तेव्हा ती कचऱ्यासाठी दिली गेली. असो. ) त्या बादलीच्या जन्मापासून तिच्या निर्वाणापर्यंत ती कधी घासली गेली असेल असं काही वाटत नाही. आता नव्या स्वच्छतागृहांमधे फरशांना मॅचिंग वस्तूंचे संच मिळायला लागलेत. विविध ऑर्गनायझर्सनी घरातल्या प्रत्येक वस्तूला सुंदर आणि सुबक जागा ठरवून दिल्आया. लोक बाहेरून माणसं बोलावून डीप क्लिनिंग आणि पेस्ट कंट्रोल वगैरे करायला लागले आणि.....आणी इथे मेजर गोची झाली.....
आता घरामध्ये एकही झुरळ असलेलं चालत नाही. ईऽऽ झुरळ कसं काय तुमच्या घरात ? या असल्या वाक्यानं घरमालकाचा डायरेक्ट अपमानच होतो तर उंदीर आणि पाल घरात दिसताक्षणी समोरच्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. कुठल्याही शाळेत किंवा कॉलेजात यांच्याशी कसं डील करायचं ते शिकवत नाहीत आणि हे प्रशिक्षण आताच्या नव्या घरमालकांना नाहीये हे त्या बिचार्या पृष्ठवंशीय आणि सरीसृप प्राण्यांना माहीतच नाहीये.
माझे वडील भिंतीवरची पाल दिसली तर "त्यात काय" म्हणायचे. ती काय करणार आपल्याला, एवढास्सा जीव तो. आपण तिला घाबरतो त्यापेक्षा ती आपल्याला जास्त घाबरते असा बचाव करायचे. पण तरी आम्ही फारच वैताग दिला की एखादा कागद हातात घ्यायचे आणि सरळ त्या कागदानं तिला उचलून बाहेर सोडून द्यायचे. आता हे सगळ्यांना कसं जमणार? आणि आताच्या पाली फक्त भिंतीवर दिसत नाहीत. त्या कुठेही दिसतात. हल्ली त्या जमिनीवर पण सरपटतात. एकदा मी बुटात पाय घातला आणि काहीतरी गुळगुळलं. पटकन पाय बाहेर काढला तर आत पाल होती. एकदा रात्री तहान लागली म्हणून उठून स्वयंपाक घरात आले तर गॅसच्या शेगडीवर एखाद्या महाराणी सारखी ती बसली होती. बरणीतून काहीतरी काढायला गेले तेव्हा झाकणावर काहीतरी सरकलं. ती झाकणावर बसली होती. 
पूर्वीच्या घरात असायची तशी हल्लीच्या घरात सदासर्वकाळ "ती" नसते पण जेव्हा तिची एन्ट्री होते तेव्हा आपल्या बेसावध क्षणी जे काही हॉरर शोज समोर येतात त्यानंतर मन:स्वास्थ्याची वाट लागते. एक तर ती तरी राहील, नाहीतर मी तरी ही अवस्था प्राप्त होते.
अरे यार, पण काय करतात अशा वेळी? आणि मग पालीला पळवण्याचे किंवा मारण्याचे प्रकार मी सिरीअसली शोधायला लागले.
आमच्या मावशींनी सांगितलं की पालीच्या शेपटीवर बॅटरीचा झोत मारायचा म्हणजे ती पुढे पुढे सरकते. एकदा तसं करत करत तिला खिडकीपर्यंत नेलं आणि ती खिडकीच्या बाहेर पडता पडता पटकन स्लाइडिंगची खिडकी बंद केली तर बिचारी त्या दोन काचांमध्ये चिरडून मेली. नंतर कधीतरी त्या खिडकीचा स्लाइडिंग चैनल साफ करत असताना एक लहानसा पुठ्ठा हातात आला. जरा जवळून पाहिला तर त्याला छोटी छोटी बोटं दिसली. ती डीहायड्रेटेड पाल होती. उसने अपनी मौत का बदला लिया था. आणि दिवसभर मी हात धुवत बसले होते.
मग भिंतीवर पाल दिसली की तिच्यावर हिट स्प्रे मारायचा. मग ती खाली पडते. नंतर झाडूनं धोपटून तिला मारायचं हा प्रकार मला थोडा थोडा जमायला लागला. जमिनीवर पाल दिसली की तिच्यावर जड टॉवेल किंवा जुना गाऊन टाकायचा. नंतर हातात ग्लोव्हज् घालून ते सगळं गोळा करून एका मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत घालून केराच्या बादलीत टाकायचं असे नवे प्रकार सापडले.
स्वयंपाकघरात ओट्याजवळ मात्र हा उपाय लागू होत नाही. चुकून गॅस चालू असेल आणि लक्षात आलं नाही तर स्प्रे पेट घेऊ शकतो. त्यामुळे स्वयंपाक घरात हिट मारायचं नाही हे डोक्यात फिट केलं. ओट्यावरची पाल कुंच्यानं धोपटून सिंक मध्ये पाडायची आणि मग तिच्यावर जोरदार पाणी सोडून तिला सिंकच्या पाईपातून सद्गती द्यायची. काल परवाच एका पालीला मी असंच सिंक मध्ये पकडलं पण ती मोठी होती त्यामुळे सिंकच्या नालीतून ती आतच जाईना. आयत्या वेळेला काय करायचं? माझ्या उड्यांपेक्षा तिच्या उड्या फास्ट असतात. मग मी पटकन तिच्यावर एक पातेलं उपडं घातलं. नंतर पाहिलं तर त्या पातेल्यातनं तिचं थोडंसं डोकं बाहेर आलं होतं. मग धुरंधरनं त्या चौघांना शटर डाऊन करून खलास केलं तसं करावं का असं वाटलं. पण धीर नाही झाला. मग एक मोठं बेडशीट घेऊन त्याच्यामध्ये ताटलीसकट सगळं दुकान गोळा केलं आणि लांब नेऊन टाकून दिलं. पालही गेली आणि बेडशीटताटली पण गेली.
सध्या तर फक्त शत्रू क्रमांक एक पालीबद्दल लिहिलंय. उंदीर, नाकतोडा, घरात चुकून शिरलेली चिमणी या लोकांचे किस्से तर अनंत आहेत. पूर्वी एकदा आमच्या पेठेतल्या बिल्डिंगच्या अरुंद एंट्रन्स मधून एक एक गाय आत शिरली तो एंट्रन्स इतका अरुंद होता की तिला रिवर्सच घेता येईना. सगळेच जण आता काय करावं बरं म्हणून एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. तेव्हा माझे वडील हातात एक काठी घेऊन आले आणि "ह्याक-ह्याक' करत तिला बरोबर वळवत बिल्डिंगच्या बाहेर काढलं. (त्यांच्या काळी त्यांच्या घरात गाई म्हशी होत्या ना) तेव्हा त्यांच्या या लाईफ सेविंग स्किलचं अतोनात अप्रूप वाटलं होतं सगळ्यांना.
कधीकाळी ह्या प्राण्यांबरोबर मजेत सहजीवन जगणारे आपण आता कुठे येऊन पोहोचलोय.
असो. इतके प्रगत आणि आळशी झालोय आपण की आता नारळाचा चव आणि खलबत्त्यात कुटलेलं दाण्याचं कूट सुद्धा विकत मिळतंय. पण या लाईफ थ्रेटनिंग प्रकारासाठी काही सोय नाहीये. त्यामुळे एखादं ट्रेनिंग, एखादा क्लास खास यासाठी निघायला हवाय महाराजा.
