बायांचा कॅमेरा, बायांचं जग!

बायांचा कॅमेरा, बायांचं जग!

मीडीयाचा अभ्यास करणार्‍या लोकांना मार्शल मॅकलुहान हे नाव माहीत असतंच. त्याच्या अंडरस्टँडिंग मीडीया या पुस्तकाचे किमान दर्शन तरी या विद्यार्थ्यांना घेणे भाग आहे. मेकलुहानने मीडीयाची विभागणी दोन प्रकारे केली होती. हॉट मीडीया आणि कूल मीडीया. मॅकलुहानचे हे पुस्तक इंटरनेटच्या आधी आलेले असल्याने यामध्ये सोशल अथवा वेब वेस्ड मीडीयाचा समावेश नाहीच. पण त्याने अशा मीडीयाचे भाकित अवश्य मांडले होते. हॉट मीडीया म्हणजे जे तंत्रामध्ये अडकलेले असतात, लोकांचा सहभाग कमी असतो, आणि कूल मीडीया म्हणजे लोकांचा जास्तीत जास्त सहभाग असणारा मीडीया. इथे सहभाग म्हणजे केवळ प्रेक्षक किँवा वाचक असणे अपेक्षित नाही तर त्या मीडीयाच्या मेसेजमध्ये सहभागी असणे अपेक्षित आहे. आजच्या काळातला परफेक्ट शब्द म्हणजे कंटेंट क्रिएशन म्हणजेच आशय निर्मिती.

1980 च्या दशकामध्ये जेव्हा इंटरनेटचा उगम होत होता, त्यावेळी लोकप्रिय झालेली अजून एक संकल्पना होती. डेमोक्रेटायझेशन ऑफ मीडीया. माध्यमांचे लोकशाहीकरण. प्रत्येकाला मीडीया केवळ कंझ्युम (वाचणे किंवा पाहणे यांसारख्या क्रिया) करण्यासाठी उपलब्ध नसून तो प्रत्येकासाठी क्रीएट (निर्मिती) करण्यासाठीदेखील उपलब्ध असणे ही याची खरी व्याख्या. इंटरनेटच्या उगमासोबत ही संकल्पना मूळ धरू लागली. सुरुवातीला ब्लॉग आणि वेबसाइटच्या माध्यमामधून माध्यम प्रत्येकासाठी उपलब्ध झाले. तरीदेखील हार्डवेअरचा एक छोटासा अडथळा होताच. प्रत्येकाकडे संगणक असेलच याची खात्री नव्हती. पण 2000 च्या दशकामध्ये हाही अडथळा दूर झाला आणि कर लो दुनिया मुठ्ठी मे या भाकितासह स्मार्टफोन प्रत्येकाच्या हाती विराजमान झाले. आणि तिथून पुढली वाटचाल ही खर्‍या अर्थाने माध्यमांच्या लोकशाहीकरणाकडे सुरू आहे.

आता नमनालाच इतके घडाभर तेल ओतण्याचे कारण, असे की नुकताच काल एक मस्त अनुभवपट पाहिला. लोक भले याला डॉक्युमेंटरी म्हणोत वा माहितीपट. माझ्यासाठी हा खरंतर मस्तएंजॉयपट होता. मुंबईच्या वस्तीमध्ये राहणार्‍या अकरा महिलांनी मोबाइलवर परस्परांचे शूट करत बनवलेला हा अनोखा अनुभवपट म्हणजे मस्त महिला मंडळी.

आयुष्यामधल्या अनेक लढाया एकाच वेळी लढत असतानाही काहीतरी वेगळं शिकायचं म्हणून कोरो इंडिया या एनजीओकडून सुरू केलेल्या फिल्म मेकिंग वर्कशॉपमधून या महिला शूटिंग करायला शिकतात आणि इतरांसारखेच नाचाचे, गाण्याचे, बागेत फिरण्याचे रील्स करत करत एका महत्त्वाच्या डॉक्युमेंटेशनकडे वळतात. सर्वसामान्य बायकांचं आयुष्य काय असणार? त्यात काय बघायचं.. तीच ती रडगाणी असणार. वगरै कल्पना मनात आल्या असतील तर त्या जरा बाजूला ठेवू. हिंदी सिनेमांनी आपल्याला दिलेली एक देण (शाप खरंतर) अशी आहे की आर्थिक स्थिती कमकुवत असलेली बाई सतत पिचलेली असते, रडकी असते, तिला काही म्हणजे काही करता येत नाही वगैरे बिचारी अबला लाचार वगैरे. पण जरा कभी तो ये मेल गेझ का पर्दा हटा के देखिए तो सही…

आजूबाजूला खूप जणी दिसतील अशा. मला हसायला खूप आवडतं असं म्हणणार्‍या कवितासारख्या. बॉयफ्रेंड एक वेळ चालेल, पण नवरा नको म्हणत पितृसत्ताक पद्धतीमधल्या सगळ्यात मोठ्या दोषावर एका खटक्यात बोट ठेवणार्‍या अंजुमसारख्या. लग्नाआधीची मी आणि लग्नानंतरची मी यामध्ये काय बदल झालाय ते आमच्यासारख्या माध्यमसाक्षर बायकांना नीट सांगता येत नाही, पण ही गौरी बरोबर तो बदल तिच्या चार शब्दात टिपते. यात प्रचंड वेगळं ग्राउंड ब्रेकिंग अद्भुत असं काहीच नाही. हे सतत आपल्या अवतीभवती असणारच विश्व आहे. गरज होती ती क्षणभर आपण थांबून त्यांचे हे विश्व पाहण्याची, अनुभवण्याची. मस्त महिला मंडली नेमका हाच क्षण आपल्याला देत आहे.

या अकरा मुली या अनुभवपटामध्ये सतत वावरत आहेत. कधी कॅमेर्‍यासमोर. कधी साइड कॅरेक्टर म्हणून आणि कायमच कॅमेर्‍यामागे. स्मार्टफोनचा कॅमेरा त्यांच्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये, इवल्याश्या खणांच्या घरामध्ये, कधी किचनमध्ये तर कधी त्यांच्यासोबत टूव्हीलवर नाहीतर लोकलच्या प्रवासामध्ये आहेच. या कॅमेर्‍यामागे असलेला हातही याच मुलींचा आहे आणि त्या जे क्षण टिपत आहेत ते त्यांच्यासाठी खूप मजेच आणि निखळ आनंदाचे आहेत हे समजलं की ही फिल्म केवळ डॉक्युमेंटरी राहत नाही. ती त्यांच्या आयुष्याचा एक कलाइडोस्कोप बनते.

कलाइडोस्कोपमध्ये कसे साधे काचेचे तुकडे नाहीतर मणी असतात. या आरशांवर प्रकाश पडला की ते झगमगतात, एक आकार धारण करतात आणि स्कोप गोल फिरवला की तेच तुकडे, तोच प्रकाश पण आकार आणि दृश्य मात्र वेगळं. तसंच काहीसं हे आहे. याच मुली, कधी कॅमेरासमोर आणि कधी मागे. कधी प्रश्न विचारताना. कधी उत्तरे देताना. कधी एकमेकींना चिडवत खिदळताना. तर कधी एकमेकींचा खंदा आधार बनून सपोर्ट सिस्टीम बनताना. या सगळ्या प्रवासामध्ये कुठेही रडकेपणा नाही, चिडचिड नाही. आपल्यावर अन्याय झाल्याचा कडवेपणा नाही. समोर आहे ते जर जगायचंच असेल तर किमान आनंदाने हसतखेळत जगू या एका विचारासरशी मनाचा दुबळेपणा झटकून टाकलेल्या या मस्त महिला. समाजाची चौकट ओलांडता येत नाही म्हणून मन मारून जगतानाच "माझं स्वप्न आता या वयात तर काय पूर्ण होत नाही, पण काही चमत्कार होऊन तशी वेळ आली तर मात्र मी घर दार सगळं सोडून माझं स्वप्न पूर्ण करेन" हा आत्मविश्वासही इथे आहे. संघर्षाच्या लढाईमध्ये आलेले खूप कठीण क्षण आठवताना डोळ्यात तरळणारं पाणी आपसूक पुसून टाकत "आज खाने मे क्या बनाया" कडे केलेला झटक्यातला प्रवास आपल्यासाठी अगदीच ओळखीचा.

या फिल्ममधले खूप सारे प्रसंग पाहताना मला माझ्या आजूबाजूच्या अनेक जणी दिसल्या. जात धर्म, आर्थिक स्तर, शिक्षण या सर्व स्तरांना भेदून जात केवळ "मैत्रीण" या सदरामधल्या अनेक जणी. माहेरी बंगला असलेली मुलगी रे रोडच्या अशाच एका गल्ल्याबोळामधल्या चाळीमध्ये राहताना दिसली. ती तिथेही खुश होतीच. दीड खोलीतच टाकटुकीने संसार करणारी ही अगदी जवळची मैत्रीण. तिला छान नोकरी आहे पण घर छोटं आहे म्हणून मग आम्ही कायम तिच्या घराजवळच्या कॅफेमध्येच भेटत असू. तिला छोट्या घराबद्दल काही नव्हतं पण आपल्या गप्पा का सासूसासर्‍यांना ऐकवायच्या असं म्हणते ती. आम्ही दोघी खूप गप्पा मारतो आणि खूप हसतो. अगदी जोरजोरात. आजूबाजूच्या कुणाच्याही पर्वा न करता. बाईने जोरात हसलं नाही पाहीजे ही काय अट आहे देवजाणे. मी हसते ब्वा जोरात. कुणाला त्रास होत असेल तर तो त्याचा प्रश्न आहे. आपल्याच घरात नाचायलाही बंदी असते अनेकदा. या आणि अशा इतक्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बायका मन मारून जगत असतात हे समाजाच्या मरोत, आपल्या (म्हणजे बायांच्या)ही अनेकदा लक्षात येत नाही. इतके खोलवर रुजलेले हे सोशल कंडिशनिंग पुन्हा एकदा हा अनुभवपट पाहताना सामोरे आले. पण मग बायका चतुर असतात, त्या बरोब्बर क्षण शोधतात स्वत:साठी मनमुराद जगण्याचे.

सुरुवातीला म्हटलं तसं हे विश्व आपल्या आजूबाजूला कायम असतंच. पण ते सामोरं कधी येत नाही आपल्या. माध्यमसाक्षरता वाढत असतानाच माध्यमाचं झालेलं हे लोकशाहीकरण आपल्याला हे क्षण सामोरे आणून देत आहे. तंत्रज्ञान जितकं आणि जसं उपलब्ध होत जातं तश्या अभिव्यक्ती वाढत राहतात. समृद्ध होत राहतात. आज माझ्या घरी बसून मला जपानी खेड्यामधली मुलगी कशी जगते हे कळू शकतं. कोकणातल्या एका घरामध्ये गौरीगणपती कसे सजतात हे व्हिएतनाममधली काकू टक लावून पाहत असते. आपल्या कंफर्ट लेव्हलच्या बाहेर जाऊन इतरांचं आयुष्य कसं असतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करणारा हा अभिजनवर्ग आता तयार होत आहे. भाषा, देश, जात, धर्म, वंश, लैगिकत्व यांसारख्या रेषा खोदून खोदून अधिक ठळक आणि खोल रक्तबंबाळ करण्याच्या जगामध्ये असे काही छोटे छोटे कलाइडोस्कोप आहेत जे आजही आपल्याला असे वैविध्यपूर्ण, आकर्षक रंगीबेरंगी नक्षीकाम दाखवतात. इतना भी बुरा नही है हाल इस दुनिया का बस थोडा और हसा किजिए असं समजावतात. त्या क्षणांपुरते का होईना आपण या महिलांच्या आयुष्याचा एक भाग बनतो, त्यांच्या प्रवासाचे हमकदम होतो, सध्यापुरते हेही नसे थोडके!!!

वर
0 users have voted.