जीव नकोसा करणारा उन्हाळा संपून मान्सूनची चाहूल लागते. पावसाळा सुरू झाला की निसर्गाचा कॅनव्हासही शुष्क कोरडे रंग बदलून हिरवागार रंग परिधान करतो आणि पक्षीनिरीक्षकांना वेध लागतात ते तिबोटी खंड्याचे म्हणजेच ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशरचे (Oriental Dwarf Kingfisher) किंवा Black-backed Dwarf Kingfisher.

अवघा १३ ते १४ सेंटिमीटर लांबीचा हा पक्षी पावसाळ्यात आपल्याकडे प्रजननासाठी येतो. सगळ्या किंगफिशर जातीतील पक्षांमध्ये हा अत्यंत देखणा व रंगीबेरंगी म्हणून ओळखला जातो. निळा, पिवळा, लाल, नारिंगी, गुलाबी अशा जणू इंद्रधनुष्याच्या सर्व रंगाच्या छटा त्यावर बघायला मिळतात. पश्चिम घाटात प्रामुख्याने कोकण भागात हा जून ते सप्टेंबर या काळात बघायला मिळतो.
मान्सूनची चाहूल लागली की या पक्षाला प्रणयाचे वेध लागतात. मादीला आकर्षित करण्यासाठीची नृ्त्यवजा कोर्टशिप बघण्यासारखी असते. त्यात मग तिला छोटे खेकडे, सापसुरळी, सरडे अशी खाद्यभेटही देण्यात येते. यानंतर मग मिलन होऊन दोघेही घरटे बांधायला घेतात. यांचे घरटे म्हणजे मातीच्या भिंतीत एक बीळासारखा बोगदा खणला जातो. हा बोगदा आतमध्ये थोडा वरच्या बाजूस झुकलेला असतो म्हणजे पावसाचे पाणी वगैरे आत शिरू नये तसेच बीळातला कचरा बाहेर निघून जावा हा उद्देश.
साधारण २०-३० दिवस अंडी उबवल्यावर पिल्लं बाहेर येतात व त्यानंतर नर-मादीची एक वेगळीच गडबड सुरू होते व ती म्हणजे त्यांच्यासाठी खाणं आणणे. पिल्लं लहान असताना छोट्या आकाराचं खाणं. पिल्लं जसंजशी वाढत जातील तसा खाद्याचा आकारही वाढत जातो. हे फिडींग साधारण २०-३० दिवस सुरू असतं. नर-मादी आळीपाळीने हे खाणं आणून भरवत असतात.

हा रंगीबेरंगी असला तरी अत्यंत लाजाळू असल्याने सहसा दिसत नाही आणि तो ही मनुष्य प्राण्यांपासून लांब राहणंच पसंत करतो त्यामुळे त्याची वाट बघत बसावं लागतं.

२०२१ च्या जुलै महिन्यात ह्या पक्षाचे फोटो काढायला मी पहिल्यांदाच कर्नाळ्याजवळ एका हाईडमध्ये गेले होते. त्यावेळेस त्याची फिडींग ॲक्टिव्हिटी बघायला मिळाली होती. यावर्षीही जायची इच्छा झाली म्हणून मागच्या आठवड्यात परत तिथेच गेले.
सकाळी ५-५.१५ च्या आसपास निघून पावणेसातच्या सुमारास पोचलो तेव्हा बरीच मंडळी आधीच येऊन बसलेली दिसली. २-३ वेळेस पक्षी येऊन गेलाय अशी माहिती मिळाली. मध्यम आकाराचे किटक, सरडे, सापसुरळी असं खाद्य पालक घेऊन येत होते. एकदा भरवलं की साधारण मध्ये अर्धा ते पाऊण तासांचा वेळ जात होता. आम्ही साधारण पाच तास बसलो होतो त्या वेळात हा पक्षी चार ते पाच वेळेला आला. पाऊस येत जात असल्याने लाईट फार काही चांगला नव्हता त्यामुळे फोटो अगदी छान म्हणता येतील असे नाही तर बरे मिळाले.
वाईल्डलाईफ किंवा पक्षीनिरीक्षण/छायाचित्रण काहीही असलं तरी त्याचे काही नियम आहेत. प्राणी-पक्षांना डिस्टर्ब न करता त्यांच्या नैसर्गिक वर्तनाचा अभ्यास करणे, त्यासाठी शांत राहावं लागतं तसंच तासनतास वाट पाहाण्यासाठी संयम असणंही अत्यंत गरजेचं असतं.

