काही गाणी अशी असतात की ती मनात निवांतपणे घर करून राहतात; पण त्यांचे खरे अर्थ मात्र काळाच्या ओघात, अनुभवांच्या साठ्याने आणि वयाच्या परिपक्वतेने हळूहळू उलगडत जातात. “बरसात की रात” मधली ही कव्वाली त्यातलीच एक.
लहानपणी बाबा जेव्हा हे गाणं लावायचे, तेव्हा मनात फक्त एकच विचार यायचा तो म्हणजे “कायच्या काय मोठ्ठं गाणं आहे!” ते ऐकण्याचाही कंटाळा यायचा. त्या वेळेस त्यातलं गूढ, त्याची खोली किंवा त्याचा आत्मा काहीच स्पर्शून जात नव्हता. मनात उमटणारा एकच शब्द “रटाळ!”
पण जसजसं आयुष्य समजायला लागलं, तसतसं जाणवलं की हे गाणं केवळ एक प्रेमगीत नाही; तर ते सूफी विचारधारेतून उगम पावलेलं, तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि मानवी भावविश्व यांना स्पर्श करणारं एक महाकाव्य आहे. यात प्रेम आहे, बंडखोरी आहे, वेदना आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात स्वतःला ओलांडून जाण्याची धडपड आहे.
मुळात “इश्क” ही संकल्पना केवळ रोमॅंटिक प्रेमापुरती मर्यादित नाही. प्रियकर-प्रेयसीचं नातं, देवावरील निस्सीम भक्ती, त्याच्याशी एकरूप होण्याची तळमळ, स्वतःचं अस्तित्व विसरण्याची अवस्था, समाजाच्या बंधनांविरुद्ध उभं राहण्याची हिंमत आणि शेवटी स्वतःला पुन्हा नव्याने सापडण्याची प्रक्रिया हे सगळंच म्हणजे इश्क.
प्रेमात स्थिरता नसते; आणि कदाचित म्हणूनच त्यात आकर्षण असतं. हरवण्यातूनच सापडण्याचा प्रवास घडतो.
“मेरे शौक़-ए-ख़ाना-ख़राब को, तेरी रहगुज़र की तलाश है”
या एका ओळीत स्वतःचं संपूर्ण विलयन (विलयन म्हणजे खादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीत पूर्णपणे मिसळून जाणे, विरघळणे किंवा एकरूप होणे.) दडलेलं आहे. ‘अहं’ विसर्जित होतो आणि त्याच्या जागी एक निरपेक्ष एकरूपता उभी राहते.
खरं प्रेम माणसाला सुखाच्या साचेबद्ध चौकटीत बसवत नाही; ते त्याला हादरवतं, मोडतं आणि पुन्हा नव्याने घडवतं. म्हणूनच साहिर म्हणतो....
“मेरे नामुराद जुनून का, है इलाज कोई तो मौत है”
“जो दवा के नाम पे ज़हर दे, उसी चारागर की तलाश है”
इथला ‘मृत्यू’ हा अंत नसून परिवर्तनाचं प्रतीक आहे. असा वैद्य हवा जो माझ्यातल्या जुन्या ‘मी’चा अंत करेल, पण त्याच प्रक्रियेतून एका नव्या ‘मी’चा जन्म घडवेल.
१९६० च्या दशकात “इश्क़ आज़ाद है…” अशी भूमिका मांडणं ही केवळ काव्यात्मक मांडणी नव्हती, तर ती एक ठाम सामाजिक घोषणा होती. प्रेमाला धर्म, जात, परंपरा यांच्या चौकटीत बंदिस्त करता येत नाही आणि केलं तर ते प्रेम राहत नाही.
“दिल इश्क़, जिस्म इश्क़, और जान इश्क़ है
ईमान की जो पूछो, तो ईमान इश्क़ है”
माणसाची खरी ओळख बाह्य लेबल्समध्ये नसते; ती त्याच्या प्रेम करण्याच्या क्षमतेत असते. जात, धर्म, ओळख यांच्या पलीकडे जाणारं एकमेव तत्व म्हणजे प्रेम.
‘इश्क’ या प्रदेशात ‘मी’ आणि ‘तू’ या सीमारेषा विरघळून जातात. राधा, मीरा, लैला-मजनू, अगदी जिझस सगळे एकाच अनुभवाच्या वेगवेगळ्या रूपांप्रमाणे भासतात. धर्म वेगळे असले तरी अनुभूती एकच असते.
“इश्क़ सरमद, इश्क़ ही मंसूर है”
ही ओळ एक वेगळंच विश्व उघडते. मन्सूर अल-हल्लाजने “अन्-अल-हक़” (मीच सत्य आहे) असं म्हणत देवाशी एकरूप होण्याची घोषणा केली आणि त्यासाठी त्याला मृत्यू पत्करावा लागला. इश्क माणसाला फक्त जवळ नेत नाही, तर देवाशी एकरूप करतो.
“बंदे को ख़ुदा करता है इश्क़।”
ही कव्वाली प्रेमाचं केवळ उदात्तीकरण करत नाही; ती त्याच्या कठोर वास्तवाकडेही बघायला भाग पाडते. प्रेम माणसाला तोडतं, त्याला नव्याने घडवतं, त्याला वेडं करतं, समाजाच्या विरोधात उभं करतं पण त्याच वेळी त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं.
म्हणूनच हे गाणं ऐकताना ‘रोमँटिक’ वाटण्यापेक्षा ‘भव्य’ वाटतं.
जणू प्रेम ही केवळ वैयक्तिक भावना नसून एक वैश्विक ऊर्जा आहे.
*******************************************************************************
